मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३
महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी काम करा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे आवाहन
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सप्ताहाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : महसूल विभाग हा सामान्य माणसाच्या शासकीय कामांशी थेट जोडलेला विभाग आहे. यासाठी महसूल विभागाने सामान्य माणसाच्या कामांप्रती अधिक संवेदनशील राहून महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी काम करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित महसूल दिन व महसूल सप्ताहाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी विकास खरात, बी. आर. माळी, वर्षा शिंगण, राजीव शिंदे, विजया पांगारकर, रघुनाथ पोटे, स्नेहल कनिचे यांच्यासह महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, शासनाच्या सर्व योजना राबविण्यात महसूल विभाग आघाडीवर असल्याने या विभागाची नाळ सामान्य माणसाला जोडलेली आहे. महसूल विभागानेही सामान्य माणसाची कामे गतीने करून त्याला शासन योजनेचा लाभ मिळवून देण्यात आग्रही भूमिका बजावावी. या पुढील काळात महसूल विभागाने जनतेची कोणतीही प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी म्हणाले, महसूल विभागाने आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. पूर, आपत्ती, दुष्काळ, निवडणूक आदि कामांमध्ये या विभागातील अधिकारी कर्मचारी झोकून देऊन काम करतात. लोकांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणारा हा विभाग आहे. यापुढेही विभागाने आपल्या चांगल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करावी.
महसूल विभाग हा शासनाच्या सर्व खात्यांना एकत्र घेऊन काम करणारा विभाग आहे. विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करावी असे अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वाती देशमुख यांनी सांगितले.
उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण, तहसीलदार प्रदीप उबाळे, तलाठी शुभांगी थोरात यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये तहसीलदार प्रदीप उबाळे, निवास ढाणे, नायब तहसीलदार विनायक महाजन, अव्वल कारकून आशिष देशिंगे, श्रीमती हेमा साबळे, मंडळ अधिकारी तानाजी पवार, फैयाज मुल्ला, महसूल सहाय्यक दिपक माने, श्याम ठाकूर, तलाठी श्रीमती शुभांगी थोरात, गणेश क्षीरसागर, वाहन चालक उत्तम जगताप, शिपाई दत्ता शिंगे, अंकुश खोत, माणिक माळी, कोतवाल विकास काळबागे, भीमराव हत्तीकर, गुरुदास माळी, अल्फास मुजावर, पोलीस पाटील श्रीमती अनिता पाटील आणि पहारेकरी या संवर्गात राजकुमार लोटके यांचा समावेश आहे.
प्रारंभी पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यानंतर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
०००००
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडून अभिवादन
सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : वाटेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज अभिवादन केले.
तद्नंतर पालकमंत्री डॉ. खाडे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या शिल्पसृष्टीस भेट देऊन पाहणी केली. यावेळी खासदार धैर्यशील माने, बार्टीचे विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीच्या अध्यक्षा नंदिनी आवडे, सत्यजीत देशमुख, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, निशिकांत पाटील, डॉ. प्रेम हनवते, विकास गायकवाड, रामदास लोखंडे, समाधान दुधाळ, गणेश सवाखंडे, सरपंच नंदा चौगुले, उपसरपंच सोनाली पाटील आदि उपस्थित होते.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)च्या वतीने वाटेगाव येथे विविध प्रबोधनात्मक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिवादन सभाही झाली. या सभेत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी यासाठी राज्य शासनाने त्यांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात 25 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. यावेळी त्यांनी उपस्थितांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
बार्टी संस्थेच्या वतीने भारतीय राज्यघटनेची प्रत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व इतर महापुरुषांच्या जीवनातील दुर्मिळ पुस्तके विक्री स्टॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते अनुयायांना पुस्तके देऊन करण्यात आले.
यावेळी शाहीर राजेंद्र कांबळे, अमर पुणेकर, अशोक गायकवाड, आर. के. भोसले आदि कलाकार व संच यांनी महापुरुषांच्या जीवनावरील शाहिरीच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचे प्रबोधन केले. यावेळी बार्टी संस्थेतील अधिकारी व समतादूत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व अण्णा भाऊ साठे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, सांगलीच्या पुष्कराज चौक येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
00000
'मेरी माटी मेरा देश' उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली, दि. 1 (जि.मा.का.): मेरी मिट्टी मेरा देश' हा उपक्रम 9 ते 15 ऑगस्ट कालावधीत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात शिलाफलकम, पंच प्रण शपथ व सेल्फी, वसुधा वंदन, वीरांना वंदन आणि ध्वजारोहण व राष्ट्रगाण असे कार्यक्रम होणार आहेत. या उपक्रमासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करून लोकसहभागातून उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.
'मेरी माटी मेरा देश' उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी सभागृहातून दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. बैठकीस प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, नगर प्रशासन विभागाचे जिल्हा सहआयुक्त ज्ञानेश्वर ढेरे प्रत्यक्ष उपस्थित होते तर महापालिका आयुक्त सुनील पवार, उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी यांनी सांगितले, आझादी का अमृत महोत्सव समारोपीय उपक्रमांतर्गत राज्यासह देशभरात 'मेरी माटी मेरा देश उपक्रम राबविण्यात येत आहे. गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घेत लोकसहभागातून हे अभियान यशस्वीपणे राबवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.
या उपक्रमांतर्गत गावातील, शहरातील संस्मरणीय ठिकाणी शिलाफलकमची उभारणी करा. या शिलाफलकमवर देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान दिलेल्या थोर व्यक्तींची नावे द्यावीत. लोकप्रतिनिधी तसेच ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी व गावकरी यांनी दिवे घेवून पंच प्रण शपथ घ्यावी. गावातील योग्य ठिकाण निवडून ‘वसुधा वंदन’ म्हणून 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करुन अमृत वाटिका तयार करावी. देशासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी व देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या व वीरांच्या कुटुंबातील सदस्यांना सन्मानित करा, अभियानांतर्गत गावात योग्य ठिकाणी कार्यक्रम घेवून तिरंगा फडकवण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी तालुकास्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करा. तालुकास्तरीय समितीच्या बैठका घ्या. वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी वनविभागाकडे करा, उपक्रमातील कार्यक्रमांची प्रचार प्रसिद्धी करा, उपक्रमात राष्ट्रध्वजाचा वापर करताना ध्वजसंहितेतील मार्गदर्शक तत्त्वानुसार करावा, पोलीस विभागाने पोलीस स्टेशननिहाय व चेक पोस्टच्या ठिकाणी बॅनर, पोस्टर लावावेत. परिवहन विभागाने एस.टी.बसेसवर व एस.टी. स्टँडवर उपक्रमाची जाहिरातीव्दारे जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
000000
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी 3 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार
सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुंसार प्रधानमंत्री पीक विमा योजना शासनाने खरीप हंगाम 2023 मध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राज्यात राबविण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागाची अंतिम मुदत 31 जुलै 2023 होती. तथापि, शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 3 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.
00000
शिराळा तालुक्यात 32.9 मि.मी. पावसाची नोंद
सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.1 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 32.9 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 3.5 (199.3), जत 1.5 (151.5), खानापूर-विटा 1.6 (117.7), वाळवा-इस्लामपूर 7 (219.8), तासगाव 3.4 (203.2), शिराळा 32.9 (577), आटपाडी 0.2 (113.5), कवठेमहांकाळ 2.6 (170), पलूस 3.9 (188.3), कडेगाव 3 (151.9).
00000
वारणा धरणात 29.28 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 74.22 (105.25), धोम 10.56 (13.50), कन्हेर 6.80 (10.10), वारणा 29.28 (34.40), दूधगंगा 17.86 (25.40), राधानगरी 8.30 (8.36), तुळशी 2.28 (3.47), कासारी 2.33 (2.77), पाटगांव 3.10 (3.72), धोम बलकवडी 3.53 (4.08), उरमोडी 5.83 (9.97), तारळी 5.02 (5.85), अलमट्टी 108.35 (123).
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 12.6 (40) व अंकली पूल हरिपूर 18.7 (45.11).
कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 1050, धोम 3999, कण्हेर 24, वारणा 5975, राधानगरी 5684, कासारी 250, धोम बलकवडी 1951, उरमोडी 490, तारळी 2409 व अलमट्टी धरणातून 57 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
00000
बुधवार, २६ जुलै, २०२३
पी.एम. किसान योजनेच्या लाभ वितरणाच्या कार्यक्रम प्रसारणाचा लाभ घेण्याचे आवाहन
पी.एम. किसान योजनेच्या लाभ वितरणाच्या
कार्यक्रम प्रसारणाचा लाभ घेण्याचे आवाहन
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 14 व्या हप्ता वितरणाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 27 जुलै 2023 रोजी होणार आहे. हा समारंभ राजस्थान मधील सिकर येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण http://pmindiawebcast.nic.in व http://pmevents.ncog.gov.in या लिंक व्दारे होणार असून या कार्यक्रमाचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना 14 व्या हप्त्यातील एप्रिल 2023 ते जुलै 2023 देय लाभ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सीकर, राजस्थान येथून ऑनलाईन समारंभामध्ये वितरीत होणार आहे. कृषि विज्ञान केंद्र कसबे डिग्रज, कृषि विज्ञान केंद्र कांचनपूर, ग्रामपंचायत स्तरावरून तसेच तालुक्यातील गावोगावी कृषि विभागामार्फत मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांनी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाचे आयोजन केले असल्याचे श्री. कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)