शनिवार, १९ सप्टेंबर, २०२६

‘लोकसंवाद-2026’मधून महात्मा फुले जन आरोग्य योजनेची जनजागृती - श्रीगणेशा आरोग्याचा उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिरात नागरिकांची तपासणी; मोफत औषधोपचार

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यभरात 16 ते 24 सप्टेंबर 2026 दरम्यान राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-2026’ या विशेष जनजागृती उपक्रमांतर्गत मिरज शहरातील श्री संत रोहिदास सांगलीवेस गणेशोत्सव मंडळ येथे महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेसह आरोग्य विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. या योजनांचा पात्र नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन समतानगर प्राथमिक शहरी आरोग्य केंद्र क्र. 7 चे वैद्यकीय अधिकारी डॉ. पृथ्वीराज धनवडे यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय, सांगलीच्या वतीने तसेच श्री संत रोहिदास सांगलीवेस गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने ‘लोकसंवाद’ व ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत आयोजित आरोग्य शिबिरात डॉ. धनवडे बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाच्या प्रियांका खराडे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. पृथ्वीराज धनवडे यांनी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची सविस्तर माहिती देत पात्र लाभार्थ्यांना योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती असणे आवश्यक असून, पात्र नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. तसेच ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिरांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आरोग्य शिबिरात उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार करण्यात आले. आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती देताना जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, एचपीव्ही लसीकरण, आयुष्मान भारत कार्ड आणि आभा कार्ड याबाबतही नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. माता व बालकांचे आरोग्य, किशोरवयीन मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण तसेच आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. धनवडे यांनी केले. शासकीय आरोग्य योजना आणि आरोग्यविषयक सुविधा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या या माहितीपूर्ण उपक्रमास परिसरातील गणेशभक्त, महिला तसेच आरोग्य तपासणीसाठी आलेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 00000

लोकसंवाद-2026 मधून कुपवाडमध्ये शासकीय योजनांची जनजागृती

- विविध योजनांची माहिती देत नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन सांगली, दि. 19 (जि. मा. का.) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यभरात १६ ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष जनजागृती उपक्रमांतर्गत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील कुपवाड येथील रूद्र युथ फाऊंडेशन गणेश मंडळात विविध शासकीय योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांना देण्यात आली. शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच योजनांची माहिती आपल्या परिसरातील नागरिक, नातेवाईक आणि मित्रपरिवारापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्हा माहिती कार्यालय, सांगलीच्या वतीने तसेच रूद्र युथ फाऊंडेशन गणेश मंडळाचे अध्यक्ष रिहाल दानवाडे यांच्या सहकार्याने या लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास माजी उपमहापौर मोहन जाधव, समाज कल्याण विभागाचे संग्रामसिंह छत्रे, आरोग्य विभागाच्या सुरेखा मेश्रामकर, प्रियांका खराडे, जिल्हा चाईल्ड लाईनचे शानूर दानवडे आदी उपस्थित होते. यावेळी समाज कल्याण विभागाचे संग्रामसिंह छत्रे यांनी स्वाधार योजना, स्वयंम योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र पडताळणी, घरकुल योजना, रमाई आवास घरकुल योजना आदी योजनांची सविस्तर माहिती दिली. पात्र लाभार्थ्यांनी संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रियेची माहिती करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. महानगरपालिका आरोग्य विभागाच्या सुरेखा मेश्रामकर व प्रियांका खराडे यांनी नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आभा कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, जननी सुरक्षा योजना तसेच लसीकरण मोहिमेची माहिती देऊन नागरिकांना मार्गदर्शन केले. जिल्हा चाईल्ड लाईनचे शानूर दानवडे यांनी महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी’, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, ‘बालसंगोपन योजना’ तसेच अनाथ प्रमाणपत्र याबाबत माहिती दिली. महिला व बालकांना आपत्कालीन मदत मिळवून देण्यासाठी चाईल्ड लाईन १०९८ आणि महिला हेल्पलाईन १८१ या क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. शासकीय योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या या माहितीपूर्ण व प्रबोधनात्मक कार्यक्रमास रूद्र युथ फाऊंडेशन गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२६

लोकसंवाद उपक्रमातून शासकीय योजनांचा जागर

सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम तसेच धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राज्यभर ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम दि. 16 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, सांगली यांच्या वतीने सांगली येथील श्रीलक्ष्मीनारायण गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने शासकीय योजनांबाबत लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक व भाविक एकत्र येत असल्याने त्यांच्यापर्यंत शासकीय योजना व लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने या लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी व प्रतिनिधींनी नागरिकांशी थेट संवाद साधत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे संतोष माने यांनी कौशल्य विकास विभागाच्या विविध योजना, कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी तसेच रोजगाराच्या उपलब्ध संधींबाबत मार्गदर्शन केले. युवक-युवतींनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यांचा पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयांतर्गत कार्यरत जिल्हा चाईल्ड लाईन, सांगलीच्या आरती निडसोसे यांनी महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये चाईल्ड हेल्पलाईन 1098, महिला हेल्पलाईन 181, बालसंगोपन योजना, अनाथ प्रमाणपत्र, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आदी योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध असलेल्या विविध यंत्रणा, हेल्पलाईन क्रमांक आणि शासकीय योजनांचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. लोकसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती केवळ ऐकविण्याबरोबरच संबंधित योजनांसाठी पात्रता, उपलब्ध सुविधा आणि लाभ घेण्याच्या प्रक्रियेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या विविध प्रश्नांना प्रत्यक्ष संवादातून उत्तरे मिळण्यास मदत झाली. या कार्यक्रमास श्रीलक्ष्मीनारायण गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मनोहर सारडा, मंडळाचे पदाधिकारी, मॉडेल करिअर सेंटरचे यंग प्रोफेशनल प्रविण बनकर तसेच मोठ्या संख्येने भाविक व नागरिक उपस्थित होते. गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि शासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करणे, हा ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. 00000

गणेशोत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांचा ‘लोकसंवाद’

सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत असताना, सांगलीत याच उत्सवाच्या मंचाचा वापर जनतेच्या कल्याणासाठी आणि सामाजिक प्रबोधनासाठी करण्यात आला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यभरात १६ ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान राबवल्या जाणाऱ्या ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष उपक्रमांतर्गत, सांगलीतील नामांकित 'खोकी संघटना गणेश मंडळ' येथे शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. जिल्हा माहिती कार्यालय, सांगलीच्या वतीने आणि खोकी संघटना गणेश मंडळाचे अध्यक्ष पत्रकार दीपक चव्हाण यांच्या सहकार्याने या लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. शासकीय योजनांच्या माहितीबरोबरच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या नशामुक्त सांगली करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत खोकी संघटना गणेश मंडळाचे अध्यक्ष पत्रकार दीपक चव्हाण यांनी सामाजिक भान जपणारा त्यांच्या मंडळाच्या वतीने सादर केलेला ‘नशामुक्त सांगली’ हा सजीव देखावा शासकीय उपक्रमास उपयुक्त व प्रेरणादायी ठरला. उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. या प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे संतोष माने यांनी तरुणांसाठी असणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना आणि आगामी रोजगार मेळाव्यांची सविस्तर माहिती देत जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. महानगरपालिकेच्या प्रतिनिधी अश्विनी माने व तेजस्विनी वाघमारे यांनी नागरिकांच्या आरोग्याशी निगडित 'आभा कार्ड', 'आयुष्मान भारत कार्ड', 'जननी सुरक्षा योजना' आणि व्यसनमुक्ती मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा चाईल्ड लाईनच्या आरती निडसोसे यांनी महिला व बालकांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'लेक लाडकी', 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण', 'बालसंगोपन योजना' आणि 'अनाथ प्रमाणपत्र' याविषयी मोलाची माहिती दिली. तसेच आपत्कालीन मदतीसाठी चाईल्ड लाईन (१०९८) आणि महिला हेल्पलाईन (१८१) या क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन केले. या माहितीपूर्ण आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाला मॉडेल करिअर सेंटरचे यंग प्रोफेशनल प्रवीण बनकर, जिल्हा चाईल्ड लाईनचे शानूर दानवडे, खोकी संघटना गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२६

सांगली जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम

सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 9 सप्टेंबर 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली कार्यालयामध्ये दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य नागनाथ चौगुले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. समिती कार्यालयास प्राप्त होणाऱ्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी अधिनियम 2000 व नियम 2012 नुसार कार्यवाही करून परिपूर्ण प्रकरणात विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येते. त्रुटी असलेल्या प्रकरणांमध्ये अर्जदारांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेलवर त्रुटी अवगत करून देण्यात येतात. ज्या प्रकरणात अभिलेख तपासणी आवश्यक आहे, अशा प्रकरणांमध्ये संबंधित शाळा, तहसीलदार व आस्थापना यांना पत्र देऊन सत्यता पडताळणी अहवाल सादर करण्याबाबत अवगत करण्यात येते. त्रुटी असलेल्या प्रकरणांकरिता ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत प्रयोजननिहाय त्रुटी पूर्तता विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. संबंधित सर्व विद्यार्थी, अर्जदार व उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह समिती कार्यालयात समक्ष उपस्थित राहून त्रुटी पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगलीचे उपायुक्त तथा सदस्य नागनाथ चव्हाण यांनी केले आहे. विशेष मोहिमेचे प्रयोजननिहाय वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे : शैक्षणिक प्रयोजनासाठी त्रुटी पूर्तता करण्याची विशेष मोहीम 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शैक्षणिक प्रयोजनासाठी अभिलेख सत्यता पडताळणी मोहीम 5 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2026 या कालावधीत होणार आहे. सेवा प्रयोजनासाठी त्रुटी पूर्तता व अभिलेख सत्यता पडताळणी मोहीम 21 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत, तर निवडणूक प्रयोजनासाठी त्रुटी पूर्तता व अभिलेख सत्यता पडताळणी मोहीमही 21 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. 00000

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२६

लोकसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

- महिला व बाल विकास विभागाच्या योजनांची माहिती; - ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचा नागरिकांनी घेतला लाभ सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम 16 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सांगली येथील शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ येथे महिलांसाठीच्या विविध शासकीय योजनांबाबत लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयांतर्गत कार्यरत जिल्हा चाईल्ड लाईन सांगलीच्या आरती निडसोसे यांनी महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. चाईल्ड लाईन 1098, महिला हेल्पलाईन 181, बालसंगोपन, अनाथ प्रमाणपत्र, लेक लाडकी, लाडकी बहीण आदी योजनांबाबत त्यांनी सविस्तर माहिती देत महिलांशी संवाद साधला. उपस्थित महिलांनी विविध योजनांबाबत विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच महिलांना विभागाच्या विविध योजनांची माहिती असलेल्या पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. शासकीय योजनांचा लाभ घेताना काही अडचणी निर्माण झाल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिनस्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त 14 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत राज्यभर ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान-2026 राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ येथे आयोजित आरोग्य शिबिराचा भाविक व नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले. या कार्यक्रमास शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राहुल डूबल व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. यावेळी जिल्हा चाईल्ड लाईनचे शानुर दानवडे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 000000

सेवा संकल्पातून लोकाभिमुख प्रशासन महिनाभराचा उपक्रम ; प्रशासन जनतेच्या दारी

‘सेवा परमो धर्मः’ ही केवळ एक उक्ती नाही, तर सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची भावना आहे. शासनाच्या योजना तयार होतात, निर्णय घेतले जातात; मात्र त्यांचा खरा अर्थ तेव्हा अधोरेखित होतो, जेव्हा त्या योजनांचा लाभ गावातील सामान्य कुटुंबापर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, महिलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत आणि गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचतो. प्रशासन १७ सप्टेंबरपासून अशाच एका लोकाभिमुख अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सज्ज झाले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांचा सहभाग वाढविणे, त्यांच्या सहभागाचे कौतुक करणे आणि शासन नागरिकांच्या पाठीशी असल्याची भावना दृढ करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने, त्यांच्या कार्यकाळात ‘सेवा परमो धर्मः’ या भावनेतून सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याच्या प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध सेवा उपक्रम राबविले जात आहेत. याच भावनेतून महाराष्ट्र शासनाने १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.हे अभियान म्हणजे केवळ कार्यक्रमांची मालिका नाही. सरकारी सेवा आणि योजना सामान्य माणसाच्या अधिक जवळ नेण्याचा हा प्रयत्न आहे. कार्यालयाच्या फेऱ्या कमी होणार गावातील एखाद्या नागरिकाला प्रमाणपत्र हवे असते, शेतकऱ्याला जमिनीची नोंद अद्ययावत करायची असते किंवा एखाद्या कुटुंबाला सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असतो. अशा वेळी अनेकदा विविध कार्यालयांमध्ये जावे लागते. सेवा संकल्प अभियानात ही प्रक्रिया शक्य तितकी सोपी करण्यावर भर देण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यात ‘सेवा सेतू’ शिबिरे आयोजित करून विविध शासकीय योजनांचे लाभ पात्र नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हणजेच अनेक सेवा एकाच ठिकाणी मिळण्याची सुविधा निर्माण होणार आहे. शिबिरांच्या माध्यमातून कामांना गती या शिबिरांमध्ये फेरफार नोंदींचा निपटारा, स्वामित्व सनद, शेतपाणंद रस्ते, शिधापत्रिका, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, वनहक्क दावे, नळजोडणी, वीज जोडणी, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, आधार, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, शिकाऊ वाहनचालक परवाना, महिला बचत गट नोंदणी, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र तसेच ७/१२ आणि ८-अ नोंदी अद्ययावत करण्यासारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर—ज्या सेवेसाठी नागरिकाला वारंवार कार्यालयात जावे लागते, ती सेवा शक्य तितकी त्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न या अभियानातून होणार आहे. गावात सेवा, गावातच समाधान सेवा संकल्प अभियानाचा विशेष भर ग्रामीण भागावरही आहे. प्रत्येक गावात आणि वॉर्डात स्थानिक गरजेनुसार ‘सेवा माझे योगदान’ उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गावातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना यात सहभागी करून घेतले जाणार आहे. गाव स्वच्छ ठेवणे, नदीघाट आणि बारवांची स्वच्छता करणे, वृक्षारोपण करणे, रक्तदान करणे, आरोग्य तपासणी शिबिर घेणे, प्लास्टिकमुक्तीची जनजागृती करणे, जलसंधारण करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, रस्ते सुरक्षेबाबत जागृती करणे अशा अनेक उपक्रमांना या माध्यमातून चालना मिळणार आहे. शासनाची सेवा, समाजाचा सहभाग याचा अर्थ एकच—शासनाची सेवा आणि समाजाचा सहभाग एकत्र आला, तर गावाचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो.ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जमीन आणि महसूल विषयक कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची असतात. फेरफार नोंदी, ७/१२, ८-अ, स्वामित्व सनद, वनहक्क दावे यांसारख्या बाबी अनेकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या आहेत. वनहक्क दाव्यांच्या बाबतीत नवीन दावे स्वीकारणे, जुन्या दाव्यांमधील दुरुस्ती करणे आणि पात्र दावे निकाली काढण्याची प्रक्रिया अभियानाच्या कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.म्हणूनच सेवा संकल्प अभियानाचा लाभ गावातील नागरिकांनी आपल्या दैनंदिन गरजांशी जोडून पाहणे महत्त्वाचे आहे. अंगणवाडीतही सेवा उत्सव लहान मुले आणि त्यांच्या मातांसाठीही या अभियानांतर्गत विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘अंगणवाडी उत्सव’ अंतर्गत अंगणवाडी केंद्रांवर मुलांसोबत मातांना आमंत्रित करून महिलांना आरोग्य आणि पोषणविषयक योजनांची माहिती देण्यात येणार आहे. मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम, फळे व मिठाईचे वाटप आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याची तरतूद आहे. ग्रामीण कुटुंबाच्या आरोग्याचा पाया मजबूत करण्यासाठी आई आणि बालकाचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे अंगणवाडी उत्सव हा केवळ एक कार्यक्रम न राहता आई, बालक आणि पोषण यांना जोडणारा उपक्रम ठरतो. गावातील तरुणांच्या कल्पनांना नवे व्यासपीठ आज ग्रामीण भागातील तरुणांकडे अनेक चांगल्या कल्पना आहेत. शेती, पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांत ते नवे प्रयोग करू शकतात. योग्य संधी आणि व्यासपीठ मिळाले, तर या कल्पना मोठ्या बदलाचे कारण ठरू शकतात.सेवा संकल्प अभियानात राज्यातील युवा, विद्यार्थी, स्टार्टअप्स, व्यावसायिक, कॉर्पोरेट इनोव्हेटर्स आणि ग्रामीण भागात नवे प्रभावी उपाय विकसित करणाऱ्या व्यक्तींना जोडण्यासाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज’ आयोजित करण्यात येणार आहे. शैक्षणिक संस्था, स्टार्टअप नेटवर्क, इन्क्युबेशन सेंटर आणि खासगी कंपन्यांचाही सहभाग घेतला जाणार आहे. निवडलेल्या उत्कृष्ट कल्पनांना तज्ज्ञांसमोर सादरीकरणाची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देशाचे भविष्य वर्गखोल्यांमध्ये घडत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही या अभियानाशी जोडण्यात आले आहे. ‘विकसित भारत’ आणि ‘मुलांच्या स्वप्नातील भारत’ या विषयांवर चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि स्वप्नांना व्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न आहे.आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक आहे. त्यामुळे विकसित भारताची संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासोबतच त्यांच्या कल्पना आणि स्वप्नांना भविष्यातील भारताच्या उभारणीशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. लाभार्थ्यांच्या घरापर्यंत ‘आशीर्वादाचा दिवा ’ शासकीय योजनेचा लाभ मिळालेल्या नागरिकाच्या घरापर्यंत जाऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्याचा उपक्रमही या अभियानात आहे. विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन दीप प्रज्वलित करणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.सरकारची योजना कागदावर असते; पण तिचा लाभ जेव्हा एखाद्या कुटुंबाच्या घरात पोहोचतो, तेव्हा त्या योजनेला खरा अर्थ प्राप्त होतो. त्या समाधानाच्या क्षणाला जोडणारा हा उपक्रम आहे. बदलाची गोष्ट आता गावागावातून एखाद्या शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळाल्याने शेतीत बदल झाला, एखाद्या महिलेला बचत गटामुळे आर्थिक आधार मिळाला, एखाद्या विद्यार्थ्याला संधी मिळाली किंवा एखाद्या कुटुंबाचे जीवनमान सुधारले, तर ही केवळ एका व्यक्तीची गोष्ट राहत नाही. ती इतरांसाठीही प्रेरणा बनते. म्हणूनच ‘बदलाची गोष्ट’ या उपक्रमातून विविध योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल त्यांच्या स्वतःच्या शब्दांत समाजासमोर आणला जाणार आहे. त्यांच्या अनुभवांचे व्हिडिओ आणि रील्सच्या माध्यमातून संकलन करण्यात येणार आहे. सेवा संकल्पाची खरी दिशा सेवा संकल्प अभियानातील प्रत्येक उपक्रमामागे वेगवेगळी उद्दिष्टे असली, तरी त्यामागची भावना एकच आहे—सामान्य नागरिकाला सेवा मिळविण्यासाठी अधिक सोपे, सुलभ आणि जवळचे वातावरण निर्माण करणे.१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या काळात प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील संवाद व लोकसहभाग वाढविणारा ठरणार आहे. योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना मिळावा, शासन अधिक लोकाभिमुख व्हावे आणि शासनाच्या योजना सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. ‘माहितीअभावी पात्र व्यक्ती वंचित राहता कामा नये’, ही या उपक्रमामागील प्रमुख भूमिका आहे. या अभियानाला नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद त्याच्या यशासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. प्रवीण टाके उपसंचालक विभागीय माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ९७०२८५८७७७ ****