गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२६
लोकसंवाद-२०२६ उपक्रमांतर्गत सांगलीतील विविध मंडळांत सायबर सुरक्षा, महिला सुरक्षिततेबाबत जनजागृती
सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सांगलीच्या वतीने ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत सांगली शहरातील बाळगोपाळ गणेशोत्सव मंडळ, मास्टर दीनानाथ चौक गणेशोत्सव मंडळ, गोल्डन क्लब गणेशोत्सव मंडळ, शांतीनगर, खणभाग येथील शांती कला क्रीडा सांस्कृतिक गणेश मंडळ येथे सायबर सुरक्षा, पोस्को कायदा, बालविवाह प्रतिबंध तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या विविध कायद्यांबाबत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत असल्याने शासनाच्या विविध योजना, कायदे, सामाजिक उपक्रम आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याबरोबरच महिला व बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींची माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्या समवेत महिला व बाल विकास विभागाच्या रोहिणी वाघमारे व वैशाली कांबळे, पोलीस सायबर विभागाचे विजय पाटणकर व कॅप्टन साहेब गौंटवाडे, समाज कल्याण विभागाच्या संयोगिता हेरकळ यांच्यासह संबंधित गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व गणेशभक्त उपस्थित होते.
सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना विजय पाटणकर म्हणाले, मोबाईल फोन, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. मोबाईलवर अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या लिंक, संदेश, फोन कॉल, बनावट ऑफर, विविध प्रकारच्या आमिषांना बळी पडून आर्थिक अथवा वैयक्तिक माहितीची हानी होऊ शकते. त्यामुळे कोणतीही अनोळखी लिंक उघडण्यापूर्वी तिची खातरजमा करावी. एपीके फाईल ओपन करू नये. अनोळखी व्यक्तिंना वैयक्तिक अथवा बँक खात्याशी संबंधित माहिती देऊ नये, तसेच पासवर्ड, ओटीपी, एटीएम/डेबिट-क्रेडिट कार्डशी संबंधित माहिती कोणासही सांगू नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सोशल मीडिया वापरताना गोपनीयता सेटिंग्जचा योग्य वापर करणे, संशयास्पद संदेश किंवा फोन कॉलला प्रतिसाद न देणे आणि सायबर फसवणूक झाल्यास तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. तसेच, बालकांच्या हाती मोबाईल फोन देताना आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी. बालकांना ऑनलाईन शॉपिंगसंदर्भात माहिती देऊ नये, असे ते म्हणाले. कोणताही अडचण आल्यास प्रथम 1930 क्रमांकावर फोन करावा आणि सायबर शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बालकांच्या संरक्षणासाठी कायद्याची माहिती
वैशाली कांबळे यांनी बालकांचे लैंगिक शोषण व अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी असलेल्या लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO) बाबतही उपस्थितांना माहिती दिली. बालकांशी संबंधित कोणतीही संशयास्पद घटना निदर्शनास आल्यास ती दुर्लक्षित न करता संबंधित यंत्रणेला माहिती देणे, बालकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे आणि त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.
रोहिणी वाघमारे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि बालविवाहामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्यांबाबतही मार्गदर्शन केले. बालविवाह रोखण्यासाठी पालक, नागरिक, सामाजिक संस्था आणि युवकांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन करण्यात आले. महिला व बालकांच्या संरक्षणासाठी 1098 हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा सकारात्मक उपयोग करून नागरिकांमध्ये सामाजिक विषयांबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमास गणेशभक्त व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा