सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३
स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हावासियांना पालकमंत्र्यांकडून शुभेच्छा
सांगली, दि. 14 (जि.मा.का.) :- भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन उद्या 15 ऑगस्ट 2023 रोजी साजरा होत आहे. स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्या सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या समारंभास जिल्ह्यातील खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, वीर माता, वीर पिता, विरपत्नी, विविध पुरस्कार प्राप्त सन्माननीय व्यक्ती आणि मान्यवर नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
०००००
बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३
“मेरी माटी मेरा देश” उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या उपस्थितीत पंचप्रण शपथ
सांगली (जि.मा.का.) दि. 9 : “मेरी माटी मेरा देश” उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पंचप्रण शपथ घेण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, दीपक शिंदे, रघुनाथ पोटे, विजया पांगारकर, वर्षा शिंगण, स्नेहल कनिचे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी मूल्यांना समोर ठेवून संपूर्ण देशभर “मेरी माटी मेरा देश” विशेष मोहिम हाती घेतली आहे. या उपक्रमांतर्गत शिलाफलकम, पंच प्रण शपथ व सेल्फी, वसुधा वंदन, वीरांना वंदन आणि ध्वजारोहण व राष्ट्रगाण असे कार्यक्रम होणार आहेत.
“भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध वारसाचा गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू” अशी शपथ यावेळी घेण्यात आली.
जिल्हा माहिती कार्यालयात घेतली पंचप्रण शपथ
“मेरी माटी मेरा देश” उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पंचप्रण शपथ घेतली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, माहिती अधिकारी एकनाथ पोवार, अमोल पाटील, शंकरराव पवार, सुधीर पाटील, नागेश वरुडे, प्रदीप थोरात उपस्थित होते.
00000
सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये “मेरी माटी मेरा देश" उपक्रम यशस्वी करणार - मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे
सांगली, दि. 7 (जि. मा. का.) : “मेरी माटी मेरा देश" अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येणार असून अभियान अनुषंगिक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत “मेरी माटी मेरा देश" या अभियानामध्ये ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र, राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे “मेरी माटी मेरा देश" अभियान राबविण्याबाबत ग्रामविकास विभागाने निर्देशित केले असून जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व 696 ग्रामपंचायतींमध्ये नियोजन करण्यात आले आहे. दि. 4 ते 10 ऑगस्ट 2023 दरम्यान “मेरी माटी मेरा देश" अनुषंगाने गावात प्रचार व प्रसिध्दी करणे, गावातील संस्मरणीय एका ठिकाणी (अमृत सरोवर / शाळा / ग्रामपंचायत इत्यादी) शिलाफलक बांधकाम करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. दि. 7 ते 9 ऑगस्ट 2023 दरम्यान “मेरी माटी मेरा देश" अभियान अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येणार असून अभियान अनुषंगिक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 13 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा उपक्रम, शिलाफलक उद्घाटन व ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
दि. 16 ते 20 ऑगस्ट 2023 दरम्यान प्रत्येक गावातून आणलेली माती एका कलशामध्ये पंचायत समिती स्तरावर गोळा केली जाणार आहे. हा कलश दि. 16 ते 20 ऑगस्ट 2023 दरम्यान राज्य स्तरावरील कार्यक्रमासाठी व दिनांक 27 ते 30 ऑगस्ट 2023 दरम्यान प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे नेण्यात येणार आहे. हा कलश दिल्ली येथे घेऊन जाण्यासाठी नेहरू युवा केंद्र, युवक कल्याण विभागाचे सहाय्य घेऊन एका युवकाची निवड केली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.
00000
“ हर घर तिरंगा" मोहिमेसाठी टपाल खात्यात 25 रुपयात मिळणार राष्ट्रध्वज
सांगली, दि. 7 (जि. मा. का.) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक यांच्या आठवणी तसेच देशभक्तीची भावना जनमानसात कायम रुजावी, या उद्देशाने गतवर्षी 15 ऑगस्टला 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाला देशवासियांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आपल्या देशाबद्दल असलेला अभिमान आणि स्वातंत्र्यदिनाचे स्मरण करण्यासाठी ही मोहीम यशस्वी झाल्यामुळे यंदाही केंद्र आणि राज्याकडून 'हर घर तिरंगा २.०' मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांना तिरंगा ध्वज विकत घेणे सुलभ व्हावे म्हणून भारतीय पोस्ट विभागात अवघ्या 25 रुपयात तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अशी माहिती सांगलीचे प्रवर अधीक्षक डाकघर आर. पी. पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.
यंदाही 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनासाठी टपाल विभागाकडून 25 रूपये प्रति ध्वज अशा किफायतशीर दराने दर्जेदार राष्ट्रीय ध्वजांची विक्री आणि वितरण करण्यात येत आहे. पोस्ट विभागाच्यावतीने सरकारी/ खासगी संस्था, कॉर्पोरेशन, स्थानिक स्वराज्य संस्थांनी पोस्ट विभागाकडे त्यांच्या कार्यालयासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय ध्वजाची आवश्यकता असल्यास १० ऑगस्टपर्यंत कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. झेंडा ऑनलाइन पद्धतीने सुद्धा ग्राहक खरेदी करू शकतात. ऑनलाइन खरेदीसाठी ग्राहकांनी www.epostoffice.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी. या मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.
00000
बुधवार, २ ऑगस्ट, २०२३
बीएलओंच्या 21 ऑगस्टपर्यंत घरोघरी भेटी, अचूक मतदार यादीसाठी सहकार्याचे आवाहन
सांगली, दि. 2 (जि. मा. का.) : मतदार यादीच्या पुनरिक्षण पूर्व उपक्रमामधील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्याचा उपक्रम दि. 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या कालावधीत संबंधित भागातील बीएलओ हे मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार यादीतील मतदारांच्या तपशीलाची पडताळणी संबंधित कुटुंबप्रमुखाकडून माहिती घेऊन करत आहेत. मतदार यादी अचूक होण्यासाठी नागरिकांनी व राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन 281-मिरज विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) दीपक शिंदे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने 281-मिरज विधानसभा मतदार संघातील बीएलओ प्रामुख्याने मतदार यादीत नाव नसलेले पात्र नागरिक, संभाव्य मतदार, 1 जानेवारी 2024 रोजीच्या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे तसेच 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑगस्ट 2023 या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे व मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र मतदार, दुबार नोंदी, मयत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, यादीत दुरुस्ती अशा मुद्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करीत आहेत.
मतदार केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण व मतदार यादी, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे आदि कामे दि. 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत करण्यात येणार आहेत. एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 व अंतिम मतदार यादी 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. दावे व हरकती सादर करण्यासाठी नमुना अर्ज तहसिल कार्यालय मिरज (निवडणूक शाखा) अथवा बीएमओ मार्फत सादर करण्यात येणार आहेत किंवा ऑनलाईन अर्ज Voter Service Portal, Voter Portal या संकेतस्थळावर व Voter Helpline Mobile App वर देखील सादर करता येतील. या मोहिमेसंदर्भात नागरिकांना किंवा मतदारांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेशी संपर्क साधावा. बीएलओ यादी तहसिल कार्यालयात उपलब्ध असल्याचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार मिरज डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी 15 ऑगस्ट अर्ज करण्याची मुदत
सांगली, दि. 2 (जि. मा. का.) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांकरिता समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक (व्यक्ती) यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सांगली जिल्ह्यातील इच्छुक स्वयंसेवी संस्था व व्यक्तिंनी पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त, समाजकल्याण, सांगली यांच्याकडे दि. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सर्व कागदपत्रांसह दाखल करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण जयंत चाचरकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
सन 2019-2020, 2020-2021, 2021-2022 व 2022-2023 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यापूर्वी ज्यांनी सन 2019-2020, 2020-2021 व 2021-2022 या वित्तीय वर्षाकरिता अर्ज केला आहे, त्यांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तथापि, त्यांनी ज्या वर्षाकरिता अर्ज केला आहे, त्या वर्षाकरिता चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा. या कालावधीकरिता पूर्वी अर्ज केलेल्या व्यक्तिंनी पुन्हा अर्ज केल्यास त्या अर्जांचाही विचार करण्यात येईल. ज्या वर्षासाठी व ज्या पुरस्कारांकरिता अर्ज करण्यात येत आहे, त्या वर्षासाठी व त्या पुरस्काराकरिता विहित केलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक राहील. तसेच, पुरस्कारासाठी दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर अशी गणना विचारात घेण्यात येईल. (उदा. सन 2019-2020 या वर्षाकरिता पात्रतेचा कालावधी 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर2019 असा विचारात घेण्यात येईल.)
अर्जाचा नमुना सहायक आयुक्त, समाजकल्याण, सांगली या कार्यालयात तसेच शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
00000
संसर्गजन्य रोगापासून बचावासाठी डोळ्यांची काळजी घ्या - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम
सांगली, दि. 2 (जि. मा. का.) : राज्यातील अनेक भागात पावसाळ्यात डोळे येण्याची विषाणूजन्य साथ येताना दिसत आहे. डोळे येणे हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे, जो पावसाळ्यात होतो. कधी दोन्ही डोळ्यांवरही त्याचा संसर्ग होतो. डोळ्यांना खाज, चिकटपणा, सूज, डोळे लालसर होणे, डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे ही लक्षणे आहेत. यासाठी नागरिकांनी डोळ्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी केले आहे.
डोळ्यांची काळजी घेण्यासाठी डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवावे. इतर व्यक्तिंच्या रूमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नये. डोळ्यांना सतत स्पर्श करू नये. उन्हात वापरण्यासाठी असणाऱ्या चष्म्यांचा वापर करावा. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे डोळ्यात टाकावीत. याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेत्र तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनही डॉ. कदम यांनी केले आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)