बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान आज सांगलीत
सांगली दि. 23 (जि.मा.का.) :- दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानांतर्गत उद्या दि. 24 ऑगस्ट रोजी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आणि आमदार तथा दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत धनंजय गार्डन, कर्नाळ रोड येथे सकाळी 11 वाजल्यापासून हे अभियान होत आहे.
या अभियानाच्या तयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित विभागांच्या कामाचा आढावा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून यासाठी प्रशासन सज्ज आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद व नगरपालिका निहाय नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या अभियानासाठी दिव्यांग बांधवांची ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था, पाणी व भोजन व्यवस्था, अन्य आवश्यक सोयी सुविधा, रँप, प्रथमोपचार पेटी, स्वच्छतागृहे, व्हील चेअर याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
अभियानात जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, तसेच शासनाच्या नियंत्रणाखालील महामंडळे व इतर संस्था यांचे स्टॉल लावण्यात आले असून एकाच छताखाली केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. या बरोबरच दिव्यांगांना आवश्यक असणारी प्रमाणपत्रे, दाखले, योजनांची माहिती व इतर अनुषंगिक सुविधा देण्यात येणार आहेत.
00000
पशुधनाची काळजीपूर्वक सुश्रुषा करा लम्पी चर्मरोगावर मात करा
गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पशुपालकांनी आपल्या पशुधनाची काळजी घेवून त्यांची योग्य सुश्रुषा करणे गरजेचे आहे. 20 टक्के औषधोपचार व 80 टक्के सुश्रुषा या सुत्रानुसार लम्पी चर्मरोगावर मात करता येते. जिल्ह्यातील पशुपालकांनी आपल्या पशुधनाची योग्य काळजी घेवून उपचार घेतल्यास लम्पी चर्मरोगापासून पशुधन वाचविण्यात यश मिळते.
आहार विषयक काळजी
रोगी जनावरांची प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी संतुलित आणि सकस आहार नियमित देण्यात यावा. त्याचप्रमाणे जनावरांचा आहार व पाणी पिणे उच्चतम राहील यासाठी पशुपालकांनी काळजी घ्यावी. आजारी जनावरांना हिरवा, मऊ व लुसलुशीत चारा तसेच चांगल्या प्रतीचा प्रथिने व ऊर्जायुक्त खुराक (ढेप/ मका आदि) द्यावा. पिण्याचे स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात वारंवार उपलब्ध करून द्यावे. पाण्यामध्ये मीठ व गूळ टाकून दिल्यास जनावर पाणी आवडीने पितात. तसेच त्यांना खनिजक्षार व ऊर्जा मिळेल. थंडीच्या काळात हलके कोमट पाणी दिल्यास जनावर आवडीने पाणी पितात. पाणी पिणे चालू राहिल्यास अत्यवस्थ जनावर सुद्धा तंदुरुस्त होते.
ज्या बाधित जनावरांना मान, पाय, छातीवरील सुजेमुळे मान खाली करता येत नाही, अशा जनावरांना चारा व पाणी तोंडाच्या उंचीवर उपलब्ध करून देण्यात यावे. गरजेप्रमाणे चारा हाताने खाऊ घातल्यास रोगी जनावर चारा खात असल्याचे दिसून आले आहे.
पूरक खाद्यपदार्थांचा अंतर्भाव
आजारी जनावरांनी चारा खाने कमी केले असेल तर अशा जनावरांना ऊर्जावर्धक (प्रोपायलीन, ग्लायकॉल) औषधे तोंडावाटे देण्यात यावीत. रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी आहारात नियमितपणे जीवनसत्वे, खनिजक्षार मिश्रण, प्रतिकारशक्ती वर्धक तसेच यकृतवर्धक औषधे देण्यात यावीत. रक्तशय झालेल्या जनावरांना रक्तवर्धक औषधे सकाळी, संध्याकाळी किमान 21 दिवस देण्यात यावीत. ओटीपोटातील पचनासाठी आवश्यक जीवजंतू सुस्थितीत राहण्यासाठी प्रि व प्रोबायोटिक औषधे त्याचप्रमाणे भूक वाढीसाठी औषधे देण्यात यावीत. आजारी जनावरांना औषधे पाजणे शक्यतो टाळावे. पावडर किंवा पातळ औषधे ही कणीक / पीठ / गुळ खुराक किंवा पाण्यातून देण्यात यावीत.
उबदार निवारा
जनावरांचे पाऊस व थंडीपासून संरक्षण करावे. जनावरे उघड्यावर बांधू नयेत. जनावरांना योग्य तो कोरडा व ऊबदार निवारा उपलब्ध करून द्यावा व त्यांचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करावे. लहान वासराना अंगावरती उबदार कपडे पांघरावेत. गोठ्यात अधिक वॅटेजचे बल्ब लावावेत जेणेकरून उष्णता निर्माण होईल व प्रतिकूल वातावरणामुळे येणारा ताण टाळता येईल.
पोळी पायावरील सुजेवर शेक देणे
ज्या जनावरांना पाया समोरील लसीका ग्रंथीवर, पायावर किंवा छातीवर सूज आहे, अशा जनावरांना बसताना त्रास होतो म्हणून ती कित्येक दिवस उभी राहतात. अशा जनावरांना मीठाच्या संतृप्त (मीठ पाण्यात विरघळणे बंद होईपर्यंत बनवलेले पाणी) गरम द्रावणाचा सुती कापडाच्या सहाय्याने दिवसातून 2 वेळा उत्तम शेक द्यावा. तसेच मॅग्नेशियम सल्फेट (बारीक पावडर) आणि ग्लीसरीन या संयुगाचा लेप सुजेवर सकाळ संध्याकाळी लावल्यास सूज कमी होण्यास मदत मिळते. अंगावरील गाठी व सूज कमी करण्यासाठी उन्हाच्या वेळेत गरम पाण्याची अंघोळ (शेकत / अंग चोळत) घालावी व अंग कापडाने कोरडे करावे म्हणजे सर्दी होणार नाही. लहान वासरांना चेहऱ्यावरील दुखऱ्या गाठीमुळे तोंडाची हालचाल करण्यास अवघड झाल्याने दुध पिता येत नाही. त्यासाठी चेहऱ्यावर गरम पाण्याने दिवसातून 2 वेळा शेक द्यावा व अंग कापडाने कोरडे करावे.उगरम पाण्याचा चटका बसणार नाही याची खबरदारी घ्यावी.
बसून राहणाऱ्या जनावरांची काळजी
पायावरील, गुडघ्यावरील सुजेमुळे उभे राहण्यास त्रास झाल्याने किंवा अशक्तपणामुळे रोगी जनावर नेहमी बसून राहते. अशा जास्त वेळ बसून राहणाऱ्या जनावरांना सिमेंट काँक्रीटची जमीन टाळावी. अंगाखाली मऊ गवत / तुसाची गादी करावी. अशा बसून राहणाऱ्या जनावरांना दर २-३ तासांनी बाजू बदलावी. दिवसातून दोन वेळा मदतीने उभे करावे. पाय चोळावेत व शेकावेत.
तोंडातील व्रणोपचार
जनावरांच्या विशेषत: लहान वासरांच्या तोंडात जखमा आढळून आल्यास, तोंड पोटेशियम परम्यांगनेटच्या द्रावणाने धुवून दिवसातून ३-४ वेळेस बोरोग्लोसरीनचे द्रावण तोंडातील जखमांवर लावावे. त्यामुळे जनावराला चारा खाण्यास / वासरांना दुध पिण्यास त्रास होणार नाही.
नाकाची स्वच्छता व वाफ देणे
रोगी जनावरांच्या विशेषत: लहान वासरांच्या नाकामध्ये काही वेळा अल्सर / जखमा निर्माण होतात, नाक चिकट स्त्रावांनी भरलेले असते. काही वेळा तो घट्ट व कडक होतो. त्यामुळे श्वसनास त्रास होतो. त्यासाठी कोमट पाण्यांनी नाकपुडी नियमितपणे स्वच्छ करावी तसेच दोन्ही नाकपुड्यात बोरोग्लोसरीन अथवा कोमट खोबरेल व बोरीक पावडरचे मिश्रण चार-चार थेंब टाकावे. जेणेकरून मऊपणा टिकून राहील, जखमा भरून येतील व श्वसनासही त्रास होणार नाही. सर्दी असेल तर निलगीरीच्या तेलाची किंवा विक्सची वाफ दिली तर चांगला फायदा होतो.
डोळयांची निगा
डोळ्यात व्रण असतील तर डोळ्यातून पाणी येते व पूढे पांढरेपणा येतो. त्यासाठी डोळे बोरिक पावडरच्या द्रावणाने नियमीत धुवून घ्यावेत किंवा कोमट पाण्याने साफ करावेत.
बैलांची काळजी
रोगातून बरे झालेल्या बैलांना कामास जुंपल्यामुळे रोग प्रकोप होवून दगावत आहेत म्हणून प्रकृती ठणठणीत होईपर्यंत त्यांना कामास लावू नये.
जखमांचे व्यवस्थापन
बाधित जनावरांमध्ये २-३ आठवड्यानंतर प्रामुख्याने सूज आलेल्या भागात विशेषतः पायावरती जखमा होतात. त्याचप्रमाणे शरीरावरील गाठी फुटून जखमा होतात. त्या जखमांवर उपचार करावा. यामध्ये जखमा 0.1 टक्के पोटेशियम परम्यागनेटच्या द्रावणाने धुवून घेतल्यानंतर त्यावर पोव्होडीन आयोडीन किंवा टिंक्चर आयोडीन लावावे आणि त्यानंतर जखमेवर मॅग्नेशियम सल्फेट व ग्लिसरीनचे मिश्रण लावून बँडेजने हळुवारपणे बांधावी. जखमांवर माश्या व इतर बाह्यपरजीवी बसू नयेत यासाठी दिवसातून दोन वेळा हर्बल स्प्रे जखम परिसरात फवारण्यात यावा. जखमेमध्ये अळ्या पडल्यास अशा जखमेत टरपेनटाईनच्या तेलात भिजवून कापसाचा बोळा ठेवावा आणि त्यानंतर मृत अळ्या बाहेरकाढून घ्याव्यात. अशा जखमांवर दिवसातून दोन वेळा हर्बल स्प्रे फवारण्यात यावा. जखमा जास्त खोल व दुषित प्रकारच्या असल्यास हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर करून अशा जखमांचा उपचार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करून घ्यावा. जखमा पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी नियमित ड्रेसिंग करणे गरजेचे आहे.
गोमाशांचा उपद्रव
रोगी जनावर सुस्त झाल्याने तसेच अंगावरती जखमा झाल्याने माश्या बसतात व जनावर त्रस्त होते. रोगी जनावरांना गोचीड-गोमाश्या यांचा त्रास कमी होण्यासाठी गोठ्यात दर ३-४ दिवसांनी कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यात यावी. तसेच अंगावरती हर्बल / वनस्पतीजन्य कीटकनाशक औषधांचा नियमित वापर करावा. यासाठी एक लिटर पाण्यामध्ये १० मिली निंबोळी तेल, १० मिली करंज तेल, १० मिली निलगीरी तेल आणि २ ग्रॅम अंगाचा साबण मिसळावे व हे मिश्रण फवारणीसाठी वापरावे.
एकूणच बाधित जनावरांच्या उपचारादरम्यान पशुपालकांनी आपल्या पशूंची काळजीपूर्वक सुश्रुषा केल्यास अनमोल पशुधन लम्पी आजारापासून वाचविण्यात यश मिळते.
संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली
मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३
नेत्र तपासणी आरोग्य शिबीराचा वाहन चालकांना लाभ घेण्याचे आवाहन
सांगली दि. 22 (जि.मा.का.) : वाहन चालकाच्या आरोग्याची तसेच दृष्टी तपासणीकरिता परिवहन विभागामार्फत संपूर्ण राज्यात नेत्र तपासणी आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली मार्फत दि. 24 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सावळी येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात नेत्र तपासणी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त वाहन चालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांनी केले आहे.
भारतामध्ये रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या आहे. भारतामध्ये दरवर्षी जवळपास 1 लाख 60 हजार व्यक्ती रस्ते अपघातांमध्ये आपला जीव गमवतात. कित्येक लोकांना अपघातामुळे कायमचे अपंगत्व येते. अशा व्यक्तींना व कुटुंबियांना अनेक आर्थिक व मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. रस्ता सुरक्षा ही परिवहन विभागाच्या महत्वाच्या जबाबदारी पैकी एक आहे. या करिता परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षेसंदर्भात संबंधित विभागांच्या बैठका आयोजित करून विविध उपाययोजना राबविण्यात येतात. भारतातील रस्ते अपघाताचे विश्लेषण केले असता बहुतांश अपघातास वाहनचालक कारणीभूत असतात. वाहन चालकाच्या वाहन चालविण्याच्या कौशल्यात त्याचे संपूर्ण आरोग्य व दृष्टीस अनन्यसाधारण महत्व आहे. याकरिता नेत्र शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सर्व वाहनचालक, वाहनमालक, प्रवाशी वाहतूक संघटना, बस संघटना, माल वाहतूक संघटना यांना नेत्र शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांनी केले आहे. तपासणी नंतर सर्व वाहन चालकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
00000
दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजना
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या एक दिवसीय अभियानाचे दि. 24 ऑगस्ट रोजी धनंजय गार्डन, कर्नाळ रोड, सांगली येथे सकाळी 11 वाजल्यापासून आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात गरजेनुसार दिव्यांगांची आरोग्य तपासणी करून त्यांना शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे प्रातिनिधीक स्वरूपात दिली जाणार आहेत. या अनुषंगाने दिव्यांगासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती ....
दिव्यांग व्यक्तींकरिता कायदे (दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 नुसार )
शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती. सर्वसमावेशक सुगम्यता निर्मितीचे शासनाचे उद्दीष्ट. दिव्यांगांसाठीच्या सर्व योजनांची परिणामकारक अंमलबजावणी. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र (UDID) वितरणाची अंमलबजावणी सुरु. शासकीय निमशासकीय सरळसेवा पदोन्तीमध्ये दिव्यांग व्यक्तींना चार टक्के आरक्षण. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण निधीच्या पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजनांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद. उच्च शिक्षणामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना पाच टक्के आरक्षण.
राष्ट्रीय न्यास अधिनियम 1999
स्वमग्न, मेंदूचा पक्षाघात, बौध्दिक विकलांगता आणि बहुविकलांगता धारक दिव्यांग व्यक्तींच्या काळजी, सुश्रुषेकरीता व संपत्तीच्या संरक्षणाकरीता कायदेशीर पालक नियुक्त करण्याचे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना अधिकार.
भारतीय पुनर्वास परिषद अधिनियम 1992
दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्ससन क्षेत्रात कार्य करण्याकरीता भारतीय पुनर्वास परीषदेकडे संबंधित तज्ज्ञाची नोंदणी आवश्यक.
राज्य शासन पुरस्कृत योजना
शासकीय संस्थांमधून दिव्यांगांचे शिक्षण व प्रशिक्षण - शासकीय संस्थांमध्ये ६ ते १८ वयोगटातील अंध, कर्णबधीर व अस्थिव्यंग दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण पदतीने विशेष शैक्षणिक साहित्याचा वापर करुन मोफत शिक्षणाची सुविधा, निवास व भोजनाची विनामुल्य व्यवस्था करण्यात येते. तसेच १८ वर्षावरील दिव्यांग व्यक्तींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने त्यांचे दिव्यांगत्व विचारात घेवून दिव्यांगत्वानुरूप विविध कुशल व अकुशल व्यवसायाचे प्रशिक्षण, त्यांच्या निवास व भोजनाची विनामूल्य व्यवस्था करण्यात येते.
स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या संस्थांमधून दिव्यांगांचे शिक्षण प्रशिक्षण - स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविणात येणाऱ्या दिव्यांगांच्या विशेष शाळेमधून वय वर्षे 6 ते 18 वयोगटातील अंध, कर्णबधीर, अस्थिव्यंग व मतिमंद दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण पध्दतीने व विशेष शैक्षणिक साहित्याचा वापर करून मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. त्याचबरोबर निवास व भोजनाची विनामूल्य व्यवस्था करण्यात येते. त्याचबरोबर 18 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने त्यांचे दिव्यांगत्व विचारात घेवून दिव्यांगत्वानुरूप विविध व्यवसायाचे दिव्यांग कर्मशाळांमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यांच्या निवास व भोजनाची विनामूल्य व्यवस्था करण्यात येते.
शालांत परिक्षा पूर्व शिक्षण शिष्यवृती - दिव्यांग शाळेतील अनिवासी विद्यार्थी तसेच सामान्य शाळेतील इयत्त 1 ली ते 10 वी पर्यंत दिव्यांग विद्यार्थ्यांना उत्पन्नाची अट न लावता शालेय शिक्षणासाठी शालांत पूर्व शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती या योजनेखाली दिली जाते.
शालांत परिक्षोत्तर (मॅट्रीकोत्तर) शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृती - अंध, अधुदृष्टी, कुष्ठरोगमुक्त, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद व मनोरुग्ण विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी नंतरचे महाविद्यालयीन व्यावसायिक, तांत्रिक व अभियांत्रिकी शिक्षणासाठी त्यांच्या अभ्यासक्रमाच्या दर्जाप्रमाणे अभ्यासक्रमाचे गट करून शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येते. त्याचबरोबर अंध विद्यार्थ्यांना वाचक भत्ता तसेच सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबरोबर शैक्षणिक शुल्क, प्रकल्प टंकलेखन खर्च, अभ्यासदौरा खर्चाची रक्कम दिली जाते.
दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल - 18 ते 50 वयोगटातील दृष्टीहीन, कर्णबधीर व अस्थिविकलांग दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी 1 लाख 50 हजार रुपये व्यवसायाकरीता 80 टक्के बँकेमार्फत कर्ज व 20 टक्के कमाल रुपये 30 हजार सामाजिक न्याय विभागामार्फत अनुदान देण्यात येते.
दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव साधने पुरविणे - शारिरीक पुनर्वसनाच्या दृष्टीने अस्थिविकलांग दिव्यांगाकरीता कॅलिपर, कृत्रिम अवयव, तीनचाकी सायकल, कर्णबधिराकरीता श्रवणयंत्र, अंध विद्यार्थ्यांकरीता टेपरेकॉर्डर.
दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी अर्थसहाय - शासकीय तसेच शासनमान्य संस्थेमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 18 ते 50 वयोगटातील दिव्यांग व्यक्तीस प्रशिक्षण पूर्ण केलेला व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या साधनांकरीता 1 हजार रूपये अर्थसहाय्य देण्यात येते.
दिव्यांग कल्याण राज्य पुरस्कार - उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिव्यांग कर्मचारी / स्वयंउद्योजक, दिव्यांगांचे नियुक्तक यांना राज्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते.
दिव्यांग अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना - किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग वधू किंवा वराने दिव्यांगत्व नसलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास अथवा दिव्यांग नसलेल्या वधू किंवा वराने दिव्यांग असलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास 50 हजार रूपये अर्थसहाय्य देण्याची तरतूद आहे.
दिव्यांग व्यक्तींकरीता पालकत्व योजना - 1999 च्या नॅशनल ट्रस्ट अॅक्टनुसार 18 वर्षावरील मतिमंद मुलांचे पालकत्व घेण्याची योजना कार्यान्वीत आहे. त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. website-www.thenationaltrustgov.in
दिव्यांग व्यक्तींकरीता असलेल्या सवलती / सुविधा / लाभ - रेल्वे / एसटी महामंडळाकडून दिव्यांग व्यक्तीस प्रवास करताना दूर प्रवास भाड्यामध्ये दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार देय असल्यास त्याच्या मदतनीसास सुद्धा सवलत. जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून दिव्यांग व्यक्तींना युडीआयडी या संगणकीय प्रणालीतून दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मोफत. दिव्यांग कर्मचारी / अधिकारी यांना विशेष वाहन भत्ता. बौध्दिक अक्षम प्रवर्गातील दिव्यांगांच्या पालकांना / दिव्यांग व्यक्तींना आयकरामध्ये सवलत. दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करामध्ये सूट. दिव्यांग व्यक्ती शासकीय / निमशासकीय / महामंडळे यांच्या नोकरभरतीमध्ये 4 टक्के इतके आरक्षण. दिव्यांग शाळा, महाविद्यालय, वसतीगृह व तत्सम उपक्रम यामधील प्रवेशामध्ये 5 टक्के इतके आरक्षण.
दिव्यांग कल्याण योजनांच्या अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद, सांगली. फोन : (०२३३) २३०२०१४, E-mail: dswozpsangli@gmail.com येथे संपर्क साधावा.
संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली
राष्ट्रीय लोकअदालतीचे 9 सप्टेंबरला आयोजन
सांगली दि. 22 (जि.मा.का.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार शनिवार, दि. 9 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय सांगली, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, सहकार न्यायालय १, २ व सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आलेली आहे. पक्षकारांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे या लोकअदालातीमधे ठेवून ती तडजोडीने मिटवून घ्यावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कि. नरडेले यांनी केले आहे.
न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, बँकेची दिवाणी दावे, नियमित दिवाणी दावे, भूमी संपादन प्रकरणे, कौटुंबिक वादातील प्रकरणे, चलनक्षम दस्तऐवज (N. I. Act 138) प्रकरणे, कामगार न्यायालयातील प्रकरणे व दावापूर्व प्रकरणे (विज बिल, टेलिफोन बिल, बँकेतील वसुली प्रकरणे ) या विषयक प्रकरणांसाठी ही राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आलेली आहे.
00000
लम्पी चर्मरोग; शनिवारपर्यंत लसीकरण पूर्ण करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली दि. 22 (जि.मा.का.) :- लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यातील गोवंशीय पशुधनाचे येत्या शनिवारपर्यंत लसीकरण पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या.
लम्पी चर्मरोगाबाबत जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे, डॉ. एच. डी. पठाण, डॉ. महादेव गवळी, डॉ. विजय ढोले, डॉ. शरद सोनवणे, डॉ. शिरमनवार आणि डॉ. देशपांडे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, लम्पी चर्मरोगाचा फैलाव रोखण्यासाठी स्वच्छता महत्वाची असून पशुपालकांनी यास प्राधान्य द्यावे. याबरोबरच ग्रामपंचायतींनी नियमित औषध फवारणी करावी. या रोगाने बाधित जनावरांचे आयसोलेशन करावे. आत्तापर्यंत 65 टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले असून उर्वरित पशुधनाचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
लम्पी चर्मरोगाबाबत मार्गदर्शन व उपचार याबाबत सल्ला देण्यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर यांच्याकडील पथक जिल्ह्यात येणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
०००००
शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर सोमवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर
सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) राजेश क्षीरसागर हे सोमवार, दि. 21 ऑगस्ट 2023 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दि. 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद शाळा क्र. 1 कसबे डिग्रज ता. मिरज येथे अंगणवाडी (अंकूर) व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा दर्जा सुधारण्यासाठी सुविधा पुरविणे या प्रकल्पास व आंबेडकर रोड क्रांती हॉस्पीटल जवळ सांगली येथे यांत्रिकी पध्दतीने रोबोटच्या मार्फत ड्रेनेज चेंबरची स्वच्छता या प्रकल्प ठिकाणांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे भेट देणार आहेत.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)