शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

या पुढे विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच - पालकमंत्री जयंत पाटील



सांगली, दि. 14, (जि. मा. का.) :  जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्याना जातीचा दाखला आणि गावकऱ्यांना शिधापत्रिका वितरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना शाळेतच जातीचे दाखले उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिली.
            महाराजस्व अभियान अंतर्गत वाळवा तालुक्यातील बहे येथे बहे, कुबालवाडी आणि खरातवाडी गावातील शालेय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले व शिधापत्रिका वितरण पालकमंत्री  जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले, याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती अश्विनी पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, तहसिलदार रवींद्र सबनीस, गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे, बहेच्या सरपंच छायाताई पाटील, खरातवाडीचे सरपंच पृथ्वीराज खरात, कुबालवाडीचे सरपंच चांगदेव कांबळे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
            पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जातीचा दाखला आणि शिधापत्रिका महत्वाचा दस्तऐवज असून ती विनासायास उपलब्ध झाली पाहिजेत. यासाठी जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्याना शाळेतच जातीचे दाखले आणि गावकऱ्यांना शिधापत्रिका गावातच उपलब्ध झाल्यास ती मिळविण्यासाठी  होणारा त्रास कमी होईल. सामान्य माणसाची कामे सहजगतीने व्हावीत, त्याला शासकीय योजनांचा लाभ घेता यावा आणि सामान्य माणसाला सेवा देण्यासाठी प्रशासन गावात जाऊन ही मोहीम राबविणार असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले. विद्यार्थ्यांना जातीचा दाखला दिल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी काय करावे लागेल यासाठी संबंधित विभागाशी चर्चा केली जाईल.
            पालकमंत्री म्हणाले, पाणंद रस्ते हा महत्वाचा प्रश्न असून जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद रस्त्याचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पाणंद रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत असून पुरामुळे अनेक ठिकाणचे पाणंद रस्ते खराब झाले असल्याने पाणंद रस्त्याच्या कार्यक्रमास प्राधान्य देण्यात येणार आहे.
             तहसलिदार रवींद्र सबनीस यांनी स्वागत केले व प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, बहे मंडल मधील बहे, कुबालवाडी व खरातवाडी या गावातील 904 विद्यार्थ्याना जातीचे दाखले व 250 कुटुंबाना शिधपत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे. या उपक्रमातून जुनी-खराब रेशनकार्डही बदलून दिली जाणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी पंचायत समिती सभापती अश्विनी पाटील, विठ्ठल पाटील, माणिक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
            यावेळी कृषि विभागाकडील योजनांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना लाभ मंजुरीचे पत्र, घरकुल योजनेच्या लाभार्थीना धनादेशाचे वितरण पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
000000



7/12 संगणकीकरणाच्या कामास प्राधान्य द्या - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात



सांगली, दि. 14, (जि. मा. का.) :  7/12 संगणकीकरणाच्या कामास अधिक प्राधान्य देण्याची सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज येथे बोलतांना केली.
            कडेगांव येथील शासकीय विश्रामगृहामध्ये जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार मोहनराव कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरविंद लाटकर, प्रांताधिकारी गणेश मरकड, कडेगांवच्या तहसिलदार शैलजा पाटील, पलूसचे तहसिलदार राजेंद्र पोळ यांच्यासह कडेगांव आणि पलूस तालुक्याचे गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
7/12 संगणकीकरणाच्या कामात सांगली जिल्हा राज्यात आघाडीवर राहील यादृष्टीने  या कामास प्राधान्य देण्याची सूचना करुन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, शेतकऱ्याला होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी सर्व जमिनींच्या अभिलेखाचे संगणकीकरणासही प्राधान्य दिले असून  7/12 ची ऑनलाईन उपलब्धता करण्याच्या कामासही गती दिली असल्याचे ते म्हणाले.
महसूल विभागामार्फत जनतेला लागणारे विविध प्रकारचे दाखले गावातच उपलब्ध व्हावेत, यासाठी गावागावात शिबिरे घेऊन दाखल्याचे वाटप करावे, विशेषत: विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले वेळेत देण्यासाठी जिल्ह्यात गावोगावी शिबिरे घेण्याची विशेष मोहिम राबविण्याची सूचनाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी बोलतांना केली. जिल्ह्यात वाळू चोरी करणाऱ्यांवर कडक निर्बंध घाला, वाळू चोरी करणाऱ्यांची कसल्याही प्रकारे गय करु नका, असे निर्देशही त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिले.
आर्थिकदृष्टया अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करण्याच्या निर्धाराने शासनाने पीक कर्ज माफ करणारी "महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना" आणली आहे. ही योजना साधी, सोपी, सरळ आणि सुलभ असून या योजनेची जिल्ह्यात गतीने अंमलबजावणी करण्याची सूचनाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. या योजनेपासून जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, अशा पध्दतीने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, अशा  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान वाटपाच्या कामाचा तसेच जिल्हयातील पुनर्वसनाच्या कामाचाही यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आढावा घेतला. प्रकल्पग्रस्तांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या कामास प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केली. याबरोबरच जिल्ह्यातील महसूल विभागाचा विभागनिहाय कामाचाही त्यांनी आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना केल्या. संभाव्य काळात जाणवणारी टंचाई परिस्थिती विचारात घेऊन आतापासूनच नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात जिल्हयातील महसूल विभागामार्फत सुरु असलेल्या उपाययोजना तसेच अन्य सर्व योजनांची माहिती दिली. शेवटी अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी आभार मानले.
000000


क्रीडा संकुलातील सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार - क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे



सांगली, दि. 14, (जि. मा. का.) :  जिल्हा क्रीडासंकुलात चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असून खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये विविध सोयी सुविधा देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. यासाठी  निश्चितपणे मदत करण्याचे आश्वासन क्रीडा युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे दिले.
लोकनेते स्व. राजारामबापू पाटील चॅरीटेबल ट्रस्ट, सांगलीच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे आयोजित जयंत चषक  खुल्या राज्यस्तरीय तायक्वाँदो स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, धनंजय पाटील, संजय बजाज, पृथ्वीराज पाटील, कमलाकर पाटील, माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
क्रीडा युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, शासन क्रीडा क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करून सोयी सुविधांसाठी मदत करेल. देशात, राज्यात क्रिकेट, कबड्डी अशा स्पर्धा नेहमीच मोठ्या प्रमाणावर भरविल्या जातात परंतु दुर्लक्षित असणाऱ्या तायक्वाँदो खेळामध्ये लक्ष घालून या खेळाच्या स्पर्धा भरविल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. क्रीडा राज्यमंत्री म्हणून आपल्या ज्या काही मागण्या, अडचणी असतील त्या सोडविण्याचे काम निश्चितपणाने करू. जिल्हा क्रीडा संकुलाचे उत्कृष्ट बांधकाम केल्याचे सांगून त्यांनी कौतुक केले. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केलेल्या मागण्यांना प्राधान्य देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
 यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते आंतरराष्ट्रीय तायक्वाँदो खेळाडू अर्णव अत्रे हिचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी तायक्वाँदो खेळाडूंशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. तसेच तायक्वाँदो खेळाडूंनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांची पाहणी करून त्यांचे कौतुक केले शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा क्रीडा संकुलात असलेल्या विविध सोयी सुविधांची राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी पाहणी करून जिल्हा क्रीडा संकुलात उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधाबाबत कौतुक करून समाधान व्यक्त केले.
प्रारंभी लोकनेते स्व. राजारामबापू पाटील कुसुमताई पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना विनाअनुदानित शाळांनाही क्रीडा साहित्यासाठी अनुदान देण्याची मागणी केली. स्वागत धनंजय पाटील यांनी केले. प्रास्ताविक संजय बजाज यांनी केले. सूत्रसंचालन एम. सी. कांबळे यांनी केले.
       या कार्यक्रमापूर्वी राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी तासगाव तालुक्यातील अंजनी येथे स्वर्गीय आर. आर. पाटील (आबा) यांच्या समाधीस्थळी भेट देवून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
00000



सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०

गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी सरपंच यांनी अभ्यासपूर्ण सहभाग द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) :  आपत्तीला तोंड देण्यासाठी गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पूरप्रवण गावातील सर्व सरपंच यांनी गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी अभ्यासपूर्ण सहभाग द्यावा. आपत्तीमुळे नुकसान कमी होईल यादृष्टीने अभ्यास करून आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, यशदा पुणे एन.आय.डी.एम. नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यातील पूरप्रवण गावातील गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याच्या अनुषंगाने सरपंच, तलाठी ग्रामसेवक यांच्यासाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, आपत्ती व्यवस्थापन केंद्र यशदा, पुणे चे संचालक कर्नल व्ही. एन. सुपनेकर (निवृत्त), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह वाळवा, पलूस शिराळा व मिरज तालुक्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी तसेच पूरप्रवण गावातील सरपंच उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून त्या आराखड्यामध्ये समाविष्ट कराव्यात. आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य सुस्थितीत ठेवावे व त्याची देखभाल व दुरूस्ती निरंतर ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. महापूरात आलेल्या अडचणी लक्षात घेऊन तसेच फक्त महापूराबाबत मर्यादित न राहता इतर सर्व आपत्तींच्या अनुषंगाने परिपूर्ण असे गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.          सर्व समावेशक गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी संबंधितांनी  सर्व यंत्रणांशी समन्वय साधावा असे आवाहन करून मुख्य कार्यकारी अभिजीत राऊत म्हणाले, सरपंच यांना गावस्तरावरील स्थानिक प्रश्नांची जाण असते. त्यांना असणाऱ्या माहितीचा उपयोगही आराखडे तयार करताना करावा.
कर्नल व्ही. एन. सुपनेकर (निवृत्त) म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्व घटकांचा समावेश आवश्यक आहे. गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करताना आपली काय क्षमता आहे व आपणास कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याचे परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या काळात व आपत्तीनंतर करण्याची कार्यवाही या सर्व बाबींवर सखोल अभ्यास करून सर्व यंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे. सर्व साहित्य, संसाधने सुस्थितीत आहेत की नाही याची निरंतर रंगीत तालीम घेणे आवश्यक आहे. आपत्तीबाबतची माहिती गावातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली पाहिजे असे नियोजन करावे. यामध्ये प्रसार माध्यमांची महत्वाची भूमिका असून जनतेला वेळेवर माहिती, सल्ला देण्यासाठी,  लोकांच्या गरजा निदर्शनास आणण्यासाठी प्रसार माध्यमांचा योग्य वापर करावा.
आपत्तीची क्षमता कमी करून शकतो पण आपत्ती ही येणारच यासाठी प्रतिसाद यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. आपल्याजवळ जे उपलब्ध आहे त्याचा वापर कसा करावा याबाबत गाव पातळीवर प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. शोध व बचाव, हानीचा अंदाज, मदत वाटप, निवाऱ्याचे व्यवस्थापन, आरोग्य नियोजन, पाण्याचे शुध्दीकरण, गोदामांची देखभाल, पशुधनास मदत, मानसिक ताणतणाव व्यवस्थापन, रसद पुरवठा व्यवस्थापन, पाणी व वीजपुरवठा, तात्पुरत्या जीवनावश्यक गरजांची पूर्ती, सुरक्षा, स्वच्छता, दळणवळण, आपदग्रस्तांच्या नातेवाईकांसोबत संवाद साधण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे याबाबत सखोल मार्गदर्शन करून आपत्ती व्यवस्थापन आराखड्यांमध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा व तो कसा तयार करावा याबाबत सविस्तर माहिती दिली व दरवर्षी आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचे पुनरावलोकन करावे, असे आवाहनही कर्नल व्ही. एन. सुपनेकर (निवृत्त) यांनी यावेळी केले.
यावेळी विविध गावचे सरपंच यांनी त्यांचे महापूरातील अनुभव कथन करून त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी त्यांच्या समस्यांचे निराकरण संबंधितांनी केले.
          जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी प्रशिक्षणाविषयी सविस्तर माहिती दिली.  दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी 2020 या कालावधीत पूरप्रवण 104 गावांतील सरपंच, तलाठी ग्रामसेवक यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे सांगून आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सर्व पूरबाधित गावातील सरपंच यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. दिनांक 11 12 फेब्रुवारी रोजी मिरज तालुक्यातील 12, पलूस 14, वाळवा 18 शिराळा तालुक्यातील 8 अशा एकूण 52 पूरप्रवण गावातील तलाठी ग्रामसेवक यांच्यासाठी प्रशिक्षण, दिनांक 13 14 फेब्रुवारी रोजी मिरज तालुक्यातील 8, पलूस 11, वाळवा 20 शिराळा तालुक्यातील 13 अशा एकूण 52 पूरप्रवण गावातील तलाठी ग्रामसेवक यांच्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे श्री. नदाफ यांनी सांगितले.
00000