मंगळवार, १३ जानेवारी, २०२६
धामणी रोड येथील हसरा चौक रस्ता 17 ते 22 जानेवारीदरम्यान वाहतुकीस बंद
धामणी रोड येथील हसरा चौक रस्ता
17 ते 22 जानेवारीदरम्यान वाहतुकीस बंद
सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 115 व 116 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी धामणी रोड येथील हसरा चौक हा रस्ता दिनांक 17 ते 22 जानेवारी 2026 या कालावधीत अटी व शर्तीच्या अधिन राहून वाहतुकीस बंद करून सदर वाहतूक पर्यायी वाहतूक मार्गावरून वळविण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.
पर्यायी वाहतूक मार्ग
(१) इनाम धामणीकडून सांगली शहरात येणाऱ्या वाहनांसाठी - इनाम धामणी- हॉरिझोन्टल हॉस्पिटल -डावीकडे वळून उषःकाल हॉस्पिटल - तक्षशिला रोड – १०० फुटी मार्गे शहरात जाता व येता येईल.
(2) इनाम धामणीकडून सांगली शहरात येणाऱ्या वाहनांसाठी - इनाम धामणी - जुना जकात नाका -वसंतराव शिंदे मार्ग - लिमये चौक- स्फूर्ती चौक - एम.एस.ई.बी. रोड मार्गे शहरात जाता व येता येईल.
(3) शांतीबन चौकाकडून इनाम धामणी रोडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी - शांतीबन चौक १०० फुटी रोड - डी-मार्ट पुढे डावीकडे वळून तक्षशिला रोड- उषःकाल हॉस्पिटल - हॉरिझोन्टल हॉस्पिटल - उजवीकडे वळून धामणीकडे जाता व येता येईल.
00000
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके 30 जानेवारीपर्यंत पाठविता येणार
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार
प्रवेशिका व पुस्तके 30 जानेवारीपर्यंत पाठविता येणार
सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२५ करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक ३० जानेवारी २०२६ पर्यंत पाठविता येणार आहेत. दिनांक १ जानेवारी, २०२५ ते ३१ डिसेंबर, २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत.
या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५ यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील.
महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२५ नियमावली व प्रवेशिका’ या शीर्षाखाली व ‘What’s new’ या सदरात ‘Late Yashwantrao Chavan State Literature Award २०२५ Rules Book and Application Form’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील, प्रवेशिका पूर्णतः भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक १ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ या विहित कालावधीत पोहोचतील अशा बेताने पाठवाव्यात.
लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करू शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक /प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५ येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक / प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य दिनांक १ जानेवारी, २०२६ ते ३० जानेवारी २०२६ या विहित कालावधीत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.
लेखक / प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर / पाकिटावर ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ३० जानेवारी, २०२६ हा राहील. विहित कालमर्यादेनंतर (१ जानेवारी, २०२६ ते ३० जानेवारी २०२६) येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी कळविले आहे.
00000
सर्व आस्थापनांतील, कारखान्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-2026
सर्व आस्थापनांतील, कारखान्यातील
कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी
सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. त्यानुसार लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 मधील कलम 135 (ब) तरतुदीच्या आदेशानुसार सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादिमध्ये काम करणाऱ्या कामगार मतदारांना व निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे सहाय्यक कामगार आयुक्त मु.अ. मुजावर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर तर मतदान क्षेत्रातील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घ्यावी.
मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरूद्ध कारवाई करण्यात येईल. आस्थापनेने निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भर पगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय उद्योग भवन, विश्रामबाग, सांगली, दुरध्वनी क्रमांक 0233-2950119 अथवा ई-मेल आयडी aclsangli@gmail.com या ठिकाणी तक्रार दाखल करावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
सोमवार, १२ जानेवारी, २०२६
(विशेष लेख मालिका भाग १) भाग -1 श्री गुरु तेज बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या समागम निमित्त माहिती देणारी क्रमंशा मालिका
(विशेष लेख मालिका भाग १)
भाग -1
श्री गुरु तेज बहादूर साहिब जी
यांच्या 350 व्या समागम निमित्त माहिती देणारी क्रमंशा मालिका
‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमिवर नांदेड आणि नवी मुंबई येथे कार्यक्रम होत असून, नांदेड येथील कार्यक्रम येत्या दि. 24 व 25 जानेवारीला होत आहे. या पार्श्वभूमिवर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनचरित्राची क्रमशः माहिती….
शीख धर्माचे नववे गुरु असलेल्या गुरु तेज बहादूर जी हे माता नानकी जी आणि गुरु हरिगोविंद साहिब जी यांच्या पाच साहिबजाद्यांमधील (पुत्रामधील) तिसरे होते. त्यांचा जन्म अमृतसर येथे १६२१ मध्ये पहाटे (अमृतवेळी) झाला. अमृतसर आणि गुरु के महल या ठिकाणांचे महत्त्वाचे तथ्य म्हणजे नंतरच्या काळात गुरु के महलला 'बाबा बकाला' म्हणायला सुरुवात झाली. अनेक इतिहासकार, जसे की "गुरु का बाग दरबार, असा निर्देश करतात की हा गुरु हरिगोविंद साहिब जी यांचा परिसर होता. "१५७३ मध्ये गुरु रामदास जी यांनी या ठिकाणी "एका छोट्या घराचे स्वरूप दिले. त्यानंतर गुरु अर्जन देवजी आणि गुरु हर गोबिंद साहिबजी यांनी या घराला मोठे करून अधिक सुंदर बनविले. गुरु तेज बहादूर यांचा जीवन काळ गुरु तेज बहादूर यांचा काळ तीन प्रमुख टप्प्यांमध्ये विभागला जातो. वडिलांसोबत वेळ घालवलेला कालखंड, बाबा बकाला येथे वेळ घालवलेला कालखंड आणि २६ वर्षे ९ महिने १३ दिवसांचा गुरुकाळ, ज्यामध्ये त्यांनी पंजाबपासून पश्चिम बंगाल आणि बिहारपर्यंत अनेक धार्मिक यात्रा केल्या.
बालपण
गुरु तेज बहादूर यांचे बालपण अमृतसर येथे गेले, जिथे त्यांनी गुरु हरिगोविंद साहिब जी, बाबा बुड्ढा जी आणि अनेक गुरु भक्त शीख विद्वानांच्या संगतीत शिक्षण घेतले. बाबा बुड्ढा जी यांनी त्यांना शस्त्रविद्या आणि राजकारणाचे शिक्षण दिले तर गुरु हरिगोविंद साहिब जी यांनी गुरु-मुखी, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र विषयाचे ज्ञान दिले. त्यांनी गुरु हरिगोविंद साहिब जी यांच्याकडून तलवार चालविणे (तेज चलाने) आणि युद्ध कला शिकली. यानंतर त्यांनी तपस्या आणि साधनेमध्ये महत्त्वाचा कालखंड घालवला. ते एक चिंतनशील, अध्यात्मिक स्वभावाचे होते आणि अनेक ठिकाणी राहून त्यांनी भक्ती, धर्म आणि सहनशीलतेचा संदेश दिला. १६३३ मध्ये त्यांनी माता गुजरी जी यांच्यासह महत्त्वाची धार्मिक यात्रा केली.
(माहितीस्त्रोत - https://gurutegbahadurshahidi.com/)
00000
गुरुवार, १ जानेवारी, २०२६
सन 2026 च्या स्थानिक सुट्ट्या जाहीर
सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी तसेच सर्व निमशासकीय कार्यालयांसाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सन 2026 मधील स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
जाहीर केलेल्या स्थानिक सुट्ट्या पुढीलप्रमाणे – शुक्रवार, दिनांक 28 ऑगस्ट 2026 (रक्षाबंधन), शुक्रवार, दिनांक 25 सप्टेंबर 2026 (अनंत चतुर्दशी) व सोमवार, दिनांक 9 नोव्हेंबर 2026 (सोमवती अमावस्या).
00000
परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 163 लागू
सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सांगली, मिरज येथील एकूण 37 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात दिनांक 4 जानेवारी 2026 रोजीचे सकाळी 7.30 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू केले असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
आदेशात म्हटले आहे, परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिंना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटा-गटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परीक्षा वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परीक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापर करण्यास मनाई केली असून परीक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई केली आहे.
हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.
00000
शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५
जबड्यावर अवघड शस्त्रक्रिया झालेल्या मुलीकडून प्रशासनाप्रती कृतज्ञता
- विभागीय आयुक्तांची भेट घेऊन व्यक्त केले ऋणनिर्देश
सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : ईश्वरपूर येथील एका मुलीला जन्मत: खालचा जबडा अडकलेला असल्याने बोलता व खाता येत नव्हते. तिची खर्चिक शस्त्रक्रिया व उपचार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या घरेलु कामगार आरोग्य तपासणी शिबीरांतर्गत पार पडले. यामुळे त्या मुलीला अन्नग्रहण करता येऊ लागले आहे. तसेच बोलण्याच्या क्रियेची सुरवात होऊ लागली आहे. सदर मुलीने तिच्या वडिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेवून आपल्यावर झालेल्या खर्चिक उपचारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यानींही सदर मुलीची आपुलकीने विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम आदि उपस्थित होते.
यावेळी शस्त्रक्रिया पार पडलेल्या वसंतदादा पाटील दंत रुग्णालय, कवलापूर येथील डॉ. श्रीनिवास अष्टेकर, डॉ. सचिन मजती, डॉ. सुरेखा बेडसगावकर व डॉ. अनिरुध्द पाटील या टीमने पार पाडली. याबाबत विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्यांचे कौतुक केले.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)