मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३
लम्पी चर्मरोग; शनिवारपर्यंत लसीकरण पूर्ण करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली दि. 22 (जि.मा.का.) :- लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यातील गोवंशीय पशुधनाचे येत्या शनिवारपर्यंत लसीकरण पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या.
लम्पी चर्मरोगाबाबत जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे, डॉ. एच. डी. पठाण, डॉ. महादेव गवळी, डॉ. विजय ढोले, डॉ. शरद सोनवणे, डॉ. शिरमनवार आणि डॉ. देशपांडे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, लम्पी चर्मरोगाचा फैलाव रोखण्यासाठी स्वच्छता महत्वाची असून पशुपालकांनी यास प्राधान्य द्यावे. याबरोबरच ग्रामपंचायतींनी नियमित औषध फवारणी करावी. या रोगाने बाधित जनावरांचे आयसोलेशन करावे. आत्तापर्यंत 65 टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले असून उर्वरित पशुधनाचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
लम्पी चर्मरोगाबाबत मार्गदर्शन व उपचार याबाबत सल्ला देण्यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर यांच्याकडील पथक जिल्ह्यात येणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
०००००
शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर सोमवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर
सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) राजेश क्षीरसागर हे सोमवार, दि. 21 ऑगस्ट 2023 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दि. 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद शाळा क्र. 1 कसबे डिग्रज ता. मिरज येथे अंगणवाडी (अंकूर) व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा दर्जा सुधारण्यासाठी सुविधा पुरविणे या प्रकल्पास व आंबेडकर रोड क्रांती हॉस्पीटल जवळ सांगली येथे यांत्रिकी पध्दतीने रोबोटच्या मार्फत ड्रेनेज चेंबरची स्वच्छता या प्रकल्प ठिकाणांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे भेट देणार आहेत.
00000
लम्पी चर्म रोग प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलनासाठी संपूर्ण सांगली जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित
सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : लम्पी चर्म रोग या अनुसूचित रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलन करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी प्राण्यामधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 आणि महाराष्ट्र शासन अधिसूचना दि. 17 जून 2022 अन्वये प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण सांगली जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करून पुढीलप्रमाणे आदेश दिले आहेत.
सांगली जिल्ह्यात लम्पी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निर्मुलन करता येईल आणि गोजातीय प्रजातीची सर्व गुरे म्हशी यांची ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात, त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्र बाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने आण करण्यास मनाई करण्यात येत आहे. यापूर्वी शर्यतीला परवानगी दिली असल्यास या आदेशान्वये सदर शर्यत परवानग्या रद्द होतील. गोजातीय प्रजातीची गुरे व म्हशीचा कोणताही बाजार भरवणे, प्राण्याच्या शर्यत लावणे, बैल गाडी शर्यत आयोजित करणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातींच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात येत आहे. नियंत्रित क्षेत्रामधील बाजार पेठेत, जत्रेत, प्रदर्शन किंवा प्राण्यांच्या अन्य जमाव मध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या उक्त बाधित झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास मनाई करण्यात येत आहे. जनावारांचा बाजार भरविण्यास मनाई करण्यात येत आहे. साथीच्या काळात बाधीत भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश प्रतिबंधीत करण्यात येत आहे. तसेच बाधीत गांवामध्ये बाधीत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व चराई करिता पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी.
रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये व रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रा मधून पशुधनाची ऑनलाईन पध्दतीने होणारी खरेदी विक्री व प्रत्यक्ष वाहतूक प्रतिबंधित करण्यात येत आहे. गायी व म्हशींना स्वतंत्र ठेवणे, बाधीत व अबाधीत जनावरे वेगळी बांधणे तसेच या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पध्दतीने पशुपालकांनी विल्हेवाट लावावी. बाधीत परिसरात स्वच्छता व निर्जंतूक द्रावणाची फवारणी करुन निर्जंतूकीकरण करावे व रोगप्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माशा, गोचीड इत्यादीच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करावी. लंम्पी चर्मरोगाचा विषाणू वीर्यामधूनही बाहेर पडत असल्यामुळे वीर्य मात्रा बनविणाऱ्या संस्था मार्फत होणारे वीर्य संकलन थांबवावे व वळुंची चाचणी करुन रोगाकरिता नकारार्थी आलेल्या वळुंचे वीर्य संकलन करणे किंवा नैसर्गिक संयोगा करिता वापर करावा. लंम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा व महानगरपालिका यांचे मार्फत त्यांचे कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरिक्षण करण्यात यावे तसेच बाधीत पशुधनाची काळजी घ्यावी व कीटक नाशक फवारणी मोहीम स्वरुपात राबविण्यात यावी.
कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणी मध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था प्रतिनिधी यांच्या विरुध्द नियमानुसार गुन्हा दाखल करणे तसेच कारवाई प्रस्तावीत करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
पशुधनामध्ये लम्पी चर्म रोगाची लागण झाल्याचे रोग निदान अहवाल प्राप्त झालेले आहेत. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री यांनी व्ही.सी व्दारे लम्पी चर्मरोग या अनुसूचित रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलन करण्यासाठी नियंत्रित क्षेत्र घोषित करणे व जनावरांचे बाजार बंद करण्याबाबत सूचित केले आहे. लम्पी चर्मरोग जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती सभेमध्ये लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण सांगली जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे या निष्कर्षापर्यंत आलेली आहे. तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका जिल्ह्यातून दुसऱ्या बाधित जिल्ह्यात जनावरांची वाहतूक केल्यामुळे बाधित जनावरापासून निरोगी जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. हा रोग विषाणूजण्य सांसर्गिक रोग असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी लम्पी चर्म रोग या अनुसूचित रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलन करण्यासाठी संपूर्ण सांगली जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी आदेश जारी केले आहेत.
00000
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
24 ऑगस्टला धनंजय गार्डन येथे आयोजन
सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे येत्या 24 ऑगस्टला नियोजन करण्यात आले आहे. धनंजय गार्डन, कर्नाळ रोड येथे सकाळी 11 वाजल्यापासून हे अभियान होणार आहे. या अभियानात गरजेनुसार दिव्यांगांची आरोग्य तपासणी करून त्यांना शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे प्रातिनिधीक स्वरूपात दिली जाणार आहेत. तरी दिव्यांग बांधवांनी या अभियानाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे केले.
या अभियानाच्या तयारीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, मंजिरी देशपांडे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे व महामंडळांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
दिव्यांगांच्या तक्रारींचा त्याच ठिकाणी निपटारा करण्याठी हे अभियान होत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, हे अभियान यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका, जिल्हा परिषद व नगरपालिका निहाय नोडल अधिकारी तसेच दिव्यांगांची व्यवस्था पाहण्यासाठी क्षेत्रनिहाय कर्मचारी नेमावेत. दिव्यांग बांधवांची ने – आण करण्यासाठी वाहन व्यवस्था, पाणी व भोजन व्यवस्था, अन्य आवश्यक सोयी सुविधा, रँप, प्रथमोपचार पेटी, स्वच्छतागृहे, व्हील चेअर आदि बाबींचे काटेकोर नियोजन करावे. आवश्यक निधी, स्टॉलची उभारणी याबाबत जिल्हा परिषद व महानगरपालिकेने व्यवस्था पाहावी, असे त्यांनी सूचित केले.
दिव्यांगांना दैनंदिन जीवनात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या तक्रारी, अडीअडचणींचा निपटारा होऊन शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे सुलभरीत्या प्राप्त होण्यासाठी हे अभियान फायदेशीर ठरणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.
या अभियानात जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, तसेच शासनाच्या नियंत्रणाखालील महामंडळे व इतर संस्था यांचे स्टॉल लावून एकाच छताखाली केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. दिव्यांगांना आवश्यक असणारी प्रमाणपत्रे, दाखले, योजनांची माहिती व इतर अनुषंगिक सुविधा देण्यात येणार आहेत.
00000
लम्पी चर्मरोग; फवारणी व लसीकरणास प्राधान्य द्या जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या सूचना
सांगली दि. 18 (जि.मा.का.) :- जिल्ह्यात लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नियमित फवारणीसह गोवंशीय पशुधनाचे तातडीने लसीकरण पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या.
लम्पी चर्मरोगाबाबत जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, जिल्हा अधीक्षक विवेक कुंभार, सहायक निबंधक उर्मिला राजमाने आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, जिल्ह्याच्या काही भागात लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव जाणवत आहे. यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या ज्या भागात लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव जाणवत आहे त्या ठिकाणी लसीकरण प्राधान्याने पूर्ण करावे. बाधित जनावरांचे आयसोलेशन, औषधोपचार, लसीकरण याबाबत आवश्यक खबरदारी घेऊन पशुपालकांमध्ये जनजागृती करावी. लसीकरण व फवारणीसाठी पथके कार्यरत ठेवावीत. लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे बाजार बंद करणे, शर्यती बंद करणे, जनावरांची वाहतूक बंद करणे आदी उपाय योजना राबविण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.
०००००
िल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या उपस्थितीत सद्भावना दिनानिमित्त प्रतिज्ञा
ज
सांगली दि. 18 (जि.मा.का.) : माजी प्रधानमंत्री भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांचा 20 ऑगस्ट हा जन्म दिवस सद्भावना दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी माजी प्रधानमंत्री भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद्नंतर सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेण्यात आली.
सद्भावना दिवस प्रतिज्ञा कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मी अशी प्रतिज्ञा करतो की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता, सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो की, आमच्यामधील सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गाने सोडवीन... अशी प्रतिज्ञा घेण्यात आली.
०००००
सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३
जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी वचनबद्ध - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
- मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेसाठी 749 एकर जागा
- म्हैसाळ विस्तारीत योजनेच्या 1028 कोटींच्या कामांचा कार्यारंभ आदेश
- 43 हजार कामगारांना 66 कोटींच्या शिक्षणविषयक योजनांचा लाभ
सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित, मागास बांधवांना सगळ्यांबरोबर संधी मिळावी, तसेच जिल्ह्याचा सर्वंकष विकास व्हावा, यासाठी वचनबद्ध आहे. यासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन आराखड्यातून विकासकामांसाठी 405 कोटींची तरतूद केली असून या माध्यमातून जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिली.
भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर दिलेल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी ही ग्वाही दिली. यावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, पद्मश्री विजयकुमार शहा, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल यांच्यासह विविध कार्यालय प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, नागरिक उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या उपस्थितांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, शेतकरी, कष्टकरी या महत्त्वाच्या घटकासाठी राज्य शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेसाठी जिल्ह्यात 28 ठिकाणी 749 एकर जागा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीस उपलब्ध करून दिली आहे. या योजनेतून शेतीपंपांना दिवसा अखंडित व शाश्वत वीज मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून 436 प्रस्तावांना कर्ज मंजुरी देण्यात आली आहे. द्राक्षे, डाळिंब व भाजीपाला पिकांच्या निर्यातीसाठी जिल्ह्यातून 12 हजाराहून अधिक लाभार्थींची नोंदणी झाली आहे. तर 17 हजार मेट्रीक टन द्राक्ष पिकाची निर्यात झाली आहे. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतून पावणेपाच हजार लाभार्थींना 13 कोटीहून अधिक अनुदान वितरीत केले आहे.
जिल्ह्यातील गरजू, गरीब अन्नापासून वंचित राहणार नाही, यासाठी शासन - प्रशासन प्रयत्न करत असल्याचे सांगून डॉ. खाडे म्हणाले, जानेवारी 2023 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून लाभार्थींना प्रतिमाह नियत मोफत धान्य देण्यात येत आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतून जवळपास पावणे सतरा लाख लाभार्थींना तर अंत्योदय योजनेतून जवळपास 31 हजार कुटुंबांना लाभ देण्यात येत आहे. तसेच, जिल्ह्यात 57 शिवभोजन केंद्रांवरून आतापर्यंत जवळपास 56 लाख 33 हजार शिवभोजन थाळ्यांचे सवलतीच्या दरात वितरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांचे काम पूर्ण झाले असून जिल्ह्याच्या दृष्टीने ही अभिमानास्पद व गौरवाची बाब आहे. या अमृत सरोवरांच्या ठिकाणी मेरी माटी मेरा देश या उपक्रमातून वृक्षारोपण करण्यात येत आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, जिल्ह्याच्या पूर्व भागातील विशेषत: जत तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी देण्यासाठी 1930 कोटी पैकी 1028 कोटी रूपयांच्या म्हैसाळ विस्तारीत योजनेच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला असून लवकरच हे काम सुरू होत आहे. यामुळे जत तालुक्यातील 65 गावांचा सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल.
जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे सांगून डॉ. खाडे म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून यापूर्वी केशरी व पिवळ्या कार्डधारकांना दीड लाख रूपयांची मदत केली जात होती. आता सर्वच नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कवच प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील39 रुग्णालयात ही योजना राबवण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे वैद्यकीय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक देणारी शासकीय स्तरावरील राज्यातील पहिली वैद्यकीय स्किल लॅब उभी करण्यात आली. तसेच, एचआयव्ही बाधित रूग्णांसाठी स्वतंत्र डायलेसीस विभाग सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून आत्तापर्यंत 1375 बालकांवर अत्यंत गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया तर 14,720 बालकांच्या इतर शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत.
बिट मार्शल पोलीस अंमलदारांना 41 दुचाकी व संपर्कासाठी मोबाईल फोन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या माध्यमातून पोलीस दल अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, विकासाच्या प्रक्रियेमध्ये कामगारांचे स्थान महत्त्वाचे आहे. कामगार कल्याणाच्या अनेक योजना शासन राबवित आहे. जिल्ह्यात एकूण दोन लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षात जवळपास 44 हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यांना शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक व सामाजिक लाभाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये 43 हजारहून अधिक कामगारांना जवळपास 66 कोटी रूपयांचा शिक्षण विषयक योजनांचा लाभ, 163 कामगारांना जवळपास 32 लाख रूपयांचा आरोग्यविषयक योजनांचा लाभ, 332 कामगारांना जवळपास पावणे 2 कोटी रूपयांचा विविध आर्थिक योजनांचा लाभ, 82 कामगारांना 41 लाख 82 हजार रूपयांचा विविध सामाजिक योजनांचा लाभ देण्यात आला आहे. सन्मान धन योजना 2022 अंतर्गत 55 वर्ष पूर्ण केलेल्या 66 घरेलु महिला कामगारांना प्रत्येकी 10 हजार रूपये सानुग्रह अनुदान याप्रमाणे साडेसहा लाख रूपये इतका लाभ वितरीत करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या ई-श्रम कामगार नोंदणी प्रकल्पांतर्गत आतापर्यंत जवळपास साडेतीन हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. तर 3 हजार कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 1 व 2 मधील सर्व कामे पूर्ण आहेत. टप्पा 3 मधील 14 कामांसाठी 69 कोटीहून अधिक रकमेस मंजुरी मिळाली आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 1 मधील 256 पैकी 244 कामे पूर्ण झाली आहेत. टप्पा 2 मधील 58 कामांसाठी 210 कोटी 22 लाख रूपये रकमेस मान्यता प्राप्त आहे. ही सर्व कामे निविदा प्रक्रियेत असून येणाऱ्या काळात सर्व गावांना दर्जेदार रस्ते मिळतील. शासनाकडून कुपवाड ड्रेनेज योजना कामास मंजुरी देण्यात आली असून 253 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यामुळे कुपवाड शहर तसेच मिरज व सांगली शहरातील ड्रेनेजचा प्रश्न सुटणार आहे, असे त्यांनी सांगितले.
ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते स्वातंत्र्य सैनिक सर्वश्री माधवराव माने, महादेव रंगनाथ दंडगे, भिमराव अण्णा गोडसे, सज्जनराव शामराव पाटील, ज्ञानू येसु सावंत, नबिलाल अमिन मुलाणी यांचा सत्कार करण्यात आला. सैन्य सेवेत जम्मू काश्मिर येथे सीमा नियंत्रण रेषेवर कार्यरत असताना केलेल्या साहसी पराक्रमासाठी हवालदार संदीप विश्वास जाधव (निवृत्त), लान्स नायक किसन बाबुराव आटुगडे (निवृत्त) यांचा ताम्रपट व सानुग्रह अनुदान देवून सन्मान करण्यात आला. याच पराक्रमासाठी शिपाई योगेश नागेश किर्ते यांचा सन्मान त्यांच्या कुटुबियांनी स्वीकारला. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल फायरमन कासाप्पा लक्ष्मण माने यांचा गौरव करण्यात आला.
गुंतागुंतीच्या न्युरोसर्जरी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल डॉ. संतोष भिमराव दळवी व डॉ. अभिनंदन पाटील, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात उकृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप साळी, बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रिया प्रधान, महात्मा ज्योतिराव फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, सुदर्शन आय हॉस्पिटल सांगली यांचा सन्मान करण्यात आला.
यशस्वी लघुउद्योजक म्हणून मे. युनिव्हर्सल पॉवर कंट्रोल सांगलीच्या पूजा विजय भगत, मे. मास इंजिनिअर्सच्या अर्चना बळीराम पवार (दास), क्षारपड जमिनीमध्ये बांबूची लागवड करून जमिनीची सुपिकता वाढविल्याबद्दल डॉ. दीपक येरटे यांचा सन्मान करण्यात आला. एक्स्ट्रा ऑर्डीनरी ग्रास्पिंग पॉवर जिनिअस किडमध्ये वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल दीड वर्षाची अर्शित राजेश शिंदे आणि शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या 22 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीत धून वादन केले. तद्नंतर डॉ. खाडे यांनी उपस्थितांची प्रत्यक्ष भेट घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले. कार्यक्रमास विविध मान्यवर, शासकीय अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पत्रकार आदि उपस्थित होते.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)