मंगळवार, २० मे, २०२५

सामाजिक न्याय विभागाच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : सामाजिक न्याय विभागाच्या योजना या बहुजनांच्या कल्याणार्थ आहेत. शिक्षण, निवास, शिष्यवृत्ती अशा अनेक योजनांतून मागासवर्गियांच्या विकासास मदत होते. त्यामुळे या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून बहुजनांचे सबळीकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिले. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीस अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते आदिंसह सामाजिक न्याय विभागाच्या विविध समित्यांचे शासकीय, अशासकीय सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सन 2024-25 या अमृत महोत्सवी वर्षात घर घर संविधान हा उपक्रम साजरा केला जात आहे. या उपक्रमांतर्गत संविधानाची जागरूकता वाढवावी. संविधानाची प्रत प्रत्येक घरी वितरीत कराव्यात, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळा, आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य आदि सोयी सुविधांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याची खात्री करावी. शासकीय निवासी शाळांचे स्ट्रक्चरल व फायर ऑडिट करून घ्यावे. इमारतीमध्ये काही दुरूस्ती करावयाची असल्यास त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेळीच करावी. वसतिगृह निरीक्षण समितीने वेळोवेळी जिल्ह्यातील वसतिगृहांना भेटी द्याव्यात. मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करावी. निवासी शाळा, आश्रमशाळांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत यासाठी त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची जनजागृती करावी. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे विविध आर्थिक लाभ डीबीटीव्दारेच होत असल्याची तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकासाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्व असलेल्या स्थळांचा विकास करणे अंतर्गत जिल्ह्यातील बांधकाम केलेल्या स्मारकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये मौजे आरग येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनमित्त घटनास्थळ, मौजे अंकलखोप येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तसेच मौजे वाटेगाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक आदींचे बांधकाम व सद्यस्थिती यांचा आढावा घेण्यात आला. तृतीयपंथीयांचे मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सूचित करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, तृतीयपंथीयांना शिधापत्रिका, ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच त्यांच्या समस्यांचे, तक्रारींचे तातडीने निवारण करावे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जिल्ह्यात सन 2004-05 पासून आत्तापर्यंत एकूण 63 लाभार्थ्यांना 154 एकर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये 98 एकर बागायत व 56 एकर जिरायत जमिनीचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी घर घर संविधान उपक्रमांतर्गत संविधान समिती आढावा बैठक, जिल्हास्तरीय वसतिगृह निरीक्षण समिती बैठक, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकासाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्व असलेल्या स्थळांचा विकास करणे अंतर्गत जिल्ह्यातील बांधकाम केलेल्या स्मारकांची सद्यस्थितीबाबत आढावा बैठक, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, तृतीयपंथीय व्यक्तींच्या समस्या / तक्रारी संदर्भात जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक घेण्यात आली. तसेच, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत लॉटरी पध्दतीने प्रातिनिधीक लाभार्थीची निवड जिल्हाधिकारी अशोक काकडे व बालक यांच्याहस्ते चिठ्ठी उचलून करण्यात आली. 00000

शुक्रवार, १६ मे, २०२५

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थींची मंगळवारी निवड जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन

सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थींच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे मंगळवार, दिनांक 20 मे 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. या योजनेतून अर्ज सादर केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण सांगली चे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. महाराष्ट्र राज्यातील 60 वर्षे व त्यापुढील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मन:शांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून प्रति व्यक्ती 30 हजार रुपये खर्चाची कमाल मर्यादा असून यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल. या योजनेतून पात्र प्रवाशांची निवड जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येईल. दि. 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत सांगली जिल्ह्यासाठी कमाल एक हजार पात्र लाभार्थींचा कोटा निश्चित करण्यात आलेला असून विहित केलेल्या तीर्थक्षेत्रांमधून तीर्थदर्शन यात्रा निश्चित करण्याचे अधिकार हे जिल्हास्तरीय समितीला आहेत. या योजनेतून लाभ घेण्यासाठी सांगली जिल्ह्याकरिता विहित कोट्यापेक्षा अधिक संख्येने अर्ज प्राप्त झाल्याने लॉटरी पध्दतीने लाभार्थींची निवड केली जाईल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

निराधार मुलांच्या आधार नोंदणीसाठी ‘साथी’चा आधार एकही निराधार बालक आधार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करा - जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे

सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार 18 वर्षाखालील अनाथ, निराधार मुलांची आधार नोंदणी आणि त्यांच्या कायदेशीर सक्षमीकरणासाठी ‘साथी’ अंतर्गत मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्या अनाथ, निराधार मुलांची आधार नोंदणी झाली नाही, अशा मुलांच्या आधार नोंदणीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांच्याशी 8591903610 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यातील एकही निराधार बालक आधार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी संबंधित यंत्रणांनी कसोसीने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी केले आहे. ‘साथी’ मोहिमेंतर्गत निराधार मुलांच्या आधार नोंदणीबाबत गठीत करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा न्यायालय सांगलीच्या वैकल्पिक वाद निवारण केंद्र येथे आयोजित या बैठकीस अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बि. दा. सारंगकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, तहसिलदार लिना खरात, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघा पाटील, पॅनेल विधिज्ञ सर्वश्री ॲड. मोहन कुलकणी, ॲड. अमित पाटील, ॲड. चिराग सोनेचा यांच्यासह समितीचे सदस्य, विधी स्वयंसेवक व अनाथ आश्रमचे अधिक्षक, प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे म्हणाले, ‘साथी’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आधार नोंदणी नसलेल्या निराधार, अनाथ मुलांचे सर्व्हेक्षण करून त्यांची आधार नोंदणी करण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत 18 वर्षाखालील ज्या निराधार मुलांची आधार नोंदणी झालेली नाही त्यांचे 26 मे ते 26 जून 2025 या कालावधीत सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याची माहिती संकलित करून 27 जून ते 5 ऑगस्ट 2025 या कालावधीत आधार नोंदणीसाठी कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. ज्या निराधार मुलांकडे आधार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे नाहीत, त्यासाठी संबंधित यंत्रणामार्फत कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे सांगून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे म्हणाले, सर्व संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यातील अनाथाश्रम, बालगृहे, निरीक्षणगृहे, रोड, रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड येथे पाहणी करून आधार नोंदणी नसलेल्या निराधार मुलांची माहिती संकलित करावी. नागरिकांनीही त्यांना ज्ञात असलेल्या निराधार मुलांची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणास देवून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी यावेळी केले. यावेळी विविध यंत्रणांच्या प्रमुखांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासित केले. 00000

रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत वसगडेतील बाधित शेतजमिनींच्या भूभाडे निश्चितीसाठी 30 मे पर्यंत स्थळ पंचनामे करावेत - जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली, दि. 16 : पुणे मिरज लोढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पाअंतर्गत पलूस तालुक्यातील मौजे वसगडे येथील बाधित होत असलेल्या शेतजमिनीच्या भू भाडे निश्चितीसंदर्भात संयुक्तरीत्या स्थळ पंचनामे करून तहसीलदारांनी 30 मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिले. यासंदर्भात महसूल विभाग, भूमिअभिलेख विभाग, रेल्वेचे अधिकारी आणि प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात पार पडली. या बैठकीस दूरदृष्यप्रणालीद्वारे खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉ. विश्वजीत कदम, तसेच बैठकस्थळी प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोखर, अतिरीक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंह जाधव, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता (निर्माण) रमेश पाखरे, कडेगावचे उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन डॉ. स्नेहल कनिचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, नगररचना विभागाचे स. र. चव्हाण आणि वसगडेचे प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. पुणे मिरज लोढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पाअंतर्गत मौजे वसगडे येथील बाधित होत असलेल्या शेतजमिनीच्या भू भाडे निश्चितीसंदर्भात अन्याय झाल्याच्या भावनेतून संबंधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालकीच्या शेतजमिनीमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणी मार्ग काढण्यासाठी ही तातडीने बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार विशाल पाटील व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याच्या भूमिकेतून शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, असे सूचित केले. प्रकल्पबाधितांनी त्यांची मागणी सविस्तर मांडली. पुणे मिरज लोढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पाअंतर्गत पलूस तालुक्यातील मौजे वसगडे येथील शेतकऱ्यांच्या 32 गटामधील 1.95 हे. आर. क्षेत्रामध्ये सन 2018 पासून अतिक्रमण करून प्रकल्पाचे काम पूर्ण केले आहे. सदर जमिनी संपादित करण्याबाबत रेल्वे विभागाकडून निर्णय घेण्यात आलेला असून त्यामध्ये सन 2015 व 2017 च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही सुरू आहे. मात्र, या जमिनीचे सन 2018 पासून जाहीर नोटीस प्रसिद्ध होईपर्यंत भूसंपादन कायदा 2013 चे कलम 80 प्रमाणे भूभाडे मिळावे, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. यावर तहसीलदार यांच्याकडून स्थळ पंचनामे अहवाल प्राप्त झाल्यास पुढील कार्यवाही करता येईल, असे अतिरीक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंह जाधव यांनी सांगितले. यावर जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, मौजे वसगडे येथील बाधित होत असलेल्या शेतजमिनीच्या भू भाडे निश्चितीसंदर्भात महसूल विभाग, भूमि अभिलेख विभाग आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या प्रत्यक्ष संबंधित जमिनीवर जावून स्थळ पंचनामे करावेत. तसेच शेतकऱ्यांचे जाब जबाब घ्यावेत. तहसीलदारांनी याबाबतचा अहवाल 30 मे पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा. त्यावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी 15 जूनपर्यंत पुढील कार्यवाही करावी, असे त्यांनी सूचित केले. उपस्थित प्रकल्पबाधित, संबंधित यंत्रणांचे शासकीय अधिकारी यांच्या अनुमतीने हा तोडगा काढण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 00000

शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२५

गदिमा : शब्दसृष्टीचे ईश्वर

नवी दिल्ली येथे येत्या दि. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. यापूर्वी 1954 साली नवी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर देशाची राजधानी नवी दिल्लीत होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन असून, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याची पार्श्वभूमी या संमेलनास आहे. या अनुषंगाने कविवर्य गजानन दिगंबर उर्फ ग. दि. माडगूळकर यांच्याबद्दल प्रकाशझोत टाकणारा लेख… गदिमा : शब्दसृष्टीचे ईश्वर आता वंदू कवीश्वर ते शब्दसृष्टीचे ईश्वर असे समर्थ रामदासांनी कवींच्या बाबत म्हटलेले आहे. आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो ते कविवर्य गजानन दिगंबर उर्फ ग. दि. माडगूळकर हे खरोखरच शब्दसृष्टीचे ईश्वर होते. त्यांना शब्दांचे अक्षरशः वरदान होते. त्यांना एकदा एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता की "अण्णा, तुम्हाला असे अचूक, समर्पक आणि चपखल असे शब्द त्या त्या ठिकाणी कसे सुचतात ?" त्यावेळी अण्णा म्हणाले होते, "मला स्वत:लाही त्याबद्दल आश्चर्य वाटते. मात्र माझ्यासमोर शब्द अक्षरश: फेर धरून नाचतात आणि 'मला घ्या मला घ्या, माझा कवितेमध्ये उपयोग करा' असे जणू म्हणतात". इतकी शब्दांवर अण्णांची हुकमत होती. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात माडगूळ नावाचे गाव आहे. ते अण्णांचे गाव. आजही तेथे अण्णांच्या आठवणी सांगणारे काहीजण भेटतात. अण्णा त्यांच्या शेतामध्ये बसून शब्दसाधना करीत असत. त्या ठिकाणाला बामणाचा पत्रा असे म्हटले जाते. ते बामणाचा पत्रा हे ठिकाण आजही आपल्याला तेथे पहायला मिळते. अण्णा हे स्वातंत्र्यसैनिक. महात्मा गांधीजींच्या आदेशाने ज्यांनी स्वातंत्र्ययुद्धात त्यावेळी उडी घेतली, त्यामध्ये अण्णा अग्रेसर होते. त्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात कलावंतांनी ठिकठिकाणी मेळे सुरू केले होते. या मेळ्यांमध्ये कथानक असे. तसेच ते कथानक विविध गीतांनी सजवलेली असे. स्वातंत्र्ययुद्ध, समाजासमोरचे प्रश्न, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले प्रतिसरकार, ब्रिटिशांच्या दंडुकेशाहीचा आणि समाजातील सावकारशाहीचा बिमोड असे अनेक विषय या गीतांमधून मांडले जात असत. काँग्रेस सेवादलाच्या अनेक बैठका सांगली जिल्ह्यात (त्यावेळचा सातारा जिल्हा) त्यावेळी होत असत. विशेषतः आटपाडी, कुंडलमध्ये अशा बैठका सातत्याने होत असत. कारण कुंडल हे त्यावेळी औंध संस्थानमध्ये होते. त्या संस्थाचे अधिपती श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी आणि त्यांचे चिरंजीव बॅरिस्टर आप्पासाहेब पंत यांचा स्वातंत्र्ययुद्धाला पूर्ण पाठिंबा होता. अण्णा स्वातंत्र्य सैनिकांच्या अनेक बैठकांना हजर असायचे. क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड, शाहीर शंकरराव निकम असे त्यावेळी हजर असायचे. पूज्य साने गुरुजीही अशा बैठकांसाठी यायचे आणि त्यावेळी सेवादलाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करायचे. अण्णा अनेक स्फूर्तीदायक अशी गीते रचत असत. त्या गीतांचे गायन त्यावेळी अतिशय प्रसिद्ध असलेल्या मेळ्यांमध्ये आणि काँग्रेस सेवादलाच्या बैठकांमध्ये आंदोलनांमध्ये होत असे. त्या गीतांमुळे स्वातंत्र्यसैनिकांना प्रेम मिळत असे. अण्णांनी नंतर मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन तसेच पटकथालेखन सुरू केले. अतिशय भावमधुर अशी गीते अण्णांनी लिहिलेली आहेत. 'नाच रे मोरा आंब्याच्या वनात', हे गीत आजही म्हणजे जवळजवळ 60 ते 65 वर्षानंतरही लोकप्रिय आहे. तमाशाप्रधान, सामाजिक समस्याप्रधान किंवा संतांच्या जीवनावरचे चित्रपट यासाठी त्यांनी लिहिलेल्या गीतांनाही रसिकांची उदंड पसंती मिळाली. तमाशाप्रधान चित्रपटातही अण्णांनी अनेक सुंदर अशा लावण्या लिहिल्या की त्या आजही लोकांच्या आठवणीत आहेत. 'ऐन दुपारी यमुनातीरी, खोडी कुणी काढली, बाई माझी करंगळी मोडली', 'बाई मी पतंग उडवीत होते' किंवा 'काठेवाडी घोड्यावरती' अशा त्यांच्या अनेक लावण्या गाजलेल्या होत्या. त्याचवेळी अतिशय नितांत सुंदर आणि समाजाचे उद्बोधन करणारी गीतेही त्यांनी चित्रपटांसाठी तसेच नाटकांसाठीही लिहिली होती. प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक राजा परांजपे यांनी तयार केलेल्या अनेक चित्रपटांचे पटकथा, संवाद आणि गीतलेखन अण्णांनी केले होते. 'जगाच्या पाठीवर' या चित्रपटातील त्यांची सगळी गाणी आजच्या भाषेत सांगायचे तर अक्षरशः हिट झाली होती. 'तुला पाहते रे तुला पाहते रे, जरी आंधळी मी तुला पाहते रे', 'जग हे बंदीशाळा', 'थकले रे नंदलाला' अशी त्या चित्रपटातील गीते अक्षरश महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही त्यावेळी गाजत होती. आजही त्या गीतांची गोडी आहे. अनेक संतांच्या जीवन चरित्रावरील चित्रपटांसाठी अण्णांनी गीते लिहिली आणि तीही तेवढीच मधुर आहेत. संत गोरा कुंभार या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली 'उठ पंढरीच्या राजा, वाढवेळ झाला, थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला', तसेच समचरण सुंदर, कासे ल्याला पितांबर' ही गीते अतिशय लोकप्रिय झाली होती. संत दामाजीपंत यांच्या जीवनावरील चित्रपटात गदिमांनी लिहिलेले 'निजरूप दाखवा हो, हरिदर्शनासी याहो' हे गीतही असेच गाजले होते. गदिमांनी अनेक लघुनिबंध लिहिले आहेत. विशेषतः हस्ताचा पाऊस, जांभळाचे दिवस अशी त्यांची लघु निबंधांची पुस्तके अतिशय प्रसिद्ध आहेत. अतिशय सहज सोपी शैली आणि लोकांना समजेल असे लेखन हे त्यांच्या साहित्याचे सगळ्यात प्रमुख वैशिष्ठ्य आहे. ते नेहमी असे म्हणायचे की माझे लेखन हे सर्वसामान्य लोकांना कळले पाहिजे. केवळ विद्वान किंवा खूप शिकलेल्या लोकांसाठीच नव्हे; तर अगदी खेड्यापाड्यातील सामान्य लोकांसाठी मला लिहायचे आहे. अण्णांच्यावर लहानपणापासून कीर्तन, तमाशा, भजन, प्रवचन यांचा मोठा प्रभाव झाला होता. संतांच्या साहित्याचे त्यांनी उदंड वाचन केले होते. संत ज्ञानेश्वर, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज, संत एकनाथ, संत रामदास अशा संतांच्या साहित्याचा त्यांनी गाढा अभ्यास केला होता. उत्तर भारतातील प्रसिद्ध संत कबीर, तुलसीदास, सूरदास आणि मीराबाई यांच्या साहित्याचाही त्यांनी सखोल अभ्यास केला होता. साहजिकच त्यांच्या कवितेवर या सर्वांच्या प्रतिमासृष्टीचा आणि प्रतिभेचाही निश्चितच परिणाम झालेला आहे. साहजिकच त्यांची शब्दकळाही त्यामुळे अतिशय ओघवती आणि समृद्ध अशी बनलेली होती. 1952 च्या दरम्यान अण्णांच्या साहित्यिक जीवनात एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आला. तो टप्पा म्हणजे गीत रामायण महाकाव्य. या गीत रामायणाने अफाट लोकप्रियता मिळवली. या गीत रामायणामधील अनेक गाणी ही आठ नऊ कडव्यांचीसुद्धा आहेत. प्रसिद्ध गायक सुधीर फडके यांचे गायन आणि गदिमांची शब्दसंपत्ती यामुळे गीतरामायण हे महाकाव्य अक्षरशः प्रचंड लोकप्रिय झाले. त्यावेळी आकाशवाणीच्या पुणे आणि मुंबई या केंद्रावरून या गीत रामायणाचे कार्यक्रम प्रथम प्रसारित झाले होते. त्याची ठराविक वेळ असायची. पहिल्या दोन-तीन दिवसातच या गीत रामायणाबद्दल लोकांना श्रद्धा आणि प्रेम वाटू लागले. तेव्हा रेडिओ फार कमी होते. त्यामुळे बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असलेल्या एखाद्या घरात रेडिओ असे. त्या घरात आसपासचे लोक तिथे जमायचे आणि त्या रेडिओची अक्षरशः फुले वाहून आणि त्याच्यासमोर उदबत्ती लावून पूजा करायचे. मग गीत रामायण - ऐकायचे. म्हणजे लोकांनी गदिमांच्या या महाकाव्यावर किती प्रेम केले, किती श्रद्धा ठेवली हे आपल्याला यावरून कळून येईल. गदिमांनी विपुल लेखन केले आहे. कथा, कविता, नाटक, चित्रपट कथा त्यांनी अनेक लिहिल्या. परंतु असे म्हणतात की गदिमांनी फक्त गीत रामायण जरी लिहिले असते तरीसुद्धा त्यांची कीर्ती दिगंत झाली असती. गीत रामायणामध्ये गदिमांनी अनेक ठिकाणी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. वनवासात असताना अयोध्येचा राजा भरत हा प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी येतो. त्यावेळी त्याचे दुःख दूर करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी त्याला अतिशय हळुवार अशा शब्दात उपदेश केला. 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' हेच ते प्रसिद्ध गीत आहे. गीत रामायणातील अनेक गीते आजही लोकप्रिय आहेत. आजही त्या गीतांचे सातत्याने स्वतंत्र कार्यक्रम होतात. गदिमांच्या या गीतरामायणामुळे त्यांना आधुनिक वाल्मिकी अशी पदवी मिळाली आणि ती सार्थ अशी आहे. - प्रा. डॉ. मंजिरी महेंद्र कुलकर्णी (लेखिका प्राध्यापक आहेत)

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२५

साहित्य सोनियाच्या खाणी

नवी दिल्ली येथे येत्या दि. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. यापूर्वी 1954 साली नवी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर देशाची राजधानी नवी दिल्लीत होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन असून, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याची पार्श्वभूमी या संमेलनास आहे. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील साहित्य, साहित्यिक व साहित्य चळवळीवर प्रकाशझोत टाकणारा लेख… साहित्य सोनियाच्या खाणी सांगली जिल्ह्याची वाङमयीन परंपरा उज्ज्वल आणि अभिमानास्पद आहे. अनेक समकालीन, तरूण लेखक, कवी आपल्या सर्जनाने साहित्याच्या विविध प्रवाहातून सांगली जिल्ह्याची साहित्य संस्कृती वर्तमानात पुढे नेत आहेत. सुप्रसिध्द इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे हे लेखक केशवसुतांचे समकालीन होते. 'समुद्र' हे 132 श्लोकांचे त्यांचे दीर्घकाव्य 1884 साली प्रकाशित झाले. यशवंतराव होळकरांच्या जीवन आणि कर्तृत्वाचे वर्णन करणारे यशवंतराव हे खंडकाव्य 1888 साली प्रकाशित झाले. गुणोत्कर्ष, तारामंडल, चित्रवंचना, कृष्णकांचन, उग्रमंगल आणि शिवसंभव ही त्यांची गाजलेली नाटके. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनादिनी (1 मे 1960) चित्रपती व्ही. शांताराम यांनी बाबूराव पेंढारकरांच्या सहकार्याने 'शिवसंभव' चा मुंबईमध्ये भव्य स्वरूपाचा प्रयोग केला होता. मिरजेचे खरे वाचन मंदिर हे त्यांच्या कार्याचे स्मारक आहे. या ग्रंथालयाच्या वतीने दरवर्षी होणारी वसंत व्याख्यानमाला एक जुनी आणि नामवंत व्याख्यानमाला असून महाराष्ट्रातल्या नामवंत लेखक, वक्ते, विचारवंत इत्यादिंना या ज्ञानयज्ञातून ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळत असते. राजकवी साधुदास हे सांगली संस्थानातले एक आदरणीय कवी होते. 'विहार', 'वनविहार', 'रणविहार' अशी त्यांनी रामायणावर आधारित महाकाव्य रचना केली. पेशवे काळावरच्या पौर्णिमा', 'प्रतिपदा' आणि व्दितिया या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या होत. काव्यविहारी (गद्रे) हे यानंतरचे एक महत्त्वाचे कवी होते. रविकिरण मंडळाच्या काव्यदृष्टीचा आणि रचनापध्दतीचा त्यांच्या काव्यलेखनावर प्रभाव होता. 'काव्यविहार', 'स्फूर्तिलहरी', 'स्फूर्तिनिनाद', 'स्फूर्तिविलास' हे त्यांचे काव्यसंग्रह असून नाट्य सुगंध आणि नाटककार देवल व्यक्ती आणि वाङमय हे त्यांचे नाट्यसमीक्षा ग्रंथही प्रसिध्द आहेत. विलिंग्डन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य गो. चिं. भाटे यांची 'प्रेम की लौकिक' ही कादंबरी विषयाच्या वेगळेपणामुळे तत्कालीन कादंबरी विश्वात गाजली होती. त्यांनी प्रवास वर्णन हा वाङमय प्रकारही प्राचुर्याने हाताळला. कानडी वाड्.मयात मोलाचे योगदान देणारे प्राचार्य गोकाक आणि प्राचार्य मुगळी यांची वाङमयीन कारकीर्द इथेच बहरली. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांचे प्राथमिक शिक्षणही मिरजेच्या शाळा नं. 1 मध्ये झाले. उद्योग आणि उन्नतीचे संस्कार मराठी मनावर घडवणारी आणि नव्याने उदयाला येत असलेल्या शिक्षित मध्यमवर्गाची वैचारिक आणि वाङमयीन अभिरूची घडवणारी 'किर्लोस्कर', 'स्त्री' आणि आणिवा ही सुप्रसिध्द मासिके सुरवातीला अनेक वर्षे या जिल्ह्यातील किर्लोस्करवाडीतून प्रकाशित होत होती. नियतकालिकांच्या इतिहासात या मासिकांना अत्यंत महत्वाचे असे स्थान आहे. मासिकांचे संस्थापक संपादक शंकरराव किर्लोस्कर आणि नंतरचे संपादक मुकुंदराव किर्लोस्कर यांचे या संदर्भातले योगदान मौल्यवान आहे. कवी सुधांशु आणि कथाकार म. भा. भोसले यांनी औदुंबर येथे सुरू केलेले सदानंद साहित्य संमेलन सत्तर वर्षांहून अधिक काळ अखंडपणे दरवर्षी मकर संक्रातीच्या दिवशी भरत असते. महाराष्ट्रातल्या मुख्य साहित्य संमेलनांव्यतिरीक्त ग्रामीण भागात भरणारे महाराष्ट्रातले हे पहिले साहित्य संमेलन होय. या संमेलनाला महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व ख्यातनाम लेखक, कवी, नाटककार, ललित लेखक, समीक्षक अध्यक्ष म्हणून हजर राहिले आहेत. जिल्हास्तरावरची सर्वात जास्त म्हणजे जवळपास 16 साहित्य संमेलने सांगली जिल्ह्याच्या विविध भागात दरवर्षी नियमितपणे भरत असतात. मराठीतले मान्यवर ज्येष्ठ लेखक या संमेलनांना अध्यक्ष म्हणून आवर्जून येत असतात. स्फुटकाव्य आणि खंडकाव्य लिहिणारे रविकिरण मंडळाचे एक संस्थापक सदस्य कवी गिरीश (शं. के कानेटकर) यांचे सांगलीमध्ये वास्तव्य होते. त्यांचे सुपुत्र आणि पुढे महाराष्ट्रातले एक ख्यातनाम नाटककार म्हणून प्रसिध्दी पावलेले वसंत कानेटकर यांचे शिक्षण विलिंग्डन महाविद्यालयात झाले आणि आपल्या काही महत्त्वाच्या नाटकांचे लेखनही त्यांनी इथेच केले. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे हेही विलिंग्डन महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणासाठी सांगलीत वास्तव्यास होते. मराठी साहित्यातील ज्येष्ठ आणि थोर लेखक आणि मराठीतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार ज्यांना मिळाला, ते वि. स. खांडेकर मूळचे सांगलीचेच. गणेश आत्माराम खांडेकर हे त्यांचे मूळ नाव. पुढे दत्तक गेल्यावर ते विष्णु सखाराम खांडेकर झाले. त्यांचे शिक्षण सांगली हायस्कूलमध्ये झाले. नंतरचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विं. दा. करंदीकर यांचे वास्तव्यही शिक्षक म्हणून काही काळ तासगावला होते. सुरवातीच्या कविता त्यांनी इथेच लिहिल्या होत्या. सर्वश्री ग. दि. माडगूळकर, शंकरराव खरात, व्यंकटेश माडगूळकर, ना. सं. इनामदार आणि प्रा. म. द. हातकणंगलेकर या सांगली जिल्ह्यातील प्रतिभावंत कवी, लेखक आणि समीक्षकांना मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला. वंचित, उपेक्षित, बहिष्कृत म्हटल्या गेलेल्या जमातीचे अनोखे दर्शन घडवणारे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीने बुलंद करणारे शाहीर अण्णाभाऊ साठे, लावणीचे अध्वर्यू पठ्ठे बापूराव, अपरिचित अनुभवांचे सशक्त चित्रण करणारे श्री. दा. पानवलकर, दलितांच्या वेदना आणि दुःखांना शब्दरूप देणारे कथाकार बंधुमाधव, ग्रामीण जीवनाचे अंतरंग उलगडणारे चारुता सागर, देवदत्त पाटील, भक्तीरसाचा आविष्कार करणारे कवी सुधांशु, गीतकार पी. सावळाराम, कवी व लोकसाहित्याचे अभ्यासक अशोकजी परांजपे, गीतकार सुधीर मोघे, लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर, तारा भवाळकर, सय्यद अमीन, सुलेखनकार र. कृ. जोशी, जीवनातील विरुपतेचे दर्शन घडविणाऱ्या कमल देसाई, प्राकृत साहित्याचे संशोधक ग. वा. तगारे, पानिपतकार विश्वास पाटील इत्यादींनी आपल्या प्रतिभासामर्थ्याने आणि सौंदर्याने सांगली जिल्ह्याचे नाव आणि लौकिक वृध्दिंगत केला आहे. अनिल दामले, शैला सायनाकर, कथाकार वामन होवाळ, कवी अभ्यासक अरुण कांबळे तसेच ललित लेखनाचे नितांत सुंदर रूप दाखवणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी, प्रा, गौतमीपुत्र कांबळे, प्रा. जी. के. ऐनापुरे, साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्राप्त वसंत केशव पाटील आणि बलवंत जेऊरकर, प्रा. वैजनाथ महाजन, कमलेश वालावलकर, संजीव खांडेकर यांच्यासारखे अनेक समकालीन, तरूण लेखक, कवी आपल्या सर्जनाने साहित्याच्या विविध प्रवाहातून सांगली जिल्ह्याची साहित्य संस्कृती वर्तमानात पुढे नेत आहेत. - अविनाश सप्रे (लेखक साहित्य अकादमीचे सदस्य आहेत)

शुक्रवार, १० जानेवारी, २०२५

फिश मार्केटमध्ये अद्ययावत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

फिश मार्केटच्या वास्तूचे भूमिपूजन संपन्न सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या फिश मार्केटच्या वास्तूचे काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावे. हे फिश मार्केट सर्व सोयीसुविधांनीयुक्त होण्यावर प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी भर द्यावा, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज येथे केले. सांगली येथील खणभाग येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत फिश मार्केटच्या भूमिपूजनांतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, पुणे विभाग मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे, महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ, महानगरपालिका शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार नितीन शिंदे, नीता केळकर, सम्राट महाडिक, स्वाती शिंदे, सुनंदा राऊत यांच्यासह महानगरपालिकचे आजी, माजी पदाधिकारी उपस्थित होते. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले, हा अतिशय चांगला प्रकल्प आहे. विकासाची प्रक्रिया अशीच चालू ठेवावी. अधिकच्या चांगल्या सोयीसाठी या वास्तूमध्ये आणखी एक मजला वाढविण्यासाठी व कोल्ड स्टोरेजबाबत मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा. लवकरात लवकर तो मंजूर करू. शासन म्हणून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सदैव कटिबध्द आहे. फिश मार्केट तयार झाल्यानंतर मत्स्य व्यावसायिकांनी रस्त्यावर विक्री न करता फिश मार्केटमध्येच करावी, असे ते म्हणाले. यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले, सांगली शहरात एक चांगली वास्तू उभारत आहे. यासाठी आवश्यकता भासल्यास खासदार फंडातूनही मदत करू. हा चांगला प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले. महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले, फिश मार्केट पूर्ण होईपर्यत येथील व्यावसायिकांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरात लवकर ही वास्तू उभारण्यासाठी प्रयत्न करू. या वास्तूमध्ये आणखी एक मजला व कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करू. या माध्यमातून मत्स्य व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची चांगली संधी उपलब्ध होईल असे ते म्हणाले. स्वाती शिंदे यांनी ही वास्तू उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर सांगली शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम अत्याधुनिक करण्यासाठी प्रयत्न करू असे त्या म्हणाल्या. प्रास्ताविकात अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या फिश मार्केटच्या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम 8 कोटी 7 लाख 53 हजार इतकी आहे. कामाचे क्षेत्रफळ 1520 चौरस मीटर असून यामध्ये 3 x 3 मीटरचे 81 दुकान गाळे, मासळी बाजारमध्ये वेस्ट डिस्पोजल युनिट, 14.73 मीटर x 3 मीटरची स्टोअर रूम, पुरूष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, ग्रॅनाईट फ्लोरिंग, प्रत्येक दुकानासाठी मासे स्वच्छतेसाठी स्वतंत्र नळ कनेक्शन व प्लॅटफॉर्म, ड्रेनज व्यवस्था, 3 मीटर रूंदीचे अंतर्गत पॅसेज, 100 दुचाकी व 30 चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था अशा सोयी सुविधा असणार आहेत, असे सांगितले. या कार्यक्रमास नागरिक, व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000