मंगळवार, २१ मार्च, २०२३
कृषी योजनांच्या यशस्वीतेसाठी वित्तीय संस्था व बँकांचा सहभाग महत्त्वाचा - मेघनाथ कांबळे
सांगली दि. 20 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यामध्ये कृषी पायाभूत सुविधा योजना राबवण्यासाठी खूप वाव असून सर्व संलग्न संस्थाने एकत्र येऊन काम केल्यास दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिकचे काम होऊ शकते. योजना राबवत असताना जिल्ह्यातील वित्तीय संस्था व बँकांची भूमिका व सहभाग फार महत्त्वाचा आहे. संबंधित वित्तीय संस्था व बँकांनी लाभार्थ्यांच्या प्राप्त प्रस्तावांना वेळेत व गरजेनुसार कर्ज रक्कम मंजूर करणे व वाटप करणे क्रमप्राप्त आहे, असे प्रतिपादन कृषी आयुक्तालय पुणे चे राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे यांनी केले.
सांगली येथे जिल्हा कृषी महोत्सवाचे औचित्य साधून कृषी पायाभूत सुविधा निधी कृतीसंगम कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक महेश हरणे, नाबार्डचे व्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या उर्मिला राजमाने, तासगाव तालुका कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर आदि उपस्थित होते.
राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे म्हणाले, लाभार्थीने त्यांचे परिपूर्ण कर्ज प्रस्ताव बँकांकडे संबंधित कागदपत्रांसहित जमा केल्यास बँकांच्या माध्यमातून लवकरात लवकर कर्ज प्रस्ताव निकाली काढले जाऊ शकतात. योजनेतील पात्र प्रकल्पांविषयी बोलताना ते म्हणाले, भविष्यांमध्ये या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीमध्ये मोठी क्रांती होऊ शकते.
कृतीसंगम कार्यशाळेमध्ये उर्वरित तीन वर्षांमध्ये जिल्ह्यातील विविध बँकांच्या 530 शाखांनी कमीत कमी एक शाखा एक प्रकरण राबवण्याविषयी संकल्प घेण्यात आला. जेणेकरून जिल्ह्यांमध्ये पुढील तीन वर्षात कमी कमी पंधराशे कोटी पर्यंतचा लाभ आपण जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देऊ शकतो.
प्रास्ताविकात श्री. सुर्यवंशी यांनी कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या विविध लाभांविषयी माहिती देऊन जिल्हामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल असे सांगितले. तालुका कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर यांनी कृती संगम कार्यशाळेची पार्श्वभूमी सांगितली. या कार्यशाळेत कृषी विज्ञान केंद्र, कांचनपूर, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, कृषी संशोधन केंद्र, सहकार व पणन मंडळ, पशुसंवर्धन विभाग व इतर शासकीय विभागांनी सहभाग घेतला.
00000
कृषी महोत्सवात पाककला स्पर्धा संपन्न
सांगली दि.19 (जिमाका) : सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा कृषी महोत्सव - 2023 दिनांक १७ ते २१ मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आलेला असून त्या निमित्ताने विविध चर्चासत्र व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून दिनांक 19 मार्च 2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे औचित्य साधून जिल्हास्तरीय पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील शेतकरी महिला, अधिकारी, कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी विविध प्रकारच्या पाककृति सादर केल्या. नाचणी, ज्वारी, बाजरी, वरई, राळा, राजगिरा इत्यादी तृणधान्यांपासून बनविलेल्या पदार्थांचा समावेश होता. या पदार्थांमध्ये नाचणीचे आंबील, राजगिरा खीर, बाजरीची खिचडी, नाचणीचा केक, बाजरीचा केक, तृणधान्य कटलेट, ज्वारी बाजरी व नाचणी पासून बनवलेली बिस्किटे, बाजरीच्या खारोड्या, नाचणीचे मोदक, पौष्टिक तृणधान्य थाळी या विशेष स्वादिष्ट पाककृती होत्या.
सदर स्पर्धेमध्ये श्रीमती अपर्णा कोडलकर यांच्या पौष्टिक तृणधान्य थाळी ला प्रथम क्रमांक, श्रीमती मीना चौगुले यांनी नाचणी पासून बनवलेल्या मोदक, केक व लाडू यांना द्वितीय क्रमांक तर डॉक्टर वैशाली माने यांनी बनवलेल्या नाचणीचे इडली, हलवा, पुरी व थालीपीठ यांना तृतीय क्रमांक घोषित करण्यात आला. या स्पर्धेसाठी श्री संजीव कोल्हार व संजय वजरीनकर, संचालक एलेंटा ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड, सांगली हे प्रायोजक म्हणून लाभले. सदर स्पर्धेचे परीक्षण राजर्षी शाहू कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय सांगली च्या प्राचार्या डॉक्टर अर्चना शिंदे, प्राध्यापिका अश्विनी कांबळे व प्राध्यापिका अबोली पिंजरकर यांनी केले.अशाप्रकारे अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात जिल्हास्तरीय पाककला स्पर्धा 2023 पार पडल्या. यावेळी माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली श्री.प्रकाश सूर्यवंशी यांनी पौष्टिक तृणधान्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पाककला एक उत्तम कला असून ती महिलांशी निगडित असल्याने गाव पातळीपर्यंत प्रसार करण्यासाठी उपयुक्त आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आहारामध्ये तृणधान्यांचा वापर वाढविण्याचे आवाहन यावेळी केले.
00000
कृषी महोत्सवामध्ये ऊस पिकावर परिसंवाद
सांगली दि.19 (जिमाका) : सांगली जिल्हा कृषी महोत्सव 2023 मध्ये दिनांक 19 मार्च 2023 रोजी परिसंवाद व चर्चासत्र या कार्यक्रमात कृषिरत्न डॉ. संजीव माने यांनी उपस्थिताना एकरी दीडशे टन ऊस उत्पादन या विषयी सविस्तर सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. संजीव माने म्हणाले, ऊस शेती करत असताना जमिनी कसदार असणे आवश्यक आहे. ऊसामध्ये एकरी चाळीस हजार उसाची संख्या आवश्यक आहे. त्याच्यासाठी फुटव्यांची संख्या निर्धारित करणे फार गरजेचा आहे. सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खताचा संतुलित वापर होणे आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापन करत असताना जमिनीमध्ये वापसा टिकवने अत्यंत महत्त्वाचा असते त्यामुळे पिकांना आवश्यक असणारे सर्व घटक जमिनी मध्ये मुळांना उपलब्ध होतात. पिकाच्या वाढीसाठी त्याचा वापर होतो. भरपूर पाणी न देता थोडं -थोडं पाणी, सारखं देणे आवश्यक आहे .त्यासाठी ऊस शेतामध्ये ठिबक सिंचन आवश्यक आहे.याप्रमाणे ऊस शेतीचे नियोजन केल्यास हेक्टरी दीडशे टन ऊस उत्पादन शक्य होऊ शकते असे ते म्हणाले .
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी व शेतकरी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कुमार खारगे यांनी केले तर आभार कडेगाव तालुका कृषी अधिकारी बाळकृष्ण कदम यांनी मानले.
000000
सोमवार, १३ मार्च, २०२३
कृषी प्रदर्शनात जनहिताच्या योजनांची प्रचार व प्रसिद्धी करा शासकीय यंत्रणांना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या सूचना
सांगली दि. 13 (जि.मा.का.) : शासन शेती आणि शेतकऱ्यांसाठी कृषी विकासाच्या अनेक योजना राबवित आहे. या योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरत असून सांगली येथे 17 ते 21 मार्च 2023 या कालावधीत होणाऱ्या कृषी प्रदर्शनात जिल्ह्यातील कार्यान्वयीन यंत्रणांनी शासनाच्या जनहिताच्या योजनांच्या माहितीचे स्टॉल लावून योजनांची प्रचार व प्रसिद्धी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या.
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका व जिल्हा परिषद सांगली यांच्या सहकार्याने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली व प्रकल्प संचालक आत्मा सांगली यांच्यावतीने कल्पद्रुम ग्राउंड, नेमिनाथ नगर, विश्रामबाग सांगली येथे दि. 17 ते 21 मार्च 2023 या पाच दिवसाच्या कालावधीत आयोजित कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी विनामुल्य असून सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
या कृषी प्रदर्शनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखालील बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, जिल्हा अग्रणी बँकचे प्रबंधक महेश हरणे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, कृषी उपसंचालक प्रियांका भोसले, यांच्यासह कृषी विभाग व जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देणे, प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपापसातील विचारांची देवाण-घेवाण करणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे, आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांना अर्थिकदृष्ट्या उन्नत करणे तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विषयक अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री करणे, दुर्लक्षित झालेल्या पौष्टिक तृणधान्य पिकांचे महत्व ग्राहकांना पटवून देऊन या पिकाखालील क्षेत्रात वाढ करणे, विविध चर्चासत्र व परिसंवादाच्या माध्यमातून अद्यावत तंत्रज्ञान / कृषि व संलग्र विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरेल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.
कृषी प्रदर्शनात 200 पेक्षा जास्त स्टॉल असून 40 स्टॉल शासकीय विभागांसाठी आहेत. शासकीय कार्यालयांना स्टॉल वाटपासाठी कृषी विभागाने समिती गठीत करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.
कृषी प्रदर्शनाबाबत माहिती देताना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले, कृषी प्रदर्शनात धान्य व फळ महोत्सव आणि विविध विषयावरील परिसंवाद / चर्चासत्राचे आयोजन केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषीत केले आहे. पौष्टिक तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकांच्या आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करून लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे या प्रमुख उद्देशाने महोत्सवामध्ये पौष्टिक तृणधान्य पिकासाठी स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. यामध्ये पौष्टिक तृणधान्य उपपदार्थांचे प्रदर्शन व विक्री, पौष्टिक तृणधान्ये रेसिपी व पौष्टिक तृणधान्य सेल्फी पॉईंट इ. चा समावेश राहणार आहे.
त्याचबरोबर महोत्सवामध्ये धान्य व फळ महोत्सव, उत्पादन ग्राहक थेट विक्री, विक्रेता खरेदीदार संमेलन, प्रगतशील शेतकरी सन्मान, कृषी निविष्ठा, कृषी तंत्रज्ञान, सिंचन, गृहउपयोगी वस्तू, विविध खाद्यपदार्थ, कृषी यांत्रिकीकरण, सुधारित औजारे, धान्य फळपिके, फुल पिके यांचे नमुने, महिला बचत गटांच्या पाककृती व फळ पिकाची कलमे / रोपे इत्यादी दालनांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी दिली.
कृषी प्रदर्शनामध्ये खते, बियाणे, कीटकनाशके, ट्रॅक्टर व सुधारित औजारे, सिंचन साधने, फळे भाजीपाला कलमे/ रोपे उत्पादक/ वितरक यांना प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन स्टॉल बुकींग करावयाचे असल्यास कृषि विभागाचे संदीप खरमाटे, कृषि सहाय्यक मो.क्र. ७९७२६५१४७१/ ९८५०९०३४६५ व श्री. अमित चव्हाण तंत्रज्ञान व्यवस्थापक मो. क्र. ९८९०३२१९८३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
00000
शुक्रवार, ३ मार्च, २०२३
शेतकऱ्यांनी नैसर्गिक, सेंद्रिय व ऑरगॅनिक शेतीकडे वळावे - कृषी मंत्री अब्दुल सत्तार
कृषी विभागाचा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आढावा
सांगली दि. 3 (जिमाका) : रासायनिक खते, पाण्याचा अतिवापर यामुळे शेतीत नापिकतेचे प्रमाण वाढत आहे. यामुळे आता नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, ऑरगॅनिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे. कृषी विभागाने यासाठी नियोजन करावे, त्यास शासनस्तरावरून आवश्यक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
कृषी विभागाच्या कोल्हापूर विभागाची आढावा बैठक सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात संपन्न झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, विभागीय कृषी सह संचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, कोल्हापूरचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अधिकारी जालिंदर पांगरे, सातारा जिल्ह्याचे कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, पाण्याच्या अतिवापरामुळे जमिन नापिक होत असून याचे दुष्परीणाम आता दिसू लागले आहेत. नापिक जमिन सुपीक बविण्यासाठी कृषि विद्यापीठांनी संशोधन करुन या जमिनीवर पिके घेण्यासाठी नवनवीन वाणांचे संशोधन करावे. तसेच शेतीमध्ये नवीन उपक्रम राबविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. सन 2023 हे वर्ष आंतरराष्रीय य पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात असून तृणधान्य हा सकस आहार आहे. याचा आहारात अधिक वापर व्हावा यासाठी प्रचार आणि प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात करावी. तृणधान्याचे मार्केटींग करून हॉटेल्स व रूग्णालयात रूग्णास देण्यात येणाऱ्या आहारामध्ये तृणधान्याचा वापर करण्यासाठी प्रयत्न करावेत.
शेती आणि शेतकरी हा मुख्य घटक मानून राज्य शासन कृषी विषयक योजना आखते. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाने कटिबध्द राहवे. कृषी विभागाच्या योजनांपासून शेतकरी लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
सांगली जिल्हा हा सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेला जिल्हा असल्याचे सांगून कृषि मंत्री श्री. सत्तार म्हणाले, जिल्ह्याने द्राक्ष, हळद यामध्ये आपले वेगळेपणे सिद्ध केले आहे. येथील शेतकरी विविध समस्यांवर मात करुन जिल्ह्यात हरित क्रांती घडवित असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
शेतकऱ्यांना घरपोच सातबारा देण्याचा महसूल यंत्रणेचा प्रयत्न आहे. याबरोबरच नवीन तंत्रज्ञानानुसार बी-बियाणे देण्यासाठी, तसेच बोगस बियाणे व खते विक्री करणाऱ्यावर कारवाई करणे, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना हवे ते देण्यासाठी महसूल विभागामार्फत प्रयत्न केले जात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांनी सांगली जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना आणि उपक्रम याची माहिती दिली. सातारा जिल्ह्याचे कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत यांनी सातारा व कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. विभागीय कृषी सह संचालक बसवराज बिराजदार यांनी आभार मानले.
0000
विषमुक्त शेतीला चालना देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील - कृषी मंत्री अब्दुल सत्तार
सांगली दि. 3 (जि. मा. का.) : रासायनिक खते, औषधे यांच्या अतिवापरामुळे अनेक राज्यात कॅन्सरसारख्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. याचा गांर्भियाने विचार करण्याची वेळ आता आली असून रासायनिक शेतीचे वाढलेले क्षेत्र व होत असलेले दुष्परिणाम ही चिंतेची आणि चिंतनाची बाब झाली आहे. त्यामुळे 25 लाख हेक्टर जमिनीवर यावर्षी विषमुक्त शेती करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यादृष्टीने राज्यात विषमुक्त शेतीला राज्य शासन चालना देत असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
विजयनगर सांगली येथे कृषी विभागाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या पुढारी ॲग्री पंढरी सिजन ३ प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, पुढारी पब्लीकेशनचे समुह सरव्यवस्थापक अनिल पाटील, कार्यकारी संपादक विजय जाधव, ऑरबिट क्रॉप न्युट्रीयंट्स संचालक दिपक राजमाने, डॉ. रवींद्र आरळी, रॉनिक स्मार्ट कोल्हापूर चे संचालक तानाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
रशिया-युक्रेन युध्दामुळे जागतिक स्तरावर मंदीचे सावट आहे. अशा काळात शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगून कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, शेतकरी आत्महऱ्या महाराष्ट्रात होवू नयेत यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून काम सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 12 हजार कोटी रूपयांची मदत केली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असणाऱ्या एनडीआरएफच्या निकषामध्ये बदल करण्यात आला आहे. अशावेळी महाराष्ट्रातील गोरगरीब, कोरडवाहू शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि विषमुक्त शेतीबाबत अचूक मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारची कृषि प्रदर्शने महत्वपूर्ण ठरतील. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर याचा लाभ घ्यावा.
जिल्ह्यात बोगस बी-बियाणे, खते, औषधे येणार नाहीत व शेतकऱ्यंचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही यादृष्टीने कृषी विभागाने दक्षता घ्यावी, असे सांगून कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, सातत्याने हवामानात होत असलेल्या बदलामुळे पिकांवर अचानक येणाऱ्या वेगवेगळ्या रोगांच्या निवारणासाठी कृषि विद्यापीठांनी संशोधन करून शेतकऱ्यांना अचूक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावे. पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर क्षेत्र क्षारपड झाले आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. नापिकीची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यात येत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
यावेळी कृषि प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या काकडी, मिरची, घेवडा, मका, वटाणा, झेंडू, झुकिनी अशा विविध पिकांच्या प्लॉटसवर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट देवून पहाणी केली, माहिती घेतली. त्याचा बाजारभाव, पिकावर पडणारे रोग याबाबत सविस्तर चर्चा केली. या कार्यक्रमात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्ष, ऊस आदिंचे चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रदर्शनात 200 पेक्षा अधिक कृषि विषयक स्टॉल्स उभारण्यात आले असून हे प्रदर्शन पाच दिवस चालणार आहे. याचा लाभ मोठ्या प्रमाणावर घ्यावा, असे आवाहन कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पुढारी पब्लीकेशनचे समुह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी केले. तर आभार कार्यकारी संपादक विजय जाधव यांनी मानले.
000000
शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३
कामगारांच्या अडीअडचणी एकाच छताखाली सोडविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला कामगार भवन उभे करणार - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली दि. 25 (जि.मा.का.) : कामगारांच्या व्यथा, अडचणी, त्यांची सुख:दुख: ही मी स्वत: भोगलेली असून यातून कामगारांच्यासाठी काही तरी मार्ग निघावा यासाठी प्रत्येक जिल्ह्याला कामगार भवन उभे करून एकाच छताखाली कामगारांच्या सर्व अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
17 व्या कामगार साहित्य संमेलनाचा सांगता समारंभ बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे संपन्न झाला. या प्रसंगी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर, 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, माजी महापौर संगीता खोत यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, साहित्यिक व कामगार उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, कामगार कष्टाचे काम करत असतो त्यामुळे त्याच्या आरोग्याच्या अडचणी निर्माण होतात. कामगारांना योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्याला मल्टीपर्पज ईएसआय हॉस्पीटलसाठी प्रयत्न करीत असून 6 ईएसआय हॉस्पीटल मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी पुणे येथील मल्टीपर्पज हॉस्पीटलची पायाभरणी लवकरच करण्यात येईल. कामगारांची मुले खेळ, उद्योगात आली पाहिजेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी वास्तु उभा करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. ईएसआय हॉस्पीटलला जोडूनच कामगारांच्या मुलांसाठी मेडिकल कॉलेज काढण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. कामगारांच्या मुलांना टेक्नीकल प्रशिक्षण देण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगून प्रत्येक वर्षी कामगार साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉ. तारा भवाळकर यांनी साहित्य संमेलन अत्यंत आनंदात पार पडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देवून येथून पुढे प्रत्येक वर्षी साहित्य संमेलन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. जुन्या व नव्या साहित्याचा इतिहास नोंदविला जावा असे सांगून डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, वर्षभर कवि संमेलन, कथाकथन, परिसंवाद अशा प्रकारचे कार्यक्रम विविध ठिकाणी घ्यावेत त्यामुळे त्या त्या ठिकाणच्या कलाकारांना वाव मिळेल. कामगार ज्या ज्या ठिकाणी काम करतात त्या त्या ठिकाणी त्यांना चांगली स्वच्छतागृहे, स्वच्छ पाणी, खाण्यापिण्याची व्यवस्था अशा सुविधा त्यांना परवडतील अशा पध्दतीने उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी म्हणाले, कामगार साहित्य चळवळीची अत्यंत आवश्यकता आहे. अनुदवादक फळी निर्माण करून आपल्या भाषेतील साहित्य इतर ठिकाणी पोहचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी वैचारिक लेखन, नाट्यलेखन, काव्यलेखन, कथालेखन स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच विविध लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी साहित्य संमेलनाबद्दल सविस्तर माहिती देवून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन श्वेता हुले यांनी केले. आभार सहायक कल्याण आयुक्त माधवी सुरवे यांनी मानले. या कार्यक्रमास साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)