गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२६

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत कडेगाव तहसीलदारांनी येतगावमध्ये साधला जनसंवाद

सांगली, दि. 23 (जि. मा. का.) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सांगली व कडेगाव तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांनी कडेगाव तालुक्यातील येतगाव येथील सन्मित्र गणेश मंडळास भेट देऊन गणेशभक्त व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल व्ही. यू. मुंडे, सर्फराज मुल्ला, वरिष्ठ पोलीस कॉन्स्टेबल सागर निकम यांच्यासह श्रीरंग उथळे, धनाजी पाटील, दशरथ पाटील, दत्तात्रय सूर्यवंशी, मुजबू अत्तार यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या नागरिकांशी संवाद साधताना तहसीलदार अजित शेलार यांनी महसूल विभागाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन केले. नागरिकांनी महसूल विभागाशी संबंधित कामकाज, शासकीय सेवा व योजनांबाबत विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. अधिक माहितीसाठी तहसील कार्यालयाशी संपर्क करण्याबाबतही त्यांनी आवाहन केले. यावेळी महसूल विभागाचे कामकाज व देण्यात येणाऱ्या विविध सेवांची माहिती देत नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस कॉन्स्टेबल सागर निकम यांनी सायबर सुरक्षेबाबतही नागरिकांना विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रकार लक्षात घेता नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले. मोबाईलवर येणारा OTP, बँकविषयक माहिती, पासवर्ड किंवा अन्य गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये, असे त्यांनी सांगितले. अनोळखी व्यक्तींकडून येणारे फोन, संदेश किंवा लिंक यांना प्रतिसाद देताना काळजी घ्यावी. ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फसवणूक झाल्यास विलंब न करता सायबर सेलशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत ‘डायल 112’ सेवेचा वापर कसा करावा, याबाबतही वरिष्ठ पोलीस कॉन्स्टेबल सागर निकम यांनी उपस्थितांना माहिती दिली. पोलीस मदत, आपत्कालीन परिस्थिती तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रसंगी तातडीने मदत मिळविण्यासाठी या सेवेचा उपयोग करता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सन्मित्र गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा