मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०२५
भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री आढळल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी - सहायक आयुक्त (अन्न) रा. अ. समुद्रे
- अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची धडक तपासणी मोहीम
- 9 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित, 51 जणांना सुधारणा नोटीस
- आतापर्यंत पावणेचार लाखाहून अधिक किंमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त
सांगली, दि. 14 (जि. मा. का.) : अन्नपदार्थ विक्रेत्यांनी सर्व अन्नपदार्थ चांगल्या, स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणामध्ये बनवून विक्री करावेत. शिळे अन्नपदार्थ विक्री केले जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. ग्राहकांनीही सतर्क राहून कुठेही भेसळयुक्त किंवा कमी दर्जाचे अन्नपदार्थ विक्री होत असल्याचे आढळल्यास त्वरित प्रशासनाच्या १८०० २२२ ३६५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अन्न तथा पदनिर्देशित अधिकारी परिमंडळ-1 रा. अ. समुद्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, अन्न व औषध प्रशासन, सांगली यांच्यावतीने सणासुदीच्या पार्श्वभूमिवर दि. 11 ऑगस्ट 2025 पासून सांगली जिल्ह्यात मिठाई, खवा, फरसाण, चिवडा इत्यादी अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर विशेष धडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात या पदार्थांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने, काही ठिकाणी भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सर्व आस्थापनांची सखोल तपासणी केली जात असून, वापरले जाणारे तेल, तूप, दूध व अन्य पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जात आहेत.
अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयामार्फत जिल्ह्यामध्ये दि. 11 ऑगस्ट 2025 पासून ते आजपर्यंत अन्न विक्री करणाऱ्या एकूण 174 आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये दूध 38, खवा मावा 14, तूप 28, खाद्यतेल 36, मिठाई 58, ड्रायफ्रुटस 18, चॉकलेट 20, भगर 14 व इतर अन्नपदार्थ (रवा, बेसन, आटा इत्यादी) चे 43 नमुने असे एकूण 269 अन्न नमुने घेतले असून प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.
तपासणीच्या अनुषंगाने 51 अन्न व्यावसायिकांना सुधारणा नोटीस पाठविण्यात आल्या असून 09 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच, 4 अन्न आस्थापनांच्या तपासण्या करुन 984 लिटरचा व 3 लाख 83 हजार 581 रुपये किंमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच एका अन्न आस्थापनेमधून 46 किलो वजनाचा 14 हजार 375 रुपये किंमतीचा बर्फीचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच एका अन्न आस्थापनेमधून 47.3 किलो वजनाचा 4 हजार 557 रुपये किंमतीचा भगर व भगरपीठाचा साठा जप्त करण्यात आला असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. ग्राहकांनीही मिठाई व इतर दुग्धजन्य अन्नपदार्थ खरेदी करताना ते ताजे असल्याची खात्री करावी. मिठाई व दुग्धजन्य पदार्थ खरेदी केल्यानंतर लवकरात लवकर खावून संपवावेत किंवा रेफ्रिजरेटरमध्ये योग्य तापमानास साठवावेत, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.
00000
वाचन प्रेरणा दिनानिमित्त आज ग्रंथप्रदर्शन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते होणार उद्घाटन
सांगली, दि. 14 (जि. मा. का.) : वाचन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा मराठी भाषा समिती व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शन दालन, पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील स्मारक, जुने स्टेशन चौक, सांगली येथे हे प्रदर्शन होणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते सकाळी 9 वाजता होणार असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने “घेवूया एकच वसा मराठीला बनवू या ज्ञानभाषा” या संकल्पनेनुसार मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व वाचन संस्कृतीच्या विकासासाठी ऐतिहासिक व संदर्भ मूल्य असलेले वैविध्यपूर्ण ग्रंथ या प्रदर्शनात अवलोकनार्थ व विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
00000
शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०२५
सांगली जिल्हा पंचायत समिती सभापती आरक्षण-2025 जाहीर
सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील दहा पंचायत समितीमधील सभापती आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे, तहसीलदार (सर्वसाधारण) लिना खरात आदि उपस्थित होते.
आरक्षण सोडतीनुसार पंचायत समितीनिहाय सभापती आरक्षण पुढीलप्रमाणे. खानापूर-विटा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री), मिरज – अनुसूचित जाती (स्त्री), कवठेमहांकाळ – सर्वसाधारण (स्त्री), आटपाडी – सर्वसाधारण, जत – सर्वसाधारण (स्त्री), वाळवा – सर्वसाधारण, पलूस – नागरिकांचा मागास प्रवर्ग, तासगाव – सर्वसाधारण (स्त्री), कडेगाव – सर्वसाधारण, शिराळा – नागरिकांचा मागास प्रवर्ग.
00000
वाचन प्रेरणा दिनानिमित्त बुधवारी ऐतिहासिक मूल्य असलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन - जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा दि. 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. या औचित्याने मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, विकास, जतन व संवर्धन होण्याच्या अनुषंगाने बुधवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील स्मारक, जुने स्टेशन चौक येथे ऐतिहासिक मूल्य असलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.
महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियम, 2021 ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने गठित जिल्हा मराठी भाषा समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस तहसीलदार लीना खरात, पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, अशासकीय सदस्य अविनाश सप्रे, उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत, महापालिकेचे संतोष बेलवलकर आदि उपस्थित होते.
वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे नेटके आयोजन करावे, असे सूचित करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, “घेवूया एकच वसा, मराठीला बनवूया ज्ञानभाषा” ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून या प्रदर्शनात जिल्ह्यातील ऐतिहासिक मूल्य असलेली ग्रंथसंपदा, संदर्भ मूल्य असलेले ग्रंथ, संस्थानकालिन गॅझेटियर, सांगली जिल्ह्यातील साहित्यिकांचे जुने दस्तावेज, महनीय व्यक्तिंकडून स्वाक्षरीत साहित्यसंपदा आदिंचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, शाळांमधील ग्रंथालयांतील ग्रंथसंपदा अवलोकन करण्यासाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत शालेय स्तरावरील ग्रंथपालांना सूचित करावे. पीएच. डी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
00000
फळप्रक्रिया उद्योगातून सांगली जिल्ह्याचा ब्रँड निर्माण करावा - जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील फळांवर प्रक्रिया करून सांगली जिल्ह्याचा एक ब्रँड निर्माण करावा. त्यासाठी शासकीय योजनांची मदत घ्यावी. चांगल्या दर्जाचे प्रक्रियायुक्त पदार्थ ग्राहकांना देण्याच्या उपक्रमाला सदैव पाठिंबा राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
कुपवाड येथील पियुष कॅनिंग अँड फ्रुट प्रोसेसिंग युनिट येथे फळे व कृषि मालावरील मूल्यवर्धनाच्या संधी व महत्त्व आणि महिला बचत गटातील महिलांना व्यवसायाच्या नवीन संधी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे, युनिटच्या प्रमुख मीनल भोसले व प्रतापराव भोसले, प्रतापराव पाटील, बचत गटातील महिला व नागरिक उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी महिला उद्योजकांच्या मालाची विक्री व शहरातील बाजारपेठेची अडचण सोडविण्यासाठी डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर काम कसे सोपे होईल याबाबत सांगितले. त्यासाठी लगेचच खरेदीदार, विक्रेत्यांच्या बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन तात्काळ करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना यावेळी दिल्या. उत्पादकांच्या पॅकिंगवर “आमची सांगली, आमचा अभिमान” हे ब्रीद वाक्य त्यांनी यावेळी सुचविले.
कुंदन शिनगारे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्ह्यातील सुरू असलेल्या बचत गटांच्या उपक्रमांची व प्रकल्पांची माहिती विषद केली. फळ प्रक्रिया, कौशल्य प्रशिक्षण यामध्ये महिलांच्या माध्यमातून छोट्या-मोठ्या व्यवसायांची वृद्धी करता येण्याची जिल्ह्याची प्रचंड क्षमता असल्याचे ते यावेळी म्हणाले.
प्रास्ताविकात मीनल भोसले व प्रतापराव भोसले यांनी पियुष स्कॅनिंग युनिटची गेल्या 30 वर्षातील मूल्यवर्धनातील कामगिरी विषद केली. तसेच बाजारपेठेतील प्रक्रियायुक्त आणि मुख्यतः आंबा, द्राक्षे, पेरू, चिंच, सीताफळ इत्यादी वरील मूल्यवर्धनामुळे किती नफा मिळू शकतो व उच्च दर्जा कसे टिकवता येईल याविषयी माहिती दिली.
00000
गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५
महिला आयोग आपल्या दारी' बुधवारी सांगली जिल्ह्यात
'महिला आयोग आपल्या दारी' बुधवारी सांगली जिल्ह्यात
महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्या रुपाली चाकणकर यांचे आवाहन
मुंबई दि. 9 ऑक्टोबर - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात बुधवार दि. १५ आँक्टोबर, २०२५ रोजी जनसुनावणी होणार असून, आयोगाच्या मा. अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या जनसुनावणीस महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर दि. १५ आँक्टोबर, २०२५ रोजी सांगली जिल्ह्यात असणार आहेत. यावेळी जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रशासन, पोलीस, कामगार, परिवहन, आरोग्य, शिक्षण आदी विभागांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, 'महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करत आहे.
000000
जिल्हा परिषद निवडणूक विभाग पंचायत समिती निर्वाचक गण आरक्षण सोडत सोमवारी
सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी आरक्षण सोडत कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या कार्यक्रमानुसार सांगली जिल्हा परिषद, 61- निवडणूक विभागाच्या, जिल्हाधिकारी सांगली यांच्यास्तरावर व 10 पंचायत समितीचे, 122- निर्वाचक गणाचे संबंधित तहसिलदार यांच्यास्तरावर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील व सर्वसाधारण महिलांसह) आरक्षण सोडत दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. यासाठी दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता निश्चित केलेल्या ठिकाणी सभा होणार आहे. ज्या नागरिकांना या सभेस हजर राहण्याचे आहे त्यांनी संबंधित ठिकाणी विहीत वेळेत हजर रहावे, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
जिल्हा परिषद सांगली साठी एकूण 61 गट असून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे सभा होणार आहे.
पंचायत समिती निहाय एकूण गण व सभेचे ठिकाण अनुक्रमे पुढीलप्रमाणे – आटपाडी – 8 गण, पंचायत समिती आटपाडी येथील बैठक सभागृह, ता.आटपाडी, जि.सांगली. जत – 18 गण, तलाठी भवन, तहसिल कार्यालय जतच्या आवारातील. खानापूर – 8 गण, बैठक सभागृह, तिसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विटा. कडेगाव – 8 गण, बैठक सभागृह, तहसिल कार्यालय कडेगाव, पहिला मजला. तासगाव – 12 गण, शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तासगाव. कवठेमहांकाळ – 8 गण, मा. आर आर (आबा) पाटील सभागृह, पंचायत समिती कवठेमहांकाळ. पलूस – 8 गण, तहसिल कार्यालय पलूस, पहिल्या मजल्यावरील सभागृह. वाळवा – 22 गण, लोकनेते राजारामबापू नाट्यगृह इस्लामपूर. शिराळा – 8 गण, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, तहसिल कार्यालय शिराळा. मिरज – 22 गण, मा. श्री. वसंतरावदादा पाटील सभागृह, पहिला मजला, पंचायत समिती मिरज.
वरील नमूद सभेच्या ठिकाणी दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सभा होणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)