मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२
कोयना धरणातून 2100 तर वारणा धरणातून 591 क्युसेक्स विसर्ग सुरू
सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात 34.35 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 104.60 (105.25), धोम 13.50 (13.50), कन्हेर 10.10 (10.10), वारणा 34.35 (34.40), दूधगंगा 21.97 (25.40), राधानगरी 8.22 (8.36), तुळशी 3.47 (3.47), कासारी 2.70 (2.77), पाटगांव 3.70 (3.72), धोम बलकवडी 4.08 (4.08), उरमोडी 9.95 (9.97), तारळी 5.77 (5.85), अलमट्टी 121.09 (123).
विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना - 2100, धोम - 1318, कण्हेर - 574, वारणा - 591, दुधगंगा - 2905, राधानगरी- निरंक, तुळशी - निरंक, कासारी - निरंक, पाटगांव - 250, धोम बलकवडी - 330, उरमोडी - 350, तारळी - 350 व अलमट्टी धरणातून 74 हजार 951 क्युसेक्स विसर्ग सुरु आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 8.7 (45), आयर्विन पूल सांगली 11.6 (40) व अंकली पूल हरिपूर 15.4 (45.11).
00000
गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिध्द - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण 18 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावे
सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये नियमित कर्जदारांना 50 हजार रूपये पर्यंत प्रोत्साहन अनुदान योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. या योजनेच्या अनुषंगाने शासनामार्फत दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी एकूण 62 हजार 642 इतक्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कर्जमाफीच्या पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली आहे. या याद्या ग्रामपंचायत, बॅक शाखा, विकास सोसायटी, सी.एस.सी.सेंटर/आपले सरकार सेवा केंद्र, सहाय्यक निबंधक सहकरी संस्था यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांना पाहण्यास मिळतील. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. यादीमध्ये नाव असलेल्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी कुठलाही विलंब न लावता दि. 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत जवळच्या आपले सरकार केंद्र / सी.एस.सी.सेन्टर किंवा बॅक शाखेत जावून आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे.
आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या सेव्हींग खात्यावर शासनाकडून लाभाची रक्कम संबंधित बँक खात्यावर वर्ग होणार आहे. सांगली जिल्ह्याची एकूण 1 लाख 60 हजार 795 इतक्या खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे. त्यापैकी पहिल्या यादीमध्ये एकूण 62 हजार 642 इतक्या लाभार्थ्यांची नावे समाविष्ट आहेत. उर्वरीत पात्र लाभार्थ्यांच्या याद्या यापुढे शासनाकडून वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी योजना संपण्यापूर्वी विनाविलंब आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे.
आधार प्रमाणीकरण न केल्यास प्रोत्साहनपर अनुदान लाभाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणार नाही. यादीतील लाभार्थ्यांनी यादीमधील आपला विशिष्ठ क्रमांक, आधार कार्ड व बँकेचे पासबुक घेवून जवळच्या आपले सरकार केंद्र / सी.एस.सी.सेंटर किंवा बॅक शाखेत जावून आधार प्रमाणिकरण पुर्ण करावे. आधार प्रमाणिकरण बायोमेट्रीक पध्दतीने किंवा मोबाईल OTP द्वारे करता येईल. या दोन्ही पर्यायाने आधार प्रमाणिकरण न झाल्यास आधार प्रमाणिकरण शक्य नाही (Unable to E-KYC) हा पर्याय निवडून तक्रार करता येईल. या तक्रारींची निराकरण तालुका स्तरीय समिती व जिल्हा स्तरीय समितींमार्फत करण्यात येईल. आधार नंबर किंवा रक्कम चूकीची असल्यास अधार अमान्य किंवा रक्कम अमान्य हा पर्याय निवडून तक्रार जनरेट करावी व मिळणारी पावती स्वत:कडे ठेवावी. तसेच एकापेक्षा जास्त कर्ज खाती असल्यास सर्व खात्यांचे आधार प्रमाणिकरण केल्यानंतर रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मयत लाभार्थ्यांच्या वारसांनी बँकेमध्ये जावून त्यांची वारसनोंद करून घ्यावयाची आहे. तसेच ज्यांनी आपले बँक खात्यास आधार क्रमांक लिंक केलेला नाही त्यांनी तात्काळ आपले आधार लिंक करून घेणे आवश्यक आहे.
सर्व बँकांच्या शाखा, तालुक्यातील उप/ सहाय्यक निंबंधक, सहकारी संस्था, कार्यालय व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय येथे या योजनेसाठी मदत कक्ष उभारणी करण्यात आला आहे. तरी मुदतीच्या आत सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण पुर्ण करून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
00000
बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२
जागतिक दृष्टी दिनी नेत्र चिकित्सा अधिकाऱ्यांना नेत्ररोग आजारांची तपासणी करण्याचे आवाहन
सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : जागतिक दृष्टी दिन सन 2000 पासून ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरूवारी साजरा करण्यात येतो. यावर्षी 23 व्या जागतिक दृष्टी दिनी दि. 13 ऑक्टोबर रोजी सांगली जिल्ह्यातील विविध उपजिल्हा रूग्णालये, ग्रामिण रूग्णालये, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे विविध नेत्ररोग आजारांची तपासणी नेत्र चिकित्सा अधिकारी यांनी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील यांनी केले आहे.
जागतिक दृष्टी दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा सामान्य जनतेमध्ये खासकरून वयस्क व्यक्ती व लहान मुले यांना विविध नेत्र आजार होऊ नये म्हणून घ्यावयाच्या काळजी व उपचार याबाबत जनजागृती करणे तसेच मोतिबिंदू, खुपऱ्या, डायबेटीक रेटीनोपॅथी, लहान मुलांमधील नेत्र विकार, नेत्र विकारांचा प्रतिबंध व व्यवस्थापन करणे हा आहे. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील नेत्र तपासणी झालेल्या रूग्णांना पुढील उपचारासाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे संदर्भित करावे. त्याचबरोबर नेत्र आजार असलेल्या जास्तीत जास्त लहान मुलांचा शोध घेवून संदर्भित सेवेसाठी समर्पित संस्थांमध्ये समन्वय निर्माण करून लहान मुलांचे नेत्रविकाराचे उपचार करावेत, अशा सूचना नेत्र चिकित्सा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथील नेत्र बाह्य विभागात तसेच राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अशसकीय स्वयंसेवी संस्था येथे मोफत मोतीबिंदू तपासणी, काचबिंदू, खुपऱ्या, डायबेटीक रेटीनोपॅथी, लहान मुलांमधील नेत्र विकार यांची तपासणी करण्यात येत आहे, याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. गायत्री खोत यांनी केले आहे. तसेच या कार्यक्रमास जास्तीत जास्त युवक युवतींनी नेत्रदानाचा संकल्प फॉर्म भरून हातभार लावावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
00000
कृषि पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनामार्फत विविध कृषि पुरस्कार देण्यात येतात. शेतकऱ्यांनी कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव तात्काळ तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी केले आहे.
विविध कृषि पुरस्कारनिहाय निकष व कंसात पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार (राज्यस्तर-1) - कृषि क्षेत्रातील विस्तार, प्रक्रिया, निर्यात, उत्पादन पिक फेरबदल, आधुनिक तंत्रज्ञान वापर इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस देण्यात येतो (पारितोषिक 75 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक/पतीसह सत्कार)). वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार (आठ कृषि विभागातून प्रत्येकी 1 याप्रमाणे 8) - कृषि व कृषि संलग्न क्षेत्रामध्ये स्पृहणीय कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस देण्यात येतो (पारितोषिक 50 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक/पतीसह सत्कार)). जिजामाता कृषिभूषण पुरस्कार (आठ कृषि विभागातून प्रत्येकी 1 याप्रमाणे 8) - कृषि क्षेत्रामध्ये महिलांचे उल्लेखनिय कार्य (पारितोषिक 50 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा पतीसह सत्कार)). वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (आठ कृषि विभागातून प्रत्येकी 1 याप्रमाणे 8) - पत्रकारीतेव्दारे अथवा इतर अन्य मार्गाने कृषि विषयक ज्ञानाचा फायदा परीसरातील शेतकऱ्यांना करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस देण्यात येतो (पारितोषिक 30 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक/पतीसह सत्कार)).
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गटासाठी प्रति जिल्हा एक याप्रमाणे 34 आणि आदिवासी गटासाठी प्रति विभाग एक याप्रमाणे सहा असे एकूण 40) - अधुनिक तंत्र सुधारीत बी-बीयाणे इत्यादींचा वापर करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना देण्यात येतो (पारितोषिक 11 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक/पतीसह सत्कार)). कृषिभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार (आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे आठ) - सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रीय निविष्ठा वापरण्यास प्रोत्साहन देणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो (पारितोषिक 50 हजार रूपये, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक/पतीसह सत्कार). उद्यानपंडीत पुरस्कार (आठ कषि विभागातून प्रत्येक एक याप्रमाणे आठ) - फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो (पारितोषिक 25 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक/पतीसह सत्कार). पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवा रत्न पुरस्कार (आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे आठ व आयुक्तालय / मंत्रालय स्तरावरून एक अधिकारी/कर्मचारी एक या प्रमाणे एकूण 9) - कृषि विभागामध्ये अतिउत्कृष्ठ कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येतो (पारितोषिक स्मृतीचिन्ह, सन्मपनपत्र (व्यक्तीचा सपत्नीक सत्कार). युवा शेतकरी पुरस्कार (आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक या प्रमाणे आठ) - कृषि क्षेत्रात उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना (वय 18 ते 40 वर्षे) देण्यात येतो (पारितोषिक 30 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक /पतीसह सत्कार).
00000
मॅग्नेट प्रकल्पांतर्गत प्रस्ताव सादर करण्यास 14 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ
सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतमाल उत्पादक संस्था, प्रक्रियादार, निर्यातदार, ॲग्रीगेटर व माविम अंतर्गत नोंदणीकृत संस्था यांच्याकडून मॅग्नेट प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दि. 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. तथापि विहीत मुदतीत बऱ्याच संस्थांना प्रस्ताव सादर करता न आल्याने इच्छुक संस्थांसाठी दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजीचे सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती विभागीय प्रकल्प उपसंचालक डॉ. सुभाष घुले यांनी दिली.
एशियन डेव्हलपमेंट बँक व महाराष्ट्र शासन सहकार व पणन विभागांतर्गत मागील वर्षीपासून मॅग्नेट प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आलेला आहे. मॅग्नेट प्रकल्पाचा मुख्य उद्देश पिकांचे काढणीत्तोर होणारे नुकसान कमी करणे, साठवणूक क्षमता वाढविणे, त्याचबरोबर पायाभूत सुविधा अंतर्गत मुल्य साखळी विकसीत करणे व मागणीनुसार शेतमालाचे मुल्यवर्धन करणे हा आहे.
00000
सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२
घोणस अळी ओळख व व्यवस्थापन
काही दिवसापासून विविध माध्यमामार्फत ऊसावर आढळून आलेल्या एका अळीमुळे जिची ओळख बोली भाषेमध्ये स्लग कैटरपिलर किंवा काटेरी अळी व ग्रामीण भाषेमध्ये घोणस अळी म्हणून आहे. जिच्या दंश झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. त्यामुळे या अळीबद्दल सर्वांच्या मनात एक प्रकारची भिती दिसून येते. तसेच त्याबद्दल बरेचसे गैरसमज निर्माण झाले आहेत.
अळीची ओळख
या अळीला स्लग कैटरपिलर किंवा काटेरी अळी किंवा डंक अळी असेही म्हणतात. ही एक पतंगवर्गिय कीड असून ती लीमाकोडिडे (स्लग कैटरपिलर पतंग) या कुटुंबातील आहे. या अळ्यांना त्यांच्या चिकटून राहण्याच्या स्वभावामुळे आणि संथ हालचाली व लक्षणामुळे स्लग अळी असे म्हणतात. या अळीचे पतंग त्यांच्या भषकांसाठी मऊ आणि पौष्टिक खाद्य असतात. पतंग फार वेगाने फिरत नाहीत आणि उडू शकता नाहीत, म्हणून ते पक्ष्यांचे आणि इतर भक्षकांचे सहज होणारे आणि मुख्य खाद्य आहेत. म्हणून या जातीच्या अळ्यांनी स्वत:चा भक्षकांपासून बचाव करण्यासाठी शरीरामध्ये भडक रंग आणि काटे विकसित केले आहेत. या त्यांच्या शरीराच्या गर्द आणि प्रखर तेजस्वी रंगाव्दारे आणि काटे किंवा केसांव्दारे त्यांच्या भक्षकांना डंख मारण्याची चेतावणी देतात. हे या अळ्यांना त्यांच्या भक्षकांपासून वाचवते. अशा काट्याच्या खाली विष ग्रंथी असतात. ही एक स्व:संरक्षणाची रणनीती आहे. या गटातील सर्व अळ्यांच्या शरीरावर काटे किंवा केस नसतात. या किडीला अकाली आपला स्पर्श झाल्यास काही प्रमाणात त्रासही होऊ शकतो परंतु या किडीचे पतंग अपायकारक नसतात.
आढळ
ही किड भारत, श्रीलंका, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया यासारख्या देशामध्ये आढळून येते.
पिकांसाठी किती धोकादायक
ही अळी पिकांचे फारसे नुकसान करत नाही, परंतु काही वेळा अळीचा प्रादुर्भाव पिकांच्या काही ठराविक भागापुरताच मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि प्रादुर्भाव झाल्यास अळ्या फक्त पानांच्या शिरा सोडून बाकी भाग अधाशीपणे खातात त्यामुळे झाडाला फक्त पानांच्या शिराच शिल्लक राहतात आणि मोठे नुकसान होते.
अळीच्या काट्याचा दंश झाल्याय काय होऊ शकते
या गटातील अळ्या त्यांच्या शरीरावर असलेल्या काट्यांमुळे आणि केसांमुळे सहज लक्षात येतात. त्याचा उद्देश त्यांच्या भक्षकांना परावृत्त करणे हा आहे. अळी लोकांच्या मागे जात नाहीत. परंतु तुम्ही त्यांना स्पर्श केल्यास किंवा चूकून संपर्कात येऊन शरीर घासले गेल्यास त्या ठिकाणी काट्यांचा दंश होऊन अपाय होऊ शकतो आणि लक्षणे उद्भवतात. अशा काट्यांमध्ये असलेले विष शरीरात प्रवेश करते. स्पर्श झालेल्या ठिकाणी अळीचे केस अथवा काटे शरीरात तसेच राहतात. दंश हा मधमाशीच्या डंखासारखा त्रासदायक असतो. विष हे सौम्य स्वरूपाचे असते परंतु वेदना होणे, पुरळ येणे, जळजळ होणे, खाज सुटणे, सूज येणे आणि फोड येणे या सारखी लक्षणे दिसू शकतात. सहसा लक्षणे ही तात्पुरत्या स्वरूपाची असतात आणि एका दिवसात निघून जातात किंवा कमी होतात. परंतु जर ती तीव्र स्वरूपाची किंवा जास्त वेळाकरिता कायम राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. काही लोकांना अशा अळीच्या संपर्कात आल्यास त्यांना असलेल्या ॲलर्जीमुळे जास्त त्रास होऊ शकतो. ज्या लोकांना अस्थमा, ॲलर्जी या सारख्या समस्या असतील अशा लोकांनी सावधगिरी बाळगून अपाय होऊन जास्त त्रास झाल्यास लवकरात लवकर वैद्यकीय उपचार घ्यावेत.
ताबडतोब करावयाचे उपाय अथवा उपचार
काही तज्ज्ञ सूचित करतात की चिकट टेप प्रभावित भागात हलक्या हाताने लावून काढावा त्याने शरीरात गेलेले अळीचे केस किंवा काटे सहज निघण्यास मदत होईल. लक्षणे सौम्य असतील तर अपाय झालेल्या ठिकाणी बर्फ लावल्यास किंवा बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट लावल्यास त्रास कमी होतो.
अळीचे नियंत्रण
कोणतेही स्पर्शजन्य किटकनाशक फवारावे. यामध्ये क्विनॉलफॉस, क्लोरोपायरीफॉस, इमामेक्टिन बेंझोएट, फ्लूबेंडामाईड सारखे कीटकनाशक शिफारस नसले तरी चांगले नियंत्रण करतात. तसेच बरेच नैसर्गिक मित्र किटकांव्दारेही या किडीचे नियंत्रण नैसर्गिकरित्याच होते. तरी सर्वांना कोणत्याही केसाळ किंवा काटेरी अळ्यापासून स्वरक्षणाची सावधगिरी बाळगावी. अळीमुळे दंश झाल्यास घाबरून न जाता योग्य उपाय अथवा उपचार घ्यावेत.
संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली
रविवार, २ ऑक्टोबर, २०२२
शिक्षणक्षेत्र सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशिल - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 02, (जि. मा. का.) : देशाच्या व राज्याच्या प्रगतीत शिक्षण क्षेत्राचे योगदान महत्वपुर्ण आहे. हे क्षेत्र अधिकाधिक सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सांगली येथील अधिवेशनाच्या निमित्ताने या क्षेत्रातील मांडण्यात आलेल्या विविध ठरावांच्याबाबतीत सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशिल राहू, अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन सांगली येथे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांची यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे होत्या, यावेळी खासदार फौजिया खान, माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील, माजी मंत्री आमदार विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार जयंत असगावकर, आमदार सुमनताई पाटील, आमदार किरण सरनाईक, आमदार चिमणराव पाटील, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी, माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, माजी आमदार प्रा. शरद पाटील, हुतात्मा समुहाचे वैभव नायकवडी, महामंडळाचे सहकार्यवाह माजी आमदार विजय गव्हाणे, सहसचिव राजेंद्र साळुंखे, माजी आमदार भैय्यासाहेब रघुवंशी, अमरसिंह देशमुख, वसंतदादा सहकारी साखर काराखान्याचे संचालक विशाल पाटील, स्वागताध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह महामंडळाचे विविध पदाधिकारी, संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षणावर होणारा खर्च ही गुतंवणूक समजून जीडीपीच्या सहा टक्के खर्च शिक्षणावर करावा, नवीन शैक्षणिक धोरण ठरविताना किंवा योजनांबाबत निर्णय घेताना शिक्षण संस्था महामंडळाच्या प्रतिनिधींचा समावेश करावा, विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना संपुर्ण सेवा संरक्षण द्यावे, विनाअनुदानित शाळांचा शिक्षकेत्तर अकृतीबंध जाहीर करावा. या साराख्या अन्य मागण्या या व्यासपीठावरुन करण्यात आल्या. या मागण्याबाबत समन्वयाने व सकारात्मक पध्दतीने मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशिल राहू, अशी ग्वाही कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्याबाहेरुन आलेल्या संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी महामंडळाचे पदाधिकारी या सर्वांचे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सांगली जिल्ह्यात स्वागत केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी राज्यस्तरीय अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, शिक्षक भरतीसाठीची पवित्र पोर्टल प्रणाली रद्द होणार नाही. पोर्टलमध्ये काही अडचणी असल्यास त्यामध्ये सुधारणा करु. विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांसोबतच आता वह्याही मोफत दिल्या जातील असे आश्वासनही दीपक केसरकर यांनी दिले.
यावेळी बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून काम केले पाहिजे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे शिक्षण आणि शिक्षणाबाबत संवेदनशील आहेत. राज्यात शिक्षकांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना तो काळजीपूर्वक घ्यावा लागतो. राज्य सरकारचा प्रती विद्यार्थ्यावर 70 हजार रुपयांचा खर्च होतो. खासगी संस्थांचा तोच खर्च तुलनेने कमी आहे. ते म्हणाले, शिक्षणसंस्था आणि शिक्षकांचे प्रश्न कसे सोडवता येतील यावर सरकार आणि शिक्षणसंस्थांनी चर्चा केली पाहिजे. येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शिक्षणसंस्थांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करुन त्यावर काय मार्ग काढता येईल यावर विचारविनिमय करु. नवीन शिक्षण धोरणावर सरकारकडून चर्चा सुरु आहे. पवित्र पोर्टलबाबत बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, पवित्र पोर्टलमुळे अनेक गुणवत्ताधारक शिक्षक मिळाले आहेत. पोर्टलबाबत जर काही त्रुटी असतील तर त्यामध्ये सुधारणा करण्याचा निश्चित प्रयत्न करु. मात्र, पवित्र पोर्टल बंद होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. तसेच आरटीई अंतर्गत प्रतिपूर्तीसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबरपर्यंत यामध्ये आणखी वाढ कशी करता येईल त्याचाही विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणसेवकांच्या पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला असून शिक्षणसेवकांना 15 हजार रुपये पगाराची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे. सरकारी शाळाही सुरु राहिल्या पाहिजेत अशी सरकारची अपेक्षा आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मानवाच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणाऱ्या घटकांपैकी एक घटक म्हणजे शिक्षण, शिक्षणाने उद्याचे सुजान, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे खरे अपेक्षित आहे. शिक्षण ही न संपणारी प्रक्रिया आहे. मानावाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे हा त्याचा हेतू आहे. आधुनिक काळात जीवनामान समृध्द करण्यासाठी शिक्षण संस्था, शिक्षक व शिक्षणाची भूमिका महत्वाची आहे. म्हणून महामंडळाच्या माध्यमातून शिक्षण संस्थांचे प्रश्न आणि त्याचसोबत शिक्षक/शिक्षकेत्तर सेवकांचे प्रश्न सोडवण्यास प्रयत्नशिल राहीन.
यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार विश्विजीत कदम, विशाल पाटील, वैभव नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार विजय गव्हाणे यांनी प्रास्ताविक केले. अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी रावसाहेब पाटील होते.
०००००
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)