गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२६

जिल्हा क्रीडा संकुलातील विविध विकास कामांसाठी पात्र निविदाकरास तात्काळ कार्यारंभ आदेश द्यावेत - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली दि. 05 (जि.मा.का.) : जिल्हा क्रीडा संकुलातील विविध क्रीडा विषयक सोयी सुविधांच्या तात्काळ निविदा उघडून कार्यारंभ आदेश द्यावेत, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात आयोजित जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमर नलवडे, क्रीडा मार्गदर्शक मधुरा सिंहासने यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हा क्रीडा संकुल येथील मैदानी खेळासाठी 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक व फुटबॉल खेळासाठी नॅचरल ग्रास मैदान या बाबी विकसीत करण्यासाठी पात्र निविदाकारास तात्काळ कार्यारंभ आदेश देण्याचे सूचित केले. तसेच जलतरण तलावाशी संबंधित आवश्यक दुरूस्तीची कामे, वेटलिफ्टिंग प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक फ्लोअरिंग तयार करणे, मिशन लक्ष्यवेध अंतर्गत आवश्यक क्रीडा साहित्य खरेदी करणे आदी कामांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. ही कामे मार्गी लावण्यासाठी तात्काळ आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या दिल्या. 0000

दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शासनाच्या सूचनांनुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कामांचे नियोजन करावे - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

- महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यंत्रणांचा घेतला आढावा सांगली, दि. 5 (जि. मा. का.) : अल निनो व दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शासनाकडून वेळोवेळी निर्गमित सूचना लक्षात घेऊन महानगरपालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद यंत्रणांनी चालू आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत नियोजन करावे. तसेच, विहित मुदतीत 30 नोव्हेंबरच्या आत प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही करावी, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या. यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्रभारी सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) डॉ. पवन म्हेत्रे, सहायक आयुक्त समाजकल्याण बाळासाहेब कामत, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी उदय पवार यांच्यासह जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागप्रमुख, जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदि उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य द्यावे. चालू आर्थिक वर्षाचे नियोजन करताना दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन जलसंधारण कामांना, पशुधनास चारा आदि कामांना प्राधान्य द्यावे. सर्व कामांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही विहित कालमर्यादेत म्हणजेच 30 नोव्हेंबरच्या आत घ्यावी. प्राप्त निधी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यंत्रणांनी विहित वेळेत खर्च करावा. मंजूर कामांचा दर्जा, गुणवत्ता उच्च प्रतीची असावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत मंजूर नियतव्यय, प्रत्यक्ष निधीची तरतूद, आतापर्यंत झालेला खर्च व कामांची सद्यस्थिती, गत आर्थिक वर्षातील प्रलंबित कामे, सद्य आर्थिक वर्षातील कामांची प्रशासकीय मान्यता, निविदा स्थिती, कार्यारंभ आदेश आदिंचा सविस्तर आढावा घेतला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रसुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान, नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना, अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, आदर्श शाळांमध्ये विविध पायाभूत सुविधा, रस्ते, बंदिस्त गटारी, जलसंधारण आराखडा, पशुधनास चारा आदिंचा आढावा घेतला. 00000

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे - विभागीय कृषी सहसंचालक जालिंदर पांगरे

सांगली, दि. 5 (जि. मा. का.) : रब्बी हंगाम सन 2026-27 मध्ये सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना सातारा जिल्ह्यातील रब्बी ज्वारी (बागायत), रब्बी ज्वारी (जिरायत), गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा व उन्हाळी भुईमूग या अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. ही योजना सांगली जिल्ह्यात रब्बी ज्वारी (बागायत), रब्बी ज्वारी (जिरायत), गहू (बागायत), हरभरा व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी तर कोल्हापूर जिल्ह्यातील रब्बी ज्वारी (जिरायत), गहू (बागायत), हरभरा व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी लागू आहे. पीक नुकसानीची जोखीम पीक विम्याच्या माध्यमातून उचलून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे कार्य या योजनेतून होत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक जालिंदर पांगरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी (कर्जदार/बिगर कर्जदार) ऐच्छिक असून खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीसुद्धा या योजनेत सहभागी होण्यास पात्र राहतील. योजनेतील सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के इतका राहणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत रब्बी ज्वारीसाठी 30 नोव्हेंबर, इतर रब्बी पिकांसाठी 15 डिसेंबर 2026 तर उन्हाळी भुईमुगासाठी 31 मार्च 2027 अशी आहे. ही योजना राबविण्यासाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून सातारा जिल्हा - एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि., सांगली जिल्हा - बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. आणि कोल्हापूर जिल्हा - युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगाआधारे/तांत्रिक उत्पादन आधारे सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय राहील. योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, शेतकरी ओळखपत्र क्रमांक (AGRISTAK Farmer ID), तसेच ई-पीक पाहणी, आधार कार्ड/आधार नोंदणीची प्रत, 7/12 उतारा, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांसाठी करारनामा/संमतीपत्र, पेरणी स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक प्रत या आवश्यक कागदपत्रांसह त्यांचे खाते कार्यरत असणारी बँक शाखा/प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, संबंधित विमा कंपनी कार्यालय, आपले सरकार सेवा सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. याशिवाय पीक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करूनही शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकतात. योजनेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी/कर्मचारी अथवा संबंधित विमा कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. 00000

ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्जदारांसाठी 50 टक्के व्याज सवलतीची ओटीएस योजना

सांगली दि. 5 (जि. मा. का.) : ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याजात 50 टक्के सवलत (सूट) देण्याबाबतची (OTS) योजना दिनांक 31 मार्च 2027 पर्यंत लागू करण्यात येत आहे. यानुसार थकबाकीदार लाभार्थींनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. एन. माने यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. 00000

जिल्ह्यात 60 टँकरव्दारे 61 गावे, 435 वाड्यातील सव्वा लाखाहून अधिक बाधित लोकसंख्येला पाणीपुरवठा

सांगली, दि. 5 (जि. मा. का.) : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सांगलीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणासाठी टँकर व विहीर अधिग्रहणाद्वारे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. बाधित गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे तसेच स्थानिक पातळीवर खाजगी विहिरी व बोअरचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेच्या 4 नोव्हेंबर अखेरच्या अहवालानुसार 52 खाजगी व 8 शासकीय अशा एकूण 60 टँकरव्दारे 61 गावे व 435 वाड्यातील 1 लाख 29 हजार 590 बाधित लोकसंख्येला व 11 हजार 346 पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 26 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित केल्या आहेत. जत तालुक्यातील टंचाईग्रस्त 52 गावे व 366 वाड्यांमधील सुमारे 1 लाख 12 हजार, 210 लोकसंख्येला 51 टँकरद्वारे (44 खाजगी व 7 शासकीय) पाणी पुरवले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात 15 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आल्या असून 4 डिझेल इंजिन भाड्याने घेण्यात आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील टंचाईग्रस्त 1 गाव व 8 वाड्यांमधील 1834 लोकसंख्येसाठी 1 शासकीय टँकर सुरू आहे. नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्यामुळे गावात पाणीटंचाई भासू नये यासाठी 2 खाजगी विहिरी/बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तासगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त 1 गाव व 6 वाड्यांमधील 855 लोकसंख्येला 1 खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. तालुक्यात 3 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. आटपाडी तालुक्यातील टंचाईग्रस्त 7 गावे व 55 वाड्यांमधील 14691 नागरिकांना आणि 11346 पशुधनाला 7 खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. या तालुक्यात 3 विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत. खानापूर तालुक्यात 2 गावे टंचाईग्रस्त असून 3 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत. 00000

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२६

दिवाळीच्या सुट्टीत गावी जाणाऱ्यांसाठी मिरज आगारातून जादा बसेस

सांगली, दि. 3 (जि. मा. का.) : दिवाळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मिरज आगाराने विशेष नियोजन केले आहे. दि. 1 ते 22 नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी मिरज आगारातून विविध मार्गांवर ३२ जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जादा बससेवेचा लाभ घेताना नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी उपलब्ध आरक्षण सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मिरज आगार प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मिरज-पुणे, मिरज-छत्रपती संभाजीनगर, मिरज-नांदेड, मिरज-लातूर, मिरज-तुळजापूर आणि मिरज-नाशिक या मार्गांवर जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच कोल्हापूर आणि इचलकरंजी मार्गावरही जादा वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 00000

सांगलीत कृष्णा नदीवरील नवीन पुलावरून जड वाहतुकीस महिनाभर बंदी

सांगली, दि. 3 (जि. मा. का.) : शहरातील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला समांतर असलेल्या नवीन पुलावरून होणाऱ्या जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीला 2 नोव्हेंबरपासून पुढील 30 दिवसांच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 155 अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे. शहरातील गजबजलेल्या भागात शालेय विद्यार्थी, पादचारी व स्थानिक नागरिकांची मोठी वर्दळ असते व जड वाहनांमुळे गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली असल्याने सार्वजनिक सुरक्षा व कायदा सुव्यवस्था राखणे अत्यंत आवश्यक आहे. शहरातील टिळक चौक, गावभाग, गणपती पेठ आणि महानगरपालिका चौक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यायी मार्ग - पुलावरील जड व अवजड वाहतूक बंद राहील, अशा कालावधीत संबंधित वाहनांनी सांगलीवाडी जुना टोल नाका, नवीन पूल - बायपास रोड - शिवशंभो चौकाचा वापर करून सांगली शहरात ये-जा करावी. या तात्पुरत्या अधिसूचनेबाबत सांगली शहरातील नागरिकांना, ट्रान्सपोर्ट असोसिएशन किंवा इतर संबंधित घटकांना काही हरकती किंवा सूचना मांडायच्या असल्यास हा आदेश प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत आपले म्हणणे लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली येथे सादर करावे. मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही व ही अधिसूचना अंतिम केली जाईल. हा आदेश रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील शासकीय वाहनांना लागू राहणार नाही, असे या आदेशात नमूद आहे. 00000