गुरुवार, ३० जून, २०२२
तासगाव तालुक्यातील किंदरवाडी ग्रामपंचायतीचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : राज्य निवडणूक आयोगाने जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणक प्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील किंदरवाडी ग्रामपंचायतीचा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान दिनांक 4 ऑगस्ट 2022 तर मतमोजणी 5 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. ग्रामपंचायत निवडणूकीकरीता राज्य निवडणूक आयोगाकडील आदेशानुसार आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी व आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही असे नमूद केले आहे.
जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकप्रणालीवदारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे. तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक - दिनांक 5 जुलै 2022 (मंगळवार). नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अअ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) - दिनांक 12 जुलै 2022 (मंगळवार) ते दिनांक 19 जुलै 2022 (मंगळवार) वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 (दिनांक 16 जुलै 2022 चा शनिवार व दिनांक 17 जुलै 2022 चा रविवार वगळून). नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचर दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) - दिनांक 20 जुलै 2022 (बुधवार) वेळ सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) - दिनांक 22 जुलै 2022 (शुक्रवार) दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ - दिनांक 22 जुलै 2022 (शुक्रवार) दुपारी 3 वाजल्यानंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक - दिनांक 4 ऑगस्ट 2022 (गुरूवार) सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत. मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) - दिनांक 5 ऑगस्ट 2022 (शुक्रवार). जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक - दिनांक 11 ऑगस्ट 2022 (गुरूवार) पर्यंत.
00000
मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत पशुवैद्यकीय सेवेसाठी पशुपालकांना टोल फ्री क्रमांकावर फोन करून लाभ घेण्याचे आवाहन
सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, कडेगाव, पलूस, वाळवा, मिरज, खानापूर व तासगाव या तालुक्यांमध्ये "मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना" या राज्यस्तरीय योजनेंतर्गत फिरते पशुचिकित्सा पथकांचा विस्तार करण्यात आलेला आहे. या योजनेंतर्गत फिरत्या पशुचिकित्सा पथकामध्ये विविध उपकरणांनी सुसज्ज वाहन उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू पशुपालकांनी "१९६२" या टोल फ्री क्रमांकावर स्वतःच्या मोबाईलवरून फोन करून त्याच्या पशुधनासाठी आवश्यक असणाऱ्या पशुवैद्यकीय सेवेची मागणी नोंदवावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. ए. धकाते यांनी केले आहे.
फिरत्या पशुचिकित्सा पथकांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय सेवांसाठी जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, कडेगाव, पलूस, वाळवा, मिरज, खानापूर व तासगाव या तालुक्यांमधील गरजू पशुपालकांनी "1962" या टोल फ्री क्रमांकावर स्वतःच्या मोबाईल क्रमांकावरून फोन करुन त्यास आवश्यक असणाऱ्या सेवेची मागणी नोंदविण्याची आहे. त्यानंतर मागणी केलेल्या सेवेच्या प्रकारानुसार व आजाराच्या तीव्रतेनुसार / वर्गीकरणानुसार संबंधित पशुपालकास 5 तास ते 72 तासांपर्यंत आवश्यक असणारी पशुवैद्यकीय सेवा फिरत्या पशुचिकित्सा पथकांमार्फत पुरविण्यात येणार आहे. या पथकांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांसाठी शासनामार्फत निश्चित केलेल्या सेवा शुल्काव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त सेवाशुल्क आकारण्यात येणार नाही.
राज्यातील पशुधनास कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया, वंध्यत्व तपासणी, गर्भधारणा तपासणी इत्यादी प्रकारच्या पशुआरोग्य सेवा पशुवैद्यकीय संस्थांमार्फत नियमितपणे पुरविल्या जातात. तथापि पशुधन आजारी पडल्यास सदर पशुधनास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये घेऊन जावे लागते. अशावेळी प्रसंगी पशुपालकांना स्वखर्चाने वाहनाची सोय करावी लागते. बहुतांशी पशुपालकांना हा आर्थिक भार परवडणारा नसतो. त्यामुळे पशुवैद्यकीय सेवेअभावी पशुधन मयत होऊन, पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. त्यासाठी ज्या भागामध्ये दळ्णवळणाच्या सुविधा अपुऱ्या आहेत अथवा पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या कमी आहे, अशा तालुक्यांमधील पशुधनास पशुवैद्यकीय सेवा पशुपालकांच्या दारापर्यंत पोहचविण्यासाठी फिरते पशुचिकित्सा पथके स्थापन करणे आवश्यक होते. त्यानुसार फिरत्या पशुचिकित्सा पथकांचा विस्तार करण्यात आलेला आहे.
जनावरास विताना त्रास होणे, गर्भाशय बाहेर पडणे (अंग बाहेर येणे), गर्भाशयाला पिळ पडणे, सर्पदंश होणे, विषबाधा होणे, तीव्र स्वरुपाची पोटफुगी होणे, घशामध्ये वस्तू अडकणे, पशुधनास अपघात होऊन गंभीर इजा होणे, आग लागून जनावर भाजणे, उष्माघात होणे, घटसर्प अथवा इतर गंभीर आजार होणे या प्रकारच्या गंभीर व अत्यावश्यक सेवांसाठी व इतर आवश्यक असणाऱ्या सेवांसाठी जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, कडेगाव, पलूस, वाळवा, मिरज, खानापूर व तासगाव या तालुक्यांमधील गरजू पशुपालकांनी “1962” या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. धकाते यांनी केले आहे.
00000
जिल्ह्यात खानापूर तालुक्यात 21.2 मि.मी. पावसाची नोंद
सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.3 मि. मी. पावसाची नोंद झाली असून खानापूर-विटा तालुक्यात सर्वाधिक 21.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 4.0 (66), जत 16.9 (93.9), खानापूर-विटा 21.2 (67.1), वाळवा-इस्लामपूर 5.6 (59.3), तासगाव 0.9 (60.4), शिराळा 1.2 (108.8), आटपाडी 12.3 (63.9), कवठेमहांकाळ 0.4 (55.9), पलूस 0.0 (43.6), कडेगाव 0.3 (51.2).
00000
जिल्ह्यातील वारणा धरणात 10.35 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 10.35 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 13.55 (105.25), धोम 4.12 (13.50), कन्हेर 2.34 (10.10), वारणा 10.35 (34.40), दूधगंगा 6.04 (25.40), राधानगरी 2.32 (8.36), तुळशी 1.37 (3.47), कासारी 0.91 (2.77), पाटगांव 1.19 (3.72), धोम बलकवडी 0.76 (4.08), उरमोडी 4.15 (9.97), तारळी 2.04 (5.85), अलमट्टी 48.21 (123).
विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 1600, धोम 0.0, कण्हेर 150, वारणा 573, दुधगंगा 300, राधानगरी 1000, तुळशी 50, कासारी 250, पाटगांव 0.0, धोम बलकवडी 0.0, उरमोडी 550, तारळी 0.0 व अलमट्टी धरणातून 798 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 14.10 (45), आयर्विन पूल सांगली 4.6 (40) व अंकली पूल हरिपूर 3.11 (45.11).
00000
बुधवार, २९ जून, २०२२
हॉटेल आस्थापनांना हायजिन रेटींग प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे मार्गदर्शनपर कार्यशाळा
सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील हॉटेल आस्थापनांना स्वच्छतेबाबत थर्ड पार्टीकडून ऑडीट करून हायजिन रेटींग प्रमाणपत्र प्राप्त करण्याबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळा अन्न व औषध प्रशासन कार्यालयातर्फे घेण्यात आली. ही कार्यशाळा अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांच्यासमवेत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती हिरेमठ व श्री. स्वामी यांनी घेतली.
या कार्यशाळेमध्ये अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील शेड्युल 4 मधील स्वच्छतेबाबत घ्यावयाची खबरदारी व उपाययोजना याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती हिरेमठ व श्री. स्वामी यांनी मार्गदर्शन केले. हायजिन रेटींग हे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती हॉटेल आस्थापनांना यावेळी देण्यात आली. या कार्यशाळेत तळण्यासाठी वापरण्यात येत असलेले तेल किती वेळा वापरावे व असे वापरून शिल्लक राहिलेले तेल रूको या संस्थेला देण्याबाबत मार्गदर्शन केले. रूको ही संस्था जळके तेल घेवून बायोडिझेल निर्मिती करीत असल्याबाबतचे त्यांना अवगत केले. वापरलेले तेल एका कंटेनरमध्ये साठवूण त्यावर रूकोचे लेबल लावण्याबाबत सूचना दिल्या.
या कार्यशाळेत ईट राईट चॅलेंजच्या कार्याबाबत माहिती देण्यात आली. सांगली जिल्ह्यात मिरज लक्ष्मी मार्केट येथील रोडवर अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांना क्लिन स्ट्रिट फूड हब चे मानांकन प्राप्त झाल्याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली.
00000
शिष्यवृत्ती, फ्रीशिप, आरएसएमएस, निर्वाह भत्ता योजनेकरीता महाडिबीटी प्रणालीवर अर्ज करण्यासाठी 5 जुलै पर्यंत मुदतवाढ
सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : अनुसूचित जाती प्रवर्गातील सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी प्रलंबित नुतनीकरण अर्जदारांसाठी तसेच सन 2021-22 मधील नवीन व नुतनीकरण अर्जदारांसाठी शिष्यवृत्ती, फ्रीशिप, आरएसएमएस, निर्वाह भत्ता या योजनेकरीता अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी प्रणालीवर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दि. 5 जुलै 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी या योजनेकरीता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावरुन अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित सर्व विद्यालय/ महाविद्यालयांनी दि. 5 जुलै 2022 पर्यंत विद्यार्थ्यांचे सर्व योजनांचे अर्ज भरुन घ्यावेत. भविष्यात अंतिम दिनांकानंतर मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्याबाबत किंवा अशा प्रकारे कोणतीही तक्रार निर्माण झाल्यास विद्यालय/ महाविद्यालयास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे.
00000
सेवा सहकारी संस्थांना काम वाटपासाठी 5 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : सेवा सहकारी संस्थांना कामे वाटपासाठी वाहनचालक 03 व सफाईकामगार 01 अशी एकूण चार कामे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली या कार्यालयाकडे प्राप्त झाली आहेत. ही कामे करण्यास इच्छुक असणाऱ्या तसेच अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या सेवा सहकारी संस्थांनी इच्छापत्र व आवश्यक कागदपत्रासह दि. 5 जुलै 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.
शिराळा तालुक्यातील सहायक अभियंता श्रेणी-1 वारणा डावा तीर कालवा उपविभाग क्र. १, कोकरूड, उपविभागीय अभियंता वारणा डावा तीर कालवा उपविभाग क्र. २, सागांव व उपविभागीय अभियंता वारणा प्रकल्प उपविभाग क्र. ३ वारणावती या आस्थापनांकडील प्रत्येकी एक वाहनचालक तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था विटा यांच्याकडील एक सफाईगार अशी एकूण चार कामे असून कामाचा कालावधी 11 महिन्यांचा आहे. वाहनचालकासाठी 13 हजार 330 रूपये मासिक मानधन आहे. तर सफाईगार कामासाठी 597 रूपये प्रतिदिन मानधन आहे.
या कामासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. बेरोजगारांची स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी यांची स्थापना ऑगस्ट 2000 नंतर झालेली असावी. तसेच सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी. बेरोजगारांची सहकारी सेवा सोसायटी त्यांना देण्यात येणारे काम करण्यासाठी पात्र असावी. सहकारी सेवा सोसायटीस 3 लाखापर्यंतची कामे मिळण्यासाठी त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे अनुभव दाखले प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. सहकारी सेवा सोसायटी खाते सहकारी बँक/ राष्ट्रीयकृत बँकेत काढलेले असावे. सहकारी सेवा सोसायटीच्या आर्थिक उलाढालीचे नियमित वार्षिक लेखापरिक्षण केलेले असावे. सन 2021-22 च्या लेखापरिक्षण अहवालाची प्रत सोबत जोडावी. सहकारी सेवा सोसायटी/ लोकसेवा केंद्र यांनी सदस्यांना ओळखपत्रे देणे आवश्यक असून ते क्रियाशील सदस्य असणे आवश्यक आहे. जे सदस्य क्रियाशिल नसतील त्यांची नावे सदर सहकारी सेवा सोसायटीतून कमी करून त्या ठिकाणी नवीन सदस्य घेण्यात यावेत. कागदपत्रांच्या छायांकित प्रती/प्रमाणपत्र मुळ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. ज्यांचे कार्यक्षेत्र शिराळा व विटा आहे तसेच जिल्हास्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या संस्थांनी अर्ज सादर करावेत. अर्जासोबत उपविधीमध्ये नमूद असलेल्या कार्यक्षेत्राच्या पानाची साक्षांकित प्रत जोडावी.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)