मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२६

दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दीपावली वस्तू प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद - 24 विशेष शाळांचा सहभाग, ३५ हजारांची विक्री

- सांगली, दि. 3 (जि. मा. का.) : जिल्हा परिषद सांगली आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यातील दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध दीपावली वस्तूंचे प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ३५,००० रुपयांपर्यंतच्या वस्तूंची विक्री झाली आहे. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी महेश धोत्रे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दादासाहेब कोळेकर यांच्या हस्ते व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा कृषी अधिकारी मनोज वेताळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुनंदा ठवळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी नानासाहेब हजारे आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी संदीप पाटील उपस्थित होते. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून व कलाकौशल्यातून तयार केलेल्या आकर्षक पणत्या, आकाशकंदील, सजावटीच्या वस्तू आणि हस्तकला साहित्य विक्रीसाठी मांडण्यात आले होते. जिल्ह्यातील २४ विशेष शाळांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला होता. दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आणि सर्जनशीलता असून, त्यांना योग्य संधी मिळाल्यास ते स्वावलंबी बनू शकतात, हे या उपक्रमातून दिसून आले. नागरिकांनी या वस्तूंची खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विक्रीचा अनुभव मिळण्यासोबतच आर्थिक उत्पन्नाची संधी उपलब्ध झाली. कार्यक्रमास विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा