गुरुवार, १६ जुलै, २०२६

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त सांगलीत कौशल्य, रोजगार व उद्योजकतेचा प्रेरणादायी सोहळा

सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली, CYDA, युथ एड फाउंडेशन (Skill4Change Program) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि LIAD Institute of Art & Design यांच्या विशेष सहकार्याने कौशल्य विकास, रोजगार आणि सर्वसमावेशक उद्योजकतेला चालना देणारा विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, समाजकल्याण निरीक्षक शीतल जाधव तसेच यशस्वी महिला उद्योजिका स्वप्नाली खांडेकर उपस्थित होत्या. यावेळी सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी यशस्वी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करून जागतिक युवा कौशल्य दिवस १५ जुलै २०२६ च्या यावर्षीच्या संकल्पनेमध्ये प्रामुख्याने एकत्रित विकास, शास्वत प्रगती आणि जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी युवा वर्गाला सक्षम करण्यासाठी सामायिक भविष्याकरिता कौशल्य या आधारावर आजच्या कार्यक्रमातील सहभागी महिलांनी सातत्य ठेऊन एकत्रित विकास व शास्वत प्रगती या मार्गाने उंच भरारी घेण्याचे आवाहन केले. युथ एड फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक प्रवीण पारसे यांनी संस्थेच्या Skill4Change उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, संस्थेमार्फत विविध हार्ड स्किल प्रशिक्षणांद्वारे ८४ महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण पूर्ण करून देण्यात आले आहे, तसेच १० महिलांचे रिक्षा चालक प्रशिक्षण देखील सुरू करण्यात आले आहे. कार्यक्रमात कौशल्य विकास व रोजगाराच्या संधी या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी बदलत्या रोजगार बाजारपेठेतील संधी, कौशल्यांचे महत्त्व आणि उद्योजकतेचे वाढते महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक उद्योजकतेच्या दिशेने जिल्हा प्रशासन, CYDA आणि युथ एड फाउंडेशन यांचे संयुक्त प्रयत्न भविष्यातही अशाच प्रकारे सुरू राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रशिक्षणामुळे महिलांना पारंपरिक व्यवसायांच्या चौकटीबाहेर पडून स्वावलंबनाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. घर, कुटुंब आणि समाजातील पारंपरिक विचारसरणी व विरोधावर मात करत या महिला आज नवीन क्षेत्रात यशस्वीपणे पाऊल टाकत आहेत. त्यांनी आत्मविश्वास, कौशल्य आणि जिद्दीच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून इतर महिलांसाठीही प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या धाडसी वाटचालीचे कौतुक करून अशा उपक्रमांची समाजाला मोठी गरज असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे CYDA संस्थेमार्फत LGBTQI समुदायासाठी उद्योजकता बीज भांडवल (Entrepreneurship Seed Fund) वितरण करण्यात आले. या माध्यमातून १० LGBTQI उद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच विस्तार करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले. यावेळी संबंधित लाभार्थ्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाबरोबरच मिळालेल्या सहाय्यामुळे व्यवसाय उभारणीस मिळालेल्या बळाविषयी मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणार्थी आणि लाभार्थ्यांनी आपल्या यशोगाथा सांगताना कौशल्य प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढला, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आणि स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. यावेळी यशस्वी प्रशिक्षणार्थींना हार्ड स्किल प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विशेषतः विविध कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या महिला प्रशिक्षणार्थींचा तसेच यशोदा भालेराव, स्वाती आवळे, अंबिका इंगळे, प्रज्ञा साबळे, रेश्मा सरोदे, ज्योती कांबळे, कांचन सरोदे, मनीषा कांबळे,रोहिणी सरोदे,अधिका फाळके या १० महिला रिक्षा चालक प्रशिक्षणार्थींचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच आपल्या कर्तृत्वाच्या बळावर यशस्वी उद्योजिका म्हणून नाव कमावलेल्या शमीम मुल्ला यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या यशस्वी उद्योजकीय प्रवासाचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन वासंती कांबळे यांनी केले, तर आभार राजश्री व्हनकडे यांनी मानले. कार्यक्रमास CYDA व यूथएड फाउंडेशनचे इम्तियाज हकीम (LGBTQI+), प्लेसमेंट ऑफिसर अच्युतराव सनगर, अश्विनी जाधव, प्रशिक्षणार्थी, सहकारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा