गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

सात-बारा उताऱ्यावरील नाव नोंदणी, फेरफार प्रक्रिया झाली गतिमान

- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या नेतृत्त्‌वाखाली महसूल विभागाची विशेष मोहीम - अधिकार अभिलेखात नावनोंदणी होणार जलद - शेतकरी, सामान्य नागरिकांच्या पैसे व वेळेत बचत सांगली, दि. 11 (जि. मा. का.) : शेतकरी व सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचा दस्तावेज असणाऱ्या सात-बारा उताऱ्यावरील नाव नोंदणी आणि फेरफार प्रक्रिया आता गतिमान झाली आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे सांगली जिल्ह्यात फेरफार निर्गत होण्यासाठी लागणारा सरासरी कालावधी लक्षणीयरीत्या घटला आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या नेतृत्त्वाखाली उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी केलेल्या प्रभावी पाठपुराव्यामुळे वारस किंवा खरेदी विक्री, ७/१२ वर नाव नोंदविण्यात होणारा विलंब, त्या नोंदीबाबत प्राप्त हरकती, सुनावणी, निकाल यामध्ये वेळ व पैशाचा अपव्यय होऊन ७/१२ सदरी नाव नोंदणी होण्यास होणाऱ्या विलंबावर मात करता येणे शक्य झाले आहे. खरेदी विक्री, वारस आदि माध्यमातून शेतजमिनीच्या अधिकार अभिलेखामध्ये आता जलद गतीने नावनोंदणी होत असल्याने शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांची दूरदृष्यप्रणालीद्वारे साप्ताहिक बैठक घेऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले. फेरफार प्रलंबित राहण्याच्या कारणांचा सखोल आढावा घेतला व त्यातील अडचणी दूर केल्या. तालुक्यांसाठी पालक अधिकारी नेमले गेले. पूर्वी अनोंदणीकृत फेरफार (वारस नोंदी) निकाली काढण्यासाठी सरासरी १९१ दिवस लागत होते. आता ही प्रक्रिया अवघ्या ८८ दिवसांत पूर्ण होत आहे, म्हणजेच १०३ दिवसांची बचत झाली आहे. तसेच, नोंदणीकृत खरेदी दस्तांवरील हरकतींमुळे फेरफार निकाली काढण्यास लागणारा १६४ दिवसांचा कालावधी आता ९२ दिवसांवर आला आहे. अनोंदणीकृत फेरफार निकाली काढण्यासाठी २५ ऐवजी २२ दिवस, तर नोंदणीकृत दस्तांवरील फेरफार ३४ ऐवजी २८ दिवसांत पूर्ण होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचत आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवस कृती आराखडा अभियानादरम्यान फेरफार संवेदनशील विषयाबाबत कामकाज केल्याने ७/१२ वर नावाची नोंद लवकर होत असल्याने नागरिकांना समाधान, आनंद वाटत आहे. या यशस्वी मोहिमेमुळे महसूल विभागाची प्रतिमा उंचावण्यात मदत होत असून, नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास दृढ झाला आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांचे आणि महसूल विभागाच्या कार्यक्षमतेचे हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. 00000

पूरपरिस्थितीचे पंचनामे पूर्ण, नुकसानभरपाईची कार्यवाही सुरू - जिल्हाधिकारी अशोक काकडे

- बाधित शेतीपीक, फळपिकांचा नुकसानभरपाईचा अहवाल सादर - घरांची पडझड, गोठा नुकसानीच्या अनुषंगाने अनुदान वितरण सुरू - भांडी, कपडे नुकसानभरपाईपोटी 1276 बाधितांना अनुदान वाटप सुरू सांगली, दि. 11 (जि. मा. का.) : ऑगस्ट 2025 मध्ये सांगली जिल्ह्यात उद्भवलेली पूरपरिस्थिती पाहता, शेतीपिके व फळपिके, घर पडझड, गोठ्याचे नुकसान, व्यावसायिकांची दुकाने, गॅरेज, तसेच घरात पाणी शिरुन भांडी व कपड्याचे नुकसान झालेले आहे. या नागरिकांच्या पाठिशी शासन व प्रशासन असून, पंचनामे व नुकसानभरपाईची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, ऑगस्ट 2025 मध्ये जिल्ह्यात उद्भ वलेल्या पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने शेतीपीक व फळपीक पंचनामे करून अहवाल सादर करण्यात आला आहे. घरांची पडझड व गोठ्यांच्या नुकसानीच्या अनुषंगाने तालुका स्तरावर पंचनामे करण्यात आले असून, बांधकाम विभागाकडून प्राप्त होणाऱ्या मूल्यांकनाचे आधारे अनुदान वितरण करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने शेतीपीक व फळपिकाचे पंचनामे करण्यात आले आहेत. यामध्ये फळपीक सोडून बागायती पिकाखालील बाधित क्षेत्र 4048.01 हेक्टर असून बाधित शेतकऱ्यांची संख्या 13 हजार 339 आहे. नुकसान भरपाईपोटी 7 कोटी 38 लाख 72 हजार रुपये अपेक्षित आहे. फळपिकाखालील बागायत क्षेत्र 26.26 हेक्टर असून बाधित शेतकऱ्यांची संख्या 136 आहे. त्यासाठी 6 लाख 65 हजार रुपये नुकसान भरपाईपोटी अपेक्षित आहेत. असे एकूण बाधित 4074.21 हेक्टर क्षेत्र असून बाधित शेतकऱ्यांची संख्या 13 हजार 475 आहे. यासाठी नुकसान भरपाईपोटी एकूण 7 कोटी 45 लाख 37 हजार 900 रुपयांच्या निधीची मागणी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे. फळपीक सोडून जिरायत पिकाखालील बाधित क्षेत्र निरंक आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, घरांची पडझड व गोठ्याच्या नुकसानीच्या अनुषंगाने तालुका- स्तरावर पंचनामे करण्यात आले आहेत. यामध्ये 7 अंशत: पक्की घरे, 82 अंशत: कच्ची घरे व एका गोठ्याचे नुकसान झाले आहे. बांधकाम विभागाकडून प्राप्त होणाऱ्या मूल्यांकनाच्या आधारे अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यात 839 इतके दुकानदार, गॅरेज, टपरीधारक यांचे नुकसान झालेले असून त्यांचे पंचनामे करण्याचे काम तालुकास्तरावर सुरू आहे. या पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच शासनाकडे अनुदान मागणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात घरात पाणी शिरुन 1276 इतक्या बाधितांचे भांडी व कपड्याचे नुकसान झालेले असून त्यांच्या प्राप्त झालेल्या पंचनाम्याचे आधारे अनुदान वाटप करण्याची कार्यवाही चालू आहे. 00000

जिल्ह्यात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत

सांगली, दि. 11 (जि. मा. का.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार शनिवार दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.के. ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून प्रकरणे तडजोडीने मिटविण्याबाबत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गिरीजेश ग. कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. या राष्ट्रीय लोकअदातीमध्ये जिल्हा न्यायालय सांगली व सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी, कौटुंबिक वादासंबंधीची, कामगार वादाची, भू संपादनाची, मोटार अपघात नुकसान भरपाई, कौटुंबिक हिंसाचाराची, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम 138 खालील प्रकरणे, जिल्हा ग्राहक मंचासमोरील प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणात बॅंक, दूरसंचार, वीज बिल, घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची प्रकरणे ठेवता येणार आहेत, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 000000

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणार - जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली दि. 11 (जि. मा. का.) – केंद्र शासनाच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टीम म्हणजेच विंडस्‌ प्रकल्पांतर्गत सांगली जिल्ह्यातील सर्व ६९६ ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. यामुळे २४ तास हवामान निरीक्षण केले जाणार असून, इंटरनेट, मोबाईल ॲपद्वारे हवामान घटकांबाबतची माहिती उपलब्ध होणार असल्याने ही स्वयंचलित हवामान केंद्रे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. विंडस्‌ प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायत स्तरावर प्रथम प्राधान्याने शासकीय जागेत स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. यामध्ये मिरज तालुक्यात ६४, तासगाव तालुक्यात ६८, क. महांकाळ तालुक्यात ५९, जत तालुक्यात ११६, खानापूर तालुक्यात ६४, आटपाडी तालुक्यात ५३, कडेगाव तालुक्यात ५४, पलूस तालुक्यात ३३, वाळवा तालुक्यात ९४ आणि शिराळा तालुक्यात ९१ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमुळे नेहमीच शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. झालेल्या नुकसानीच्या नोंदी तात्काळ उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्र्यांना वेळेत मदत मिळत नाही. या सर्व प्रकारावर स्वयंचलित हवामान केंद्रामुळे मात करता येणार आहे. प्रशासनास अतिवृष्टीची अचूक व वेळेत माहिती मिळणार आहे. स्वयंचलित हवामान केंद्रामुळे दैनंदिन पर्जन्यमान, तापमान, वाऱ्याचा वेग इ. माहिती वेळेत मिळण्यास मदत होऊन, गावागावातील नुकसानीचा खरा अहवाल शासकीय यंत्रणेपुढे जलदतेने येण्यास मदत होणार आहे. लवकरच शासनाकडून ही केंद्रे बसवण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे ते म्हणाले. यापूर्वी केवळ महसूल मंडळ स्तरावर ही आकडेवारी उपलब्ध होत होती. स्वयंचलित हवामान केंद्रे उभारल्यानंतर ती प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध होणार आहे. या केंद्रांमुळे २४ तास हवामानाचे निरीक्षण होऊन इंटरनेट, मोबाईल ॲपद्वारे ही रिअल टाईम माहिती उपलब्ध होणार आहे. यामध्ये मानवी हस्तक्षेप राहणार नाही. प्रशासनास अतिवृष्टीची अचूक माहिती मिळणार आहे. अचानक उद्‌भवलेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती यापुढे ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध होणार असल्याने क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत होऊन बाधितांना तातडीने नुकसानभरपाई मिळण्यास मदत होणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात आल्यास चक्रीवादळ, दुष्काळ, आग, पूर, गारपीट, ढगफुटी, थंडीची लाट इत्यादि नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामानविषयक माहिती ग्रामपंचायत स्तरावरच उपलब्ध होईल. या केंद्रांमुळे पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग या हवामानविषयक घटकांची माहिती प्राप्त होते. या घटकांसंदर्भात स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे प्राप्त माहितीचा वापर एआय (AI) प्रणाली तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हवामानविषयक माहितीचे संकलन, विश्लेषण, शेतकऱ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन इत्यादि बाबींसाठी उपयुक्त ठरेल. 00000

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावे समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेस प्रतिसाद सांगली, दि. 11 (जि. मा. का.) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन केंद्र व राज्य शासनाच्या योजना गावातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून या योजनांचा लाभ त्यांना द्यावा. या अभियानाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत राज संस्था सुशासन, लोकसहभाग व शाश्वत विकासाचे आदर्श केंद्र बनेल यासाठी व गावे समृद्ध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. ऐश्वर्य मल्टिपर्पज हॉल इनाम धामणी येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना सूत्रबध्दतेने काम करण्याची संधी मिळेल. या कार्यशाळेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती घेऊन ती आपल्या गावातील तळागाळातील व्यक्तिपर्यंत पोहोचवावी. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा नीट अभ्यास करून, त्यांची गावामध्ये अंमलबजावणी करावी. शहरामध्ये असणाऱ्या विविध सोयी सुविधा गावातच मिळाल्या तर ग्रामीण नागरिकांना अधिक चांगले जीवन जगता येईल व लोक शहराकडे वळणार नाहीत. यासाठी गावे समृध्द करावीत. ग्रामपंचातींना थेट निधी दिला जात आहे. या माध्यमातून चांगली कामे करून गावे मजबूत करावीत. विविध प्रयोग करून पुढे जावे. महिला सक्षम होण्यासाठी मुलींना चांगले शिक्षण द्यावे. गावातच रोजगार निर्माण होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी करून उत्पन्न वाढीसाठी त्यांनी स्वतः गावी केलेल्या विविध प्रयोगांची माहिती दिली. यावेळी खासदार विशाल पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजना सामान्य नागरिकांपर्यत पोहोचवून गावांचा विकास करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात शशिकांत शिंदे यांनी कार्यशाळेचा हेतू विषद करून आदर्श गाव, तालुका, जिल्हा, राज्य घडविण्यासाठी शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन केले. या कार्यक्रमास गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे आजी, माजी सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

शिक्षकांनी विविध माध्यमांतून गुणवत्तावृद्धीवर भर द्यावा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

- जिल्हा शिक्षक पुरस्कार, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्कारांचे वितरण सांगली, दि. 11 (जि. मा. का.) : शिक्षणाचा गाभा, आत्मा हा विद्यार्थी आहे आणि त्याला न्याय देणारा शिक्षक आहे. शिक्षकांनी विविध माध्यमांतून शाळेची गुणवत्ता वाढवण्यावर भर द्यावा, तरच शाळेचा पट वाढेल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. माहेश्वरी गार्डन मल्टीपर्पज हॉल, सांगली येथे जिल्हा शिक्षक पुरस्कार 2025-26 व पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्कार सन 2023-24 व 2024-25 चे वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शाळेच्या भौतिक सुविधांबरोबरच शाळेमध्ये शिक्षण चांगले असणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांना चांगले प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर सेवा कालावधीत त्यांना वेतनश्रेणीचा लाभ, पुरस्कार असे सातत्याने प्रयत्न करून शिक्षक हा उत्साहात कसा राहील, तो विद्यार्थ्यांवर मेहनत घेण्यासाठीची प्रेरणा असणारा कसा राहील असा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. नवीन शिक्षण धोरणांनुसार शिक्षकांना फार मोठी भूमिका निभावावी लागणार आहे. शिक्षकांनी विविध माध्यमातून शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यातील मॉडेल स्कूल योजनेचा पॅटर्न राज्याने निवडला. सांगली जिल्ह्यात तीन टप्प्यात 449 शाळा मॉडेल स्कूल केल्या. चौथ्या टप्प्यासाठी 48 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. अनेक शाळांमध्ये सोलर पॅनेल लावण्यात आले आहेत. रोबोटिकबाबतची माहिती लहानपणापासून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सांगली जिल्ह्यातील पीएम श्री मध्ये 13 व सीएम श्री मध्ये 25 शाळांची निवड केलेली आहे. पीएम श्री मधील निवड केलेल्या शाळांसाठी केंद्रातून तर सीएम श्री मध्ये निवड केलेल्या शाळासाठी राज्य शासनाचा निधी येतो. या माध्यमातून शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. प्रामुख्याने बालवाडी, प्राथमिक, व माध्यमिकमध्ये इयत्ता 5 वी व 6 वी यावर सर्वांनी विशेष लक्ष केंद्रित करावे. सद्या क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यास मोठा वाव आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवर पदक प्राप्त खेळाडूंना विविध सवलती देण्यात आल्या आहेत. खेळाडूंनी मन लावून देशासाठी खेळून देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे, असे सांगत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षक व क्रीडापटूंना शुभेच्छा दिल्या. आमदार इद्रिस नायकवडी म्हणाले, ज्यावेळी शिक्षक म्हणून रूजू होतो तोच त्यांचा पुरस्कार असतो. शिक्षक पुरस्कार देताना शिक्षक म्हणून रूजू झाल्यानंतर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले त्या ठिकाणी त्यांनी शाळेचा किती पट वाढविला या निकषाचा शिक्षक पुरस्कार निवडीसाठी समावेश होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. शिक्षक पुरस्कार प्राप्त उपशिक्षक गोपाल पाटसुपे व क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षक विजयकुमार शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्कार 2025-26 व पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्कार सन 2023-24 व 2024-25 चे वितरण करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्‍ते दीप प्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त शिक्षक, खेळाडू यांच्यासह त्यांचे नातेवाईक तसेच शिक्षक, शिक्षिका, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्रस्तावित कामांची प्रशासकीय मान्यता 25 सप्टेंबरपर्यंत घ्यावी - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

- राज्यस्तरीय यंत्रणांच्या कामकाजाचा घेतला आढावा - सन 2024-25 ची दायित्व मागणी सात दिवसात करण्याचे निर्देश सांगली, दि. 11 (जि. मा. का.) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) व जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत सन 2025-26 च्या प्रशासकीय मान्यता 30 सप्टेंबरपूर्वी द्यावयाच्या आहेत. त्यामुळे सर्व राज्यस्तरीय कार्यान्वयीन यंत्रणानी पालकमंत्री कार्यालयाच्या समन्वयाने आपले परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडे 19 सप्टेंबरपर्यंत सादर करावेत व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही 25 सप्टेंबरपूर्वी पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले. जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत विविध राज्यस्तरीय यंत्रणांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह विविध राज्यस्तरीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षात सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्रातील योजना मिळून एकूण 632 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र व विकसित सांगली जिल्हा यांच्या अनुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेतील प्रस्तावित कामे जिल्हा विकास आराखड्याला नजरेसमोर ठेवून करावीत. सर्व राज्यस्तर कार्यान्वयीन यंत्रणानी पालकमंत्री कार्यालयाच्या समन्वयाने आपले परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडे 19 सप्टेंबरपर्यंत सादर करावेत व 25 सप्टेंबरपूर्वी प्रशासकीय मान्यता घ्यावी अन्यथा त्याबाबतची जबाबदारी संबंधित यंत्रणेची राहील. तसेच, सन 2024-25 ची दायित्व मागणी सात दिवसात करावी. यासाठी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा व याबाबतचा साप्ताहिक प्रगती अहवाल आपणास सादर करावा, असे त्यांनी सूचित केले. यावेळी विविध विषयांचा आढावा घेताना महत्त्वाकांक्षी 10 कोटी वृक्षलागवडीची उद्दिष्टपूर्ती संबंधित यंत्रणांनी विहित वेळेत पूर्ण करावी. उद्योजकांचे प्रश्न व ड्राय पोर्ट आदि प्रश्नी पुढील आठवडाभरात स्वतंत्र बैठक आयोजित करावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या. तसेच, जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिवाळीपर्यंत तयार केलेल्या वस्तु आपण खरेदी करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी नैसर्गिक आपत्ती मदत अहवाल, स्वयंचलित हवामान केंद्रे, जिल्ह्याचा जीडीपी वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न, 10 कोटी वृक्षलागवडींतर्गत जिल्ह्याची उद्दिष्टपूर्ती, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी घेतलेले शिबिर व त्यांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन आदिंबाबत माहिती दिली. जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी सादरीकरण केले. राज्यस्तरीय यंत्रणांच्या प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर केली. 00000