सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५
महाराष्ट्र लोकसेवा हमी अधिनियमअंतर्गत सेवांचा लाभ घ्यावा - उपजिल्हाधिकारी विवेक काळे
सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाने नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक, वेळेवर आणि जबाबदारीने उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हमी अधिनियम 2015 लागू केला आहे. याव्दारे प्रत्येक सेवेसाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तरी महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत उपजिल्हाधिकारी विवेक काळे यांनी शासकीय प्रसिद्धीद्वारे केले आहे.
सेवा न मिळाल्यास किंवा विहित मुदतीत सेवा न मिळाल्यास नागरिकांना अपील करण्याचा अधिकार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.
महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा व सेवा मिळण्याचा कालावधी दिवसांमध्ये पुढीलप्रमाणे. वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र - 15, जातीचे प्रमाणपत्र – 45, उत्पन्न प्रमाणपत्र – 15, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र – 21, तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र – 7, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र – 7, ऐपतीचा दाखला – 21, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना – 7, अधिकार अभिलेखाची प्रमाणित प्रत – 7, अल्पभू-धारक दाखला – 15, भूमीहीन शेतमजूर असल्याचा दाखला – 15, शेतकरी असल्याचा दाखला – 15, डोंगर/दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र – 7, प्रतिज्ञापत्र साक्षांकित करणे – 1, औद्योगिक प्रयोजनार्थ जमीन खोदण्याची परवानगी (गौण खनिक उत्खनन) – 15, औद्योगिक प्रयोजनार्थ जमीन वापरण्याकामे बिगर अधिसूचित वृक्ष तोड परवानगी – 30 दिवस.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 42-अ (1) (अ) अन्वये भोगवटादार वर्ग-1 या धारणाधिकाराच्या जमिनीसंदर्भात नियोजन प्राधिकारणाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर अर्जांतर्गत जमिनीचा वर्ग, जमिनीचा भोगवटादार व त्यावरील भार इ. चे विनिश्चिती प्रमाणपत्र देणे – 30 दिवस.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 42-अ (1) (ब) अन्वये राज्यात अंमलात असलेले शेतजमीन व कुळवहिवाट अधिनियम, विविध वतन अधिनियम आणि महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 या अधिनियमानुसार वाटप केलेल्या भोगवटादार वर्ग 2 या धारणाधिकाराच्या जमिनीकरीता भोगवटादाराचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यापासून विकास परवानगी मिळविण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे – 30 दिवस.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 42-अ अन्वये संबंधित व्यक्तीने प्राप्त केलेल्या विकास परवानगीच्या अनुषंगाने अशा व्यक्तीकडून प्राप्त झालेल्या लेखी माहितीच्या आधारे आणि कलम 47 अ मध्ये नमूद केलेल्या दराने रुपांतरण कराचा आणि त्याबद्दलचा अकृषिक आकारणीचा भरणा केल्यावर संबंधित व्यक्तीला विहित नमुन्यामध्ये सनद देणे – 30 दिवस.
उद्योजकांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 44 (अ) च्या तरतूदीनुसार परस्पर औद्योगिक वापर सुरु करणे शक्य व्हावे, त्याकरीता आवश्यक अधिकृत माहिती तातडीने उपलब्ध करून देणे – 30 दिवस.
0000000
रविवार, २८ सप्टेंबर, २०२५
विविध उपक्रमांव्दारे इतरांच्याबद्दल सेवाभाव निर्माण करा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- महाआरोग्य शिबीर उपक्रमाबद्दल धर्मादाय अधिकाऱ्यांचे केले कौतुक
सांगली, दि. 28 (जि. मा. का.) : आरोग्य सेवेसारखे पुण्य कामच नाही, त्यासाठी यावर सर्वांनी काम केले पाहिजे. प्रत्येक संस्था, व्यक्ती यांनी समाजाच्या प्रश्नावर काम करणे आवश्यक असून माणसांच्या मनामध्ये विविध उपक्रमाव्दारे इतरांच्याबद्दल सेवाभाव निर्माण करावा. खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवेतून आपण माणसांचे आयुष्य वाढवून त्यांचा दुवा घेणार आहोत. यासाठी आरोग्य सुविधांना पर्याय नाही, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांच्या संकल्पनेतून धर्मादाय सह आयुक्त कार्यालय कोल्हापूर व धर्मादाय उप आयुक्त कार्यालय सांगली यांच्या वतीने संजय भोकरे अभियांत्रिकी महाविद्यालय मिरज येथे आयोजित मोफत महाआरोग्य शिबिर-2025 च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, संजय भोकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संजय भोकरे, कोल्हापूर धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार, सांगली धर्मादाय उप आयुक्त डॉ. मनिष पवार, सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रियांगिनी पाटील, ऋषिकेश हिंगणगावकर, व शरद वाळके, अधीक्षक राहूल पाटील, प्रताप पवार, रूग्णालय निरीक्षक सचिन पाटील आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आजारीच पडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर गावागावांमध्ये योगासने, विपषना याकडे जावे लागेल. खाण्यापिण्याच्या सवयींवर विशेष ध्यान देणे गरजेचे आहे. याबाबत लहान मुलांच्यावरही चांगल्या आरोग्य सवयी लावाव्यात. आजारी पडू नये यासाठी काळजी, आजारी पडल्यानंतरची काळजी व आजारपण संपल्यानंतरची काळजी घेणे आवश्यक आहे. धर्मादाय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी स्वत:हून पुढे येऊन शासकीय कामाच्या व्यतिरिक्त हा विशेष उपक्रम राबविल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
धर्मादायच्या अधिकाऱ्यांना मोठे अधिकार आहेत ते त्यांनी वापरावेत असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शासकीय जागेत असलेल्या धर्मादाय रूग्णालयांना गोर, गरीब गरजू रूग्णांना 20 टक्के बेड राखीव ठेऊन त्यांच्यावर मोफत उपचार करणे असा कायदा आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी गरजूंना याचा लाभ मिळतो का याची वेळोवेळी तपासणी करावी. कोरोनापासून आरोग्याच्या सर्व सुविधा वाढल्या आहेत. माणुसकीला धरून असणाऱ्या सद्याच्या काळामध्ये प्रचंड मोठी आवश्यकता असणाऱ्या या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून या आरोग्य शिबीरातून तपासणीअंती पुढील उपचार आवश्यक असणाऱ्या रूग्णांसाठी आवश्यक व्यवस्था करावी, असे ते यावेळी म्हणाले.
या शिबिरामध्ये सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सांगली च्या अधिनस्त सर्व धर्मादाय रुग्णालये सहभागी झाली असून या शिबिरात मोफत सर्व रोग (हृदयरोग, कॅन्सर, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्रचिकित्सा, दंतरोग, बालरोग, आयुर्वेदिक, होमिओपॅथी इ.) निदान या सर्व प्रकारच्या रोगांवर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून औषधोपचार मोफत देण्यात येतील. आवश्यकतेनुसार रुग्णांवर नोंदणीकृत धर्मादाय रुग्णालयामार्फत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. तसेच रक्तदान शिबिरही आयोजित केले आहे.
प्रारंभी फीत कापून व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या प्रसंगी शाहीर बजरंग आंबी यांनी पोवाड्याच्या माध्यमातून आरोग्याचे महत्व विशद केले.
प्रास्ताविकात धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार यांनी या मोफत शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले. कार्यक्रमास धर्मादाय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच धर्मादाय रूग्णालयाचे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५
बालगृहातील बालकांचे भविष्य सुरक्षित, उज्ज्वल होण्यासाठी प्रयत्न करावेत - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : बालगृहातील बालकांच्या आयुष्याला चांगला आकार देऊन भविष्याला दिशा देण्यासाठी काम करावे. बालगृहातील बालकांचे भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून "शिकूया कौशल्य, घडवूया भविष्य" हे ध्येयवाक्य घेऊन निरीक्षणगृहातील दीपोत्सव कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेस भेटप्रसंगी ते बोलत होते.
सौ. सुंदराबाई मालू मुलींचे बालगृह, सांगली येथे आयोजित आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा परिविक्षा अनुरक्षण संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर सिंहासने, मानद कार्यवाहक सुनील कोरे, भारती दिगडे, बालगृहातील मुले - मुली या कार्यशाळेस उपस्थित होते. ही कार्यशाळा 10 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
शिक्षण व नोकरीमध्ये अनाथांना एक टक्का आरक्षण असून, यातून मुलांनी चांगले करियर घडवावे, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, येथील मुलांचे उत्तम संगोपन करा. चांगले शिक्षण देऊन त्यांचे चांगले करियर घडवा. त्यांच्यात प्रेरणा निर्माण करा. त्यांच्यातील कलागुण शोधून, त्यांना वाव द्यावा. त्या अनुषंगाने काही बाह्य शिक्षण द्यावयाचे असल्यास फीची व्यवस्था करण्यात येईल.
बालगृहातील बालके व निरीक्षणगृहाच्या भौतिक अडचणी सोडवू, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, बालनिरीक्षणगृहात मुले 18 वर्षांपर्यंत राहू शकतात. 18 वर्षांनंतरच्या अनाथांची निवासव्यवस्था, महाविद्यालयीन शिक्षण, करियर, नोकरी, विवाह असे अनेक महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यामुळे ही वयोमर्यादा वाढवण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बालगृहातील मुलांनी कोणती ही विशिष्ट वस्तु मोठ्या प्रमाणात तयार करावी. आपण दिवाळीत भेटवस्तु म्हणून देण्यासाठी ती वस्तू खरेदी करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
प्रास्ताविकात सुधीर सिंहासने यांनी बालनिरीक्षणगृहातील कामकाजाचा आढावा व अडचणी सांगितल्या.
00000
फायबर ग्लास बोटींच्या माध्यमातून आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- 25 फायबर ग्लास बोटींचे लोकार्पण
सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : नैसर्गिक आपत्तीचे आव्हान पेलताना नागरिकांनी भविष्यकालीन संकटे ओळखावीत. महापुराचा पूर्वानुभव लक्षात घेता, कायमस्वरूपी उपाययोजनांचा विचार करावा लागेल. वारंवार पूरबाधित होणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांनीही आपली मनस्थिती बदलावी, असे आवाहन करून फायबर ग्लास बोटींच्या माध्यमातून आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यात आले आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
गतिमान प्रशासन तथा आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत 25 फायबर ग्लास बोटींच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. सरकारी घाट, आयर्विन पुलाजवळ, सांगली येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, कार्यकारी अभियंता (इ व द) कुंडलिक उबाळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अंतर्गत १८ प्रवासी क्षमतेच्या २३ फायबर ग्लास यांत्रिक बोटी व जिल्हा परिषद स्वीय निधी अंतर्गत १८ प्रवासी क्षमतेची १ व ८ प्रवासी क्षमतेची १ फायबर ग्लास यांत्रिक बोटी अशा २५ फायबर ग्लास यांत्रिक बोटींचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोनशीला अनावरण करून व ताबा पावती वितरणाद्वारे करण्यात आले.
जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषद, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२४-२५ अंतर्गत गतिमान प्रशासन तथा आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण या बोटींची खरेदी करण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्याचे गटविकास अधिकारी तसेच, चारही तालुक्यातील पूरबाधित गावांचे सरपंच, नागरिक यांना बोटींची ताबा पावती वितरीत करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे,यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांच्यासह लाभार्थी तालुक्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.
शिराळा तालुक्यातील ग्रामपंचायत मणदूर व देववाडी, वाळवा तालुक्यातील ग्रामपंचायत कोळे, बनेवाडी, चिकुर्डे, रेठरे हरणाक्ष, बहे, मसुचीवाडी व तांबवे, बोरगांव पलूस तालुक्यातील चोपडेवाडी, संतगांव (राडेवाडी), बुर्ली, दहयारी, तुपारी, नागठाणे, सुखवाड व अंकलखोप व मिरज तालुक्यातील ढवळी, म्हैशाळ, वड्डी, निलजी बामणी, जुनी धामणी, सावळवाडी व कसबे डिग्रज या ग्रामपंचायतींना नवीन यांत्रिक फायबर ग्लास बोटी वितरीत करण्यात आलेल्या आहेत.
00000
नगर भूमापन अधिकारी कार्यालय सांगली येथे सोमवारी फेरफार अदालत
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा अंतर्गत नगर भूमापन अधिकारी कार्यालय सांगली येथे सोमवार, दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरफार अदालतीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नगर भूमापन अधिकारी सुवर्णा मसणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच महाभूमी पोर्टलवरील सेवांची माहिती देण्याकामी नगर भूमापन अधिकारी कार्यालय सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, ब्लॉक नं. 102, सांगली मिरज रोड, विजयनगर, सांगली येथे फेरफार अदालतीचे 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
000000
बालकामगार नियमांच्या प्राथमिक अधिसूचनेबाबत हरकती, सूचना असल्यास कळविण्याचे आवाहन
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनामार्फत "महाराष्ट्र बालकामगार (प्रतिबंध व नियमन) नियम २०२५" नियमांची प्राथमिक अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेच्या अनुषंगाने काही हरकती व सूचना असल्यास मा. कामगार आयुक्त, कामगार भवन, सी-२०, ई-ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. यांच्या कार्यालयास अवगत कराव्यात, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
00000
महापालिका क्षेत्रात चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- महानगरपालिका क्षेत्रातील विविध कामांचा घेतला आढावा
सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, चांगल्या दर्जाचे रस्ते आदि नागरी सुविधा प्राधान्य क्रमाने उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील विविध कामांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. महापालिकेच्या पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील सभागृहात झालेल्या या बैठकीस महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, अतिरीक्त आयुक्त राहुल रोकडे, जयश्री पाटील, शेखर इनामदार, समित कदम, पृथ्वीराज पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बैठकीत स्मार्ट एलईडी, पाणी योजना, ड्रेनेजसह विविध कामांचा आढावा घेतला. महापालिका क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व उपाययोजना, वारणा उद्भव योजना, सांगली व कुपवाड ड्रेनेज योजना, शासनाकडील प्रलंबित प्रस्ताव व त्यांची सद्यस्थिती, महापालिका क्षेत्रातील रस्ते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ पुतळा व कमान, चौक सुशोभिकरण, पंचमुखी मारूती रस्ता, यासह छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, रोईंग क्लब, गुंठेवारी प्रमाणपत्र आदिंचा सविस्तर आढावा घेऊन संबंधितांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.
यावेळी आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिकेत गेल्या चार महिन्यात केलेल्या कामकाजाची माहिती उपस्थितांसमोर सादर केली. यामध्ये करसंकलन, दायित्त्व, घंटागाडी, सार्वजनिक शौचालये, पाणीपुरवठा, रस्त्याची कामे, सांडपाणी व्यवस्थापन आदिंबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा सादर केला.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)