मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३
प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सांगली दि. 7 (जि.मा.का.) :- केंद्र शासनाच्या प्राणी क्लेष प्रतिबंधक अधिनियम,१९६० मधील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी मानवहितकारक कार्य करणाऱ्या, प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी त्यांचे अर्ज संबंधित कामाच्या संपूर्ण तपशिलासह जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, सांगली (मुख्यालय मिरज) येथे दि. २२ फेब्रुवारी २०२३ अखेर समक्ष अथवा टपालाने अथवा ई-मेलने सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस.एस.बेडक्याळे यांनी केले आहे.
व्यवस्थापकीय समितीवर गोशाळा अथवा पांजरपोळ संस्थेचे अध्यक्ष, प्राणी कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे सदस्य, मानवहित कार्य करणाऱ्या / प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या/ प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती इ. क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येत असते. प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी, सांगली च्या समितीतील यापूर्वी नियुक्ती झालेल्या अशासकीय सदस्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आलेला असल्याने इच्छुक व पात्र व्यक्तींकडून नव्याने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी, सांगली च्या व्यवस्थापकीय समितीवर पुढीलप्रमाणे विविध गटांमधून अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील गोशाळा अथवा पांजरपोळ संस्थांपैकी एका संस्थेचा अध्यक्ष, प्राणी कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे दोन सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती, सांगली जिल्ह्यातील मानवहितकारक कार्य करणारे / प्राण्यांवर प्रेम करणारे / प्राणी कल्याणासाठी काम करणारे ५ ते ६ कार्यकर्ते.
इच्छुक व्यक्तींकडून मानवहितकारक कार्य / प्राणी कल्याणासाठी काम केल्याच्या संपूर्ण तपशिलासह अर्ज मागविण्यात येत आहेत. प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या छाननीसाठी इच्छुक व्यक्तींच्या प्राणी कल्याणाच्या कामाचा अनुभव तसेच प्राणी कल्याण कायद्याचे ज्ञान या बाबींचा प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येणार आहे. छाननीनंतर पात्र असणाऱ्या व्यक्तींच्या चारित्र्याची पडताळणी पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. त्यानंतर चारित्र्य पडताळणी अहवाल अनुकूल असणाऱ्या व्यक्तींची शिफारस प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी मार्फत शासनास करण्यात येणार आहे. त्यानंतर प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती शासन स्तरावरून करण्यात येणार आहे.
कार्यालयाचा पत्रव्यवहाराचा पत्ता : जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सांगली (मुख्यालय मिरज), डॉ. आंबेडकर रोड, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय आवार, झरी बाग, मिरज ता.मिरज जि.सांगली पिन-४१६४१०, दूरध्वनी क्रमांक : ०२३३-२२२२२३३, ई-मेल आय डी : ddcahsangli@gmail.com.
०००००
कृषि पुरस्कारासाठी 13 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सांगली दि. 7 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनामार्फत विविध कृषि पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी दि. 13 फेब्रुवारी 2023 पर्यंत तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी केले आहे.
कृषि विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध कृषि पुरस्काराचे नाव, निकष व पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार कृषि क्षेत्रातील विस्तार, प्रक्रिया, निर्यात, उत्पादन पिक फेरबदल, अधुनिक तंत्रज्ञान वापर इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 75 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार कृषि व कृषि संलग्न क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 75 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. जिजामाता कृषिभूषण पुरस्कार कृषि क्षेत्रामध्ये महिलांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 50 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार पत्रकारीतेव्दारे अथवा इतर अन्य मार्गाने कृषि विषयक ज्ञानाचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 30 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार अधुनिक तंत्र सुधारीत बी-बीयाणे इत्यादींचा वापर करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 11 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. कृषिभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रीय निविष्ठा वापरण्यास प्रोत्साहन देणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 50 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. उद्यानपंडीत पुरस्कार फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 25 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवा रत्न पुरस्कार कृषि विभागामध्ये अतिउत्कृष्ठ कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. युवा शेतकरी पुरस्कार कृषि क्षेत्रात उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांना देण्यात येतो (वय वर्षे 18 ते 40 वर्षे). या पुरस्काराचे स्वरूप पारितोषिक 30 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे.
00000
रोजगार मेळावा 10 फेब्रुवारीला
सांगली दि. 7 (जि. मा. का.) : खाजगी क्षेत्रात खाजगी लहान, मध्यम व मोठ्या कारखान्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी व समाजात दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीकोनातून रोजगार मेळाव्याचे ऑफलाईन आयोजन शुक्रवार दि. 10 फेब्रुवारी 2023 रोजी सांगली चेंबर ऑफ कॉमर्स, 3 रा मजला, वखार भाग, अमराई रोड, सांगली येथे आयोजित करण्यात आले आहे. उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अप्लॉय करावे व मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारानी समक्ष उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.
रोजगार मेळाव्यामध्ये नियमीत एकूण 140 पदे भरण्यात येणार असून यामध्ये महाबळ मेटल प्रा.लि. एमआयडीसी मिरज यांचेकडील इलेक्ट्रीशीयन, सॅण्ड प्लॅन्ट ऑपरेटर, ऑपरेटर (कॅमशॉफटस), सीएनसी / व्हीएमसी ऑपरेटर, मोल्डर, फिटर, ऑपरेटर (रेडिओग्राफी) टेम्प टेस्टींग ऑपरेटर, रोबो ऑपरेटर, कोअर शॉप मशीन ऑपरेटर, कोअर शॉप प्लॅटिंग ऑपरेटर, इनस्पेक्टर, पॅटर्न शॉप व वेल्डर इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी इ. १० वी, इ.१२ वी व कोणत्याही शाखेची पदवी तसेच ITI, Diploma, BE इ. शैक्षणिक पात्रतेची पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी १ ते २ वर्षे अनुभव असल्यास प्राध्यान्य देण्यात येईल असे कळविण्यात आलेले आहे.
मूथूट मायक्रोफिन लिमीटेड, सांगली या कंपनीकडील फिल्ड ऑफिसर, क्रेडीट ऑफिसर व ब्रँच मॅनेंजर अशा प्रकारची पदे भरण्यात येणार असून या पदासाठी HSC, B.com, Any Graduate इत्यादी शैक्षणिक पात्रतेची पदे भरण्यात येणार आहेत.
00000
सुकन्या समृध्दी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सांगली दि. 7 (जि. मा. का.) : सुकन्या समृध्दी योजना मुलींच्या शिक्षणासाठी तसेच भवितव्यासाठी फायदेशीर योजना असून आत्तापर्यंत या योजनेत सांगली जिल्ह्यामध्ये 74 हजार 512 खाती उघडण्यात आली आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेत खाती काढून आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन सांगली विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर रमेश पाटील यांनी केले आहे.
अमृतपेक्स प्लस (राष्ट्रीय टपाल तिकीट प्रदर्शन) कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर भारतीय टपाल विभागामार्फत दिल्ली येथे 11 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आणि अमृतपेक्स 2023 निमित्त महिला सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशन मोहिमेचा एक भाग म्हणून टपाल विभागाने देशव्यापी सुकन्या समृध्दी योजनेचे खाते उघडण्याची विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेमध्ये दि 9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी अमृतपेक्स च्या पूर्वसंध्येवर जास्तीत जास्त सुकन्या खाती उघडण्यात येणार आहेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या पोस्ट कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.
00000
दहा वर्षापुर्वीचे आधार कार्ड त्वरीत अद्ययावत करून घ्या - निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी चौगुले
सांगली दि. 7 (जि. मा. का.) : बायोमेट्रीक प्रमाणिकरणासह रहिवाशांची ओळख पटविण्याच्या तरतुदीसह आधार हा ओळखीचा सर्वात व्यापकपणे पुरावा म्हणून स्विकारला जातो. रहिवाशांना सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी आता आधारचा वापर सक्तीचा केला जात आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी रहिवाशांना नविन आणि अद्ययावत तपशिलासह आधार सादर करणे आवश्यक आहे. सांगली जिल्ह्यातील ज्या रहिवाशांना 10 वर्षाहून अधिक काळ आधार कार्ड मिळालेले आहे, परंतू त्यांनी एकदाही ते अपडेट केले नसेल, अशा रहिवाशांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन त्यांचा पत्ता पुनश्चः सत्यापीत करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी चौगुले यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यातील 31 लाख 52 हजार 947 नागरिकांना आधार कार्ड उपलब्ध झालेले आहे. यापैकी 10 लाख 73 हजार 340 आधारकार्ड कागदपत्रे अद्ययावत करिता प्रलंबीत आहेत. तरी आधार कार्ड काढून 10 वर्ष झालेल्या तथापी, अपडेशन न केलेल्या नागरीकांनी ओळखीचे व पत्यासंबंधी आपल्या नजीकच्या आधार सेवा केंद्रामध्ये जावून दस्ताऐवज सादर करून अद्ययावतीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तसेच वयाची 18 वर्ष पूर्ण होऊनही ज्यांनी आधार नोंदणी केलेली नाही (18 वर्ष पेक्षा जास्त वय असून ज्यांच्याकडे आधारकार्डच नाही) अशा नागरिकांची आधार नोंदणी ही जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत नियुक्त केलेल्या अधिकृत आधार नोंदणी केंद्रावरच केली जाईल. सदर केंद्राची यादी www.sangli.nic.in वर पाहावयास उपलब्ध आहे.
शुन्य ते 5 वर्ष वयोगटातील ज्या बालकांनी आधार नोंदणी केलेली आहे अशा बालकांची दर पाच व दहा वर्षानी बॉयोमेट्रीक अपडेट करणे अनिवार्य आहे. वयानुसार बोटांचे ठसे, डोळ्याचे बुबुळ यामध्ये बदल होत असल्याने बायोमेट्रीक अद्ययावत असणे आवश्यक आहे. अन्यथा मुलांचे आधार कार्ड हे बायोमेट्रीक अद्ययावत न केल्यास निष्क्रीय होऊ शकतात. यासाठी आपल्या नजीकच्या आधार सेवा केंद्रावर जावून निशुल्क सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी चौगुले यांनी केले आहे.
आधार सेवा देणाऱ्या केंद्राबाबत आपणास कोणतीही तक्रार असल्यास संचित पवार जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, मोबाईल नंबर 9021026898 व विपुल मद्वाण्णा, वरिष्ठ सहाय्यक अभियंता, मोबाईल नंबर 9921317151 माहिती तंत्रज्ञान कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याशी त्वयरी संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आधार सेवांचे दर
• कोणत्याही वयोगटातील नविन आधार नोंदणी - निशुल्क.
• डेमोग्राफीक अद्ययावतीकरणासह किंवा त्याशिवाय अनिवार्य बायोमेट्रीक अद्ययावतीकरण - निशुल्क.
• बायोमेट्रीक अद्ययावतीकरण डेमोग्राफीक अद्ययावतीकरणासह किंवा त्याशिवाय - 100 रूपये.
• डेमोग्राफीक अद्ययावतीकरण - 50 रूपये.
• दस्ताऐवज अद्यावतीकरणाकरीता आधार सेवा केंद्रावर यासाठी - 50 रूपये.
• myAadhaar portal वरुन ऑनलाईन दस्ताऐवज अद्यावत केल्यास - 25 रूपये.
• आधार रंगीत प्रिंट डाऊनलोड - 30 रूपये.
00000
मुख्यमंत्री यांच्या नावे द्यावयाची अर्ज, निवेदने जिल्हास्तरीय मुख्यमंत्री कक्षास द्या - प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख
सांगली दि. 7 (जि.मा.का.) :- जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली (रोहयो शाखा) येथे स्थापन करण्यात आलेला आहे. हा उपक्रम मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. नागरिकांनी मुख्यमंत्री यांच्या नावे द्यावयाची अर्ज, निवेदने जिल्हास्तरीय मुख्यमंत्री कक्षास द्यावीत. प्रलंबित न्यायिक, अर्धन्यायिक प्रकरण आणि केसेस यामध्ये देण्यात येऊ नयेत, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाबाबत माहिती देण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी चौगुले यांच्यासह माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख म्हणाल्या, राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न शासन स्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ मुख्यमंत्री सचिवालय का मंत्रालय मुंबई येथे स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्याकरीता संबंधित क्षेत्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणेकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. मात्र, यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे विभागीय स्तरावरील क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी या जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी म्हणून कामकाज पहात आहेत. तसेच या कक्षामध्ये महसूल सहायक व नायब तहसिलदार यांची नेमणूक करण्यात आलेली असल्याचे सांगून प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख म्हणाल्या, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षामध्ये सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्री महोदय यांना उद्देशून लिहिलेले अर्ज निवेदने, संदर्भ इत्यादी स्वीकारले जातील. कक्षास प्राप्त प्रकरणापैकी ज्या प्रकरणामध्ये जिल्हास्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे अशी प्रकरणे संबंधित जिल्हास्तरावरील विभाग प्रमुखाकडे वर्ग करून त्यावर दिनांक १० जानेवारी २०२३ रोजीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयात दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे ज्या प्रकरणी शासन स्तरावरून कार्यवाही होणे अपेक्षित आहे. अशी सर्व वैयक्तिक / धोरणात्मक अर्ज, संदर्भ व निवेदने अपर मुख्य सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई-३२ याला सादर करण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या कामासाठी मंत्रालय स्तरावर जाण्याची आवश्यकता भासणार नाही आणि त्यांचे प्रश्न जिल्हास्तरावरच सोडविले जातील.
जिल्हास्तरीय मुख्यमंत्री कक्षास आतापर्यंत एकूण ५८ अर्ज / निवेदने प्राप्त झाले असून त्यापैकी १२ अर्ज धोरणात्मक निर्णयाच्या बाबतीत असल्याने शासनास सादर केले आहे. तसेच जिल्हास्तरावरून कार्यवाही अपेक्षित असलेल्या ५० प्रकरणाबाबत सबंधीत विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांची निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन २२ प्रकरणे निकाली काढण्यात आलेली असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी सांगितले.
०००००
शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३
प्रत्येक क्षेत्रात नवे करण्याची उमेद बाळगा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
सांगली दि. 3 (जि.मा.का.) : आजची पिढी ही अधिक चिकित्सक असून विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात नवे करण्याची उमेद बाळगावी, असा सल्ला पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज विज्ञान प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्यांना दिला.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग व विज्ञान व गणित अध्यापक संघ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कुपवाड एमआयडीसी येथील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या पॉलिटेक्निक येथे आयोजित ५० व्या सांगली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व पारितोषिक वितरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शांतिनाथ कांते, लठ्ठे पॉलिटेक्निकचे प्राचार्य आण्णासाहेब गाजी, सुहास पाटील, भालचंद्र पाटील, सुशांत खाडे यांच्यासह मान्यवर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची वाढावी, त्यांच्यात संशोधक वृत्ती निर्माण व्हावी यासाठी शालेय, तालुका व जिल्हा स्तरावर भरवण्यात येणारी विज्ञान प्रदर्शने प्रेरणादायी आहेत. लठ्ठे पॉलीटेक्निक येथे आयोजित करण्यात आलेल्या ५० व्या सांगली जिल्हा विज्ञान प्रदर्शनातून देशासाठी भावी संशोधक व वैज्ञानिक निर्माण होतील, असा विश्वास पालकमंत्री डॉ. खाडे यांनी व्यक्त केला. मुलांमध्ये लहान वयापासूनच वैज्ञानिक ज्ञानाबाबत रूची निर्माण करण्यासाठी लठ्ठे पॉलिटेक्निक येथे सुंदर विज्ञान प्रदर्शन भरवले याबद्दल त्यांनी संयोजकांना धन्यवाद दिले. तसेच विज्ञान प्रदर्शनासाठी अनुदान बंद केले नसून याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने पाठवावा त्याचा पाठपुरावा केला जाईल असे ते म्हणाले.
५० वे विज्ञान प्रदर्शन लठ्ठे पॉलिटेक्निक येथे आयोजित करण्याचा बहुमान दिल्याबदद्ल लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शांतिनाथ कांते यांनी शिक्षण विभागाचे आभार मानले. यापुढेही शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी लठ्ठे एज्युकेशन सोसायटी मदत करेल, असा विश्वास त्यांनी दिला.
माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. लोंढे यांनी प्रास्ताविकात विज्ञान प्रदर्शनाची माहिती दिली. मुलांमध्ये वैज्ञानिक चिकित्सा व संशोधन वृत्ती वाढावी यासाठी अशी प्रदर्शने उपयुक्त ठरतात. जिल्ह्यात 758 हायस्कूल असून यामध्ये दोन लाखाच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना बाल वयातच विज्ञानाची गोडी लागून त्यांच्यात संशोधक वृत्ती निर्माण व्हावी यासाठी सायन्स क्लबची स्थापना करण्यात येणार असून जिल्ह्यातील शालेय विद्यार्थांसाठी सायन्स सेंटर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विज्ञान शिक्षक दादासाहेब सरगर यांनी विज्ञान प्रदर्शनासंदर्भात माहिती देऊन प्रत्येक गटात प्रथम क्रमांक आलेल्या विज्ञान उपक्रमाची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
50 व्या सांगली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विद्यार्थी कृती या गटात इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूरच्या विश्वप्रतापसिंग रामराजे माने यास प्रथम क्रमांक, शांतिनिकेतन कन्या शाळा सांगली येथील वैष्णवी आनंदा मोरे द्वितीय, येलूर हायस्कूल येलूरची वेदिका रत्नाकर जाधव तृतीय आणि कमलाबाई रामनामे कन्या विद्यालय इस्लामपूरची मधुरा मनोज कोरडे व पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर हायस्कूल पलूसचे श्रेयस जगन्नाथ जाधव यांना उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिक मिळाले आहे.
प्राथमिक शिक्षक कृती गटात जिल्हा परिषद शाळा, आराळा येथील शिक्षक मोहन राजाराम पवार प्रथम क्रमांक, जिल्हा परिषद शाळा कारजनगे येथील शिक्षक श्रीकांत शंकर सोनार द्वितीय, जिल्हा परिषद शाळा लक्ष्मीनगर करगणी येथील शिक्षक दिपाली आनंद देवकर तृतीय आणि जिल्हा परिषद शाळा नं. २, कुची येथील शिक्षक अमोल किसन हंकारे यांना उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिक मिळाले आहे.
माध्यमिक विद्यार्थी कृती गटात जिजामाता विद्यालय वाळवा येथील श्रुती गजानन माळी प्रथम क्रमांक, एस. व्ही. एम. व्ही, कोळेगरी येथील प्रतीक्षा करबसप्पा हिरेमठ द्वितीय क्रमांक, शांतिनिकेतन विद्यामंदिर सांगली येथील आरती उमेश चव्हाण तृतीय क्रमांक आणि नचिकेता गौरवकुंज माध्यमिक विद्यालयाची ज्ञानेश्वरी संतोष माने व आझाद विद्यालय कासेगाव येथील ऋषिकेश राजेंद्र किरवे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.
माध्यमिक शिक्षक कृती गटात न्यू इंग्लिश स्कूल कोंगनोळी येथील शिक्षक संजयकुमार लालासो मगर प्रथम क्रमांक, समाज विकास विद्यालय, सांगाव येथील शिक्षक मंगेश विठ्ठल तिके द्वितीय क्रमांक, प्रतिनिधी हायस्कूल कुंडल येथील शिक्षक गीतांजली योगेश लुब्बाळ तृतीय क्रमांक आणि जवाहर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मिरज येथील शिक्षक परवीन मोहम्मद आरिफ बागवान यांना उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिक मिळाले आहे.
प्रयोगशाळा परिचर कृती गटात सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी येथील अशोक गणपतराव पाटील प्रथम क्रमांक, विटा हायस्कूल विटा येथील मुलाणी परवेज मौलाअली द्वितीय क्रमांक, बाळासाहेब गुरव बापू हायस्कूल कवठेमहांकाळ येथील शहाजी पतंगराव दळवी तृतीय क्रमांक आणि समाज विकास विद्यालय सांगाव येथील आर. एच. कोरे यांना उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिक मिळाले आहे.
विज्ञान प्रदर्शनातील प्रश्नमंजुषा या गटात नांद्रे विद्यालय व कला वाणिज्य विद्यालय नांद्रे येथील श्रद्धा राजेंद्र तांदळे, श्रावणी आप्पासो यादव, समीक्षा संदीप पवार यांना प्रथम क्रमांक, सेकंडरी हायस्कूल व जुनिअर कॉलेज भिलवडी येथील सृष्टी दादा चौगुले, सानिका शब्बीर इनामदार, सुखदा धनंजय भोळे यांना द्वितीय क्रमांक आणि महात्मा गांधी विद्यालय विटा येथील साद रफिक तांबोळी, अथर्व दीपक मुतालिक, विराज सूर्यकांत कदम यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे.
दिव्यांग विद्यार्थी कृती गटात भीमरावशेठ जगन्नाथ चव्हाण-देशमुख विद्यालय वासुंबे ता. खानापूर येथील विराज संजय पवार यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
००००००
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)