बुधवार, २२ जुलै, २०२६

विविध योजनांच्या लाभातून समाज सुखी राहण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

- सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उद्घाटन सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : नागरिकांच्या रोजच्या जीवनात लागणारे विविध दाखले, विविध योजनांचा लाभ तात्काळ व वेळीच मिळावा या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन केले आहे. अशा प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून हजारो नागरिकांना फायदा घेता येतो. प्रशासनाने विविध योजनांचा लाभ नागरिकांना देऊन समाज सुखी कसा राहील यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून 282 सांगली विधानसभा मतदारसंघात मल्हार हॉल, बालाजी मिल रोड, शिवाजीनगर, सांगली येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, उपजिल्हाधिकारी विजया यादव, मिरज उपविभागीय अधिकारी विशाल यादव, मुद्रांक जिल्हाधिकारी प्रमोद कदम, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या समाजकल्याण समिती सभापती गीता पवार, सांगली अप्पर तहसिलदार अश्विनी वरूटे, माजी आमदार दिनकर पाटील आदी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहानुसार लोकांची सेवा करणारा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे. शिबीरात लावण्यात आलेल्या विविध विभागांच्या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना आवश्यक असणारे दाखले व अन्य लाभ घ्यावेत. सुविधा केंद्र, शिबीरांच्या माध्यमातून जास्तीत जास्त दाखले देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नागरिकांनी त्यांना आवश्यक असलेले दाखले तसेच मुलांचे जातीचे दाखले शाळेत असतानाच विहीत वेळेत काढून घ्यावेत. शेतकरी व महिला हे दोन घटक मजबूत झाले तर समाज मजबूत होईल यासाठी शेतकरी व महिलांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आमदार सुधीर गाडगीळ व सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या समाजकल्याण समिती सभापती गीता पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर हा सतत चालणारा कार्यक्रम आहे. या अभियानाचा उद्देश महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करून शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा आहे. महसूल विभाग नियमित सेवा देत असतो. पाणंद रस्ते, मोजणी, रेखांकन, तुकडेबंदी आदी विविध प्रकरणे निर्गत करण्यात येत आहेत. या शिबीरामध्ये विविध विभागांचे स्टॉल लावले असून याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात जातीचे दाखले वाटप, आधार केंद्राच्या किटचे वाटप, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय व मुद्रांक नोंदणी विभागाकडील लाभाचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आले. या शिबीरात विविध विभागांचे 14 स्टॉल लावण्यात आले असून या स्टॉलना पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी भेट देवून नागरिकांना देण्यात येणाऱ्या लाभांबाबत माहिती जाणून घेतली. प्रास्ताविकात सांगली अप्पर तहसिलदार अश्विनी वरूटे यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद करून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या अभियानामध्ये महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र वाटप, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद, शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी फी माफी, लोकसेवा हक्क कायद्यानुसार विविध दाखल्यांचे वितरण, भूसंपादन प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके तयार करून दप्तर अद्ययावत करणे, सातबारा मधील त्रुटींची दुरूस्ती करून दूरूस्त सातबारा देणे, जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत वारस नोंदी, पात्र अ.पा.क. नोंदी कमी करणे, ए.कु.में. नोंदी कमी करणे, नजर गहाण इत्यादी नोंदीबाबत कार्यवाही, डिजीटल सातबाऱ्याच्या कायदेशीर वैधतेबाबत जनजागृती करणे, अकृषक तरतुदीतील सुधारणांबाबत मार्गदर्शन करणे, ई-मोजणी सेवा, ॲग्रीस्टॅक नोंदणी, पी. एम. योजनेशी संबंधित कामे इत्यादी विविध विभागांकडून लाभ देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास विविध विभांगाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा