गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२६

‘लोकसंवाद-२०२६’ जतमध्ये तहसीलदारांनी साधला गणेशभक्तांशी संवाद महिला सक्षमीकरण, सायबर सुरक्षेबाबत केले मार्गदर्शन

सांगली, दि. 23 (जि. मा. का.) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सांगलीच्या व जत तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी जत शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणेशभक्त, महिला व नागरिकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. यावेळी महिला सक्षमीकरण, सामाजिक समस्या तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचावाबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी शिवनगर गणेशोत्सव मंडळ तसेच सुनेत्रा कॉलनी गणेशोत्सव मंडळास भेट दिली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या नागरिकांशी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधत शासनाच्या लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती दिली. ‘लक्ष्मी मुक्ती’सह महिलांच्या सन्मानाशी संबंधित उपक्रमांची माहिती देताना तहसीलदार प्रवीण धानोरकर म्हणाले, महिलांना कुटुंबातील मालमत्तेमध्ये योग्य हक्क व सहभाग मिळणे आवश्यक आहे. मालमत्तेमध्ये सहभागीदार करण्यासाठी लक्ष्मीमुक्ती योजना असून, यातून महिलांच्या हक्कांचे संरक्षण होणार आहे. यातून कुटुंबातील महिला आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम होतील. महिलांच्या हक्कासाठी असणाऱ्या विविध कायदेशीर तरतुदींची माहिती देऊन तहसीलदार प्रवीण धानोरकर म्हणाले, हुंडामुक्ती, कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध कायदेशीर उपाययोजना याबाबत महिलांनी जागरूक राहावे. आपल्या हक्कांबाबत सजग राहावे. कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी असलेल्या विशाखा समितीच्या तरतुदींबाबत माहिती देत, महिलांनी कोणत्याही प्रकारच्या अन्याय सहन करू नये, असे ते म्हणाले. तहसीलदार प्रवीण धानोरकर म्हणाले, सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करताना मोबाईलवर येणारा OTP, बँक खात्याची माहिती, एटीएम/डेबिट-क्रेडिट कार्ड तपशील, पासवर्ड किंवा अन्य गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. अशा बाबी टाळण्यासाठी अनोळखी लिंकवर क्लिक करणे, संशयास्पद फोन अथवा संदेशांना प्रतिसाद देणे टाळावे आणि फसवणूक झाल्यास तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असेही ते म्हणाले. शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार आवश्यक अर्ज व प्रक्रिया पूर्ण करता येते, याबाबत नागरिकांनी संबंधित महसूल कार्यालयाकडून अधिकृत माहिती घ्यावी, असे आवाहन करून तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन, त्यांचे संरक्षण आणि समान संधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्व विषद केले. तसेच, युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. या संवादावेळी सहाय्यक महसूल अधिकारी राहूल कोळी, ग्राम महसूल अधिकारी विलास सूर्यवंशी, महसूल सेवक सुभाष कोळी यांच्यासह सुनेत्रा कॉलनी गणेशोत्सव मंडळ येथे गणेश मंडळाचे प्रमोद संकपाळ, अमित कोळी, संभाजी कोडग तसेच शिवनगर गणेशोत्सव मंडळ येथे चंद्रकांत कुंभार, सुनील गिरी गोसावी, अनिल देशपांडे, अशोक स्वामी, नंदकुमार साळुंखे, सुरेश साळुंखे, प्रशांत साळुंखे, जगदीश हिरेमठ, प्रशांत हिरेमठ तसेच गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा