शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सिटी हायस्कूला दिली भेट
कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी शिक्षण संस्थांनी योगदान द्यावे
सांगली दि. 30 (जि.मा.का.) : राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी आज सांगली शिक्षण संस्थेच्या सांगली येथील सिटी हायस्कूला भेट देऊन संस्थाचालक यांच्याशी संवाद साधला व कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी शिक्षण संस्थांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी, संचालक नितीन खाडीलकर, हरी भिडे, विजय देवधर, केदार खाडिलकर, विपीन कुलकर्णी आदि उपस्थित होते.
सिटी हायस्कूलमध्ये संस्था चालक यांच्याशी संवाद साधताना शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणाले, न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे आपल्याला व्होकेशनल ट्रेनिंगवर भर द्यावा लागेल. शिक्षण संस्थांनी काही कोर्सेस डिझाईन केले पाहिजेत की, जेणकरून भावी पिढी बेरोजगार राहणार नाही. कौशल्यावर आधारित शिक्षण पध्दती निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्था फार मोठे योगदान देवू शकतात. यासाठी शिक्षण संस्थांना एका वेगळ्या दिशेने वाटचाल करावी लागेल.आणि हीच वाटचाल शिक्षण संस्थानाही सक्षम बनवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
00000
मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३
मतदान केंद्राची प्रारुप यादी प्रसिध्द : सूचना 3 ऑक्टोबरपर्यंत नोंदवाव्यात - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली, दि. 25 (जि.मा.का.): मतदान केंद्राची प्रारुप यादी व अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्रांची यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर जाहीररीत्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत सूचना व हरकती असल्यास त्यांनी 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत नोंदवाव्यात, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कळविले आहे.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (अर्हता दिनांक 01 जानेवारी, 2024 वर आधारीत) अंतर्गत मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या एकूण 2415 यादी भागांमध्ये राबविण्यात येत असून सदर कार्यक्रमाचे अनुषंगाने पूर्व पुनरिक्षण उपक्रमाचा एक भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार दि. 21 जुलै 2023 ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व पुर्नरचना देखील करण्यात येत आहे.
सांगली जिल्ह्यातील एकूण 8 विधानसभा मतदार संघामध्ये मिळून एकत्रितरित्या मतदान केंद्राच्या नावातील बदलाचे एकूण 116, मतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे एकूण 59, Merge करण्यात आलेले 35 मतदान केंद्र व भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार एका मतदान केंद्रावरील 1500 मतदारापेक्षा अधीक क्षमता होणाऱ्या मतदान केंद्राच्या बाबतीत नव्याने प्रस्तावीत होणारे एकूण 06 मतदान केंद्राची संख्या आहे. असे एकूण 2421 मतदान केंद्राच्या सूसुत्रीकरणाचे व पुर्नरचनेचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. सदर प्रस्तावीत बदल हे सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयाकडून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयास मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत मा. भारत निवडणूक आयोग यांचेकडे मंजूरीसाठी पाठविण्याकरीता प्राप्त झालेले आहेत. सदर बदल व अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्राची यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सांगली यांच्या कार्यालयाच्या नोटीसबोर्डवर जाहीररित्या प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या बाबत कोणासही कोणत्याही सूचना द्यावयाची असल्यास 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत वा त्यापूर्वी द्याव्यात.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि. 17 ऑक्टोबर 2023 रोजी एकत्रितरित्या प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. वरील नमूद बदलाचे प्रस्ताव मा. भारत निवडणूक आयोगाकडून मंजूर झाल्यास सदर एकत्रितरित्या प्रसिध्द होणाऱ्या प्रारूप मतदार यादीमध्ये सदरचे बदल अंमलात येतील व त्या आधारे मतदान केंद्राचे सुसूत्रिकरण व पुर्नरचना देखील अस्तित्वात येईल. सदरची जाहीर नोटीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे नोटीस बोर्डावर जाहिर प्रसिध्दी करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कळविले आहे.
००००
गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३
नागरिकांना सुरक्षित व सकस अन्नपदार्थ उपलब्ध होण्यासाठी तपासणी व खाद्यनमुने घेण्याची विशेष मोहीम
- सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे
मिठाई उत्पादकांना कायद्याचे पालन करण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन
सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : प्रत्येक नागरिकांस सुरक्षित व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी यांनी तपासणी व खाद्यनमुने घेण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम दिवाळीपर्यंत चालू राहणार आहे. मिठाई उत्पादकांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी केले आहे.
अन्न व्यावसायिकांनी व्यवसाय करताना मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात वापरण्यायोग्य (use by date) दिनांक टाकावा. कच्चे अन्नपदार्थ व खवा हे परवानाधारक / नोंदणीधारक अन्न व्यवसायिकांकडून खरेदी करावे जेणेकरुन त्यांची खरेदी बिले राहतीत तसेच प्रत्येक अन्न व्यवसायिकाने त्यांच्या विक्री बिलावर अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत प्राप्त परवाना/नोंदणी क्रमांक नमुद करणे अनिवार्य आहे. पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा. अन्नपदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवणुक करावेत. कामगारांची त्वचा व संसर्गजन्य रोगापासून मुक्तबाबतची वैद्यकिय तपासणी करावी. मिठाई तयार करताना केवळ फुडग्रेड खाद्यरंगाचा १००PPM च्या आतच वापर करावा. बंगाली मिठाई ही ८-१० तासांच्या आत खाण्याबाबत पॅकेजिंग मटेरियलवर निर्देश देण्यात यावेत. स्पेशन बर्फीचा वापर मिठाई बनविण्यासाठी करू नये. माशांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जाळीदार झाकणे, बंदिस्त शोकेस असावे. फरसाण तयार करताना वापरण्यात येणारे खाद्यतेल हे २-३ वेळाच वापरण्यात यावे त्यानंतर ते RUCO अंतर्गत बायोडिझेल कंपन्यांना देण्यात यावे, अशा सूचना अन्न व्यवसायिकांना अन्न व औषध प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
सणासुदीच्या काळात नागरिकांनी मिठाई, दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थ खरेदी करताना फक्त नोंदणी/परवानाधारक आस्थापनांकडून खरेदी करावी. मिठाई दुध दुग्धजन्यपदार्थ व आवश्यकतेनुसार खरेदी करावे. खरेदी करताना use by date पाहुनच खरेदी करावी. उघड्यावरील तसेच फेरीवाल्याकडून मिठाई, खावा (मावा) खरेदी करू नये, माव्यापासून बनविलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो २४ तासाच्या आत करावे तसेच त्यांची साठवणूक योग्य तापमानात (फ्रिजमध्ये) करावी. बंगाली मिठाई 8-10 तासाच्या आत सेवन करावी. मिठाईवर बुरशी आढळल्यास त्यांचे सेवन करू नये, खराब / चवीत फरक जाणवला तर ती मिठाई नष्ट करावी, असे आवाहनही श्री. मसारे यांनी केले आहे.
प्रत्येक नागरिकांस सुरक्षित व निर्भेळ अन्न उपलब्ध होण्यासाठी तसेच त्यामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे. व्यावसायिक व ग्राहकांनी अधिक माहितीसाठी प्रशासनाच्या टोल फ्री क्रं. 1800222365 किंवा कार्यालयातील दुरध्वनी क्रमांक 0233-2602202 अथवा fdasangli@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. अन्न पदार्थांबाबत काही तक्रार असल्यास नागरिक प्रशासनाच्या FoScos प्रणालीवरही ऑनलाईन तक्रार करू शकतात, असे आवाहन श्री. मसारे यांनी केले आहे.
00000
जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी
सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : विविध आंदोलने, आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 24 सप्टेंबर 2023 ते 8 ऑक्टोबर 2023 अखेर पर्यंत खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.
या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.
हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 24 सप्टेंबर 2023 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 8 ऑक्टोबर 2023 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत.
00000
'आयुष्मान भव' मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली, दि. 21 (जि.मा.का.) :- 'आयुष्मान भव' मोहिमेची व्यापक जनजागृती करून ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
'आयुष्मान भव' मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, नेत्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. शरद शेगावकर, जिल्हा समन्वयक अविनाश शिंदे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, आयुष्मान कार्ड काढण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करावे. हे कार्ड काढण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी वरिष्ठ स्तरावर कळवून त्याचे निराकरण करून घ्यावे. यासाठी एक संनियंत्रण समिती गठीत करावी. 'आयुष्मान भव' या मोहिमेंतर्गत घेण्यात येणाऱ्या आरोग्य मेळाव्यात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. यामध्ये आवश्यक मनुष्यबळ, औषध पुरवठा, तज्ज्ञ डॉक्टर याचा समावेश असावा.
00000
हेल्पलाईन क्रमांकावरून अवयवदानाची माहिती घेण्याचे आवाहन
सांगली, दि. 21 (जि.मा.का.) :- अवयवदानाबाबत जनजागृती व्हावी, याबाबत जनतेला माहिती मिळावी व अवयवदानासाठी नागरिकांनी पुढे यावे यासाठी आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात हेल्पलाईन सुविधा सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून अवयवदानाबाबत माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, नेत्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. शरद शेगावकर, जिल्हा समन्वयक अविनाश शिंदे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
रक्तदान, नेत्रदान, त्वचादान, देहदान, अवयवदान या संदर्भात माहिती हवी असल्यास जिल्ह्यातील नागरिकांनी, युवक, युवतींनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करुन माहिती घ्यावी. अवयवदानासाठी (१) पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली संपर्क क्रं. ०२३३ - २३७४६५१ ते ५४ मो. ८८३०९८६०६३, ८००७२५९११९ (२) शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज संपर्क क्रं. ०२३३-२२३२०९०/९१ ते ९९, मो. ८८३०९८६०६३, ८००७२५९११९, (३) भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, सांगली संपर्क क्रं. ०२३३-२६०१५९२ / ९३ / ९४, (४) सेवासदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज संपर्क क्र. ०२३३-२२१२७२८ / २९, मो. ८६९८२१२७२८ या रूग्णालयांच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
नेत्रदानासाठी (१) पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली मो.क्र. ८००७२५९११९, ८८३०९८६०६३, (२) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज ०२३३-२२३२०९१ ते ९९, (३) दृष्टीदान आय बँक, सांगली ०२३३-२३०१९३९-४०-४१ / ९६२३२३१९१९, (४) पारसमल कोचेटा आय बँक, मिरज ०२३३-२६४४४९९ / ८००७८४५४५४, (५) श्रीमती ताराबाई परांजपे आय बँक, सांगली ०२३३-२३२२५०६ / ९४२१२२२२५९, (६) भारती हॉस्पिटल आय बँक, सांगली ०२३३- २६०१५९२ / ९३ / ९६६५१५५७००, (७) नंदादीप आय बँक, सांगली. ०२३३-२६२१७२७ / ७५८८०८५९९९, (८) श्री टेके आय क्लिनिक, सांगली ०२३३-२३७६३३० / ९८९०४६४३४०/७७९८१५२००१, (९) डॉ. अनिल कुलकर्णी आय. हॉस्पिटल, मिरज ९१४२२११६६६, या रूग्णालयांच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी अवयवदान समन्वयक अविनाश शिंदे यांच्या ८८३०९८६०६३, ८००७९५९११९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
000000
आटपाडी येथे 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर कालावधीत दुग्ध व्यवसाय शेळीपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण
सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम. सी. ई. डी.) सांगली यांच्यावतीने पंचायत समिती, आटपाडी येथे दुग्ध व्यवसाय व शेळीपालन कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण ऑनलाइन / ऑफलाइन पद्धतीने दिनांक 27 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोंबर 2023 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सुशिक्षित बेरोजगार शेतकरी कुटुंबातील व्यक्ती यांच्यासाठी आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय शेळीपालन कुक्कुटपालन कशा पद्धतीने करावे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणामध्ये दुधाळ व्यवसायाचे आर्थिक तंत्र, जनावराच्या जाती, शेळीच्या विविध जाती व योग्य जातीची निवड तसेच कुक्कुटपालन मध्ये पक्षाच्या विविध जाती, योग्य जातीची निवड, जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन, गोठा बांधणी, आझोला चारा, हायड्रोपोनिक चारा व हिरव्या चाऱ्याच्या विविध जाती, शेळी पालनमध्ये शेळीपालनाचे व्यवस्थापन, करडाची निगा, गोठा बांधणी, जनावरांचे आजार, उपचार, लसीकरण, चाऱ्याचे नियोजन तसेच व्यवसायाचे व्यवस्थापन, बाजारपेठ व्यवस्थापन, पशुखाद्य निर्मिती, गांडूळ खत निर्मिती तसेच शासनाच्या विविध कर्ज व अनुदान विषयक योजनांची माहिती प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी कार्यक्रम आयोजक दत्तात्रेय पुकळे (मो. नं. 9689927976) एम. सी. ई .डी. द्वारा पंचायत समिती आटपाडी येथे संपर्क साधावा व तालुक्यातील शेतकरी व बेरोजगार युवकांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय अधिकारी सुदाम थोटे व प्रकल्प अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर यांनी केले आहे.
000000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)