शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२६
पोस्टाच्या माध्यमातून हयातीचा दाखला घरबसल्या देणे शक्य
सांगली दि. 6 (जि.मा.का.) : नोव्हेंबर महिन्यात सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बँकेत जाऊन हयातीचा दाखला सादर करावा लागतो. यासाठी बँकांमध्ये लांब रांगा लागत असल्याने तसेच तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. मात्र, आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पोस्टमनला घरी बोलावून किंवा पोस्ट कार्यालयात जाऊन ऑनलाइन पद्धतीने हयातीचा दाखला देता येणार आहे. यासाठी केंद्राच्या पोस्ट पेमेंट बँक आणि पेन्शन विभागाच्या माध्यमातून ही योजना आणण्यात आली असल्याचे सांगली विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर अर्जुन इंगळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हयातीचा दाखला संबंधित बँकेच्या माध्यमातून निवृत्त वेतन घेणाऱ्या लाभार्थ्यांना सादर करावा लागतो. यावेळी अनेक निवृत्तीधारकांचे बायोमेट्रिक होत नाही. कारण त्यांच्या बोटांचे ठसे नीट उमटत नाहीत. त्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. पोस्टाच्या या योजनेत फेस ऑथेंटिकेशन करून हयातीचा दाखला देता येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व पेन्शनधारकांना हयातीचा दाखला देणे सुलभ होण्यासाठी पोस्ट विभागाकडून सर्व कार्यालयांमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील पेन्शनधारकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा