शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२

आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना लसीचा डोस देण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : जागतिक आरोग्य संघटनेने सन १९८८ मध्ये पोलिओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले आहे. त्यानुसार सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीची एक - एक मात्रा दिली जात आहे. त्यास अनुसरून सन २०२२ मध्ये दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. तरी दि. २७ फेब्रुवारी २०१७ नंतर जन्मलेल्या सर्व बालकांना दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी जवळच्या बुथवर नेऊन पोलिओ लसीचा डोस द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे व आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेच्या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक २७ फेब्रुवारी २०१७ नंतर जन्मलेल्या सर्व बालकांची संगणकीकृत नोंदणी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा इत्यादी व्दारे करण्यात आली असून लसीकरणासाठी एकूण 2061 बुथ स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये 0 ते 5 वर्षे वयोगटातील ग्रामीण क्षेत्रातील अपेक्षित 17 हजार 260 लाभार्थीसाठी 1 हजार 453 बुथ, शहरी भागातील 17 हजार 372 लाभार्थीसाठी 114 बुथ व महानगरपालिका क्षेत्रातील 53 हजार 834 लाभार्थीसाठी 494 बुथ स्थापन करण्यात आले आहेत. लाभार्थीना २ कि.मी. पेक्षा जास्त अंतर चालत जावे लागणार नाही याची दक्षता घेवून बुथची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक बुथवर दोन ते तीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून बुथवर लसपाजक, लेखनिक व केंद्रप्रमुख व्यक्ती व स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. लसीकरणाच्या दिवशी सर्व बालकांना लस मिळावी यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा, नाके, एस.टी.स्टँण्ड, रेल्वे स्थानके, टोलनाके इत्यादी ठिकाणी 169 ट्रान्सिट टीम (ग्रामीण 86, शहरी 10 व महानगरपालिका 73) कार्यरत आहेत. बांधकामाची ठिकाणे, रस्त्याची कामे, खाणकामगार, ऊसतोड कामगार, विटभट्ट्या, मंदिरे, बगीचे, फुटपाथवरील लाभार्थी, तात्पुरत्या व फिरत्या वसाहती, फिरस्ते, प्रसुतीगृहे व खाजगी दवाखाणे, तुरळक वाड्या वस्त्या इत्यादी ठिकाणच्या बालकांच्या लसीकरणासाठी 274 मोबाईल टीम (ग्रामीण 248, शहरी 6 व महानगरपालिका 20) कार्यरत आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली. 00000

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

युक्रेनमध्ये सांगली जिल्ह्या तील नागरिक, विद्यार्थी अडकले असल्याहस संपर्क साधा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतातून युक्रेनमध्ये कामासाठी किंवा शिक्षणासाठी गेलेले नागरिक, विद्यार्थी तिथे अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा नागरिकांसाठी नवी दिल्ली येथे हेल्पलाईन स्थापन करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथील हेल्पलाईन नंबर पुढीलप्रमाणे. केंद्रीय परराष्ट्र कार्यालय, नवी दिल्ली, फोन क्र. टोल फ्री 1800118797, फोन 011-23012113 / 23014105 / 23017905, फॅक्स-011-23088124, ईमेल situationrom@mea.gov.in. सांगली जिल्ह्यातील कोणीही नागरिक, विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली दूरध्वनी क्रमांक 0233-2600500 / टोल फ्री क्रमांक 1077, ई-मेल sanglirdc@gmail.com वर संपर्क साधावा. तसेच स्थानिक तहसिल कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. ०००००

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात सांगली जिल्ह्याचे काम राज्यात आदर्शवत - मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : लहान बालकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात. यातील अनेक आजार असे आहेत ज्यांवर बालक लहान असतानाच उपचार सुरू केला तर त्याचा फार मोठा फायदा होवू शकतो. सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गतचे कामकाज राज्यात आदर्शवत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. हॉटेल द ग्रेट मराठा सांगली येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम प्रशिक्षण, डिजीटल श्रवणयंत्र वाटप शुभारंभ व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, जिल्हा कार्यक्रम सहायक अनिता हसबणीस, लाभार्थी, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, अनेक लहान बालकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात. त्यांच्यावर लहानपणीच लवकर उपचार केल्यास लाभदायक ठरू शकते. जिल्ह्यात जवळपास 0 ते 6 वर्षे वयोगटातील दोन लाख बालके आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम टिमची संख्या मर्यादित असल्याने ते प्रत्येक ठिकाणी पोहचू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना प्रशिक्षण द्यावे. अंगणवाडी सेविकांच्यामार्फत त्यांच्यामार्फत प्रत्येक बालकाची तपासणी केली जाईल. काही आजार आढणाऱ्या बालकांची पुन्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम टीम मार्फत तपासणी केली जाईल. प्रत्येक बालकास लवकरात लवकर उपचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषद यंत्रणा, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम यंत्रणा यांनी एकत्रितपणे काम करावे. याबरोबरच प्रायव्हेट इंस्टिट्यूट सोबत समन्वय ठेवून बालकांना उपचार द्यावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे म्हणाले, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत टीमला फील्डवर काम करत असताना आवश्यक असणाऱ्या बाबींचे सखोल मार्गदर्शन होण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम तयार करून त्याला प्रात्यक्षिकांची जोड देण्याच्या दृष्टीने येत्या काळात नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट सेवा दिलेल्या तसेच कोविड सेंटरमध्ये अहोरात्र सेवा बजावलेल्या डॉ. प्रसाद पाटील, डॉ. संदिप साळवी, डॉ. प्रकाश मोरे, डॉ. सुनिता गायकवाड, डॉ. प्रियांका पाटील, डॉ. कल्याणी शिंदगी, डॉ. नवाजशरिफ मुजावर व योगेश कदम यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी कर्णबधीर बालकांना प्राथमिक स्वरूपात डिजीटल श्रवणयंत्राचे वाटप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याहस्ते करण्यात आले. 00000

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आता ग्राहक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचाही समावेश

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यामध्ये दि. 12 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून जिल्हा न्यायालय सांगली व सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असणाऱ्या अन्य प्रकरणांबरोबरच ग्राहक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे ही आता राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवली जाणार आहेत. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार शनिवार, दि. 12 मार्च 2022 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सांगली ए. एस. राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय सांगली व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी, कौटुंबिक वादासंबंधीची, कामगार वादाची, भू-संपादनाची, मोटार अपघात नुकसान भरपाईची, कौटुंबिक हिंसाचाराची, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १८ खालील प्रकरणे, ग्राहक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणात बँक, दूरसंचार, वीज बिल, घरपट्टी व पाणीपट्टी वसुनलीची प्रकरणे ठेवता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व वकील, पक्षकार, कर्मचारी यांनी योग्य ती काळजी घेवून उपस्थित रहावे. पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून प्रकरणे तडजोडीने मिटविण्याबाबतचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण ‍कि. नरडेले यांनी केले आहे. 00000

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत सहभाग घ्या - तहसिलदार प्रदीप उबाळे

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : भारत निवडणूक आयोगाने दि. 25 जानेवारी 2022 ते 15 मार्च 2022 या कालावधीमध्ये राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये प्रश्नमंजुषा, व्हीडिओ तयार करणे, पोष्टरची डिझाईन स्पर्धा, गाण्याची स्पर्धा, घोषवाक्य तयार करण्याची स्पर्धा अशा पाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. या स्पर्धेची सविस्तर माहिती http://ecisveep.nic.in/contest/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारण्याची मुदत 15 मार्च 2022 पर्यंत असून या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन 283-इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा वाळवा-इस्लामपूर तहसिलदार प्रदीप उबाळे यांनी केले आहे. स्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका सर्व तपशिलांसह voter-contest@eci.gov.in इथे ईमेल कराव्यात. ईमेल करताना स्पर्धेचे नाव <स्पर्धा> आणि <श्रेणी> याचा विषयात उल्लेख करावा. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. सर्व प्रवेशिका 15 मार्च 2022 पर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशीलांसह voter-contest@eci.gov.in या ईमेलवर पाठवाव्यात, असे आवाहनही तहसिलदार प्रदीप उबाळे यांनी केले आहे 00000

आयईएम धारक उपक्रमांना नोंदणी करण्याचे आवाहन

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने 25 मार्च 2021 पासून आय ई एम अर्ज भरण्यासाठी एक सुधारित जी 2 बी पोर्टल (http://services.dipp.gov.in/lms) सुरु केले आहे. प्रत्यक्षात उत्पादनात गेलेल्या उद्योग घटकाकडून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर संपर्क साधून त्वरीत आयईएम पार्ट 'बी' भरून घेणे आवश्यक आहे. उत्पादनापूर्वीच्या इतर टप्प्यातील आयईएम धारक उपक्रमांनी नव्या संकेतस्थळावर पार्ट ए बाबतची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे. एका आय ई एम कंपनी व्यावसायिक घटकाच्या नावे त्याच्या युनिटच्या स्थानाचा विचार न करता केवळ एकच आय ई एम जारी केला जात आहे. या करीता अर्जदारांना पोर्टलवर लॉग इन करून त्यांच्या आय ई एम संदर्भात डेटा अपडेट अथवा पुनर्प्रमाणित करण्यासाठी 15 जुलै 2021 पासून जी 2 बी पोर्टलमध्ये एक वेगळी विंडो प्रदान करण्यात आली आहे. अर्जदारांना ऑनलाईन प्रक्रियेत मार्गदर्शन करण्यासाठी वापरकर्ता मॅन्युअल आणि व्हिडिओ ट्युटोरियल जी 2 बी. पोर्टलवर उपलब्ध करून दिले आहेत. जरी संबंधित आय ई एम (औद्योगिक आवेदनपत्र धारक) घटकामध्ये कोणताही बदल नसला तरीही सर्व आय ई एम धारकांना नव्याने उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर पुनश्च अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या करीता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सर्व अर्जदारांना आवश्यक तेथे आधारभूत कागदपत्रे जोडावी लागणार असून या सर्व अर्जांची पुनश्च पडताळणी करताना अर्जदारांना एक क्यु. आर. कोड आधारित पोचपावती दिली जाणार असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 000000

बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मुल्यसाखळी विकासाचे उप प्रकल्प राबविण्यासाठी 31 मार्च पर्यंत अर्ज करा - जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. ए. धकाते

सांगली, दि. २४, (जि. मा. का.) : बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील समुदाय आधारीत संस्थांकडून मुल्यसाखळी विकासाचे उप प्रकल्प राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. जाहिराती संदर्भातील माहिती, अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना इ. माहिती https://www.smart-mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट घ्यावी. त्यामध्ये माहिती भरुन व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सांगली (मुख्यालय मिरज) यांच्या कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत सादर करावेत. या अगोदर ऑनलाईन अर्ज केलेल्या संस्थांनी पुनश्च: अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. ए. धकाते यांनी केले आहे. सदर अर्ज हे शेळ्या (मांस व दुध) आणि परसबागेतील कुक्कुटपालन (अंडी) यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पांसाठी आहेत. अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारित संस्थांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स इत्यादींचा समावेश असल्याचे डॉ. धकाते यांनी सांगितले. 00000