शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०

रस्ता सुरक्षेबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा - खासदार संजय पाटील

सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : प्रत्येक जीव अनमोल आहे. मात्र, रस्ते अपघातात विविध कारणांनी अनेकांचे जीव जातात. ओव्हर स्पीड, मोबाईलवर बोलणे, ट्रॅक्टर ट्रॉलीला परावर्तक नसणे अशा अनेक कारणांनी रस्ते अपघात होतात. जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृतांच्या संख्येत घट झाली आहे. ही बाब आशावादी असली तरी, यापुढील काळात अपघात रोखण्यासाठी, रस्ता सुरक्षेसाठी प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदि संबंधित यंत्रणांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असा सूचना खासदार संजय पाटील यांनी दिल्या.
    जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. यावेळी जिल्ह्यातील रस्ते अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या बाबींचा उहापोह करण्यात आला. बैठकीस आमदार सुमनताई पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार काटकर, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एम. एस. मगदुम यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
    खासदार संजय पाटील म्हणाले, अपघात होऊ नयेत, वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणेंनी आवश्यक त्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात. वेगमर्यादेवर नियंत्रण, स्पीड ब्रेकर, ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात. मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस विभागाने कारवाई करावी. स्कूल व्हॅनमध्ये प्रमाणित केलेलेच सीएनजी किट असावे. घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करू नये. असे कोणी करत असल्यास परिवहन विभागाने त्याची तपासणी करूत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. नागरिकांना रस्त्यावरील खड्‌ड्यामुळे कोणताही त्रास होणार नाही व जाण्यायेण्यासाठी सुलभता व्हावी या दृष्टीने संबंधित यंत्रणेने रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरून घ्यावेत. महामार्गांची कामे संबंधितांनी विहीत वेळेत पूर्ण करावीत. काही अडचण आल्यास जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून काम पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.  
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी संबंधित विभागांनी रस्ता सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी व ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत कार्यवाही करावी. महामार्गाचे काम विहीत वेळेत पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी काही अडचण आल्यास जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्याशी संपर्क साधून त्या सोडवाव्यात असे सांगितले.
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, जिल्ह्यात 36 ब्लॅक स्पॉट आहेत. त्यावर सूचविलेल्या उपाययोजनाप्रमाणे सदरची कामे संबंधित विभागाने तात्काळ पूर्ण करावीत. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या इलेक्ट्रीक खांबामुळे बरेच अपघात होत आहेत. यासाठी महावितरणने आवश्यक ती कार्यवाही करावी. सांगली शहरात रस्ते वाहतुक सुरळित ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी सिग्नल लावण्याबरोबरच महापालिकेने आवश्यक त्या ठिकाणी प्लॅस्टिक बॅरिकेटस लावावेत अशा सूचना केल्या.
रस्ते अपघातांची आणि मृतांची संख्या कमी करणे या मूळ उद्देशांच्या अनुषंगाने बैठकीत रस्ते अपघात कमी करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच, मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई, गरजेच्या ठिकाणी गतिरोधक, ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर ट्रॉल्या, बैलगाड्या परावर्तक, सिग्नल यंत्रणा, आवश्यक ठिकाणी रस्ता रूंदीकरण, रस्ता दुभाजक आदि बाबींवर बैठकीत चर्चा करून संबंधितांना योग्य ते निर्देश देण्यात आले.
00000


सामाजिक माध्यमांच्या वापराबाबत जागृतीसाठी सायबर सेफ वुमेन मोहिम अत्यंत महत्वपूर्ण - महापौर संगीता खोत

महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दल सदैव सज्ज- पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा

     सांगली, दि. 3, (जि. मा. का.) :  सामाजिक माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यांच्या वापराबाबत जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने राबविण्यात येत असलेली सायबर सेफ वुमेन मोहिम अत्यंत महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर संगीता खोत यांनी केले.
     महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी सुरक्षा विषयक कायद्यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष पोलिस महानिरिक्षक महाराष्ट्र राज्य सायबर मुंबई यांच्या आदेशाने पोलिस अधिक्षक कार्यालय सांगली सायबर पोलिस ठाणे व जिल्हा माहिती कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सेफ वुमेन मोहिमेतंर्गत कृष्णा मॅरेज हॉल विश्रामबाग येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर संगीता खोत बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा होते. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक मनिषा डुबुले, सायबरतज्ज्ञ विनायक राज्याध्यक्ष, बार असोशिएशनच्या महिला सचिव ॲड. मुक्ता दुबे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, सायबर शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे, पोलीस हेडकाँस्टेबल सिध्दार्थ कांबळे, मराठा सेवा संघ उद्योजक कक्ष अध्यक्षा तेजस्विनी सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक माध्यमांचा वापर करताना महिलांनी सजक राहा, कोणत्याही अमिषाला भूलथापांना बळी पडू नका. कठीण प्रसंग ओढवल्यास पोलिस यंत्रणाची मदत घ्यावी, असे आवाहनही महापौर संगीता खोत यांनी केले.

डरना मत , कहना मेरा भाई एस पी है - पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा

सायबर स्टॉकिंगला महिला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. सामाजिक माध्यमांच्या वापराबाबत महिलांना त्यांचे अधिकार माहिती असणे आवश्यक आहे. तुमची शांतता, सुरक्षितता, मानसिक स्वास्थ हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तुमच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दल सदैव सज्ज असून कोणत्याही दबावाला बळी पडू नका. कोणी तुम्हाला त्रास देत असल्यास निर्भय होऊन पोलिस यंत्रणेची मदत घ्या. कोणालाही घाबरू नका, असे सांगून पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी डरना मत कहना मेरा भाई एस पी है अशा शब्दात महिलांना आश्वस्त केले. यावेळी त्यांनी महिलांसाठी 1091 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू आहे. तसेच सर्व पोलिस ठाण्यामध्ये सखी हेल्प डेस्क सुरू करण्यात आला आहे. निर्भया पथके सक्षमपणे कार्यरत आहेत. सायबर गुन्ह्यांबाबत सायबर सेल मदतीसाठी तत्पर आहे. महिलांनी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक तेंव्हा यांची मदत घ्यावी, असे आवाहन केले.
यावेळी सामाजिक माध्यमांचा वापर सजकतेने व दक्षतेने करण्याचे आवाहन करून आपले पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. पासवर्ड निवडताना वैशिष्टपूर्ण अक्षरांचा वापर करा. फेसबुकच्या खात्यामध्ये पब्लिक अक्सेस देऊ नका. अनोळखी प्रोफाईलवर संभाषण करू नका असे सांगून व्हॉटस्ॲप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यास त्यांची जबाबदारी ग्रुप ॲडमिनवर निश्चित करण्यात येईल याची जाणीव ही पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी केली.
अप्पर पोलिस अधिक्षक मनिषा डुबुले म्हणाल्या, सध्याचे युग हे संगणकाचे आहे. जग जवळ आले असले तरी सायबर क्राइमही वाढला आहे. फेसबुक, व्हॉटस्ॲप आदी सामाजि‍क माध्यमातून फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. यात मोठ्या प्रमाणावर महिला बळी पडत आहेत. अशा वेळी तंत्रज्ञानाच्या होत असलेल्या दुरपयोगाबद्दल जाणीव जागृती करण्याच्या दृष्टीने सायबर सेफ वुमेन मोहिम कार्यक्रम घेण्यात येत आहेत. महिलाच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दल अविरत सज्ज आहे.
या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलताना सायबरतज्ज्ञ विनायक राजाध्यक्ष म्हणाले, दिवसेंदिवस समाजमाध्यमांचा वापर वाढत असून सायबर क्षेत्रात महिलांबाबत असुरक्षितता वाढली आहे. प्रोफाईल हॅकिंग, लिंक बेटींग, ऑनलाईन शॉपींग, सायबर स्टेकींग, सायबर बुलींग यासारख्या बाबींना महिला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत त्यामुळे बदलत्या काळात महिलांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून समाजमाध्यमांचा अधिक दक्षतेने वापर करावा.
ॲड. मुक्ता दुबे यांनी महिलांवरील अत्याचार व त्यासंबधात असणाऱ्या कायद्यांबाबत, न्यायिक प्रक्रियेबाबत माहिती दिली.स्वागत व प्रास्ताविक अप्पर पोलिस अधिक्षक मनिषा डुबुले यांनी केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी मानले. या कार्यक्रमाला विविध शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्या, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, महिला दक्षता समितीच्या सदस्या, पोलिस यंत्रणेतील विविध अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
0000








सायबर गुन्ह्यांचा वेळीच प्रतिबंध करण्यासाठी अधिक सतर्क आणि दक्ष राहणे गरजेचे -सायबरतज्ज्ञ विनायक राजाध्यक्ष

महिला सुरक्षा विषयक कार्यशाळा संपन्न

    सांगली, दि. 2, (जि. मा. का.) :  सायबर गुन्ह्यांचा वेळीच प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण समाजानेच विशेषत: महिलांनी अधिक सतर्क आणि दक्ष राहणे गरजेचे असून यासाठी समाज माध्यमांबाबत जाणीवजागृती वाढविणे गरजेचे असल्याचे मत सायबरतज्ज्ञ विनायक राजाध्यक्ष यांनी आज येथे बोलतांना केले.
     जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पत्रकारांसाठी आत्मा सभागृहात आयोजित केलेल्या महिला सुरक्षा कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेस सायबर शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, ॲड. रूपाली मेटकरी, निवृत्त माहिती अधिकारी एस. आर. माने, माहिती सहाय्यक एकनाथ पवार आदि उपस्थित होते.
     दिवसेंदिवस समाजमाध्यमांचा वापर वाढत असून सायबर क्षेत्रात महिलांबाबत असुरक्षितता वाढली आहे. प्रोफाईल हॅकिंग, लिंक बेटींग, ऑनलाईन शॉपींग, सायबर स्टेकींग, सायबर बुलींग यासारख्या बाबींना महिला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत त्यामुळे बदलत्या काळात महिलांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून समाजमाध्यमांचा अधिक दक्षतेने वापर करावा, असे आवाहन करून सायबरतज्ज्ञ विनायक राजाध्यक्ष म्हणाले, समाजमाध्यमांविषयी तांत्रिक ज्ञान वाढविणे गरजेचे असून यासाठी संपूर्ण समाजात सायबर साक्षरता आणि प्रबोधनाची नवी चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. सायबर गुन्ह्यामध्ये महिला बळी पडणार नाहीत या दृष्टीने समाजमाध्यमांविषयी अधिक माहिती करून घेणेही गरजेचे आहे. 
     सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे असून समाजात प्रत्येक घटकाने डोके शांत ठेवून, डोळे उघडे ठेवून समाजमाध्यमांचा काळजीपूर्वक वापर करावा असे आवाहनही  सायबरतज्ज्ञ विनायक राजाध्यक्ष यांनी केले.
     या प्रसंगी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे म्हणाले, महिलांची कसल्याही प्रकारे फसवणूक अथवा अडवणूक होणार नाही यासाठी त्यांनी समाजमाध्यमांचा काळजीपूर्वक वापर करावा. समाजात दिवसेंदिवस सायबर गुन्हे वाढत असून या गुन्ह्यांचा वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहेच तथापी, सायबर गुन्हे घडणारच नाहीत यासाठी या माध्यमांचा काळजीपूर्वक वापर करणे काळाची गरज बनली आहे. सायबर गुन्ह्यांविषयी समाजाने विशेषत: महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती उदाहरणासह दिली.
     या प्रसंगी बोलताना ॲड. रूपाली मेटकरी यांनी महिला सुरक्षा विषयक अनेक कायद्यांची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने महिलांवर होणारे कौटुंबिक हिंसाचार, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ, हुंडाबळी, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा अशा सर्वच कायद्यांची सोप्या पध्दतीने माहिती दिली.
     जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले आणि महिलांविषयी असणारे कायदे तसेच योजनांची माहिती दिली. निवृत्त माहिती अधिकारी एस. आर. माने यांनी आभार मानले.
     या प्रसंगी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सुरू केलेल्या सखी मदत केंद्राविषयी माहिती देण्यात आली. महिला सुरक्षा विषयक योजना व कायद्यांविषयी प्रश्नोत्तरेही घेण्यात आली.
     या कार्यशाळेस वृत्तपत्र व प्रसार माध्यमांचे संपादक, प्रतिनिधी, सखी मदत केंद्राच्या महिला, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000000


   
 

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करा - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

शेतकऱ्यांच्या बांधावर जावून विभागीय आयुक्त यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

            सांगली, दि. 2, (जि. मा. का.) :  पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत, असे निर्देश देवून नुकसानीची भरपाई लवकरच दिली जाईल, अशी ग्वाही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज शेतकऱ्यांना दिली.
डॉ. म्हैसेकर यांनी आज सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज, शेळकेवाडी व तासगाव तालुक्यातील मणेराजुरी व कवठेएकंद येथील नुकसानग्रस्त द्राक्ष, डाळींब, ज्वारी, सोयाबीन आदि पीकांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, उपविभागीय अधिकारी मिरज समिर शिंगटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी आदी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर यांनी पीकांची पाहणी केल्यावर नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे, शेतकऱ्यांकडे अनावश्यक कागदपत्रे मागू नयेत असे सांगून पंचनाम्यांसाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, नुकसान झालेल्या पिकांचे छायाचित्रे काढून ठेवावी, अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या. पीक विमा उतरलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याबाबतची कागदपत्रे तयार करावीत. त्यासाठी विमा प्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी एकत्र येऊन काम करावे, असे सांगितले.
जिल्ह्यात माहे ऑक्टोबर महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेत एकूण दोन ते अडीच पट पाऊस जास्त झाला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 512 गावांमधील १ लाख १७ हजार ५८२ शेतकऱ्यांचे ५५ हजार १३६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे   33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक नजरअंदाज आहे. यामध्ये परतीच्या पावसामुळे काढणी योग्य सोयाबीन, मका, भुईमुग, ज्वारी व बाजरी आदि पिकांचे नुकसान झाले आहे. अतिजोराच्या अवेळी झालेल्या पावसामुळे फळे व भाजीपाला पिकांचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. काही ठिकाणी द्राक्षांचे घड कुजले आहेत. द्राक्षावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. डाळिंबाची फळे झडली आहेत. हवेतील आद्रता वाढून फळकुज, बॅक्टेरिया व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. रब्बी हंगामातील उगवण झालेली मका व रब्बी ज्वारी पीक अतिपावसामुळे काही ठिकाणी पिवळे पडले आहे. एकूणच परतीच्या अवेळी पावसामुळे जिल्ह्यात कृषि क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी देवून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना पंचनामे त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

00000