शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३
कामगारांच्या अडीअडचणी एकाच छताखाली सोडविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला कामगार भवन उभे करणार - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली दि. 25 (जि.मा.का.) : कामगारांच्या व्यथा, अडचणी, त्यांची सुख:दुख: ही मी स्वत: भोगलेली असून यातून कामगारांच्यासाठी काही तरी मार्ग निघावा यासाठी प्रत्येक जिल्ह्याला कामगार भवन उभे करून एकाच छताखाली कामगारांच्या सर्व अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
17 व्या कामगार साहित्य संमेलनाचा सांगता समारंभ बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे संपन्न झाला. या प्रसंगी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर, 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, माजी महापौर संगीता खोत यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, साहित्यिक व कामगार उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, कामगार कष्टाचे काम करत असतो त्यामुळे त्याच्या आरोग्याच्या अडचणी निर्माण होतात. कामगारांना योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्याला मल्टीपर्पज ईएसआय हॉस्पीटलसाठी प्रयत्न करीत असून 6 ईएसआय हॉस्पीटल मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी पुणे येथील मल्टीपर्पज हॉस्पीटलची पायाभरणी लवकरच करण्यात येईल. कामगारांची मुले खेळ, उद्योगात आली पाहिजेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी वास्तु उभा करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. ईएसआय हॉस्पीटलला जोडूनच कामगारांच्या मुलांसाठी मेडिकल कॉलेज काढण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. कामगारांच्या मुलांना टेक्नीकल प्रशिक्षण देण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगून प्रत्येक वर्षी कामगार साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉ. तारा भवाळकर यांनी साहित्य संमेलन अत्यंत आनंदात पार पडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देवून येथून पुढे प्रत्येक वर्षी साहित्य संमेलन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. जुन्या व नव्या साहित्याचा इतिहास नोंदविला जावा असे सांगून डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, वर्षभर कवि संमेलन, कथाकथन, परिसंवाद अशा प्रकारचे कार्यक्रम विविध ठिकाणी घ्यावेत त्यामुळे त्या त्या ठिकाणच्या कलाकारांना वाव मिळेल. कामगार ज्या ज्या ठिकाणी काम करतात त्या त्या ठिकाणी त्यांना चांगली स्वच्छतागृहे, स्वच्छ पाणी, खाण्यापिण्याची व्यवस्था अशा सुविधा त्यांना परवडतील अशा पध्दतीने उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी म्हणाले, कामगार साहित्य चळवळीची अत्यंत आवश्यकता आहे. अनुदवादक फळी निर्माण करून आपल्या भाषेतील साहित्य इतर ठिकाणी पोहचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी वैचारिक लेखन, नाट्यलेखन, काव्यलेखन, कथालेखन स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच विविध लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी साहित्य संमेलनाबद्दल सविस्तर माहिती देवून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन श्वेता हुले यांनी केले. आभार सहायक कल्याण आयुक्त माधवी सुरवे यांनी मानले. या कार्यक्रमास साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000
शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३
ढोल ताशांच्या निनादात आणि ज्ञानोबा...तुकाराम या गजरात १७ व्या कामगार साहित्य संमेलनाचा ग्रंथ दिंडीने शुभारंभ
पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्याहस्ते ग्रंथ पालखीचे पूजन
सांगली दि. 24 ( जि.मा.का.) : ढोल ताशांच्या निनादात आणि ज्ञानोबा... तुकाराम .. जय जय राम कृष्ण हरी..... गजरात १७ व्या कामगार साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथ दिंडीने करण्यात आला. मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला. कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश खाडे आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्याहस्ते ग्रंथ पालखीचे पूजन करण्यात आले. तत्पूर्वी पालकमंत्री डॉ सुरेश खाडे व अन्य मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या वेशभूषा करून सहभागी झालेले युवक आणि संबळ वाद्य वाजवणारी गौरी वायचळने ग्रंथ दिंडीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डोक्यावर तुळस कट्टा, हाती ब्रेल लिपीत लिहिलेली ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा व मुखाने ज्ञानोबा... तुकाराम .. जय..जय राम... कृष्ण हरी... असा हरी नामाचा गजर करीत ग्रंथ दिंडीत सहभागी झालेले कै. सु.धा. घोडावत या अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. ग्रंथ दिंडीत अंध शाळेच्या विद्यार्थ्यांच्या चमू सोबत वासुदेवानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कामगार साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात आलेली ही ग्रंथ दिंडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरुवात होऊन सराफ कट्टा, लक्ष्मी मार्केट, महापालिका कार्यालय, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर प्रवेशद्वार या मार्गावरून बालगंधर्व नाट्यमंदिर पर्यंत काढण्यात आली. ग्रंथ दिंडीत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व कामगार विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
ग्रंथ दिंडी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे पोहोचल्यानंतर विं. दा. बालमंचाचे, डॉ. शंकरराव खरात ग्रंथ दालन आणि लोकशाहीर पट्टे बापूराव कविता भिंतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
०००००
माणसामधली सृजनशक्ती असेपर्यंत साहित्यही असणार - ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
सर्व उद्योगात कामगार हाच केंद्रबिंदू ... पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली दि. 24 (जि.मा.का.) : सृजनात्मा निर्माण करणारा आत्मा, म्हणजे माणूस हा सर्वश्रेष्ठ आहे. संस्कृती म्हणजे एकमेकांना जोडून राहणं, प्रेम करणं. यंत्रमानवाला आपल्या मेंदुवर स्वार होऊ देवू नका. यंत्र माणसाच्या हातात पाहिजे, ते माणसाच्या डोक्यावर जावू नये. यंत्र असो, तंत्र असो, कृत्रिम बुध्दिमत्ता असो, तिचा निर्माता, सृजनात्मा हा माणूसच आहे. कृत्रिम बुध्दीलाही माणसांनीच निर्माण केलेलं आहे. माणसामधली सृजनशक्ती आहे, तोपर्यंत त्याची कविताही असणार आहे, त्याची कृतीही असणार आहे, त्याची कलाही असणार आहे, त्याचं साहित्यही असणार आहे आणि माणूसही असणार आहे, असा विश्वास 17 व्या कामगार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यनगरी बालगंधर्व नाट्यमंदिर, मिरज येथे आयोजित 17 व्या कामगार साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्याहस्ते आणि संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, उप सचिव दादासाहेब खताळ, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष भिमराव धुळूबुळू यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, साहित्यिक व कामगार उपस्थित होते.
डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, साहित्य, मग ते कोणाचंही, कोणत्याही काळातलं असू देत, निर्माण करणारा माणूसच असतो. आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ते साहित्य त्याच्या जगण्यातून निर्माण होत असतं. साहित्याचा विषय हा नेहमी माणूसच असतो. मग माणसाचं जगणं, तो ज्या कुटुंबात, समाजस्तरात जन्माला येतो, ज्या वातावरणात वाढतो. त्या वातावरणातलं राजकारण, धर्मकारण, अर्थकारण, शिक्षणव्यवस्था, सांस्कृतिक वातावरण या सगळ्या ताणाबाणांच्या मिश्रतेचा साहित्यात आविष्कार होत असतो. कामगार साहित्यातही हेच होत असतं. कामगारांच्या साहित्यातून श्रमाचा हुंकार बाहेर पडतो, असे त्या म्हणाल्या.
मी कामगार आहे तळपती तलवार आहे, सारस्वतांनो मी थोडासा गुन्हा करणार आहे! “ म्हणजे लिहिणार आहे असे ज्येष्ठ साहित्यिक नारायण सुर्वे म्हणतात, असे सांगून डॉ. भवाळकर म्हणाल्या, गिरण्या कारखान्यातल्या एकाच प्रकारच्या अनुभवी संघभावनेने कामगाराला नवी दृष्टी दिली व नवं भान दिलं. नवी अस्मिता, अभिमान आणि विश्वास दिला. यंत्रयुगातल्या एकानुभवी समूहाला कष्टाचंही सामूहिक एकीकरण झालं. नवयुगाचं अर्थकारण मालक - मजूर संबंध, संघर्ष, मजुरांचे हक्क इत्यादी बाबींच्यामधून नवभान आलेला कामगारवर्ग निर्माण झाला. नवभान आलेला कामगार साहित्यिक, भांडवलशाहीचं नवं अर्थभान घेऊन लिहू-वाचू लागला. मोर्चे यामुळे कामगार चळवळीचं अस्तित्व समाजाला जाणवू लागलं. त्याचा आविष्कार त्याच्या लेखनातूनं होऊ लागला. नवयुगाच्या विविध चळवळीतुन कामगार चळवळ ही पुढे येत गेली. त्या त्या गटातल्या साहित्याची निर्मिती त्यातून झाली.
बुध्दी व श्रम ही दोन्ही बले जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा नवनिर्मिती होते. मनगट, मन आणि बुध्दी एकत्र आल्याशिवाय प्रगती नाही म्हणूनच श्रमातून सौंदर्य निर्माण करणाऱ्या कामगारांना समाजात आदराचे स्थान दिले पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाचे उद्घाटक डॉ. राजा दीक्षित यांनी यावेळी केले. 19 व्या शतकात महात्मा फुले, शतपत्रेकार लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी कामगारांच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळवून दिली. नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिली कामगार संघटना स्थापना केली. सध्याच्या काळात कामगारांच्या चळवळी मंदावत आहेत. हा जागतिकीकरणाचा दुष्परिणाम आहे. कंत्राटी पध्दतीने कामगार भरती होत असल्याने त्यांना संघटीत होण्यास संधी मिळत नाही, ही चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले.
कामगारांनी काम मागण्यापेक्षा देणारे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सर्व उद्योगात कामगार केंद्रबिंदू असल्याने त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी. कामगार साहित्य संमेलनाला मोठा वारसा असून यातून कामगारांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम कामगार कल्याण मंडळामार्फत होत आहे. कामगार साहित्य संमेलनाच्या मंचावरून कामगारांचे प्रश्न, समस्या यावर चर्चा घडते. कामगार कल्याण मंडळाने 17 वे साहित्य संमेलन साहित्य, आरोग्य पंढरी असलेल्या मिरजेत आयोजित केल्याबद्दल कामगार मंडळाचे त्यांनी आभार मानले.
कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल म्हणाल्या, कामगार कल्याण मंडळामार्फत कामगारांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. कामगारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्यस्पर्धा आयोजित केल्या जात असून कबड्डी सारख्या राज्यस्तरीय स्पर्धाही घेतल्या जात आहेत. शिक्षण, साहित्य व सांस्कृतिक विषयक कार्यक्रम आयोजित करून कामगारांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे काम कल्याण मंडळामार्फत केले जात असल्याचे त्या म्हणाल्या.
कामगार कल्याण मंडळामार्फत साहित्य संमेलनासारखे उपक्रम आयोजित करून कामगाराला एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम केले जात आहे, असे कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी प्रास्ताविकात सांगितले. सुमारे 12 वर्षानंतर हे साहित्य संमेलन होत असून या साहित्य संमेलनामध्ये ३ हजार कामगार व कुटुंबियांनी नोंदणी केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी स्थानिक कलाकारांनी महाराष्ट्र गीत तर बाबा नदाफ आणि सहकाऱ्यांनी महात्मा फुले यांचा सत्य सर्वांचे आदिघर, सत्य सर्वांचे माहेर हा अखंड सादर केला. कार्यक्रमात अभिनेत्री रोहिणी कुडेकर, संबळ वादक गौरी वायचळ, अभिनेता अजितकुमार कोष्टी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
00000
गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
तृणधान्य वापराबाबत लोकांमध्ये रुची निर्माण करा
आमदार सुधीर गाडगीळ यांचे आवाहन
सांगली, दि. 23 (जि.मा.का.):- आरोग्यासाठी तृणधान्ये आहारात हितकारक आणि महत्त्वाची असून तृणधान्य वापराबाबत लोकांमध्ये रुची निर्माण करण्यासाठी कृषी विभागाने जनजागृती करावी, असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज केले.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या प्राचार्य अर्चना शिंदे, कृषी उपसंचालक प्रियांका भोसले, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश मसारे, विभागीय कृषी संशोधन केंद्र शेंडा पार्क कोल्हापूर येथील प्रभारी अधिकारी तथा नाचणी पैदासकार, नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे योगेश बन, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे रामकृष्ण पटवर्धन व महाविद्यालयाचे प्राध्यापक राजकुमार पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
आमदार श्री. गाडगीळ म्हणाले, आहारात तृणधान्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र फास्ट फूड मुळे आहारात तृणधान्याचे प्रमाण कमी झाले आहे. तृणधान्यांचा आहारात नेहमी वापर करून रोग प्रतिकार शक्ती वाढवू, असे आवाहन त्यांनी केले. तृणधान्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी कृषी विभागाबरोबरच सर्वच विभागानी प्रयत्न करावेत, असे सांगून श्री, गाडगीळ म्हणाले तृणधान्याचे महत्त्व पटवून देणाऱ्या एका चांगल्या कार्यक्रमास उपस्थित राहता आले याचे आपणास समाधान वाटते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सूर्यवंशी म्हणाले, फास्ट फूडच्या वापरामुळे आहारात तृणधान्याचा वापर कमी झाला आहे. तृणधान्याचे महत्त्व सर्वांना पटवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर 2023 वर्ष पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. तृणधान्यामुळे आरोग्य चांगले होऊन प्रतिकारशक्ती वाढते यामुळे शालेय पोषण आहारामध्ये देखील तृणधान्याचा वापर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्राध्यापक राजकुमार पाटील म्हणाले, निरोगी आयुष्यासाठी आहारात तृणधान्याचा वापर वाढवणे गरजेचे आहे. तृणधान्य सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया चांगली होते यामुळे मानवी आहारात तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जावेत, असे श्री. पाटील म्हणाले.
पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
तत्पूर्वी आमदार श्री. गाडगीळ यांनी तृणधान्य पासून बनवलेल्या विविध पदार्थांच्या स्टॉलला भेट दिली. तदनंतर त्यांनी रांगोळी प्रदर्शनाचीही पाहणी केली.
000000
शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०२३
बाल महोत्सवामध्ये यश मिळविलेल्या स्पर्धकांनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय व ऑलंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेवून नाव उज्वल करावे - महिला व बाल विकास विभागीय उपायुक्त संजय माने
चाचा नेहरु विभागीय बाल महोत्सवात सर्वसाधारण विजेतेपद सांगली आणि पुणे जिल्ह्याकडे
सांगली दि. 17 (जि.मा.का.) : बाल महोत्सवामध्ये यश मिळविलेल्या स्पर्धकांनी राज्यस्तरीय राष्ट्रीय व ऑलंपिक स्पर्धांमध्ये सहभागी घेवून स्वतःचे व महिला व बाल विकास विभागाचे नाव उज्वल करावे. त्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून योग्य ती मदत व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही महिला व बाल विकास विभाग पुणे विभागीय उपायुक्त संजय माने यांनी दिली.
जिल्हा महिला व बाल विकास विभाग पुणे व जिल्हा महिला व बाल विकास विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रिडा संकुल श्री. संजय भोकरे इंजिनिअरिंग कॉलेज सांगली मिरज रोड सांगली येथे दिनांक १४ ते १६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये विभागीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा सांगता समारंभ व स्पर्धांचे बक्षीस समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी विजयमाला खरात, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार, जिल्हा परिविक्षा अधिकारी सुरेंद्र बेंद्रे, चंद्रशेखर तेली, विनोद चौगुले, अतिश शिंदे, विधिसल्लागार दिपिका बोराडे, जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगुले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बाबासाहेब नागरगोजे आदि उपस्थित होते.
शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत विभागीय चाचा नेहरु बाल महोत्सव २०२२-२३ या कार्यक्रमाचे पुणे विभागातील ५ जिल्ह्यातील अनाथ निराधार निराश्रीत उन्मागी दुर्लक्षित बालकांच्या कलागुणांना व सुप्तगुणांना वाव देण्यासाठी विभागीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बाल महोत्सवामध्ये बालकांसाठी वैयक्तिक व सांघीक स्पर्धाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय बाल महोत्सवामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यातील ५०० बालकांनी सहभाग घेवून वैयक्तिक व सांघीक स्पर्धा/सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद व्दिगुणीत करुन आस्वाद घेतला. या महोत्सवामध्ये जनरल चॅम्पीयन शिप मुली पुणे जिल्ह्याला तर जनरल चॅम्पीयन शिप मुले ही सांगली जिल्ह्याला मिळाली.
यावेळी बाल महोत्सवातील सहभागी प्रवेशितांना ज्या ज्या खेळामध्ये प्राविण्य मिळविले आहे त्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देवून त्यांचे कौतुक केले.
000000
रोजगार मेळावा 22 फेब्रुवारीला - सहायक आयुकत ज.बा. करीम
सांगली दि. 17 (जि.मा.का.) : खाजगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठ्या कारखान्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी व बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीकोनातून प्लेसमेंट ड्राईव्हचे व रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 22 फेब्रवारी 2023 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली येथे करण्यात आले आहे. यासाठी उमेदवारांनी www.mahaswayam.gpv.in या वेबसाईटवर नोंदणी करावी व मुलाखतीसाठी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुकत ज.बा. करीम यांनी केले आहे.
प्लेसमेंट ड्राईव्ह / रोजगार मेळाव्यामध्ये सहा कंपन्याची / उद्योजकांची एकूण २१३ पदे भरण्यात येणार असून यामध्ये सांगली जिल्ह्यातील हिंदुस्थान नायलॉन लि. सांगली, कामधेनू ॲग्रोव्हेट, कसबे डिग्रज, मुथुट मायक्रोफिन लिमीटेड, सांगली, नेहा इंजिटेक सोल्युशन प्रा लि., सांगली, श्री.चिंतामणी मोटार्स प्रा.लि. सांगली, स्पॉटलाईट कन्सलटंट, पुणे इ. विविध नामवंत कंपन्यानी / सहभाग नोंदविलेला आहे. यामध्ये विविध प्रकारची पदभरती करण्यात येणार आहेत.
मुथुट मायक्रोफिन लिमीटेड, सांगली यांच्याकडील फिल्ड ऑफिसर-20, क्रेडिट ऑफिसर-15, व ब्रॅच मॅनेजर-10 या पदासाठी शैक्षणिक पात्रता इ. 12 वी पास, बी.कॉम व कोणत्याही शाखेचा पदवीधर अशी आहे. नेहा इंजिटेक सोल्युशन प्रा.लि, सांगली यांच्याकडील मेकॅनिकल इंजिनिअर-4, फिटर-2, वेल्डर-5, व हेल्पर-10 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिकपात्रता BE-Mech/ DME, ITI- Fitter, Welder व इ.१० वी व १२ वी पास अशी आहे. तसेच कामधेनू ॲग्रोव्हेट, कसबे डिग्रज यांच्याकडील सेल्स कोऑर्डीनेटर-1, सेल्स ऑफिसर-12, ड्रायव्हर-3, प्लॉट सुपरवायझर-1, न्यूट्रीशन मॅनेंजर-2 इत्यादी जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणीक पात्रता बीकॉम/एमकॉक, टॅली, बीएससी/एमएससी-ॲग्री, एमबीए, कोणत्याही शाखेचा पदवीधर, 10 वी व Driver पास अशी आहे.
हिंदुस्थान नॉयलॉन सांगली यांच्याकडील Marketing Executive-5, Turner-10, CNC/VMC Operator-15, Machinist-12, Fitter-10, Helper-10, Machine Operator-10 अशी पदे भरण्यात येणार असुन यासाठी इ.10 वी 12 वी कोणत्याही शाखेची पदवी तसेच ITI-Fitter, Machinist, CNC/VMC, Turner पास अशी आहे. चिंतामणी मोटार्स, सांगली यांच्याकडील Purchase Executiv-2, HR Asst.Manager-1, Machine Operator-2, CO2 Welder-2 एकूण- 7 पदे भरणार असुन सदर पदासाठी इ.12 वी पास, Diploma-DME/Degree-Mech/Automobile, MBA पदासाठी इ.१० वी व १२ वी पास अशी आहे. तसेच SpotLight Cunsultant, Pune यांच्याकडील Field Executive/CNC Machine/Relationship Manager- 50 पदे भरणार असुन सदर पदासाठी कमीत कमी इ.12 वी पास असणे आवश्यक आहे.
000000
अटल भूजल पंधवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन
सांगली दि. 17 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात 13 ते 27 फेब्रुवारी 2023 दरम्यान वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सांगली कार्यालयामार्फत भूजल पंधवडा राबविण्यात येत आहे. केंद्रशासन व जागतिक बँक सहाय्यीत अटल भूजल योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या 5 तालुक्यातील 95 गावांत अटल योजनेचा चित्ररथ शालेय विद्यार्थांच्या स्पर्धा, महिलांच्या स्पर्धा, वृक्षारोपण, शेतकरी मेळावे, सरपंच परीषद अशा विविध उपक्रमांचे आयोजन भूजल पंधवडामध्ये करण्यात आले आहे. अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी दिली.
भूजल पंधवड्यात लोकसहभागातून भूजलाचे महत्व, पाण्याचे व्यवस्थापन याबद्दल जनजागृती करण्यात येत असून लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. तसेच भूजल संबंधी विविध घटकांची प्रात्यक्षीके तसेच उपक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. या योजनेचा कालावधी 2020-21 ते 2024-25 असा आहे.
पुरवठा (जलसंधारणाची कामे) व मागणी (पाणी बचतीच्या उपाययोजना) व्यवस्थापनाच्या सूत्राचा अवलंब करून भूजल साठ्यात शाश्वतता आणणे, सद्य:स्थितीत कार्यान्वित असलेल्या केंद्र व राज्य पुरस्कृत योजना म.न.रे.गा., प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन इत्यादीच्या माध्यमातून होत असलेल्या गुंतवणुकीमध्ये अभिसरण साध्य करणे, भूजलाच्या शाश्वत विकासाकरीता राज्य, जिल्हा व ग्राम पातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे, सूक्ष्म सिंचन पध्दतीचा अधिकाधिक अवलंब करून उपलब्ध भूजलाचा वापर मर्यादित करणे, सिंचन व्यवस्थापनामध्ये सुधारणा आणणे ही अटल योजनेची मुख्य उद्यिष्टे आहेत.
विविध उपक्रम राबवून अटल भूजल योजनेबाबत योजनेत समाविष्ठ गावात जनजागृती करण्यात येणार आहे. गावातील विविध पातळीवर ग्रामस्थ, महिला, सामाजिक संस्था यांच्या बैठका घेवून भूजलाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. जल सुरक्षा आरखड्याच्या माध्यमातून भूजलची घसरण थांबविणे व भूजल पातळीत वाढ करणे या करीता उपायायोजनाची माहिती विविध उपक्रमातून गावस्तरावर देण्यात येणार आहे. यामध्ये भूजल पुनर्भरण उपाययोजनेंतर्गत सिमेंट नाला बांध, माती नाला बांध व दगडी बांध, विहीर पुनर्भरण, रिचार्ज ट्रेंच व रिचार्ज शाफ्ट, इ. कामे करून भूजल पातळीत वाढ करणे, अस्तीत्वातील कामांचे पुनर्रुजीवन अंतर्गत सिमेंट नाला बांध व तत्सम कामे-हायब्रीड गॅबीयन बंधारे व अस्तीत्वातील जलसंधारणाच्या कामांची दुरूस्ती तसेच भूजल पुनर्भरण, जलसंधारण कामाच्या साठवण क्षेत्रातील गाळ काढणे अशी पुनर्रुजीवन कामे करून भूजल पातळीत वाढ करणे, मागणी व्यवस्थापन व पाणी बचतीच्या उपाययोजनेंतर्गत सुक्ष्म सिंचनाचा अधिकाधिक वापर, मातीतील आद्रता टिकवून ठेवणाऱ्या प्रणालीचा वापर, पाणी उपलब्धतेनुसार पिकसंरचना इत्यादीसाठी चालना देण्यात येणार असून कृषि विभागाव्दारे प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व इतर सुरु असलेल्या योजनांमधून एककेंद्राभिमुखतेव्दारे अंमलबजावणी करून पाण्याची बचत व कार्यक्षम पाणी वापरात वाढ करण्याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी सांगितले.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)