मंगळवार, १३ जानेवारी, २०२६

अन्न व औषध प्रशासनाच्या भरारी पथकाच्या कारवाईत सव्वा कोटींचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त, १२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

अन्न व औषध प्रशासनाच्या भरारी पथकाच्या कारवाईत सव्वा कोटींचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त, १२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : राज्यातील भेसळखोर व प्रतिबंधित अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते यांच्यावर विशेष लक्ष देऊन कठोर कारवाई करण्यासाठी स्थापन विशेष भरारी पथकाने सांगली जिल्ह्यात तीन दिवसात केलेल्या धडक कारवायामध्ये रु. १ कोटी, २३ लाख, ८५ हजार ,६४० रूपयांचा प्रतिबंधित अन्न साठा जप्त करून १२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. पत्रकात म्हटले आहे कि, अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनात राज्यातील भेसळखोर व प्रतिबंधित अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते यांच्यावर विशेष लक्ष देऊन कठोर कारवाई करण्यासाठी राज्यात स्वतंत्र विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाचे प्रमुख भंडारा जिल्ह्याचे सहायक आयुक्त (अन्न) यदुराज दहातोंडे यांनी पथकातील इतर अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागेर व मंगेश लवटे यांच्यासह सांगली जिल्ह्यामध्ये दि. 9 ते 12 जानेवारी 2026 या 3 दिवसात कारवाया केल्या. सांगली जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त श्री. समुद्रे व नि. सु. मसारे तसेच स्थानिक अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासमवेत नियोजनबद्ध कारवायात त्यांनी प्रतिबंधित अन्न वाहतूकदार व विक्रेत्यांवर धडक कारवाया करून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला. मगरमच्छ कॉलनी येथे वाहन क्र. एम एच १० सी आर ६४६० या वाहनावर कारवाई करून विक्रीकरिता वाहतूक होणारा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला किंमत २४,९०,४४०/-रु चा साठा व रु. ६,००,०००/-असा एकूण रु. ३०,९०,४४०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखु, पानमसाला व वाहन इत्यादी साठा सील करण्यात आला आहे व ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मिरज म्हैसाळ रोड येथे वाहन क्र. के ए १३ सी ८०७४ या वाहनावर कारवाई करून विक्रीकरिता वाहतूक होणारा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला किंमत ७६,९५,२००/- रु. चा साठा व रु. १६,००,०००/- असा एकूण रु. ९२,९५,२००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, पानमसाला व वाहन इत्यादी साठा सील करण्यात आला आहे व ७ आरोपींविरुद्ध ( खरेदीदार, वाहतूकदार, पुरवठादार, उत्पादक) गुन्हा दाखल करण्यात आला. तीन दिवसात केलेल्या धडक कारवायामध्ये रु. १ कोटी, २३ लाख, ८५ हजार ,६४० रूपयांचा प्रतिबंधित अन्न साठा जप्त करून १२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासन, सांगली येथील अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार, धनंजय आघाव, सुमित खांडेकर, तुषार घुमरे, प्रणव जिनगर यांनी सक्रिय सहभाग घेतला. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा