शुक्रवार, ३० जून, २०२३
आपत्ती व्यवस्थापनामध्ये गांभिर्याने काम करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
कामात कुचराई झाल्यास वैयक्तीक जबाबदारी निश्चित होणार
सांगली दि. 30 (जि.मा.का.) :- आपत्ती व्यवस्थापनांतर्गत दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. यामध्ये कोणतीही दिरंगाई झाल्यास वैयक्तीक जबाबदारी निश्चित करण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापनामध्ये यंत्रणांनी गांभिर्याने व समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून तयारी बैठक संपन्न झाली. यावेळी महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, कडेगाव उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, जत प्रभारी उपविभागीय अधिकारी जीवन बनसोडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, धोकादायक शासकीय इमारती, शाळा, तात्पुरती निवारा व्यवस्था यांचे स्ट्रक्चरल ऑडिट तात्काळ करून घ्यावे. जिल्हा परिषदेकडून २३ बोटींची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसह पाठवावा. रेस्क्यूची आवश्यकता भासल्यास स्थानिक लोकांची मदत मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, पोहणारे, स्थानिक मंडळे, संस्था यांची बैठक घ्यावी. चारा उपलब्धतेसाठी मागणी व पुर्ततेचे नियोजन कळवावे. जलजीवन मिशनची खुदाईची कामे मान्सून मध्ये बंद ठेवावीत. कामासाठी खुदाई केलेले रस्ते सुस्थितीत करावेत. एमएसईबीने विद्युत पुरवठा खंडित झाल्यास पुरेशा व्यवस्थेसाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. शासकीय यंत्रणांनी अभिलेखे भिजून नुकसान होवू नये यासाठी सुव्यवस्थित ठेवावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील म्हणाले, संभाव्य महापूरासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. सर्वांनी समन्वयाने संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज राहू. कृषी विभागाने 2019 ची पाणीपातळी ग्राह्य धरून पंचनाम्यांसाठी पथके तयार करावीत. त्यांना आवश्यक ट्रेनिंग द्यावे. चारा तजवीज ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिगेट लावण्यासाठी तयारी ठेवावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच एनडीआरएफची टीम 15 जुलै पासून जिल्ह्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीत 7 जुलै रोजी कर्नाटकेचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्यात आंतरराज्य बैठक होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली.
०००००
बुधवार, २८ जून, २०२३
स्वाधार योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी 14 जुलै पर्यंत मुदतवाढ
सांगली दि. 28 (जि.मा.का.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्याचे सन 2022-23 मधील अर्ज दि. 31 मार्च 2023 पर्यंत स्विकारण्यात आले होते. तथापि, या योजनेच्या लाभापासून गरजु विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी या योजनेंतर्गत सन 2022-23 मधील विद्यार्थ्यांचे अर्ज स्विकारण्याची मुदत दि. 14 जुलै 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण सांगली कार्यालयाकडे अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी विद्यार्थी सध्या शिकत असलेल्या संबधीत महाविद्यालयाचे प्राचार्य/मुख्याध्यापक,
अधिक्षीका मुलींचे शासकिय वसतिगृह, विश्रामबाग सांगली दूरध्वनी क्र. 0233-2304367, अधिक्षक मुलांचे शासकिय वसतिगृह विश्रामबाग सांगली दुरध्वनी क्र. 0233-2301414, सहायक आयुक्त समाज कल्याण सांगली दूरध्वनी क्र. 0233-2374739 येथे संपर्क साधावा.
00000
शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम जाहीर
सांगली दि. 28 (जि.मा.का.) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत माहे जुलै 2023 या महिन्यातील शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजाचा तालुकानिहाय आयोजित शिबीर दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला असून तो पुढीलप्रमाणे आहे.
इस्लामपूर 3 व 17 जुलै, विटा 4 व 25 जुलै, कडेगाव 11 व 31 जुलै, पलूस 6 व 28 जुलै, आष्टा 10 व 24 जुलै, आटपाडी 18 जुलै, जत 5 व 19 जुलै, शिराळा 13 व 17 जुलै, तासगाव 12 व 26 जुलै, कवठेमहांकाळ 20 जुलै.
00000
‘राष्ट्रकुल’सह जागतिक नेमबाजी स्पर्धेतील पदक विजेते खेळाडूंसह त्यांच्या मार्गदर्शकांना पारितोषिकाची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू
सांगली दि. 28 (जि.मा.का.) : राष्ट्रकुल स्पर्धा २०२२, जागतिक नेमबाजी स्पर्धा २०२२ मधील पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना मंजूर रोख पारितोषिकाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, असे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने सहसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक व्हावे, राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीयस्तरावर दर्जेदार कामगिरी करून पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभूत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून क्रीडा धोरण तयार करण्यात आले आहे.
या धोरणांतर्गत आंतरराष्ट्रीयस्तरावर उल्लेखनीय कामगिरी तसेच राज्याचे नाव उज्ज्वल करून पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना रोख बक्षीस देवून गौरविण्याची योजना संचालनालयस्तरावर कार्यान्वित आहे. त्यानुसार २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत बर्मिंगहॅम (इंग्लंड) येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक प्राप्त सात खेळाडू व त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांसह कैरो (इजिप्त) येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धा २०२२ मधील पदक प्राप्त चार खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना द्यावयाच्या रोख रकमेत मुख्यमंत्र्यांनी वाढ करून पदक प्राप्त खेळाडूंना रोख रक्कम जाहीर केली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मधील पदक प्राप्त खेळाडूंना जाहीर रकमेचा तपशील असा (अनुक्रमे खेळाडू व मार्गदर्शक या क्रमाने) : सुवर्ण पदक- ५० लाख रुपये, १२ लाख ५० हजार रुपये. रौप्य पदक – ३० लाख रुपये, ७ लाख ३० हजार रुपये. जागतिक नेमबाजी स्पर्धा २०२२ मधील पदक प्राप्त खेळाडूंना जाहीर रकमेचा तपशील असा (अनुक्रमे खेळाडू व मार्गदर्शक या क्रमाने) : सुवर्ण पदक – दीड कोटी रुपये, सात लाख ५० हजार रुपये, सांघिक - ५० लाख रुपये, सात लाख ५० हजार रुपये. रौप्य पदक (सांघिक) - ३० लाख रुपये, पाच लाख रुपये. कांस्य पदक (सांघिक) : २० लाख रुपये, २ लाख ५० हजार रुपये. पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली रोख पारितोषिकाची रक्कम सर्व संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यास क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी मान्यता दिली असून मंजूर रोख पारितोषिकाची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही संचालनालयस्तरावर प्राधान्याने सुरू आहे, असेही सहसंचालक श्री. कांबळे यांनी म्हटले आहे.
०००००
"महिला आयोग आपल्या दारी' 7 जुलैला सांगली जिल्ह्यात महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्या - रुपाली चाकणकर यांचे आवाहन
सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी शुक्रवार दि. 7 जुलै 2023 रोजी सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात सकाळी 11 वाजता होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि आयोगाच्या सदस्या या स्वतः तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. सांगली जिल्ह्यात होणाऱ्या या जनसुनावणीत अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर दि. 7 जुलै रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर महिला व बालकांच्या विषयांच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्याची आढावा बैठक होईल. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच कामगार आयुक्त, आरोग्य, परिवहन, शिक्षण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित असतील. वरील सर्व कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे होणार आहेत. जिल्हा दौरा दरम्यान वन स्टॉप सेंटर तसेच महिला वसतीगृहास ही आयोगाच्या अध्यक्षा व सदस्या भेट देणार आहेत.
महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हा स्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग करत आहे.
00000
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 6 जुलै
सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला सामाजिक कार्यकर्त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्कारासाठी सन 2020-21, 2021-22, 2022-23 व सन 2023-24 या वर्षासाठी इच्छुक व्यक्ती, संस्थाकडून दिनांक 6 जुलै 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व्यक्ती, संस्थांनी विहित नमुन्यातील अर्जासाठी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नविन प्रशासकीय इमारत विजयनगर, मिरज रोड सांगली येथे संपर्क साधून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव चार प्रतित विहीत वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी केले आहे.
या पुरस्कारांचे स्वरुप व अर्हता पुढीलप्रमाणे आहे. राज्यस्तरीय महिलांकरीता वैयक्तीक पुरस्कार (राज्यस्तरीय पुरस्कार ) - रोख रक्कम 1 लाख 1 रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ. महिला व बाल कल्याण क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रिबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्या महिला तो पुरस्कार मिळाल्याच्या 5 वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारास पात्र राहणार नाहीत.
विभागीय स्तरावरील स्वयंसेवी संस्थांना पुरस्कार - रोख रक्कम 25 हजार 1 रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ. महिला व बाल कल्याण क्षेत्रात किमान 7 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. नोंदणीकृत संस्थेस दलित मित्र पुरस्कार प्राप्त नसावा, संस्था राजकारणांपासून अलिप्त असावी. तसेच तिचे कार्य व सेवाही पक्षातीत व राजकारणापासून अलिप्त असावी.
जिल्हास्तरीय पुरस्कार - रोख रक्कम 10 हजार 1 रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ. महिला व बाल कल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रिबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्या महिलांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही.
अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक व्यक्ती /संस्थांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रेही सादर करणे आवश्यक आहे. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी उपविभागीय अधिकारी यांचे विना दुराचार प्रमाणपत्र, गैरवर्तनासंबंधी खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे पोलिस विभागाचे प्रमाणपत्र, सार्वजनीक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र, प्रस्ताव धारकाची माहिती व केलेल्या कार्याचा अहवाल, वृत्तपत्र फोटोग्राफ्स इ., सद्या कोणत्या पदावर कार्यरत आहे, यापूर्वी पुरस्कार मिळाले काय? असल्यास तपशिल. विभागीयस्तर पुरस्कारासाठी संस्थेची माहिती व कार्याचा अहवाल, उपविभागीय अधिकारी यांचे विना दुराचार प्रमाणपत्र, गैरवर्तनासंबंधी खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे पोलिस विभागाचे प्रमाणपत्र, सार्वजनीक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र, वृत्तपत्र फोटोग्राफ्स इ., संस्थेस यापूर्वी पुरस्कार मिळाले आहे काय? असल्यास तपशिल, संस्था नोंदणी प्रमाणपत्र व घटनेची प्रत.
00000
नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरु
सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय, पलूस येथे इयत्ता 6 वी मध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता 80 जागा भरण्यात येणार आहेत. प्रवेश परीक्षा शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11.30 ते 1.30 या वेळेत घेतली जाणार आहे. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा दिनांक 20 जून 2023 ते 10 ऑगस्ट 2023 असा आहे. पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज मुदतीमध्ये भरावेत, असे आवाहन प्राचार्य सुनिलकुमार नल्लाथ यांनी केले आहे.
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी संकेत स्थळ www.navodaya.gov.in किंवा https://navodaya.gov.in वर संपर्क साधावा. पात्र उमेदवार हा संबंधित जिल्ह्यातील असावा. ऑनलाईन अर्ज करताना ते इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडून योग्य रित्या भरलेले प्रमाणपत्र ज्यावर स्वतःचे अलीकडील काळात काढलेले छायाचित्र (Photo), विद्यार्थ्यांची स्वाक्षरी, पालकांची स्वाक्षरी आणि मुख्याध्यापकाकडून प्रतिहस्ताक्षरित केलेले प्रमाणपत्र (jpg स्वरुपात 10kb-100kb प्रमाणात ) ऑनलाईन अपलोड करावयाचे आहे. विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2012 ते 31 जुलै 2014 दरम्यान झालेला असावा, असे प्राचार्य सुनिलकुमार नल्लाथ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)