बुधवार, २९ जुलै, २०२६

सांगलीत गुरूवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळावा

- 19 पेक्षा अधिक नामांकित आस्थापना; 500 हून अधिक पदांसाठी थेट भरती सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळावा 2026 चे आयोजन गुरुवार, दि. 30 जुलै 2026 रोजी श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, मध्यवर्ती बसस्थानकाजवळ, सांगली येथे सकाळी 10 वाजल्यापासून करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप ऑनलाइन नोंदणी केलेली नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह थेट मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा. सांगली जिल्हा व परिसरातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोजगार मेळावा समन्वय समितीच्या अध्यक्ष काव्यश्री नलावडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. या रोजगार मेळाव्यात 19 पेक्षा अधिक नामांकित आस्थापना व कंपन्या सहभागी होणार असून 500 हून अधिक रिक्त पदांसाठी थेट भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी, आयटी/बीपीओ, बँकिंग व फायनान्स सर्व्हिसेस, सेल्स अँड मार्केटिंग तसेच इतर विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी या मेळाव्यात उपलब्ध होणार आहेत. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर पदवीधारक तसेच तांत्रिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध पदांसाठी थेट वॉक-इन मुलाखती देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. उमेदवारांना नियोक्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून जागेवरच प्राथमिक निवड होण्याची संधी मिळणार आहे. रोजगार मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी रेझ्युम/बायोडाटा (तीन प्रती), शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती, आधार कार्ड तसेच पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत आणावे. मेळाव्यात सहभाग पूर्णपणे विनामूल्य असून कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. अधिक माहितीसाठी (0233) 2990383 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा