सोमवार, ४ मे, २०२०

इस्लामपूर येथील कंन्टेंन्मेंट झोनची अधिसूचना रद्द - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 04, (जि. मा. का.) : कोव्हिड 19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने इस्लामपूर शहरातील मध्यभागी दि.13 मार्च 2020 पासून कंन्टेन्मेंट झोनची अमंलबजावणी करण्यात आली होती. त्यास 43 दिवस पूर्ण झाले आहेत. सदर बाधित क्षेत्रातील शेवटची पाझीटीव्ह केस दि. 4 एप्रिल 2020 रोजी निदर्शनास आली असून तदनतंर एकही नवीन रूग्ण्‍ आढळून आला नाही. त्या नतंर सलग 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे इस्लामपूर येथील कंन्टेंन्मेंट झोनची अधिसूचना रद्द करण्यात आली आहे अशी  माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. 
इस्लामपूर नगरपालिका हद्दीत कोरोना बाधित रूग्ण्‍ आढळून आलेले होते. त्या ठिकाणी तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये इस्लामपूर नगरपरिषद हद्दीत कन्टेंन्मेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते.
0000

सांगली जिल्ह्यातून बाहेर जाऊ इच्छिणाऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावे -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 04, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात अडकलेले परराज्यात, परजिल्ह्यातील मजूर, यात्रेकरू, विद्यार्थी, पर्यटक व अन्य कामासाठी अडकलेल्या व्यक्ती यांना त्यांच्या स्वगृही जायाचे असल्यास त्यांनी https://covid19.mahapolice.in यावर ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
सांगली जिल्हयातून बाहेर जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येण्याची आवश्यकता नाही. सदर व्यक्तींनी https://covid19.mahapolice.in यावर ऑनलाईन अर्ज करावेत. शासन निर्णयामधील सर्व कार्यवाही पूर्ण केल्यानंतर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रवासासाठीची परवानगी सदर प्रवाशी ज्या जिल्हयात जाऊ इच्छितात त्या संबंधित जिल्हादंडाधिकारी यांना पाठविण्यात येईल. संबंधित जिल्हादंडाधिकारी यांच्याकडून प्रवासासाठी परवानगी दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून अंतिम परवानगी देण्यात येईल. त्यानंतरच सदर व्यक्तीला प्रत्यक्ष प्रवासास सुरुवात करता येईल. परवानगी मिळालेले व्यक्ती ज्या वाहनाने प्रवास करणार आहेत, अशा वाहनांना जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून प्रवासाचा निश्चित मार्ग कालावधी नमूद करून देण्यात आलेला पास सोबत असणे बंधनकारक असणार आहे.
सांगली जिल्ह्यातून जाण्यासाठी प्रवास परवानगीच्या अर्जासाठी  https://sangli.nic.in/notice/regarding-filling-information-for-tourists-students-pilgrims-workers-others-to-travel-from-sangli-district-to-other-states-districts/ या देखील गुगल लिंकचा वापर करता येईल. 
सांगली जिल्ह्यात येण्यासाठी
तसेच सांगली जिल्ह्यातील परराज्यात, परजिल्ह्यात अडकलेल्या व्यक्तींनी त्यांच्या स्वगृही येण्यासाठी, ते ज्या ठिकाणी अडकले आहेत त्या ठिकाणच्या जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे प्रवासाच्या परवानगीसाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. असे ही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले. संदर्भात काही शंका असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक 0233-2600500 व मो.क्र. 9370333932, 8208689681 या क्रमांकावर संबंधित व्यक्तींनी संपर्क साधावा. तसेच टोल फ्री क्रमांक 1077 ची संपर्क सुविधा सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांकरीता उपलब्ध आहे.
सदर प्रवासासाठी संबंधित जिल्हादंडाधिकारी यांचे ना हरकत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या  कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर त्यांना सांगली जिल्ह्यात येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून परवानगी दिली जाईल. या प्रमाणे सांगली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. सदर तपासणी करण्यासाठी जिल्हा स्थलसीमा हद्दीवरील चेक पोस्टवर व आरोग्य पथके नेमण्यात आलेली आहेत. तसेच सदर प्रवाशांना सक्तीने 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात येईल. देण्यात येणारी परवानगी ही जिल्ह्यात घोषित करण्यात आलेल्या व या पुढे वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या कंटेनमेंट झोन मधील व्यक्तींना दिली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

0000

सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 03, (जि. मा. का.) : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीत एकाची कोरोना चाचणी  पॉझीटीव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी  माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे – सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील 1) वाघमोडेनगर मेन रोड ते रुमाले नगर डॉ. खोत दवाखाना उत्तर बाजू  2) रुमाले नगर ते स्वामी मळा पाठीमागील बाजून कुपवाड एमआयडीसी हद्दीवरील स्वामी मळा मोबाईल टॉवर पर्यंत 3) कुपवाड एमआयडीसी हद्दीवरील स्वामी मळा मोबईल टॉवर ते एमआयडीसी हद्दीतील राजरामबापू कॉलनी पर्यंत 3) राजरामबापू कॉलनी ते शिवशक्ती नगर उत्तर हद्दीतील जलराम ट्रेडर्स ते मोबाईल टॉवर दक्षिण उत्तर मिरज रोड पूर्व बाजुकडील रुमाले नगर पर्यंत असा आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे – 1) कुपवाड महावीर व्यायाम शाळा ते कुपवाड एमआयडीसी मेन रोड ते सावळी रोड चौक पर्यंत 2) सावळी रोड चौक ते मिरज एमआयडीसी रोड लठ्ठे  तंत्रनिकेतन ते मिरज एमआयडीसी जकात नाका पर्यंत 3) मिरज एमआयडीसी जकात नाका ते शिवशक्तीनगर दक्षिण हद्दीतील कुपवाड मिरज रोड पोलीस पार्क उत्तर बाजूपर्यंत 4) पोलीस पार्क ते लाड नगर पूर्व बाजू विजयनगर रस्ता 5) लाड नगर ते सिदधार्थनगर ते महावीर व्यायाम शाळापर्यंत असा आहे.

00000

सांगली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आल्याने काही प्रमाणात सुट तरी सोशल डिस्टसिंग पाळणे अनिवार्यच - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 03, (जि. मा. का.) : लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या झोनमध्ये सांगली जिल्हा ऑरेंज झोन मध्ये आल्याने काही प्रमाणात सुट देण्यात आली आहे. सोशल डिस्टंसिंग पाळणे, आनावश्यक गर्दी न करणे, मास्क वापरणे या अटी शर्तीना अधिन राहून देण्यात शिथिलता आले आहे. आता पर्यंत जी आपण शिस्त पाळली आहे त्यामुळे जिल्हा रेड झोन मधून ऑरेंज झोनमध्ये आला आहे. जर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली तर पुन्हा आपला झोन बदलून पुन्हा रेड झोन मध्ये जाऊ शकतो.  त्यामुळे ज्या सवलती आपल्या मिळाल्या आहेत त्या बंद होऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. ज्या सवलती मिळाल्या आहेत त्या शासनाने दिलेल्या निर्देशानूसार वापर करणे आवश्यक आहे. असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात लॉकडाऊनचा कालावधी १७ मे २०२० पर्यंत वाढविणे तसेच या काळात करावयाच्या उपायांच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांसंदर्भात राज्य शासनामार्फत आदेश जारी करण्यात आला. रेड (हॉटस्पॉट),ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील धोक्यांची तीव्रता लक्षात घेऊन या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. काही भागांमध्ये कामांसाठी परवानगी देण्यात आली असली तरी त्यांना कोविड १९ प्रादुर्भावापासून सुरक्षित राहण्यासाठीचे नियम मात्र काटेकोरपणे पाळावे लागतील. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज मध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

कंटेंमेंट झोन असलेल्या परिसरात सद्यस्थितीत चालू असलेल्या नियमावलीत कोणताही बदल होणार नाही. अत्यावश्यक, जिवनावश्यक वस्तुंच्या विक्री व वैद्यकीय अस्थापना या शिवाय या परिसरामध्ये काहीही उघडे राहणार नाही. कंटेन्मेंट झोनमधील १००  टक्के नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे अनिवार्य. आत आणि बाहेर जाण्याचे मार्ग निश्चित केलेले राहतील. सहवासितांचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग), विशेष पथके स्थापन करून त्याद्वारे घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण करणे, जनतेचे समुपदेशन आणि प्रबोधन याबाबी सुरुच राहतील. कंटेन्मेंट झोन हद्दीत कठोर नियंत्रण राखणे आवश्यक राहील. वैद्यकीय आणीबाणी तसेच जीवनावश्यक वस्तू व सेवा याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणाने कोणाही व्यक्तीची/लोकसंख्येची या कंटेन्मेंट झोनबाहेर किंवा बाहेरून आत हालचाल/प्रवास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.

रेड, ऑरेंज किंवा ग्रीन अशा कुठल्याही झोनमधील खालील गोष्टींना लॉकडाऊनच्या काळात कायमस्वरूपी बंदी असेल. विमानवाहतूकीला बंदी. तथापि वैद्यकीय सेवा तसेच अपवादात्मक परिस्थितील हवाई ॲम्बुलन्स सेवा आणि इतर आवश्यकता वाटल्यास वैद्यकीय सेवा. ट्रेन वाहतूक पूर्णपणे बंद राहील, तथापि अत्यावश्यक कारणासाठी ट्रेनने प्रवास करण्यासाठी परवानगी. आंतरराज्यीय बसवाहतूक पूर्णपणे बंद, तथापि अत्यावश्यक कारणासाठी  परवानगी. वैयक्तीकरित्या कोणालाही आंतरराज्यीय प्रवास करण्यास बंदी. वैद्यकीय कारणास्तव तसेच अत्यावश्यक लोकांना परवानगी.

शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था विविध क्लासेस यांना बंदी. ऑनलाईन/ इ-लर्निग शिक्षणाला परवानगी. सर्व सिनेमागृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, क्रीडासंकुल, तरणतलाव, करमणूक संकुले, नाट्यगृहे, बार आणि ऑडिटोरियम, हॉल यांना पूर्णपणे बंदी. सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक सण आणि कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी. सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे यांना बंदी. धार्मिक कारणासाठी एकत्र येण्यावर बंदी.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वैयक्तिक जाण्या-येण्यावर रात्री ७ ते सकाळी ७ पर्यंत पूर्ण बंदी.  सर्व क्षेत्रात ६५ वर्षावरील नागरिकांना आजारी व्यक्तींना, गर्भवती महिला, 10 वर्षाच्या आतील मुले यांना सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून फिरण्यावर बंदी, वैद्यकीय कारणास्तव डॉक्टरांकडे जाण्याची मुभा देण्यात आली आहे.

ऑरेंज झोनमध्ये (कंटेनमेंट झोन बाहेर) आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बस सेवा बंदच राहील. एक वाहनचालक व दोन प्रवाशांसह टॅक्सी व कॅब यांना परवानगी देण्यात येईल. चारचाकी वाहनांमध्ये वाहनचालकाशिवाय केवळ दोन व्यक्तींनाच प्रवास करण्याची मुभा असेल.

ग्रामीण भागातील सर्व उद्योग सुरु राहतील. याबाबतील कामगारांचा निवास व समर्पित वाहनाची अट शिथिल करण्यात आली आहे. तर शहरी भागातील उद्योगांसाठी ही कामगारांच्या निवासाची अट शिथिल केली असून समर्पित वाहनाची अट ऐच्छिक केली आहे.

शहरी भागातील बांधकामे : केवळ परिस्थितीजन्य बांधकामे (जेथे प्रत्यक्ष जागेवर कामगार उपलब्ध असतील आणि बाहेरून कामगार आणण्याची आवश्यकता नाही) आणि नविनीकरण उर्जा प्रकल्पांच्या बांधकामांना परवानगी आहे. ग्रामीण भागात सर्व बांधकामांना परवानगी आहे.

शहरी भागात सर्व मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स आणि मार्केट बंद राहतील (महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील भाग.) तथापि, बाजारपेठ आणि बाजार संकुलांमध्ये आवश्यक वस्तू विकणार्‍या दुकानांना परवानगी आहे. शहरी भागातील एकाकी दुकाने, संकुलाजवळील तसेच निवासी संकुलातील दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. आवश्यक आणि अनावश्यक असा कोणताही भेद न करता एका रांगेत/रोडमध्ये (लेनमध्ये) पाच पेक्षा जास्त दुकाने खुली असू नयेत. जर एखाद्या लेनमध्ये/ रोडवर पाचपेक्षा जास्त दुकाने असतील तर जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने खुली राहतील. ग्रामीण भागातील मॉल वगळता सर्व दुकाने आवश्यक व अनावश्यक भेद न करता खुले ठेवण्याची परवानगी आहे. सर्व बाबतील सोशल डिस्टसिंग पाळणे अनिवार्य करण्यात आले आहे.

कॉमर्स उपक्रमांना केवळ जीवनावश्यक वस्तू, औषध, वैद्यकीय उपकरणे, सीटीओ आदी विक्री करण्यासंदर्भात परवानगी असेल.

खासगी कार्यालये ३३ टक्के मनुष्यबळाचा वापर करून सुरू करू शकतील. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये ही उपसचिव व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती ही १०० टक्के तर ३३ टक्के इतर कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील. तथापि, संरक्षण आणि सुरक्षा सेवा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पोलीस, कारागृह, गृहरक्षक, नागरी संरक्षण, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि संबंधित सेवा, एनआयसी, सीमा शूल्क, एफसीआय, एनसीसी, एनवायके आणि महानगरपालिका सेवा कोणत्याही निर्बंधाशिवाय सुरू राहतील.

मान्सूनपूर्व सर्व कामे, ज्यामध्ये इमारतीचे संरक्षण, शटरिंग, वॉटरप्रूफिंग, पूर संरक्षण, इमारती दुरुस्ती सुरक्षितरीत्या इमारती पाडणे इत्यादी कामांचा समावेश आहे. इतर मान्सूपूर्व कामांना परवानगी दिली आहे.

या मार्गदर्शक सूचनांन्वये ज्या बाबींना विशेषत्वाने करण्यास परवानगी देण्यात आली आहे/काही अटी शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. अशा सर्व बाबीं व्यतिरिक्त इतर सर्व बाबी विविध प्रकारच्या झोनमध्ये करण्यास परवानगी असेल. तथापि, कोवीड १९ चा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने परिस्थितीचे अवलोकन करून, ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे, अशांपैकी काही निवडक बाबींस गरज वाटल्यास अटी शर्तीसह परवानगी दिली जाईल.

आंतरराज्य मालवाहतुकीसाठी तसेच रिकाम्या ट्रक्स करिता राज्य आणि जिल्हा प्राधिकारी परवानगी देतील.

पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास कलम 144 नूसार बंदी राहील लग्न सोहळ्यांसाठी सोशल डिस्टसिंग पाळून जास्तीजास्त 50 लोकांना परवानगी दिली आहे. अत्यंसंस्कारासाठी पुर्वीप्रमाणेच 20 लोकांना एकत्रित येण्यास परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी आहेच या पुढे दंड आकारणी होईल. सार्वजनिक ठिकाणी दारु, पान तांबाखुजन्य पदार्थावर बंदी आहे. तसेच पान व तंबाखुजन्य पदार्थावर विक्री करण्यास बंदी असणार आहे. लिकरची दुकाने सुरु राहतील पण केवळ सोशल डिस्टसिंग पाळून विक्री सुरु राहील. या ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोक राहू नयेत अशी अट टाकण्यात आली आहे. या संदर्भात उत्पादन शुल्क विभाग अधिक सूचना असल्यास स्वतंत्रपणे निर्देश प्रसिध्द करतील. परमिट रुम व बार बंदच राहतील. सर्व कामांच्या ठिकाणी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड केले जाईल. अंतर जिल्हा वाहतुक होत असताना बाबींना परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी ई-पासची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील.

लॉकडाऊन उपाय योजना आणि कोव्हीड १९ व्यवस्थापनाचे निर्देशांचे उल्लघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० अंतर्गत तसेच भारतीय दंड संहिता (IPC) सेक्शन १८८ आणि इतर कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल.
00000


शनिवार, २ मे, २०२०

मौजे-दुधेभावी येथे कोराना बाधित रूग्ण आढळून आलेल्या ठिकाणापासून 1 कि.मी. त्रिज्येमध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित

सांगली, दि. 02, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील मौजे-दुधेभावी या ग्रामपंचायत     हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेले आहेत. या भागात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार होवू नये यासाठी सदर भागातील    व्यक्ती, जनतेच्या हालचालींवर व प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर जाणे व बाहेरून प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध घालणे   आवश्यक आहे. तातडीची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सदरचा भाग प्रतिबंधित करण्याच्या अनुषंगाने भारतीय साथ रोग     नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील मौजे-दुधेभावी येथे कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेल्या ठिकाणापासून 1 कि.मी. त्रिज्येमध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - (1) दुधेभावी - निमजकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दक्षिणेकडील भाग, (2) निमज रस्ता - दुधेभावी पाझर तलाव च्या पूर्वेकडील बाजूचा भाग, (3) दक्षिण बाजूस पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा ओढा, (4) नामदेव फोंडे शंकर फोंडे व जाधव वस्ती च्या पश्चिमेकडील भाग. या क्रमंाक 1 ते 4 च्या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र. या भागांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशी अधिसूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केली आहे.


00000

शुक्रवार, १ मे, २०२०

शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ त्वरीत मिळणे आवश्यक - पालकमंत्री जयंत पाटील

- कोणत्याही परिस्थितीत कृषि पंपांच्या प्रलंबित विद्युत जोडण्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा
- पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई वंचित शेतकऱ्यांना त्वरीत द्या

सांगली, दि. 01, (जि. मा. का.) : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे  लाभ मिळण्यात विलंब होत असल्याचे आढळून येत आहे. याची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याच्या वारसांना तातडीची मदत व्हावी यासाठी कृषि विभागाने शेतकऱ्याच्या अपघातानंतर कुटुंबियांकडून त्वरीत कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. तसेच विमा कंपन्यांकडून सदरचे क्लेम संबंधितांना मिळवून देईपर्यंत डेडीकेटेड पाठपुरावा करावा, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, महावितरणचे प्रभारी अधिक्षक अभियंता पराग बापट, कृषि उपसंचालक सुरेश मगदूम आदि उपस्थित होते.

           कोणत्याही परिस्थितीत कृषि पंपांच्या प्रलंबित विद्युत जोडण्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा…
कृषि पंपांच्या विद्युत जोडणीसाठी अनामत रक्कम भरूनही महावितरणकडे सुमारे १० हजार विद्युत जोडण्या प्रलंबित आहेत. याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सद्या ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे सदर विद्युत जोडणीचे काम आहे त्याचे काम समाधानकारक नाही त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अतिरीक्त मनुष्यबळ देऊन पावसाळ्यापूर्वी प्रलंबित असणाऱ्या संपूर्ण विद्युत जोडण्या पूर्ण कराव्यात. जिल्ह्यातला बराचसा भाग दुष्काळी असल्याने त्यांना पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कृषि पंपांच्या विद्युत जोडणीचे काम पूर्ण करावे, असे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

     पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई वंचित शेतकऱ्यांना त्वरीत द्या…
सांगली जिल्ह्यात सन 2019 मध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या कृषि क्षेत्रासाठी शासनाकडून नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झालेली आहे. तथापी जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांपर्यंत सदरची रक्कम पोहोचली नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, ॲक्सीस बँक व फेडरल बँक यांच्याकडील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या न आल्याने रक्कम शेतकऱ्यांच्या खाती वर्ग होऊ शकली नाही, असे यावेळी सांगण्यात आले. यावर संबंधितांकडून त्वरीत याद्या प्राप्त करून घेऊन रक्कम तात्काळ शेतकऱ्यांची खाती वर्ग करा, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक यांना दिले.

या बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी हवामान आधारीत फळपीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, द्राक्ष व डाळींब पिकासाठी अंश तपासणी प्रयोगशाळा आदि सर्व विषयांवर सविस्तर चर्चा केली. 

कोविड-19 च्या आयसोलेशन कक्षात काम करणाऱ्या पथकाला आवश्यक सर्व सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा - पालकमंत्री जयंत पाटील

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरजच्या आधुनिकीकरणासाठी आराखडा तयार करा
    
सांगली, दि. 01, (जि. मा. का.) : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी विविध यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कोविड-19 च्या आयसोलेशन कक्षात काम करणाऱ्या पथकाला आवश्यक सर्व सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा असे सांगून कोविड रूग्णांना देण्यात येणाऱ्या उपचाराबाबत सखोल विचारणा केली.
या बैठकीस कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील कोविड संदर्भातील रूग्णांची सद्यस्थिती जाणून घेतली. यामध्ये आजअखेर ८९१ थ्रोट स्वॅब तपासण्यात आले असून त्यापैकी ३१ पॉझीटीव्ह तर ८३२ निगेटीव्ह (रिपीट ९८) अहवाल प्राप्त झाले आहेत. २८ अहवाल प्रलंबित आहेत. २६ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ४ रूग्ण कोविड रूग्णालयात मिरज येथे उपचाराखाली आहेत. ८ ठिकाणी करण्यात आलेल्या संस्था अलगीकरणामध्ये एकूण १७० व्यक्ती आहेत. तर गृह अलगीकरणामध्ये ३९६ व्यक्ती आहेत. संभाव्य रूग्ण वाढ परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील त्रिस्तरीय उपचार पध्दती कार्यान्वीत करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामध्ये ३८ ठिकाणी कोविड केअर सेंटर, ४९ ठिकाणी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर व ४ जिल्हास्तरीय कोविड हॉस्पीटल यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी या बैठकीत दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज यामध्ये आधुनिकता व सुसुत्रता आणणे आवश्यक आहे त्यासाठी जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांनी सर्वांगीण आराखडा तयार करावा व तो प्रस्तावित करावा. त्याच्या निधीसाठी पाठपुरावा करू असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर ग्रामीण रूग्णालयात टाटा ट्रस्ट मुंबई यांच्यामार्फत इंन्टेसीव्ह केअर युनीट (आयसीयु) ची सुविधा निर्माण करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे सदर ठिकाणी अत्याधुनिक सुविधा निर्माण होतील. त्यासाठी टाटा ट्रस्ट बरोबर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी समन्वय ठेवावा, असे सूचित केले.
महाराष्ट्र व देशभर सांगली जिल्ह्यातील गलई बांधव पसरलेले आहेत. ते ज्या राज्यामध्ये सद्या वास्तव्यास आहे त्या राज्यांनी त्यांना प्रवासाची अनुमती दिली तर त्यांना स्वीकारण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा आवश्यक कार्यवाही करू शकते, असे स्पष्ट करून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, ज्यांना आपल्या मूळ जिल्ह्यात परत यावयाचे आहे त्यांनी संबंधित राज्यातील यंत्रणेकडे संपर्क साधावा. सर्व प्रक्रिया पूर्ण करून जिल्ह्यात परतणाऱ्या नागरिकांना आल्यानंतर पुन्हा १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनामार्फत कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत याचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी उद्योजक उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे  अर्ज येत  आहेत, असे सांगून ज्या उद्योजकांना आपले उद्योग सुरू करावयाचे आहेत त्यांनी कामगारांची वाहतूक करण्यासाठी समर्पित वाहन व्यवस्था करावी, असे निर्देशित केले आहे त्यानुसार जे उद्योजक निर्देशित प्रमाणे सुविधा उपलब्ध करून देतील त्यांना परवानगी देण्यात येत आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील उद्योग पुन्हा सुरू होत आहेत, असे यावेळी सांगितले.
जिल्ह्यात सद्या २१ ठिकाणी शिवभोजन केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांना थाळ्यांची संख्या वाढवून देण्यात यावी, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांना सांगितले.
00000