शुक्रवार, १२ मे, २०२३
व्यसनमुक्त होण्यासाठी प्रयत्न करा - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे
तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती होणे गरजेचे
सांगली दि. 12 (जि.मा.का.) : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे मुख कर्करोग होतो. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफुस, गळा, अन्ननलिका, मुत्राशय तसेच नाक, पोट, गर्भाशय मुखाचा कॅन्सर होतो. त्याचबरोबर इतर विविध आजार व उपचार न करता येणारा अल्सर यासारखे आजार उद्भवतात. यामुळे तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती होणे गरजेचे आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करावा. पुढील पिढी सुदृढ, व्यसनमुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत व सांगली जिल्हा तंबाखू मुक्त करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त 1 ते 31 मे 2023 या कालावधीत तंबाखू विरोधी जनजागृतीपर विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडविण्यासाठी उपजिल्हा रूग्णालय शिराळा, इस्लामपूर, कवठेमहांकाळ तसेच ग्रामीण रूग्णालय कडेगाव, पलूस, विटा, तासगाव, आटपाडी व जिल्हास्तरावर तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले असून तंबाखू सेवन सोडविण्यासाठी तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्राची अथवा 1800-11-2356 या Quit Line ची सहाय्यता घ्यावी. जागतिक प्रौढ तंबाखू निरीक्षण २०१६-१७ (Gats) नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांचे प्रमाण हे तरूण पिढीमध्ये वाढत चालले असून तंबाखूमुळे होणाऱ्या विविध कर्करोगांची जनजागृती करणे गरजेचे आहे.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ उत्पादन कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी व शालेय परिसरात दंडात्मक कारवाई करण्यात येते. कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी आहे. कलम ५ नुसार तंबाखू जन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी, कलम ६ (अ) नुसार १८ वर्षाखालील व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी, कलम ६(ब) नुसार सर्व शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी व कलम ७ नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या वेष्टनावर केंद्र शासनाने निर्देशित केलेल्या आरोग्याबाबतीत धोक्याची सुचना छापणे (८० टक्के भाग व्यापलेला असावा).
०००००
एस.एस.बी. परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी नाशिक येथे मोफत प्रशिक्षण
सांगली दि. 12 (जि.मा.का.) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 29 मे 2023 ते 7 जून 2023 या कालावधीत SSB कोर्स क्र. 53 आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली येथे दि. 23 मे 2023 रोजी मुलाखतीस हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सांगली यांनी केले आहे.
उमेदवारांनी मुलाखतीस येतेवेळी फेसबुक पेज वर Department of Sainik Welfare, Pune (DSW) वर सर्च करून त्यामधील SSB-53 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट केलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे. केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेवून यावे. कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी C सर्टिफिकेट A किंवा B ग्रेडमध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry Scheme साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे प्रत्यक्ष अथवा pctcoic@yahoo.in व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 वर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सांगली यांनी केले आहे.
०००००
‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ
मुंबई, दि. 12 : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या (दि.१३ मे) सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता.पाटण) येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत.
राज्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. राज्यभर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षामार्फत राज्यातील अभियानाचे समन्वयन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी या अभियानाचे प्रमुख आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्हा आणि तालुकास्तरावर देखील जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर २ दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महारोजगार मेळावा, मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन
‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने दौलतनगर येथे बेरोजगार युवक-युवतींकरिता ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या परिसरातील युवावर्गाला ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या निमित्ताने रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘मोफत महाआरोग्य शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरातून गरजू रुग्णांच्या विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम, महारोजगार मेळावा आणि महाआरोग्य शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
००००
सोमवार, ८ मे, २०२३
आपत्तीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील
1 जूनपासून नियंत्रण कक्ष सुरू करावेत
सांगली दि. 8 (जि.मा.का.) : यंदाच्या पावसाळ्यात पूर परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी आवश्यक उपाय योजना आतापासून करुया, संभाव्य आपत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची खबरदारी घेऊया, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील यांनी मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीस महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, उपविभागीय अधिकारी संतोष भोर, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. किरण पराग, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्यासह सर्व तहसिलदार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यंदाच्या पावसाळ्यात पूर परिस्थिती उद्भवल्यास आणि पुरामुळे पाणी पुरवठा योजना बाधित झाल्यास अशा गावामध्ये पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी. आवश्यक तेथे टँकर सुरू करण्यासाठी आता पासून नियोजन करावे. आरोग्य विभागाने साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी औषध फवारणी करावी. पुरेसा औषध साठा उपलब्ध करून ठेवावा. पूर प्रवण गावांमध्ये आपत्कालीन हि साहित्य सुस्थितीत असल्याची खातरजमा करावी. संभाव्य आपत्ती, पूर परिस्थितीमध्ये करावयाचे कामाचे गावनिहाय आराखडे तयार करावेत. नदीकाठच्या गावांमध्ये मदत व बचाव कार्य याबाबतची प्रात्यक्षिके घेण्यात यावीत. यामध्ये स्थानिक स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्थांचा सहभाग घ्यावा. आपत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची खबरदारी यंत्रणांनी घ्यावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी यावेळी यंत्रणांना दिल्या.
पूर परिस्थिती उद्भवणाऱ्या गावांमध्ये तात्पुरती निवारा केंद्र कार्यान्वीत करण्यासाठी नियोजन करावे. यापूर्वी ज्या गावांमध्ये केंद्रे कार्यान्वित करण्यात आली होती अशा केंद्राची पहाणी करुन ती सुस्थितीत ठेवण्याचे नियोजन करावे. संभाव्य पूर परिस्थितीत पूरग्रस्तांना अन्य ठिकाणाहून येणाऱ्या मदतीचे सनियंत्रण करण्यासाठी अधिकारी नियुक्तीसाठी आवश्यक कार्यवाही करावी. संभाव्य पूरामुळे बाधित होणारी जनावरे यांची माहिती पशुसंवर्धन विभागाने संकलीत करावे. या जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्धतेबाबत कृषी विभागाने नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात ज्या ठिकाणी चारा पैदास केला जातो याची माहिती कृषी विभागाने तयार करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
यंदाच्या पावसाळ्यात पाऊस, पूर यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी. रस्त्यावर पडणाऱ्या झाडामुळे वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी उपाययोजना करुन यासाठी पथके तयार करावीत. पूरग्रस्त भागातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावा, अशा सूचना करुन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, जलसंपदा विभागाने धरणातील पाणीसाठा, विसर्ग, नद्यांची पाणी पातळी याबाबतची माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा.
महानगरपालिकेने धोकादायक इमारतींबाबत आवश्यक कार्यवाही करावी. नाले सफाई, स्थानिक हेल्पलाईन क्रमांक, तात्पुरती निवारा केंद्रे, पूर परिस्थिती उद्भवल्यास नागरीकांचे स्थलांतर करणे याबाबत आवश्यक उपाय योजना कराव्यात. महाराष्ट्र राज्यविद्युत वितरण कंपनीने ट्रान्स्फॉर्मर खराब झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी पथके गठीत करावीत. आपत्तीच्या काळात विद्युत पुरवठा सुरळीत सुरु ठेवण्याची नियोजन करावे. संभाव्य पूर परिस्थितीत पोलीस विभागाने आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवावा. ग्रामपंचायत विभागाने नदीकाठच्या गावांना देण्यात आलेल्या बोटी व अन्य साहित्य सुस्थितीत असल्याची खातरजमा करुन त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावा अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
00000
रविवार, ७ मे, २०२३
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत महानिर्मितीचे ७.५६ मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत महानिर्मितीचे ७.५६ मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित
नागेवाडी ४.२० मेगावाट, वालेखिंडी ३.३६ मेगावाट
८ गावांतील २२०० कृषी वीज ग्राहकांना योजनेचा लाभ
१०.६ मेगावाटचे तीन सौर ऊर्जा प्रकल्प अंतिम टप्प्यात
नागपूर ७ मे २०२३ : रात्री सिंचन करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते त्यामुळे शेतीसाठी दिवसा भरवशाचा वीज पुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाने जून २०१७ मध्ये महत्वाकांक्षी “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली. त्यात ७.५६ मेगावाटचे दोन सौर ऊर्जा प्रकल्प ५ मे २०२३ रोजी कार्यान्वित करण्यात महानिर्मितीला यश आले आहे.
नागेवाडी – स्थापित क्षमता ४.२ मेगावाट :
नागेवाडी तालुका तासगांव जिल्हा सांगली या सौर प्रकल्पामुळे नजीकच्या चार गावांना नागेवाडी, अंजनी, वडगांव आणि लोकरेवाडी या गावातील सुमारे १२०० ते १३०० वीज ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. सदर प्रकल्प महावितरणच्या ३३/११ के.व्ही. अंजनी नागेवाडी उपकेंद्राला जोडण्यात आला आहे. सुमारे १० हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून, प्रकल्प उभारणीचा खर्च १५ कोटी आहे. महानिर्मिती, मेसर्स ई.ई.एस.एल.(विकासक), मेसर्स टाटा (सब व्हेंडर) आहेत.
वालेखिंडी – स्थापित क्षमता ३.३६ मेगावाट :
वालेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली या सौर प्रकल्पामुळे नजीकच्या चार गावांना वालेखिंडी, बेवनूर, सिंदेवाडी आणि नवलेवाडी या गावांतील सुमारे एक हजार कृषी वीज ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. सुमारे ८ हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून, प्रकल्प उभारणीचा खर्च १२ कोटी आहे. महानिर्मिती, मेसर्स ई.ई.एस.एल.(विकासक), मेसर्स टाटा (सब व्हेंडर) आहेत. नजीकच्या महावितरणच्या ३३/११ के.व्ही. वालेखिंडी उपकेंद्राला सदर प्रकल्प जोडण्यात आला आहे.
या दोन सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे स्थानिक पातळीवर प्रत्येकी १० ते १५ व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. सौर ऊर्जेद्वारे मिळणारी वीज सुमारे रु.३.३० प्रती युनिट दराने मिळणार असून महावितरण समवेत वीज खरेदी करार करण्यात आला आहे.
आगामी काही महिन्यात महानिर्मितीचे बोर्गी(जिल्हा-सांगली) २ मेगावाट, कुंभोज(जिल्हा-कोल्हापूर) ४.४ मेगावाट, सोनगाव(जिल्हा-सातारा) ४.२ मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत.
आजघडीला महानिर्मितीच्या एकूण ३६७.४२ मेगावाट स्थापित क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज उत्पादन होत आहे.
मा.उप मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांचे निर्देशानुसार तसेच महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी. अनबलगन यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच १०० मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी विकासकाला इरादा पत्र देण्यात आले आहे तसेच आर्थिक वर्ष २०२३-२०२४ करिता सुमारे १ हजार मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्पांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून संचालक(प्रकल्प) आणि संपूर्ण सौर प्रकल्प चमू यासाठी परिश्रम घेत आहेत.
00000
शुक्रवार, ५ मे, २०२३
नदी स्वच्छ, सुंदर, प्रदुषण मुक्त व अमृत वाहिनी करण्यासाठी दुषित पाणी नदीमध्ये जावू न देणे काळाची गरज - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : नदी स्वच्छ, सुंदर, प्रदुषण मुक्त व अमृत वाहिनी करण्यासाठी दुषित पाणी नदीमध्ये जावू न देणे, नदीची स्वच्छता ठेवणे ही काळाची गरज आहे. यासाठी आवश्यक ती दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणुया नदीला या अभियानांतर्गत कृष्णा नदीच्या तीरावर माईघाट सांगली येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते कलश पुजन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, उपवनसंरक्षक निता कट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, जलसंपदा विभगाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, जलबिरादरी महाराष्ट्र राज्य नरेंद्र चुग आदि उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, गेल्या काही वर्षातील पर्जन्याच्या विचलनामुळे कधी अनावृष्टी तर कधी अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पूर आणि दुष्काळ यासारख्या समस्या भेडसावत आहेत. त्याचा शेती उत्पादनावरही विपरीत परिणाम होत आहे. वाढते नागरीकरण व औद्योगिकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला आहे. नद्यांमध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन व साठवण क्षमता कमी झाली आहे. या बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी चला जाणूया नदीला या अभियानाखाली नदी संवाद यात्रेची सुरूवात करण्यात आली आहे. संबंधित यंत्रणांनी नदीला जाणून घेवून समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. या अभियानासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. शासन यासाठी कुठेही कमी पडणार नाही. नदी स्वच्छ, सुंदर करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. त्यासाठी या उपक्रमास नागरिकांनीही त्यांचे योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपवनसंरक्षक निता कट्टे व श्री. नरेंद्र चुग यांनी मनोगत व्यक्त करताना चला जाणुया नदीला या अभियानाचा हेतू विशद करून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
प्रारंभी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते कृष्णा, माणगंगा, कोरडा, महाकाली, येरळा, अग्रणी व तिळगंगा या सात नद्यांचे कलश पुजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी जलप्रतिज्ञा घेतली. शेवटी या सर्व कलशांचे कृष्णा नदी मध्ये विसर्जन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले. सूत्रसंचालन संगीता मोरे यांनी केले.
या कार्यक्रमास प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री. अवताडे, चला जाणुया नदीला अभियानाचे जिल्हा समन्वयक डॉ. रविंद्र व्होरा, कृष्णा नदी समन्वयक डॉ. मनोज पाटील, अग्रणी नदी समन्वयक अंकुश नारायणकर, महांकाली नदी समन्वयक सागर पाटील, तिळगंगा नदी समन्वयक प्रकाश पाटील, येरळा नदी समन्वयक संपतराव पवार, जाई कुलकर्णी, कोरडा नदी केंद्रस्थ अधिकारी सचिन पवार, माणगंगा नदी केंद्रस्थ अधिकारी अभिनंदन हरगुडे, येरळा नदी केंद्रस्थ अधिकारी डी. एस. साहुत्रे, सांगली पाटबंधारे विभागाच्या सहायक अधीक्षक अभियंता तृप्ती मुकुर्णे, उपकार्यकारी अभियंता श्वेता दबडे, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, नागरिक उपस्थित होते.
00000
बुधवार, ३ मे, २०२३
सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी जिल्हा प्रशासन सातत्याने संपर्कात जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नाला यश : अडकलेले नागरिक परत येण्यास सुरूवात
सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांमध्ये केनान शुगर कंपनी लि. मध्ये कार्यरत असलेल्या सांगली जिल्ह्यातील 100 ते 120 नागरिकांशी जिल्हा प्रशासन सातत्याने त्यांच्याशी संपर्क ठेवून आहे. येथील सर्व नागरिक सुखरूप असून भारत सरकारच्या ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुमारे 95 नागरिकांची पहिली बॅच भारतीय वायुसेनेच्या विमानाने पोर्ट सुदान ते जेधाह (सौदी अरेबिया) व जेधाह ते मुंबई असा प्रवास करून भारतात परत आलेली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 7 नागरिकांचा समावेश आहे. सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी व त्यांना सुखरूपपणे परत आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहे. यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्यावर अधिकाऱ्यांची नियुक्तीही जिल्हा प्रशासनाने केली आहे.
सांगलीचे जिल्हाधिकारी कार्यालय सध्या सुदानमधील केनाना शुगर कंपनी लि.मध्ये कार्यरत असलेल्या भारतीय प्रवासी गटा सोबत संपर्कात आहे. येथे साधारण 400 भारतीय नागरिक कार्यरत असतात आणि त्यापैकी 100 ते 120 नागरिक हे सांगली जिल्ह्याचे आहेत असे कळते. नागरिकांनी स्थलांतराच्या समस्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि केनाना साखर कारखान्याच्या साईटवरून पोर्ट सुदान आणि पुढे त्यांच्या सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्याची विनंती त्यांनी भारतीय दूतावासाला केली आहे.
एक्सपॅट्सच्या म्हणण्यानुसार, केनाना शुगर कंपनी लि. सर्व भारतीयांना सोडण्यास तयार आहे, परंतु कंपनीकडे सध्या त्यांना कंपनीच्या ठिकाणाहून पोर्ट सुदानपर्यंत नेण्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही, जे सुमारे 1200 कि.मी. दूर आहेत. कंपनीने सुचवले आहे की, प्रवाशांनी त्यांच्या समस्येबद्दल भारतीय दूतावासाला कळवावे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाने हे प्रकरण गांभीर्याने व संवेदनशिलपणे घेत केनाना साखर कारखाना साईट ते पोर्ट सुदान आणि पुढे जाणाऱ्या भारतीयांसाठी सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक संपर्क भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे. त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने सुदानमध्ये आपल्या नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली मार्फत झालेल्या पाठपुराव्यानुसार सुदान देशातील शुगर फॅक्टरीत अडकलेल्या 370 भारतीयांपैकी 95 लोकांची पहिली बॅच भारताकडे आली आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील तानाजी पाटील, जितेंद्र डोळ, सागर जाधव, संदीप खराडे, राजू भुजबळकर, राजाराम पाटील, श्रीकांत पाटील यांचा समावेश आहे.
यातील तानाजी पाटील (रा. सुर्यगांव, ता. पलूस) यांच्याशी संपर्क झाला असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सुदानमध्ये अडकलेले नागरिक सुखरूप आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालय सातत्याने नागरिकांच्या संपर्कात आहे. भारतीय दुतावास सर्वोतोपरी मदत करत असून नागरिकांना इर्मजन्सी पासपोर्ट उपलब्ध करून देण्यात येत आहे. भारतीय वायूसेनेच्या विमानाने आम्हाला भारतात आणले असून आमचा प्रवास सुखरूप झाला आहे. आज सायंकाळी दुसरी बॅच सुदानमधून बाहेर पडत असून त्यात जिल्ह्यातील 15 ते 20 नागरिकांचा समावेश असेल. जवळपास 400 पैकी 300 नागरिक सुदानमधून बाहेर पडणार असून 70 ते 75 नागरिक स्वत:च्या जबाबदारीवर सुदानमध्येच राहण्याच्या तयारीत आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाने सातत्याने संपर्क ठेवत दिलेला धीर व केलेल्या मदतीबद्दल यावेळी त्यांनी अत्यंत कृतज्ञता व्यक्त केली.
०००००
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)