ई पॉस मशीन धान्य वितरणामुळे 3.64 मे.टन धान्याची बचत
मुंबई दि. 31: सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत करण्यात येणारे धान्य वितरण हा सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळयाचा प्रश्न आहे. धान्य वितरण योग्य लाभार्थींनाच व्हावी यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये ई पॉस (Adhaar Enabled Public
Distribution
System)
मशीन बसविण्यात आले आहे. या ई पॉसमुळे लाभार्थीची बायोमॅट्रिक ओळख पटवून शिधावस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. ई पॉस मशीनद्वारे धान्य वितरणामुळे 3.64 मे .टनहून अधिक धान्याची बचत झाली आहे.
याबाबत बोलताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर म्हणाले,
सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर राज्यशासनाने भर दिला आहे. ई पॉस मशीनद्वारे केरोसीनचे वाटप केले जात असल्यामुळे केरोसीनची सुमारे 60 टक्क्यांपर्यंत बचत झाली आहे. दरमहा सव्वाकोटी कुटुंब आधार प्रमाणीकरण करुन धान्य उचल करत असल्यामुळे विक्री व्यवहार पारदर्शक झाले आहेत. या प्रणालीमुळे लाभार्थींना राज्यातील कोणत्याही धान्य दुकानातून धान्य घेण्याची सुविधा पोर्टबिलिटीमुळे शक्य झाली आहे. ई पॉस मशीन वरील विक्रीव्यवहार mahafood.gov.in या संकेत स्थळावर जनतेसाठी उपलब्ध असल्याने विभागाच्या कामकाजात पारदर्शकता येण्यास मदत झाली आहे.
ई पॉसमुळे काळाबाजार रोखण्यास मदत होण्याबरोबरच रेशन दुकानदारांना उत्पन्नवाढीसाठी प्रोत्साहन मिळाले आहे. सर्व शिधापत्रिका या आधारकार्डशी जोडण्यात आल्यामुळे पात्र लाभार्थींना नियमित धान्य मिळू लागले आहे. जून 2017 पासून सर्व रास्त भाव दुकानांतून ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण केले जात असून 1 मे 2018
पासून आधार प्रमाणीकरण करुनच धान्य वितरण करण्यात येत असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सांगितले.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा