बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३
जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज 31 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन
सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित उमेदवारास अर्ज करतेवेळी जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सन 2023-24 या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेमध्ये व पदविका तृतीय वर्षात शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज शैक्षणिक संस्थेच्या शिफारसीसह दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत समिती कार्यालयाकडे सादर करावेत. शैक्षणिक संस्थांनाही विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करून समितीकडे मुदतीत अर्ज सादर करण्याच्या सूचना निर्गमित कराव्यात, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी जयंत चाचरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
अर्जदारांनी bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा. महाविद्यालयीन शिफारसपत्र, 15A फॉर्मवर प्राचार्यांची सही, शिक्का व चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीविषयक सर्व पुरावे व विहित नमुन्यातील शपथपत्रासह सर्व मूळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी कागदपत्रांच्या / पुराव्यांच्या साक्षांकित प्रतींसह समितीकडे सादर करावी. अर्ज सादर करतेवेळी अर्जदार / पालक यांनी समक्ष मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे.
00000
जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी पात्र उमेदवारांना नावनोंदणी करण्याचे आवाहन
सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षानी होत असते. ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील सर्व 23 वर्षांखालील तरुणाकरिता त्याच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा, ही ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. यापुढील जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 मध्ये फ्रान्स (ल्योन) येथे आयोजित होणार आहे. तरी या स्पर्धेकरिता इच्छुक पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in / या लिंकवर भेट देवून नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.
यापूर्वी 46 जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये 62 सेक्टरमधून 50 देशातील एक हजार उमेदवार सहभागी झालेले असून ही स्पर्धा 15 देशात 12 आठवड्यांसाठी आयोजित करण्यात आलेली होती. सन 2024 मध्ये आयोजित जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 52 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, Sector Skill Council, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करुन निवड केलेल्या उमेदवारांची नावे जागतिक स्पर्धेच्या नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत.
जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2002 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच Additive Manufacturing, Cloud Computing, Cyber Security, Digital Construction, Industrial Design Technology, Industry ४.०, Information Network Cabling, Mechatronics, Robot System Integration & Water Technology या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 1999 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य असल्याचे श्री. करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
एमपीएससी स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर
सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2024 मध्ये नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उप सचिव दे. वि. तावडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक अनुक्रमे परीक्षा, संवर्ग, परीक्षेचे स्वरूप, जाहिरात, पूर्व परीक्षा दिनांक व मुख्य परीक्षा दिनांक व कंसात निकालाचा अंदाजित महिना पुढीलप्रमाणे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा-2024 - दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा-2024, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, जानेवारी 2024, पूर्व परीक्षा 17 मार्च 2024 (मे 2024). दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-2024, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 27 जुलै 2024 (ऑक्टोबर 2024).
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा-2024 - महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी 1/मुद्रांक निरीक्षक, कर सहायक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उद्योग निरीक्षक, लिपिक-टंकलेखक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय, सहायक मोटार वाहन निरीक्षक, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, फेब्रुवारी 2024, पूर्व परीक्षा 16 जून 2024 (ऑगस्ट 2024). महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-2024 - सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी 1/मुद्रांक निरीक्षक, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्य परीक्षा 29 सप्टेंबर 2024 (जानेवारी 2025). सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-2024, सहायक मोटार वाहन निरीक्षक गट-क, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्य परीक्षा 26 ऑक्टोबर 2024 (जानेवारी 2025). महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-2024 - कर सहायक, दुय्यक निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उद्योग निरीक्षक, लिपीक-टंकलेखक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्या परीक्षा 17 नोव्हेंबर 2024 (फेब्रुवारी 2025).
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा-2024 - महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा-2024, राज्य सेवा-33 संवर्ग, यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, कृषि सेवा, सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, वनसेवा, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, जानेवारी 2024, पूर्व परीक्षा 28 एप्रिल 2024 (जुलै 2024).
अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा-2024 - सहायक आयुक्त अनन तथा पदनिर्देशन अधिकारी व अन्न सुरक्षा अधिकारी गट-ब - पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 9 नोव्हेंबर 2024 सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025).
महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2024, सहायक अभियंता विद्युत व यांत्रिकी गट-ब श्रेणी-2, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 10 नोव्हेंबर 2024, सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025).
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-2024, कृषि अधिकारी गट अ, कृषि अधिकारी गट ब, कृषि अधिकारी गट ब कनिष्ठ, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 10 नोव्हेंबर 2024 सकाळ पेपर क्रमांक १, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025).
महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2024, सहायक अभियंता यांत्रिकी गट-ब श्रेणी-2, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 23 नोव्हेंबर 2024 सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025).
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2024, सहायक अभियंता विद्युत गट-ब श्रेणी-2, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 23 नोव्हेंबर 2024 सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025).
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2024, सहायक कार्यकारी अभियंता गट-अ (स्थापत्य), सहायक अभियंता गट-अ (स्थापत्य), सहायक अभियंता गट-ब (स्थापत्य) श्रेणी-2, उप विभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट-अ, जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट-ब, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 23 नोव्हेंबर 2024, सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (फेब्रुवारी 2025).
निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा-2024, निरीक्षक वैधमापन शास्त्र गट-ब, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 1 डिसेंबर 2024, सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025).
राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024, एकूण 33 संवर्ग, पारंपरिक/वर्णनात्मक तसेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्य परीक्षा 14 डिसेंबर 2024, सकाळ भाषा पेपर-1 मराठी, दुपार भाषा पेपर-2, 15 डिसेंबर 2024, सकाळ सामान्य अध्ययन-2, दुपार सामान्य अध्ययन-1, 16 डिसेंबर 2024 - सकाळ सामान्य अध्ययन-4, दुपार सामान्य अध्ययन-3 (मार्च 2025).
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-2024, सहायक वनसंरक्षक गट-अ, वनक्षेत्रपाल गट-ब, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 28 डिसेंबर 2024, सकाळ कृषि अभियांत्रिकी/रासायनिक अभियांत्रिकी/स्थापत्य अभियांत्रिकी/यांत्रिकी अभियांत्रिकी, दुपार कृषि/पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान, 29 डिसेंबर 2024, सकाळ वनस्पति शास्त्र / प्राणिशास्त्र, दुपार रसायनशास्त्र (मार्च 2025). 30 डिसेंबर 2024 सकाळ गणित/सांख्यिकी, दुपार वनशास्त्र, 31 डिसेंबर 2024 सकाळ भूशास्त्र, दुपार भौतिकशास्त्र (मार्च 2025).
शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संबंधित परीक्षेची परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड पध्दत इत्यादी तपशिल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे / येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/अधिसूचनेव्दारे उपलब्ध करून देण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
सर्वच एचआयव्ही संसर्गित रूग्णांना मोफत ART औषधोपचार
सर्वच एचआयव्ही संसर्गित रूग्णांना मोफत ART औषधोपचार
- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम
जागतिक एड्स दिन व पंधरवड्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन
सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : यावर्षी जागतिक एड्स दिन दि. 1 डिसेंबर व पंधरवड्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये जिल्हा व तालुका स्तरावर प्रभातफेरींचे आयोजन करण्यात आले आहे. एचआयव्ही संसर्गित लोकांना उद्योगाच्या संधी मिळवून देण्यासाठी स्किल इंडिया उपक्रमातून प्रशिक्षण व पतपुरवठा करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. विविध अशासकीय संस्था व देणगीदार यांच्या मदतीने एचआयव्ही संसर्गित 18 वर्षे पेक्षा कमी वयोगटातील मुला मुलींना व HB कमी असलेल्या रूग्णांना पोषण आहार देणे व मुला मुलींच्यासाठी वधु वर परिचय मेळावा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर YRG Care संस्थेच्या मदतीने एचआयव्ही संसर्गित लोकांना मिळणाऱ्या शासकीय योजनांचे छोटे माहितीपुस्तक QR code सहीत तयार करून रूग्णांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली.
जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमिवर माहिती देताना डॉ. विक्रमसिंह कदम म्हणाले, सध्या सांगली जिल्ह्यामध्ये 17 ICTC, 1 Mobile ICTC व 1 PPP-ICTC च्या माध्यमातुन HIV समुपदेशन व चाचणी सेवा दिली जाते. तसेच HIV शोध मोहिमेसाठी 2 गुप्तरोग तपासणी केंद्रे व 18 रक्तपेढ्यांचे सहकार्य मिळते. जिल्ह्यातील 4 ART सेंटर व 11 लिंक ART सेंटरच्या माध्यमातून 10 हजार 705 HIV संसर्गित रूग्णांना मोफत ART औषधोपचार दिला जातो. ART औषधोपचारमुळे HIV विषाणूंची संख्या नियंत्रणात राहून होणाऱ्या संधीसाधु आजारांना अटकाव केला जातो, असे ते म्हणाले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम म्हणाले, Treat all Policy अंतर्गत सर्वच HIV संसर्गित रूग्णांना मोफत ART औषधोपचार सुरू करण्यात येत आहेत. तसेच ज्या रूग्णांच्या तपासणीमध्ये HIV संसर्ग असल्याचे आढळून आले आहे, परंतु अद्याप ते उपचारासाठी ART सेंटर पर्यंत गेले नाहीत अशा सर्वांना गृहभेटी घेऊन त्यांना ART औषधोपचाराचे महत्व पटवून दिले जात आहे व या सर्वांना ART औषधोपचारावरती घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. HIV संसर्गित रूग्णांकरिता वेगळी डायलेसीस मशीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या ठिकाणी कार्यान्वीत झाली आहे. आपल्या जिल्ह्यातील सर्व रूग्णांना पुरेल एवढा औषधसाठा आपणाकडे उपलब्ध असून जिल्ह्यातील सर्व HIV संसर्गित रूग्णांनी या औषधप्रणालीचा लाभ घेऊन आपले आयुष्य सुखकर करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कदम यांनी केले आहे.
00000
शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३
संविधान दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडून अभिवादन
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान मिरज येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार देश चालत आहे. आपण सर्वांनीही संविधानाचा आदर करून पुढे वाटचाल करूया, असे ते म्हणाले.
यावेळी मकरंद देशपांडे, महादेव कुरणे, गजेंद्र कुल्लोळी, मोहन वनखंडे, पांडुरंग कोरे व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
00000
संविधान दिनानिमित्त बाईक रॅलीस प्रतिसाद
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे एस. टी. स्टँड सांगली जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार, समाज कल्याणचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, सामाजिक न्याय पुरस्कार प्राप्त अशोक पवार, नितीन जोंधळे, अरुण परसुळे, विठ्ठल काळे तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर संविधानाचा जागर करणारा समता चित्ररथ व बाईक रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, एस. टी. स्टँड मार्गापासून शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा, महानगरपालिका इमारत मार्ग - सिटी पोस्ट ऑफिस मार्गे स्टेशन चौक - राम मंदिर मार्गे पुष्कराज चौकात रॅलीची सांगता झाली. संविधानाचा जागर करून या माध्मयातून घराघरात समता पोहोचवण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
00000
शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०२३
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचतील - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
- विकसित भारत संकल्प यात्रेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ
- 26 जानेवारीपर्यंत चालणार मोहीम
- जिल्ह्यातील 697 ग्रामपंचायतींमध्ये शासकीय योजनांचा जागर
सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केला.
भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. या यात्रेंतर्गत जिल्हा परिषद आवारात त्यांच्या हस्ते या चित्ररथांना हिरवा झेंडा दाखवून विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) प्रमोद काळे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, या मोहिमेंतर्गत जिल्ह्यासाठी 6 व्हॅन आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी एक व्हॅन असून, ती जिथे जिथे जाईल, तिथे तिथे शासकीय योजनांचे प्रबोधन करेल, योजनांची माहिती देईल. स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पूर्वी लाभ मिळालेले लाभार्थी यांच्या उपस्थितीत या व्हॅनचे स्वागत केले जाईल. या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवली जाईल, वंचित लाभार्थींची नोंदणी केली जाईल व योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोहोचवला जाईल. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रत्येक व्हॅन दर दिवशी दोन ग्रामपंचायतींमध्ये फिरणार आहे. या पद्धतीने 26 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील 697 ग्रामपंचायतींमध्ये या व्हॅन फिरणार आहेत. ग्रामीण/शहरी/नगरपालिका स्तरावर लाभार्थी शोधणे, प्रत्येक गरजू लाभार्थीपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि लाभार्थीस त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे या यात्रेचा हेतू आहे. तरी सदर शासकीय योजनांची माहिती घेऊन पात्र वंचित लाभार्थींनी नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देता येईल, असे ते म्हणाले.
विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेची माहिती विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद - वैयक्तिक यशकथा / अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थींची नोंदणी करणे, ही या विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दिष्टे आहेत.
यात्रेंतर्गत पहिल्या टप्प्यात 6 तालुक्यांमध्ये व्हॅन फिरणार असून, दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 4 तालुक्यामध्ये व्हॅन फिरणार आहेत. पहिल्या टप्प्यांतर्गत आज दि. 24 व उद्या 25 नोव्हेंबर रोजी सदर व्हॅनचे तालुकानिहाय मार्गक्रमण पुढीलप्रमाणे – शिराळा – दि. 24 नोव्हेंबर – रेड, बेलदारवाडी, दि. 25 नोव्हेंबर – खेड, भटवाडी
मिरज – दि. 24 नोव्हेंबर – सावळी, कानडवाडी, दि. 25 नोव्हेंबर – मानमोडी, रसूलवाडी
कडेगाव – दि. 24 नोव्हेंबर – कोतवडे, नेर्ली, दि. 25 नोव्हेंबर – अपशिंगे, खंबाळे औंध
जत – दि. 24 नोव्हेंबर –अंकले, डोर्ली, दि. 25 नोव्हेंबर – बाज, बेळुंखी
विटा – दि. 24 नोव्हेंबर –गार्डी, घानवड, दि. 25 नोव्हेंबर – हिंगणगादे, नागेवाडी
कवठेमहांकाळ – दि. 24 नोव्हेंबर –अलकूड एम, बोरगाव दि. 25 नोव्हेंबर – जायगव्हाण, मळणगाव
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)