शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२६
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी घेतला चारा लागवड नियोजनाचा आढावा
- रांजणी येथील आझोला उत्पादन प्रकल्पाची पाहणी
सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, रांजणी येथे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी भेट देऊन चारा लागवडीसाठी उपलब्ध क्षेत्राची पाहणी केली. यावेळी चारा लागवडीचे नियोजन, त्याची अंमलबजावणी तसेच पशुपालकांना चारा उपलब्ध करून देण्याबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. याचबरोबर प्रक्षेत्रावरील आझोला उत्पादन प्रकल्पाचीही त्यांनी पाहणी केली. तसेच, करोली टी येथील शेतकरी शंकर वसंत बर्गे यांच्या मुक्त संचार गोठा, अझोला, हायड्रोपोनिक युनिटला जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. यावेळी तहसीलदार अर्चना कापसे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे, प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. सचिन धडस यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सध्या जिल्ह्यात पुरेसा चारा आहे. मात्र, संभाव्य चारा टंचाईचा विचार करून दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रक्षेत्रावरील चारा लागवडीसाठी उपलब्ध असलेल्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून नियोजित कामांची माहिती घेतली.
आझोला उत्पादनातून पशुखाद्यावरील खर्चात बचत
प्रक्षेत्रावर राबविण्यात येत असलेल्या आझोला उत्पादन प्रकल्पाची जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी विशेष पाहणी केली. आझोला ही पाण्यावर वाढणारी हिरवी वनस्पती असून पशुधनासाठी पूरक व पौष्टिक चारा म्हणून तिचा उपयोग केला जातो. या वनस्पतीमध्ये साधारणतः २५ ते ३० टक्के प्रथिने असल्याने पशुधनाच्या आहारात तिचा समावेश उपयुक्त ठरतो.
आझोलाचा वापर शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी तसेच कोंबड्यांच्या खाद्यामध्ये केला जातो. पशुधनाच्या आहारात दररोज साधारणतः २०० ते २५० ग्रॅम आझोलाचा वापर केला जातो. आझोलामुळे पशुखाद्यातील पोषणमूल्य वाढण्यास मदत होते. तसेच नियमित पशुखाद्य व खुराकावरील खर्च कमी करण्यास हातभार लागतो. परिणामी पशुपालकांचा उत्पादन खर्च कमी होऊन आर्थिक बचतीस मदत होते.
या प्रक्षेत्रावर उत्पादित करण्यात येणारा आझोला परिसरातील पशुपालकांना प्रतिकिलो १५० रुपये दराने विक्री केला जातो. त्यामुळे स्थानिक पशुपालकांना पौष्टिक पूरक चारा उपलब्ध होत असून आझोला उत्पादनाचा लाभ घेण्याची संधी मिळत आहे. कमी जागेत आणि पाण्याच्या माध्यमातून उत्पादित करता येणाऱ्या या चाऱ्याच्या उपयुक्ततेबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.
लोकरीपासून विविध वस्तू निर्मिती करणाऱ्या युनिटची पाहणी
या भेटीदरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी प्रक्षेत्रावरील लोकरीपासून विविध वस्तू तयार करण्याच्या उत्पादन युनिटलाही भेट दिली. मेंढीपालनातून मिळणाऱ्या लोकरीवर प्रक्रिया करून त्यापासून विविध उपयोगी वस्तू तयार करण्याच्या कामाची त्यांनी पाहणी केली. या युनिटमधील उत्पादन प्रक्रिया, तयार करण्यात येणाऱ्या वस्तू आणि उपलब्ध सुविधांची माहिती यावेळी देण्यात आली.
खरशिंग येथे शेतकऱ्यांना वैरण बियाणांचे वाटप
दरम्यान, वैरण विकास कार्यक्रमांतर्गत खरशिंग येथे शेतकऱ्यांना वैरण पिकांच्या बियाणांचे वाटप करण्यात आले. दुष्काळी परिस्थितीचा विचार करता शेतकऱ्यांनी उपलब्ध क्षेत्रामध्ये वैरण पिकांची लागवड करून पशुधनासाठी चारा उत्पादन वाढवावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. वैरण बियाणांच्या वाटपामुळे शेतकऱ्यांना चारा लागवडीस प्रोत्साहन मिळणार असून भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी मदत होणार आहे.
0000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा