सांगली, दि.
४, (जि.
मा. का.)
: पर्जन्यवृष्टी तसेच,
कोयना व वारणा धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग यामुळे कृष्णा, वारणा नदीतील पाण्याची
पातळी वाढत आहे. पूरपरिस्थितीवर प्रशासन नजर ठेवून असून संभाव्य कोणत्याही
आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. तरी नागरिकांनी घाबरून जावू नये,
प्रशासन आपल्या सोबत आहे, अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.
पूरपरिस्थितीच्या
अनुषंगाने आज सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मिरज व सांगली येथे विविध
ठिकाणी पूरपरिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर
गाडगीळ, महापौर संगीता खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, सांगली-मिरज-कुपवाड
महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात,
तहसिलदार शरद पाटील, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह पाटबंधारे,
कृषि व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सामाजिक
न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने नागरिक,
जनावरांचे स्थलांतर, चारा, पाणी व वैद्यकीय सुविधा याबाबत आवश्यक उपाययोजना
करण्यात आल्या आहेत. संभाव्य आपत्तीच्या वेळी आवश्यक उपाययोजनांसाठी राज्य शासन
आणि प्रशासन कटिबद्ध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी संबंधित
अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून जीवरक्षक दलास सर्व सोयी सुविधा
पुरविण्याचे तसेच सतर्क राहण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर संस्था, व्यक्ती यांनी
पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पूरपरिस्थितीच्या
अनुषंगाने केलेल्या उपाययोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.
00000


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा