सोमवार, २१ सप्टेंबर, २०२६
सांगली अपर तहसील कार्यालयांतर्गत गुरूवारी महसूल लोकअदालत
सांगली, दि. 21 (जि. मा. का.): महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत जिल्हाधिकारी सांगली, उपविभागीय अधिकारी मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली अपर तहसील कार्यालय, सांगली अंतर्गत महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान आयोजित करण्यात आले आहे. जुना राजवाडा परिसरातील अपर तहसीलदार कार्यालय, सांगली येथे 24 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता ही महसूल लोकअदालत होणार असल्याचे अपर तहसीलदार अश्विनी वरूटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
महसूल प्रशासनातील अर्धन्यायिक (Quasi-Judicial) न्यायालयांमध्ये जमिनींशी संबंधित प्रलंबित महसुली दावे व अपिले परस्पर संमतीने व कायदेशीर तडजोडीने कायमस्वरूपी निकाली काढण्याची संधी या अभियानातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे पक्षकारांचा वेळ व पैसा वाचण्यास तसेच न्यायालयावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
या लोकअदालतीमध्ये ज्या पक्षकारांचे दावे प्रलंबित आहेत, त्यांनी दोन्ही पक्षांच्या परस्पर संमतीने विहित नमुन्यातील (प्रपत्र-अ) तडजोड अर्ज संबंधित कार्यालयात सादर करावयाचा आहे. प्राप्त अर्जांची छाननी करून लोकअदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षांच्या सहमतीने प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
सांगली, कुपवाड, बुधगाव, कसबे डिग्रज व कवठेपिरान परिसरातील सर्व पक्षकार व नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपले प्रलंबित महसुली वाद तडजोडीने मिटवून घ्यावेत, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा