सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२६

सेवा संकल्प कार्यक्रमांतर्गत तासगाव येथे अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृती

- अंधश्रद्धेला बळी न पडता डोळसपणे विचार करण्याचे विद्यार्थिनींना आवाहन सांगली, दि. 5 (जि. मा. का.) : समाजामध्ये अंधश्रद्धा, नरबळी तसेच अमानुष व अघोरी प्रथांना कोणतेही स्थान नसून, अशा प्रथांविरोधात कायद्याची माहिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जनजागृती होणे आवश्यक आहे. विद्यार्थिनींनी अंधश्रद्धेला बळी न पडता प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहावे, असे आवाहन समतादूत सविता पाटील यांनी केले. तासगाव येथील सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह येथे सेवा संकल्प कार्यक्रमांतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन तसेच नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी व दृष्ट प्रथा प्रतिबंध व निर्मूलन कायद्याबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून समतादूत सविता पाटील उपस्थित होत्या. यावेळी सविता पाटील यांनी सेवा संकल्प कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थिनींना दिली. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन, नरबळी प्रतिबंध आणि अमानुष अघोरी प्रथांविरोधातील कायदेशीर तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. समाजात अंधश्रद्धेमुळे होणारे गैरप्रकार, फसवणूक आणि नागरिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. कोणत्याही अफवा, अघोरी प्रथा किंवा अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता त्यामागील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थिनींनी स्वतः जागरूक राहून कुटुंब व समाजामध्येही अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान स्वच्छता अभियानाचेही आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत परिसर स्वच्छ केला. स्वच्छता, सामाजिक जाणीव आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. वसतिगृहाच्या अधीक्षिका ऋचा राजपूत यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनींनी जीवनातील प्रत्येक बाबीकडे डोळसपणे पाहावे, योग्य-अयोग्य यातील फरक समजून घ्यावा आणि अंधश्रद्धेपासून दूर राहावे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृहातील विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वसतिगृहातील कर्मचारी तसेच विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, कायदेविषयक जागरूकता, स्वच्छता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबत सकारात्मक संदेश पोहोचला. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा