सोमवार, ४ जुलै, २०२२
शिष्यवृत्ती, फ्रीशिप, आरएसएमएस, निर्वाह भत्ता योजनेकरीता अर्ज करण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदतवाढ
सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील नवीन शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी नवीन व नुतनीकरण अर्जदारांसाठी तसेच सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित नुतनीकरण अर्जदारांसाठी शिष्यवृत्ती, फ्रीशिप, आरएसएमएस, निर्वाह भत्ता या योजनेकरीता अर्ज भरण्याकामी महाडिबीटी प्रणालीवर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून नवीन व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी अनुसचित जाती प्रवर्गाकरीता दि. 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित नुतनीकरण अर्जदारांसाठी व सन 2021-22 मधील नवीन व नुतनीकरण अर्जदारांसाठी दि. 5 जुलै 2022 पर्यंत अंतीम मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेकरीता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावरुन अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित सर्व विद्यालय/ महाविद्यालयांनी विहीत मुदतीत विद्यार्थ्यांचे सर्व योजनांचे अर्ज भरुन घ्यावेत. भविष्यात अंतिम दिनांकानंतर मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्याबाबत किंवा अशा प्रकारे कोणतीही तक्रार निर्माण झाल्यास विद्यालय/ महाविद्यालयास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे.
00000
मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सुचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 9 डिसेंबर 2020 अन्वये निश्चित केल्या आहेत. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या योजनेकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली, जुना बुधगाव रोड सांगली यांच्याकडे सर्व अटी व शर्तीची पुर्तता करून प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
00000
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या लाभासाठी 30 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2022-23 मध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी विहीत नमुन्यात प्रस्ताव दि. 30 ऑगस्ट 2022 अखेर सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे योजनेच्या अटी व शर्तीची पूर्तता करून सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणी करून तीन वर्षे झालेल्या आणि अल्पसंख्याक बहुल जिल्ह्यातील व तालुक्यातील मदरशांना डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतून जिल्ह्यातील मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारीक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दु या विषयांचे शिक्षण देणे, मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इयत्ता 9 वी, 10 वी व 12 वी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे, परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होऊन त्यांची रोजगार क्षमता वाढून आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल या दृष्टिने मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान देणे व शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेच्या अटी व शर्ती तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली, दूरध्वनी क्रमांक 0233-2600525 येथे संपर्क साधावा.
00000
धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधांसाठी 30 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : जिल्हास्तरावर सन 2022-23 मध्ये धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, अपंग शाळा, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी अल्पसंख्यांक विकास विभागाकडील दि. ऑक्टोबर 2015 च्या शासन निर्णयातील निकषांची पुर्तता करून दि. 30 ऑगस्ट 2022 अखेर सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
या योजनेच्या अटी व शर्ती तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली, दूरध्वनी क्रमांक 0233-2600525 येथे संपर्क साधावा.
000000
शुक्रवार, १ जुलै, २०२२
जिल्ह्यातील वारणा धरणात 10.40 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 10.40 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 13.55 (105.25), धोम 4.12 (13.50), कन्हेर 2.33 (10.10), वारणा 10.40 (34.40), दूधगंगा 6.09 (25.40), राधानगरी 2.28 (8.36), तुळशी 1.36 (3.47), कासारी 0.93 (2.77), पाटगांव 1.22 (3.72), धोम बलकवडी 0.76 (4.08), उरमोडी 4.11 (9.97), तारळी 2.04 (5.85), अलमट्टी 48.21 (123).
विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 1600, धोम 0.0, कण्हेर 24, वारणा 580, दुधगंगा 50, राधानगरी 1000, तुळशी 50, कासारी 250, पाटगांव 0.0, धोम बलकवडी 0.0, उरमोडी 550, तारळी 0.0 व अलमट्टी धरणातून 810 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 16.1 (45), आयर्विन पूल सांगली 4.6 (40) व अंकली पूल हरिपूर 3.10 (45.11).
00000
जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 10.5 मि.मी. पावसाची नोंद
सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.1 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 10.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 5.9 (71.9), जत 0.5 (94.4), खानापूर-विटा 0.3 (67.4), वाळवा-इस्लामपूर 2.6 (61.9), तासगाव 1.2 (61.6), शिराळा 10.5 (119.3), आटपाडी 3.7 (67.6), कवठेमहांकाळ 0.8 (56.7), पलूस 0.2 (43.8), कडेगाव 3.4 (54.6).
00000
कृषि दिन उत्साहात साजरा
कृषि संजीवनी सप्ताह मोहिमेचा समारोप
सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती 1 जुलै 2022 जिल्ह्यामध्ये कृषि दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2022 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यामध्ये दि. 25 जुन ते 01 जुलै 2022 दरम्यान राबविण्यात आलेल्या कृषि संजीवनी सप्ताह मोहिमेचा समारोप करण्यात आला.
सांगली येथे आत्मा कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कृषि दिन व कृषि संजीवनी सप्ताह मोहिमेच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ, कृषि उपसंचालक प्रियांका भोसले, तंत्र अधिकारी मयुरा काळे, कृषि पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांसह इतर शेतकरी, कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी उपस्थितांना कृषि विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनां विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना कृषि विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या मोहिमांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व प्रचार प्रसिद्धीसाठी रिसोर्स शेतकरी म्हणून सहभाग घेण्याबाबत आवाहन केले.
वाळवा तालुक्यातील आष्टा येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी संजीव गणपतराव माने यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आधुनिक पद्धतीने शेती करण्याबाबत मार्गदर्शन केले. पडवळवाडी येथील कृषिभुषण सेंद्रीय शेती पुरस्कार प्राप्त शेतकरी सचिन तानाजी येवले यांनी सेंद्रीय शेती पद्धती व विक्री व्यवस्थापन याबाबतउपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. कृषि दिनाचे औचित्य साधून उपस्थित अधिकारी व विविध कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी यांच्याहस्ते कृषि चिकित्सालय फळरोपवाटिका कुपवाड येथील कार्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
प्रास्ताविक तंत्र अधिकारी मयुरा काळे यांनी केले, आभार कृषि उपसंचालक प्रियांका भोसले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी सुरेश ज्ञानदेव चव्हाण (वसंतराव नाईक कृषिभूषण), सुनिल आनंदराव माने (वसंतराव नाईक कृषिभूषण), प्रशांत श्रीधर लटपटे (वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार), काकासाहेब रावसाहेब सावंत (उद्यानपंडीत पुरस्कार) तसेच कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी व मिरज तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
000000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)