मंगळवार, २८ मार्च, २०२३

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते वितरण

सांगली दि. 28 (जि.मा.का.) :- महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांच्यासह महिला व बाल विकास क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उपस्थित होत्या. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते लता विष्णू पाटील (विश्रामबाग सांगली), शोभाताई निवृर्ती होनमाने (देवराष्ट्रे), सविता विश्वनाथ डांगे (उरूण इस्लामपूर) आणि डॉ. निर्मला सुधीर पाटील (उत्तर शिवाजीनगर सांगली) या महिलांचा सन्मान करण्यात आला. 10 हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमात सांगली जिल्हा कृषी महोत्सवात घेण्यात आलेल्या पौष्टीक तृणधान्य पाककला स्पर्धेतील विजेत्या अपर्णा कोडलकर, मीना हेमंत चौगुले, डॉ. वैशाली दिलीप माने यांनाही पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच कोरोनामध्ये दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना 10 लाख रूपये त्यांच्या नावे बँकेत जमा केल्याबाबतच्या पासबुकाचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. ००००००

प्रतिक्षा बागडीने जिल्ह्याचा क्रीडा लौकिक वाढविला - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 28 (जि.मा.का.) :- सांगली जिल्ह्याची कन्या प्रतिक्षा बागडी हिने पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजयश्री मिळवून मानाची गदा पटकावून क्रीडा क्षेत्रात सांगली जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी तिला वैयक्तिक एक लाखाचा धनादेश देऊन गौरविले. ‍ ऑलम्पिक स्पर्धेस व भावी कारकिर्दीस पालकमंत्री डॉ. खाडे यांनी प्रतिक्षा बागडीला शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार उपस्थित होते. ०००००

सामान्य माणसाला आनंद देणारा आनंदाचा शिधा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 28 (जि.मा.का.) :- राज्य शासन सर्व सामान्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेत असून आनंदाचा शिधा वितरण या निर्णयामुळे सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे, असा विश्वास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री डॉ. खाडे यांच्याहस्ते 100 फुटी रोड येथील शासनमान्य रास्त भाव दुकान येथे पात्र लाभार्थीना आनंदाचा शिधा संचाचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी महापालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थींना आनंदाचा शिधा वितरीत केला जाणार आहे. आनंदाचा शिधा संचात एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेलाचा समावेश असून प्रतिसंच मात्र 100 रूपये या सवलतीच्या दराने पात्र मिळणार आहे. शिधा गुढी पाडव्यापासून एक महिन्यात वितरीत केला जाणार आहे. 00000

मिरज दर्गा येथे आवश्यक सुविधांसाठी सर्व समावेशक आराखडा सादर करा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 28 (जि.मा.का.) : मिरज येथील ख्वाजा शमशोद्दीन मिरासाहेब दर्गा या ठिकाणी येणाऱ्या भाविक व पर्यटकांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दर्ग्याचा आणि मिरज येथील सर्व अल्पसंख्यांक समाजाच्या धार्मिक स्थळांच्या विकासासाठी सर्व समावेशक विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज दिल्या. मिरज येथील ख्वाजा शमशोद्दीन मिरासाहेब दर्गा हा सुमारे 600 वर्षापूर्वीचा असून दर्ग्याच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल न करता सौंदर्य व पावित्र्य याचा समतोल राखत नवीन विकास आराखडा येत्या दोन आठवड्यात सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. ख्वाजा शमशोद्दीन मिरासाहेब दर्गा व अल्पसंख्यांक समाजाच्या धार्मिक स्थळे विकसित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस पालकमंत्री डॉ. खाडे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, विकास आराखडा करताना दर्ग्याकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांच्या कामाचा दर्जा सुधारावा. दर्ग्यासमोरील अतिक्रमणे काढावीत. आराखड्यामध्ये वाहनतळ, सर्व सोयीयुक्त यात्री निवास, नगारखाना, प्रवेशव्दार व कमान, फायर फायटिंग, सोलर सिस्टिम, अंडरग्राउंड वायरिंग, चौक सुशोभिकरण व दर्ग्याच्या शेजारी असणाऱ्या सरपंच कार्यालयाचे नूतनीकरण या बाबीनाही प्राधान्य द्यावे. याबरोबरच इदगाह मैदान, खासबाग परिसर, अनुभव मंडप, तंतूवाद्य भवन, चर्मकार समाज भवन आदी बाबींचा सर्व समावेशक विकास आराखडा समावेश करावा. जैन समाजाच्या मुलांसाठी असलेल्या वस्तीगृहाची दुरुस्ती व दीपस्तंभ, ख्रिचन समाज स्मशान भूमी व पंढरपूर रोडवर असणाऱ्या चर्च परिसरातील दुरुस्तीची कामे आराखड्यात प्राधान्याने समाविष्ट करावीत, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या. 00000

नद्यांमध्ये सांडपाणी मिसळून प्रदूषण करणाऱ्या कारखाने, कंपन्या, यंत्रणांवर कठोर कारवाई करणार - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 28 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील नद्यांमध्ये सांडपाणी मिसळून प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या कारखाने, कंपन्या, यंत्रणा यांची कोणत्याही स्थितीत गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. कृष्णा नदीत 10 मार्च 2023 रोजी मोठ्या प्रमाणावर मासे मृत्यूमुखी पडले, या घटनेला जबाबदार असणाऱ्या घटकांचा व त्यावरील केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रदूषण नियंत्रण महामंडळ व प्रशासकीय यंत्रणा यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री. औताडे यांच्यासह सबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. कृष्णा नदीत सोडण्यात येत असलेल्या प्रदूषीत पाण्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, महानगरपालिकेच्या पंपहाऊसमधील पंप वारंवार बंद पडत असल्याने प्रदूषित पाणी थेट नदीत सोडले जाते. परिणामी गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर नदीतील मासे मृत्यूमुखी पडले. ही अत्यंत दुर्देवी घटना असून नागरिकांच्या आरोग्यालाही यातून मोठ्या प्रमाणावर धोका संभवू शकतो. त्यामुळे या प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या यंत्रणा, वरिष्ठ अधिकारी यांच्यावरच कठोर कारवाई करण्यात यावी. गेल्या अनेक वर्षापासून शेरीनाल्यावरील एसटीपी प्लाँट चे काम सुरू आहे. सदरचा प्लाँट तात्काळ पूर्ण करून सांडपाणी नदीत मिसळण्याचा प्रश्न गांर्भियाने सोडविणे आवश्यक आहे. प्रदूषित पाणी नदीत मिसळू नये यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना त्वरीत करा. सन 2022-23 आणि 2023-24 मध्ये प्रदूषण टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा अहवाल महानगरपालिकेकडील यंत्रणांनी तात्काळ सादर करावा. महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सदैव सज्ज असणे आवश्यक आहे. नदी प्रदूषणासाठी जबाबदाऱ्या असणाऱ्या घटकांना प्रदूषण नियंत्रण मंडळासह जिल्हा प्रशासनानेही नोटीसा बजावाव्यात. यावेळी त्यांनी सावळी येथील भूजल प्रदूषणाबाबतही चर्चा केली. जिल्ह्यात नदी प्रदूषण करणाऱ्या तसेच हवा प्रदूषण करणाऱ्या घटकांचा प्रदूषण नियंत्रण महामंडळाने स्पेशल ड्राईव्ह घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 00000

सोमवार, २७ मार्च, २०२३

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मालगाव येथे आनंदाचा शिधा संचाचे वितरण

सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : राज्य शासनाने गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थींना आनंदाचा शिधा वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने ‍मिरज तालुक्यातील मालगाव येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते आनंदाचा शिधा संचाचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील पात्र लाभार्थींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी केले. आनंदाचा शिधा संच वितरण कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, मिरज प्रांताधिकारी डॉ. समीर शिंगटे, तहसिलदार डी. एस. कुंभार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल यांच्यासह मालगाव व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, गेल्या वर्षी दिवाळी सणानिमित्त शासनाने अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थींना आनंदाचा शिधा संच वितरीत केला. याच धर्तीवर गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वितरीत करण्याचा शासन निर्णय घेतला आहे. या आनंदाच्या शिधामध्ये एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेल या बाबींचा समावेश आहे. आनंदाचा शिधा प्रतिसंच मात्र 100 रूपये या सवलतीच्या दराने पात्र लाभार्थींना मिळणार आहे. शिधा गुडीपाडव्यापासून एक महिन्यात वितरीत करावयाचा असल्याचे ते यावेळी म्हणाले. सांगली जिल्ह्यासाठी 3 लाख 98 हजार 946 आनंदाचा शिधा संच मंजूर झाले आहेत. यामध्ये सांगली 52 हजार 205, मिरज 45 हजार 310, कवठेमहांकाळ 23 हजार 85, जत 50 हजार 365, आटपाडी 22 हजार 756, कडेगाव 24 हजार 793, खानापूर-विटा 27 हजार 294, तासगाव 40 हजार 203, पलूस 27 हजार 94, वाळवा 46 हजार 952, आष्टा 13 हजार 216 व शिराळा तालुक्यासाठी 25 हजार 673 शिधा संचाचा समावेश आहे. ०००००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतूने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविली जात आहे. या योजनेच्या लाभामुळे या घटकातील शेतकऱ्यांना शेतीसाठी शाश्वत सिंचनाची सोय होऊन त्यांची आर्थिक उन्नती साधली जाईल. या योजनेविषयी थोडक्यात..... योजनेच्या लाभासाठी पात्रता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतकरी पात्र आहेत. (लाभार्थी जवळ जातीचे प्रमाणपत्र आवश्यक). लाभार्थी शेतकऱ्यांजवळ 7/12 व 8-अ चा उतारा आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजाराच्या मर्यादेत असावे (उत्पन्नाचा दाखला आवश्यक). लाभार्थीची जमीन धारणा 0.20 हेक्टर ते सहा हेक्टर पर्यंत असावी (नवीन विहिरीच्या लाभासाठी किमान 0.40 हेक्टर क्षेत्र आवश्यक) आणि सामूहिक क्षेत्र जमीन किमान 0.40 हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब नवीन विहीर या घटकाचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील. अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर या बाबीसाठी 2 लाख 50 हजार, जुनी विहीर दुरुस्ती 50 हजार, इन वेल बोअरिंग 20 हजार, पंप संच 20 हजार, वीज जोडणी आकार 10 हजार, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण 1 लाख, सूक्ष्म सिंचन संच मध्ये ठिबकसाठी 50 हजार किंवा तुषारसाठी 25 हजार रुपये अनुदान अनुज्ञेय आहे. नवीन विहीर पंप संच, वीज जोडणी आकार, तुषार किंवा ठिबक यासाठी एकूण 3 लाख 5 हजार ते 3 लाख 30 हजार इतके पॅकेज तर जुनी विहीर दुरुस्ती, पंपसंच, वीज जोडणी आकार, तुषार किंवा ठिबक यासाठी 1 लाख 5 हजार ते 1 लाख 30 हजाराचे पॅकेज. शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण यामध्ये शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, पंपसंच, वीज जोडणी आकार, तुषार किंवा ठिबक यासाठी एकूण एक लाख 55 हजार ते एक लाख 80 हजार इतके पॅकेज. तसेच यामध्ये अर्जदाराकडे जर काही घटक उपलब्ध असतील तर उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ विहित मर्यादेत देण्यात येईल. या घटकांचा लाभ घेतल्यानंतरही लाभार्थ्याने इनवेल बोअरिंग या घटकाची मागणी केल्यास या घटकासाठी अतिरिक्त लाभ देण्यात येईल. या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा https://mahadbtmahiti.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कृषी विभाग यांच्याकडे संपर्क साधावा. जिल्हा माहिती कार्यालय, सांगली. 000000