गुरुवार, ३१ मे, २०१८

मुद्रा योजनेतून एक लाखपेक्षा अधिक लाभार्थींना लाभ

सामान्य नागरिकांना इच्छा असूनही आर्थिक सहाय्याअभावी अनेकदा व्यवसाय, उद्योग सुरू करता येत नाहीत. त्यामुळे अशांच्या मदतीसाठी शासनाने मुद्रा योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे. त्या पार्श्वभूमिवर मुद्रा योजनेची अधिक माहिती या लेखातून जाणून घेऊया...
या योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात 31 मार्च 2018 अखेर एकूण 1 लाख 14 हजार 71 लाभार्थींना 727 कोटी 47 लाख रुपये कर्ज वितरण करण्यात आले आहे. यामध्ये शिशु गटामध्ये 1 लाख 3 हजार 273 लाभार्थींना 264 कोटी 70 लाख रुपये, किशोर गटामध्ये 7 हजार 554 लाभार्थींना 202 कोटी 41 लाख रुपये, तरुण गटामध्ये 3 हजार 244 लाभार्थींना 260 कोटी 36 लाख रुपये कर्ज वितरण करण्यात आले आहे. अनेक उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेऊन प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे.
सांगलीच्या रुचिरा हॉटेलचे मालक प्रशांत शेट्टी त्यापैकीच एक. मुद्रा योजनेतून कमी त्रासात कर्ज मिळाल्याबद्दल ऋणनिर्देश व्यक्त करून ते म्हणाले, मी हॉटेल व्यवसायासाठी विजया बँकेतून जानेवारी 2018 मध्ये 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. विनातारण हे कर्ज मिळाल्याने मला व्यवसायवृद्धीसाठी त्याची मदत  झाली आहे. आमच्यासारख्या युवा पिढीतील तरूणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मुद्रा कर्जाच्या माध्यमातून चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लि. यांची आद्याक्षरे घेऊन मुद्रा योजनेचे नाव तयार झाले आहे. मा. प्रधानमंत्री महोदयांनी मुद्रा बँक योजना दिनांक 8 एप्रिल 2015 रोजी कार्यान्वित केली. उद्योजक आणि लहान व्यापार करणाऱ्या जवळजवळ 90 टक्के लोकांपुढे मुबलक अर्थसहाय्याची तरतूद करणे हा एक कठीण प्रश्न होता. त्यासाठी कुठलेही खात्रीशीर साधन उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांना एक खात्रीशीर ठिकाण आणि योजना उपलब्ध करण्यासाठी मुद्रा योजनेची सुरुवात करण्यात आली. या बँकेच्या माध्यमातून लघु उद्योगांना कर्ज देण्यासाठी देशातील इतर बँकांना प्रोत्साहनही देण्यात येईल. शिवाय या कर्ज योजनांच्या नियमनाचे कामही मुद्रा बँकेच्या हाती असेल.
या योजनेनुसार कुठल्याही प्रकारची तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरू, बेरोजगार यांना कर्ज पुरवठा करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते. देशामध्ये होतकरू, बुद्धिमान आणि जीवनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे लाखो तरूण आहेत. परंतु, त्यांना कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्यामुळे एखादा लहान उद्योग, व्यवसाय नव्याने उभारण्यासाठी अनंत अडचणी येतात. मुख्य अडचण ही भांडवलाची असते. कोणताही उद्योग, व्यापार आणि व्यवसाय उभारावयाचा असेल तर कमी व्याजदरामध्ये पतपुरवठा ही मुलभूत गरज आहे. या सर्वांचा विचार करून अशा तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यातून उद्योजक निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने मा. प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून केंद्रशासनाने मुद्रा बँक योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत बेरोजगारांना कर्ज पुरवठा करून त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहीत केले जाते.
   मुद्रा योजनेत तीन श्रेणी असतात. या श्रेणीचे शिशु, किशोर आणि तरुण या गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. शिशु श्रेणींतर्गत 50 हजार रुपयांचे कर्ज मिळू शकते, तर किशोर श्रेणीत 50 हजार पासून 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. तसेच तरुण श्रेणींतर्गत 5 लाखांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. मुद्रा बँकेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज दिले जाते. त्याचबरोबर भाजीवाले, सलून यांनाही कर्ज दिले जाईल असेही म्हटले आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेत प्रत्येक सेक्टरनुसार योजना बनवली जाईल आणि प्रत्येक सेक्टरमध्ये वेगवेगळ्या योजना राबविल्या जातील. मुद्रा योजनेविषयीची माहिती आणि योजनेचा लाभ हा प्रादेशिक ग्रामीण बँकांनाही घेता येईल.
एकूणच या योजनेचा लाभ घेऊन अनेकांनी आपल्या उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल सुरू केली आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या छोट्या नवउद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

                              संप्रदा द. बीडकर
                           प्र. जिल्हा माहिती अधिकारी
                           सांगली










बुधवार, ३० मे, २०१८

तंबाखुचे सेवन संपेल जीवन

   सृष्टीवरील सर्व सजीव प्राण्यांचे जीवन अमुल्य आहे. पण त्यातल्या त्यात मानवी जीवन म्हणजे वरदान मानले जाते. मानव आपल्या भौतिक सुखासाठी जीवनात प्रचंड प्रमाणात धडपड, मेहनत करतो या सर्व धडपडीच्या जीवनात थोडासा विरंगुळा, शरीराला आराम मिळावा यासाठी काही वेळेला व्यसनांच्या आहारी जातो. प्रारंभी ही व्यसने काही प्रमाणात बरी वाटतात पण त्यांच्या आहरी गेल्यानंतर हीच व्यसने उग्र रुप धारण करुन मानवाचे जीवन संपवतात. या व्यसनापैकी एक व्यसन म्हणजेच तंबाखुचे व्यसन किंवा तंबाखुजन्य पदार्थाचे व्यसन. ही व्यसन जगाचीच समस्या बनली आहे. 31 मे जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. याच तंबाखुजन्य व्यसनांबाबत थोडंस जाणून घेवूया..


     तंबाखुने होणाऱ्या विविध आजारामुळे भारतात दरवर्षी लाखो लोक मृत्यूमुखी पडतात. तंबाखुचा शरीराच्या प्रत्येक भागावर हानीकारक परिणाम होत असतात. तंबाखु कोणत्याही स्वरुपात - खाल्ला तरी शरीराला हानीकारकच आहे. सुरुवातीला तंबाखू ही औषधी समजली जायची. पण सोळाव्या शतकापासून तंबाखूच्य्या अनिष्ट परिणामांची शंका डॉक्टरांना येऊ लागली आणि तंबाखु अथवा तंबाखुजन्य पदार्थ सेवन हे व्यसन असल्याचे सिध्द झाले.
   तंबाखू सेवन करण्याच्या अनेक पध्दती आहेत. भारतात तंबाखू चुन्याबरोबर मळून खातात. पानात चुना, सुपारी, कात तंबाखू घालून त्याचा विडा करतात. नुसताच बार भरणारे लोक दिवसभर तंबाखू तोंडात ठेवतात. ही गोळी गालात किंवा खालचा ओठ हिरडी यांच्यामध्ये ठेवतात. काही लोक विशेषत: तरुण गुटखा खाणे या नवीन फॅशनच्या आहारी जातात. पानात गुंडाळलेली तंबाखू म्हणजे विडी कागदात गुंडाळलेली ती सिगारेट. विडी, सिगारेट, पाईप, सिगार हुक्का यात तंबाखू एका टोकाला जळत ठेवण्यात येते. तिचा धूर तोंडातून घशावाटे छातीत ओढून पुन्हा श्वसनमार्गे शरीरातून तोंड नाकाव्दारे बाहेर सोडला जातो.
   काही लोक तर पेटलेली बाजू तोंडात धरुन धुम्रपान करतात. काही जण तपकिरीच्या रुपाने तंबाखू नाकातून श्वसनमार्गे ओढतात. कित्येक लोक तंबाखू जाळून त्याची मिशरी करतात ती दातांना हिरड्यांना लावतात. या तंबाखू सेवनाच्या उपरोक्त पध्दतीपैकी धुम्रपान, तंबाखू खाणे गुटखा ह्या जास्त प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पध्दती आहेत.
तंबाखुचे दुष्परिणाम
   धुम्रपानाने होणारे दुष्परिणाम - भूक लागणे, आतड्याची कार्यक्षमता मंदावणे, श्वसन नलिकेत किंवा पोटात "व्रण" होणे, धुम्रपानाचा जास्तीत जास्त वाईट परिणाम - श्वसनसंस्था रक्ताभिसरण संस्था यावर होतो. फुप्फुसाचे श्वसनसंस्थेचे आजार वारंवार होतात. रक्तदाब वाढणे, ह्दयाला इतर महत्वाच्या अवयांना रक्तपुरवठा कमी होणे हे दुष्परिणाम होतात. प्रदीर्घ धुम्रपानामुळे फुप्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. महिलांच्या बाबतीत ह्या शिवाय- गर्भात विकृती निर्माण होणे, कमी वजनाचे बालक जन्माला येणे,गर्भपात होणे किंवा मृत बालकाचा जन्म होणे या बाबी घडू शकतात.
   पानातून किंवा चुन्याबरोबर तंबाखू खाल्याने हेच सर्व दुष्परिणाम शरीरात होतात त्याबरोबर तोंडाचेही अनेक रोग होऊ शकतात. तंबाखूबरोबरच्या चुन्यामुळे तोंडातील नाजूक अशा त्वचेला व्रण पडून त्यामुळे तेथे कर्करोग होऊ शकतो. सिगारेटच्या धुरात एकंदर चार हजार प्रकारची विविध रसायने असतात. त्यातील सर्वच्या सर्व शरीराला अपायकारक आहेत काही रसायने अत्यंत विषारी आहेत. उदा. स्टार, निकोटीन, हायड्रोसायनिक ऍ़सिड, कार्बन मोनोक्साईड इत्यादी. धुम्रपानातून निघालेल्या धुराचा त्रास धुम्रपान करणाऱ्या परंतु शेजारी बसलेल्या व्यक्तिलाही होऊ शकतो हा परिणामही तेवढाच घातक असतो.
   तंबाखू खाण्याचे अलीकडच्या काळात नवीन प्रकार आले आहेत. त्यामध्ये  गुटख्यामधील तंबाखू किंवा तंबाखूचा अर्क, मावा, सुपारी, चुना, सुगंधी द्रव्ये यांचा समावेश करून खाणे. ह्या बरोबरच इतरही काही मेंदूवर परिणाम करणारी घातक द्रव्ये गुटख्यामध्ये घातली जातात, जेणेकरुन लवकर तलफ भागू शकेल. परंतु यामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांचे प्रमाण वाढते. गुटख्याचा तोंडाच्या आतील त्वचेवर वाईट असा परिणाम अत्यंत जलद गतीने होतो काही दिवसात त्या व्यक्तिला तोंड उघडणेही दुरापास्त होते. याशिवाय तंखाखूचे शरीरावर होणारे दुष्परिणाम तर आहेतच.
   तंबाखूचे सेवन कसे थांबवावे- विडी-सिगारेट ओढणे बंद करायला सर्वप्रथम प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते. कारण तंबाखूची सवय झालेल्या माणसाला विडी-सिगारेट सोडली की निश्चितच अस्वस्थ वाटू लागते. याचे कारण हे की तंबाखूमधील निकोटीन काहींना दारुपेक्षाही अधिक व्यसनासक्त करते. असे असले तरी हे व्यसन सोडणे अशक्य नसते.
   सर्वसाधारणपणे मनुष्य वेगवेगळ्या वेळी विडी - सिगारेट ओढत असतो. रक्तातील निकोटीनचे प्रमाण कमी होते आणि मग तंबाखुची आस लागते. सिगारेट सोडलेल्या माणसाला त्याच्या सवयीच्यावेळी तलफ येते. अशा वेळी ग्लासभर पाणी पिणे, पेपरमिट चोखणे, शतपावली करणे,यासारख्या क्रिया केल्या तर तलफ कमी होते. महिना दोन महिन्यांत तंबाखुची आस नष्ट होते. तंबाखु गुटख्याचे सेवन म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे. तरी तरुणांनी या व्यसनापासून दूर राहावे समाजातील स्वयंसेवी संस्था आणि घटकांनी तंबाखु, गुटखा खाणाऱ्या लोकांना या व्यसनापासून प्रवृत्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी मेळावे, चर्चासत्रे आयोजित करुन मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
   अलिकडे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यामध्ये गुटखा खाण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच रोज मोलमजुरी करणारे कामगार यांच्यामध्येही कामात उत्साह येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तंबाखू, गुटख्याचे सेवन केले जाते. त्यामुळे क्षणीक काळासाठी उत्साह वाढतो परंतु आयुष्याची वाट लागते. भारतात कॅन्सरचे प्रमाण वाढण्यामागे हेच कारण आहे. यासाठीच युवा पिढीने तंखाखू गुटख्याच्या व्यसनापासून चार हात लांब राहून स्वत:च्या आरोग्यासाठी, भविष्यासाठी दूर राहण्याची नितांत गरज आहे. नाहीतर तंबाखुचे सेवन संपेल जीवन हे वाक्य खरे ठरेल.
                
                               जिल्हा माहिती कार्यालय,
                               सांगली
                
00000