सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी खासदार फंडातून 25 लाखांची मदत - केंद्रीय सामाजि‍क न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) :  मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे सांगली जिल्ह्यात आलेल्या पूराने लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे आहे, असे सांगून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या सर्व लोकांना न्याय देण्याचे केंद्र व राज्य शासनाची भूमिका असल्याचे सांगून आपल्या खासदार फंडातून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रति जिल्हा 25 लाख रूपये मदत घोषीत केली.
     पलूस तालुक्यातील वसगडे, मिरज तालुक्यातील नांद्रे येथे स्थलांतरीतांच्या तात्पूरत्या निवारा केंद्रांना भेट देवून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तेथील पूरग्रस्तांना दिलासा दिला. यावेळी त्यांच्यासोबत अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे आदि उपस्थित होते.  
पूरबाधितांना कायमस्वरूपी निवारा होईपर्यंत तात्पुरती घरे देण्यात येतील, असे सांगून श्री. आठवले म्हणाले, पूराचा सामना करण्यासाठी सुरक्षित स्थळी घरं बांधता येतील असा आराखडा तयार करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. शासन निकषाप्रमाणे देय असणारी रक्कम सर्व पूरग्रस्तापर्यंत व्यवस्थित पोहचतील याबाबत दक्षता घेण्यात येईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी ब्रम्हनाळ येथे बोट उलटून झालेली घटना दुर्दैवी असून पुन्हा अशी घटना होणार नाही यासाठी दक्षता घेण्यात येईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी ब्रम्हनाळ दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रदांजली वाहिली.
000000






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा