शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२६

मुरघास व सुका चारा पुरवठ्यासाठी 25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : सन 2026-27 मध्ये सांगली जिल्ह्यात संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवल्यास जनावरांसाठी निर्माण होणाऱ्या चारा टंचाईवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार आणि आपत्कालिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाने नियोजन सुरू केले आहे. त्यानुसार जनावरांसाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या चारा छावण्या व चारा डेपोमध्ये मुरघास आणि सुका चारा उपलब्ध करून देण्यासाठी सेवाभावी संस्था, उत्पादक व पुरवठादार यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय जिल्हा उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. अटी व शर्ती - (1) चारा पुरवठा करण्यासाठीचे अर्ज मा. जिल्हाधिकारी, सांगली यांचे नावे करून हे अर्ज जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, कार्यालय सांगली, डॉ. आंबेडकर रोड, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय आवार, मिरज या कार्यालयात सादर करावेत. (2) चारा पुरवठा करताना भरलेल्या गाडीचे वजन काटा पावती व मोकळ्या झालेल्या गाडीचे वजन काटा पावती सादर करणे बंधनकारक राहील. (3) चारा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाडीची/वाहनाची सर्व अनुषंगिक कागदपत्रे (वाहन नोंदणी पत्र) सादर करणे बंधनकारक राहील. (4) चारा पुरवठा आदेश दिल्यानंतर तात्काळ दिलेल्या ठिकाणी चारा पुरवठा करणे आवश्यक आहे. (5) वाहतुकीचे दर हे गाडीच्या प्रकारानुसार व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी निर्धारित केलेल्या दरानुसार अनुज्ञेय असतील. (6) उक्त नमूद चारा निशुल्क दराने पुरवठादार/सेवाभावी संस्था/गोरक्षणासाठी कार्यरत संस्था तयार असल्यास त्यांनीसुद्धा आपली नावे व आपण पुरवठा करू इच्छिता अशा गावांची नावे कळवावीत. (7) शासन निर्णयानुसार मुरघासाची किंमत कमाल रुपये 8/- प्रति किलो व सुका चारा कमाल रुपये 12/- प्रति किलो (वाहतूक खर्च वगळून) एवढी निश्चित करण्यात आलेली आहे. (8) पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णय 30 ऑक्टोबर 2026 (E1869528) नुसार चाऱ्याची मानके व विविध घटकांची तपासणी शासनाने नमूद केलेल्या प्रयोगशाळेत करणे बंधनकारक राहील. अर्जाचा नमुना जिल्हाधिकारी सांगली यांच्या sangli.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सेवाभावी संस्था, उत्पादक, पुरवठादार यांनी आपले अर्ज दिनांक 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत बंद लिफाफ्यामध्ये जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, कार्यालय सांगली या कार्यालयास टपालाने अथवा समक्ष कार्यालयीन वेळेत सादर करण्याची दक्षता घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, कार्यालय सांगली या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा