शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२६
दुष्काळावर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने, समन्वयाने जबाबदारी पार पाडावी - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व उपाययोजनांचा घेतला आढावा
सांगली, दि. 6 (जि. मा. का.) : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने व समन्वयाने काम करावे. पाणी उपलब्धता, जलसंधारण, पाणीपुरवठा आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांना प्राधान्य द्यावे. मंजूर कामांच्या अंमलबजावणीतील अडचणी वेळेत दूर करून कामे रखडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या.
अल निनो व दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमिवर आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष संगिता पाटील, आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, महिला व बालकल्याण सभापती स्नेहल मोरे, समाजकल्याण सभापती दादासाहेब कोळेकर, बांधकाम व अर्थ सभापती पृथ्वीराज पाटील, कृषि व पशुसंवर्धन सभापती सावित्री रवी पाटील, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे आदिंसह संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य शासनाच्या दुष्काळी तालुक्यात सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश आहे. शासनाने पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देऊन शेतकरी बांधवांना दिलासा दिला आहे. तसेच, अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादीही जाहीर झाली असून, रक्कम वितरण सुरू झाले आहे. राज्य शासनाबरोबरच सर्व शासकीय यंत्रणांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा, नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि शिल्लक पाण्याचे सिंचनासाठी नियोजन करावे, असे सूचित करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयातून काम करून शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ सुलभतेने मिळवून द्यावा. दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये कोणत्याही प्रकारची सक्तीची वसुली करण्यात येऊ नये. राज्य शासनाकडून देण्यात येणारी आर्थिक मदत, सवलती आणि योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत तत्परतेने पोहोचवावा, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी पशुसंवर्धन आणि कृषी विभागाने आतापासूनच नियोजन करावे. शेतकऱ्यांना चारा लागवड आणि चारा उत्पादनासाठी प्रोत्साहित करावे. जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध राहील, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध जलसाठ्याचे योग्य व्यवस्थापन करावे. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करावी, असे ते म्हणाले.
शासकीय योजनांच्या अंमलबजावणीव्यतिरीक्त अधिकाऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयोग करावेत. टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत आहे. मात्र, संबंधित गावाने पुढाकार घेऊन पाण्याची टाकी बांधल्यास सी एस आर च्या माध्यमातून टँकरने पाणी पुरवठा करता येईल. तसेच, हे पाणी शुद्ध होण्यासाठी पाणी शुद्धीकरण मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्याचा विचार यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच, आपल्यामार्फत सुरू असलेल्या उपक्रमातून दुष्काळी भागात धान्यवाटप करणाऱ्या दुकानदारांना 50 टक्के सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देऊ, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी महिला बचत गटांना चारा उत्पादनासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात येईल, यासाठी नियोजन करण्यात येत आहे. हा उत्पादित करण्यात आलेला चारा शासनाकडून खरेदी केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पाटबंधारे, जिल्हा परिषद पाणीपुरवठा, मृद व जलसंधारण, कृषि, पशुसंवर्धन, भूजल, लघुपाटबंधारे विभाग, महावितरण, रोजगार हमी योजना आदि संबंधित विभागांनी दुष्काळावर मात करण्यासाठी करण्यात येत उपाययोजनांची सविस्तर माहिती सादर केली.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा