बुधवार, २३ सप्टेंबर, २०२६
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पाडण्यासाठी समन्वय ठेवावा -जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष शासकीय कार्यालय प्रमुख, राजकीय पक्षांच्या बैठकीत सूचना
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६
आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे,
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पाडण्यासाठी समन्वय ठेवावा
-जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
शासकीय कार्यालय प्रमुख, राजकीय पक्षांच्या बैठकीत सूचना
सांगली, दि. 23 (जि. मा. का.) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुषंगाने दि. २२ सप्टेंबर २०२६ पासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत, निःपक्षपातीपणे व पारदर्शकपणे पार पाडण्याच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आयोजित सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे सावंत यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील राजकीय पक्षांचे, आचारसंहितेचा भंग होईल असे जाहिरात फलक, मालमत्ता विरूपण कायद्याचे उल्लंघन करणारे होर्डिंग्ज, भित्तीपत्रके, भिंतींवरील मजकूर तत्काळ काढण्याचे निर्देश
देऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, शासकीय कार्यालयांनी विविध कामकाजात आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. मतदारांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव टाकणारी कोणतीही धोरणात्मक घोषणा किंवा कार्यक्रम, निवडणूक पूर्ण होईपर्यंत कोणत्याही सरकारी विभागामार्फत सुरू करता येणार नाही, याची नोंद घेऊन कामकाज करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, मतदारांना कुठल्याही प्रकारचे प्रलोभन दिले जाणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी कटाक्षाने काळजी घ्यावी, आचारसंहितेची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी निवडणुकीसाठी नियुक्त सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा, असे त्यांनी सांगितले.
राजकीय पक्षांचीही घेतली बैठक
दरम्यान, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ चा कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचीही बैठक घेण्यात आली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी निवडणुकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या 28 डिसेंबर 2016 च्या पत्रानुसार राज्य विधानपरिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघ तसेच स्थानिक प्राधिकरण मतदारसंघांमधून होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुका तसेच पोटनिवडणुकांना राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या सर्व तरतुदी आवश्यक त्या फेरफारांसह लागू राहतील. याचबरोबर आयोगाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या विविध सूचनांचेही तंतोतंत पालन करावे, असे त्यांनी सूचित केले.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे सावंत यांनी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ चा निवडणूक कार्यक्रम व आदर्श आचारसंहिता, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, 12 जानेवारी रोजी प्रसिद्ध मतदार यादीतील मतदारसंख्या, पुरवणी मतदार यादी, अंतिम मतदार याद्यांच्या अनुषंगाने सविस्तर माहिती सांगितली. या निवडणुकीत मतदान करता यावे म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत नवीन मतदार नोंदणीसाठीच्या दाखल अर्जांवर कार्यवाही करता येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, जिल्हा स्तरावर माध्यम प्रमाणिकरण व माध्यम संनियंत्रण समितीकडून इलेक्ट्रॉनिक माध्यमे व समाजमाध्यमांवरील जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण करून घेण्याबाबत यावेळी सूचित करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा