बुधवार, ३ एप्रिल, २०२४
पलूसमध्ये मतदार जागृती अभियानांतर्गत मॅरेथॉन रॅली संपन्न
सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : येत्या 7 मे रोजी सांगली लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. मतदान म्हणजे लोकशाहीचा मोठा उत्सव आहे. या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी प्रशासन पातळीवर जोरदार प्रबोधन मोहीम राबवली जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज पलूस शहरात तालुका प्रशासनाच्या वतीने पलूस तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन ते नवीन एसटी स्टँडपर्यंत मॅरेथॉन रॅली काढण्यात आली.
या मॅरेथॉन रॅलीची सुरुवात तहसील कार्यालयापासून झाली. प्रारंभी तहसीलदार दीप्ती रेटे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.
यावेळी बोलताना सहा. नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे म्हणाले, स्वीप कार्यक्रमांतर्गत युवक, युवती, प्रौढ, वृद्ध तसेच जे नव मतदार आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदानासंदर्भात गेली दोन महिने जागृती करण्याचे प्रयत्न करीत आहोत. तसेच शाळा, महाविद्यालयातून या संदर्भात रांगोळी / निबंध स्पर्धा, विद्यार्थी रॅली, सायकल रॅली असे उपक्रम घेतले आहेत. या सर्व बाबींचा मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निश्चित फायदा होईल.
यावेळी मतदार जागृतीच्या अनुषंगाने उपस्थितांनी मॅरेथॉन रॅलीमध्ये, सर्व कर्मचाऱ्यांनी हातात बॅनर घेवून तसेच मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. आपले मतदान आपले भविष्य अशा घोषणा दिल्या.
या रॅलीमध्ये तहसीलदार दीप्ती रिठे, निवडणूक नायब तहसीलदार सर्वश्री परदेशी, मनोहर पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप पाटील, गटशिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे, केंद्रप्रमुख सर्वश्री किरण आमणे, राम चव्हाण, शिक्षक मारुती शिरतोडे, नितीन चव्हाण, पंडित विष्णू दिगंबर हायस्कूलचे मुख्याध्यापक तानाजी करांडे, बाळासाहेब खेडकर, विनोद आल्हाट, संतोष खेडकर, अमोल कोळेकर यांच्यासह तहसील कार्यालय पंचायत समिती कर्मचारी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
00000
सोमवार, १ एप्रिल, २०२४
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रमाव्दारे जनजागृती करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यात येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत सर्व स्तरावर नाविण्यपूर्ण उपक्रमाव्दारे जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.
मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीप कार्यक्रम आढावा व नियोजनाबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी श्रीमती निता शिंदे, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, जि.प. उपपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तथा स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, गत निवडणुकीत राष्ट्रीय सरासरी पेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रमाव्दारे जनजागृती करावी. मतदान केंद्र, गाव व तालुका स्तरावर नाविण्यपूर्ण उपक्रमाव्दारे जनजागृती करावी. महाविद्यालय, पेट्रोल पंप, एसटी महामंडळ बसस्थानक, बसेस, पोस्ट ऑफीस, चावडी, मंगल कार्यालये, मोठे समारंभ आदी ठिकाणी पोस्टर, स्टीकर, ऑडिओ जिंगल्स, नाविण्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृती करावी. तसेच जिल्ह्यातून किमान एक लाख संकल्प पत्रे भरून घ्यावीत. यामध्ये 50 टक्क्यापेक्षा अधिक महिलांचा समावेश असावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे म्हणाले, तालुकास्तरावर मोठी रांगोळी, ज्या ठिकाणी नागरिकांची गर्दी असते त्या ठिकाणी पोहोचून मतदार जनजागृती करावी. त्याचबरोबर सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. तसेच वाढता उन्हाळा लक्षात घेता नागरिकांना त्रास होणार नाही या दृष्टीने सकाळी कार्यक्रमाचे नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात याव्यात. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी रांगोळी स्पर्धा, सायकल रॅलीचे नेटके आयोजन करून मतदार जनजागृती मोठ्या प्रमाणावर करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळीस तालुकास्तरीय नोडल अधिकारी उपस्थित होते.
00000
शुक्रवार, २९ मार्च, २०२४
वासुंबेमध्ये सायकल रॅली, रांगोळी स्पर्धेचे आयोजन
सांगली दि.29 (जि.मा.का.) : येत्या सात मे रोजी लोकशाहीचा उत्सव पार पडत आहे. या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी स्वीप मोहिमेअंतर्गत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नाचे फलित म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश मतदानाची टक्केवारी वाढावी असा आहे. तासगाव तालुक्यातील मौजे वासुंबे येथे गेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये कमी मतदान झाले होते ही बाब तेथील नागरिकांना अस्वस्थ करत होती. यंदा मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतला त्या अनुषंगाने स्वीप उपक्रमांतर्गंत मतदान वाढीसाठी तेथील प्रशालेची मदत घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्याद्वारे वासुंबे गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी व सायकल रॅली काढण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थी व पालक यांच्यासाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या कामी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती शोभा जाधव यांनी उपस्थित नागरिकांना मतदान कर्तव्य बजाविण्याबाबत आवाहन केले. या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत, यंदा मतदानाचा हक्क मोठ्या प्रमाणावर बजावणार असल्याचे सांगितले.
0000000
बुधवार, २७ मार्च, २०२४
लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावावा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅली उत्साहात संपन्न
सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे, यासाठी स्वीप (SVEEP) कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. सर्व मतदारांनी लोकशाही बळकटीकरणासाठी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी केले.
मतदार जनजागृतीसाठी स्वीप उपक्रमांतर्गत आज सकाळी 7 वाजता विश्रामबाग सांगली येथे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीस प्रारंभ केला. या सायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, महानगरपालिका उपायुक्त वैभव साबळे, आरोग्य अधिकारी रविंद्र ताटे, वैद्यकीय अधिकारी वैभव पाटील, मुख्य अग्नीशमन अधिकारी सुनील माळी, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर, श्री. बोडस, अरूण लोंढे, यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, सायकल पट्टू, क्रीडा प्रेमी, नागरिक, विविध शाळा, विद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी रॅलीमध्ये सहभाग घेणाऱ्यांचे अभिनंदन करून, 7 मे रोजी मतदान करण्याचे तसेच, इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याबाबत आवाहन केले.
विश्रामबाग सांगली येथून काढण्यात आलेली सायकल रॅली पुढे पुष्कराज चौक - राम मंदिर मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम सांगली येथे या रॅलीची सांगता झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी 7 मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.
यावेळी उपस्थित सायकल पट्टू, पत्रकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात या सायकल रॅली कार्यक्रमाची सांगता झाली.
00000
मंगळवार, २६ मार्च, २०२४
अत्यावश्यक शासकीय सेवेमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाची सुविधा
सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : भारत निवडणूक आयोगाने अत्यावश्यक शासकीय सेवेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानादिवशी पदीय कर्तव्य बजावत असल्याने प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून मतदान करता येत नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोस्टल मतदानाची सुविधी उपलब्ध करून दिली आहे. याबाबतची अधिसूचना व नमुना फॉर्म 12 D सांगली जिल्ह्याच्या sangli.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी याचा लाभ घेवून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
अत्यावश्यक शासकीय सेवेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानादिवशी पदीय कर्तव्य बजावत असल्याने प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून मतदान करता येत नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोस्टल मतदानाची सुविधी उपलब्ध करून दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 19 मार्च 2024 रोजी प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 32 अत्यावश्यक शासकीय सेवेमधील जे अधिकारी, कर्मचाऱी मतदानादिवशी कर्तव्य बजावत असतील त्यांना पोस्टल मतदानाची सुविधा दिली आहे. अत्यावश्यक सेवेमधील आस्थापना पुढीलप्रमाणे - मेट्रो, रेल्वे ट्रान्सपोर्ट (पॅसेंजर आणि Freight) सर्व्हिसेस, ज्या प्रसारमाध्यमांना मतदान दिवसातील प्रक्रिया कव्हर करण्यासाठी आयोगाच्या मान्यतेने अधिकृत पत्रे जारी करण्यात आली आहेत ते प्रसारमाध्यम प्रतिनिधी, इलेक्ट्रीसिटी डिपार्टमेंट, बीएसएनएल, पोस्ट आणि टेलिग्राम, दूरदर्शन, ऑल इंडिया रेडिओ, स्टेट मिल्क युनियन ॲण्ड मिल्क कोऑपरेटिव्ह सोसायटी, हेल्थ डिपार्टमेंट, फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ॲव्हीएशन, रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, फायर सर्व्हिसेस, ट्राफिक पोलिस, ॲम्बुलन्स सर्व्हिसेस, शिपींग, फायर फोर्स, जेल, एक्साईज, वॉटर ॲथॉरिटी, ट्रेझरी सर्व्हिसेस, फॉरेस्ट, इन्फॉर्मेशन ॲण्ड पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट, पोलीस, सिव्हील डिफेन्स ॲण्ड होम गार्ड, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार, पॉवर, भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, डिपार्टमेंट ऑफ पीडब्लूडी, एमटीएनएल.
00000
गुरुवार, २१ मार्च, २०२४
स्वीप अंतर्गत येत्या 27 मार्च रोजी सर्व तालुक्यांत सायकल रॅलीचे आयोजन
सांगली दि. 21 (जि.मा.का.) : येत्या सात मे रोजी लोकशाहीचा उत्सव पार पडत आहे. या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी स्वीप मोहिमेअंतर्गत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नाचे फलित म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश मतदानाची टक्केवारी वाढावी असा असून या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह सांगली शहरामध्ये, दि. 27 मार्च रोजी सकाळी 7 वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीला विश्राम बाग येथून प्रारंभ होणार असून कर्मवीर भाऊराव पाटील चौक, राममंदीर या ठिकाणा वरून मार्गक्रमण करत भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे या रॅलीची सांगता होणार आहे. या रॅलीला प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 18 वर्षापुढील सर्वांनी या सायकल रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन स्वीपचे नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले आहे.
00000
वय वर्ष फक्त 103 ..! - छे . . ! छे . . ! मी घरून मतदान करणार नाही तर प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊनच मतदान करणार
सांगली दि. 21 (जि.मा.का.) : पांढरपेशा . . . सुशिक्षित वर्गामध्ये मतदान करण्याविषयी फारशी रुची दिसून येत नाही. मात्र अशाही स्थितीत काहीजण प्रकाशाचा किरण बनतात. असाच एक किरण ...शिराळामध्ये आहे. नाव महादेव दंडगे (स्वातंत्र सैनिक ) वय वर्ष फक्त 103.
या वयात ही देशप्रेम .. कणखरता . . जिद्द या शब्दांनी ओतप्रोत भरलेल. एक समृद्ध, सफल आयुष्य. ही गोष्ट आहे एका देशप्रेमी मतदाराची. शिराळा मतदार संघ विधानसभेला सांगली जिल्ह्याशी तर लोकसभेला कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदार संघाशी जोडलेला. या मतदारसंघाची पाहणी करण्यासाठी तेथील निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे हे गेले होते. सोबत शिराळ्याच्या तहसीलदार श्यामला खोत या ही सोबत होत्या.
यंदा निवडणूक आयोगाने 85 वर्षांपुढील तसेच अंध मतदारासाठी विशेष बाब म्हणून घरातूनच मतदान करण्याची सोय या निवडणुकीत केली आहे. निवडणूक आयोगाच्या या मतदान उपक्रमाबाबत माहिती सांगण्यासाठी श्री. शिंदे यांनी शिराळाचा दौरा केला. यावेळेस त्यांना या ठिकाणी श्री. दंडगे नावाचे स्वातंत्र्य सैनिक (वय -103 )असल्याचे समजले. त्यांची श्री. शिंदे यांनी आपुलकीने भेट घेत घरून मतदान करण्याबाबत सुचित केले. त्यावर दंडगे यांनी स्मित हास्य करत सांगितले, छे . . ! छे . . ! मी घरून मतदान करणार नाही तर प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊनच त्या ठिकाणी मतदान करणार. त्यांची ही जिद्द पाहून निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शिंदे ही क्षणभरासाठी थबकले . . . ! जर या 103 वर्षाच्या नवतरुण मतदाराचा आदर्श मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या नागरिकांनी घेतला तर ?
000000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)