गुरुवार, ३० जुलै, २०२६

कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे - जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

सांगली, दि. 30 (जि. मा. का.) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-2026 चा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक (फार्मर आयडी) नोंदणी, आधार प्रमाणीकरण तसेच बँकेकडून आवश्यक असलेली प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या अनुषंगाने राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा उपनिबंधक सुनिल चव्हाण, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रवीण शिंदे यांच्यासह राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवस्थापक, प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, योजनेच्या संगणकीय प्रणालीवर बँकांकडून थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली असून त्याचे संगणकीय संस्करण सुरू आहे. या प्रक्रियेनंतर योजना निकषानुसार पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी 25 जुलै 2026 रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा, विकास सोसायट्या, ग्रामपंचायती आणि गाव चावडीच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 38 हजार 410 शेतकरी पात्र ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 56 हजार 962 आणि राष्ट्रीयकृत व इतर बँकांची 12 हजार 99 अशी एकूण 68 हजार 981 कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 34 हजार 547 आणि राष्ट्रीयकृत व इतर बँकांचे 3 हजार 863 असे एकूण 38 हजार 410 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी पोर्टलवर प्राप्त झाली आहे या पात्र शेतकऱ्यांपैकी 23 हजार 512 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 21842 आणि राष्ट्रीयकृत व इतर बँकांचे 1670 शेतकरी आहेत. मात्र, अद्याप 14898 पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी असल्याने संबंधितांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 12 हजार 385 शेतकऱ्यांकडे अद्याप फार्मर आयडी उपलब्ध नाही. यामध्ये आटपाडी तालुक्यातील 687, खानापूर 358, मिरज 1 हजार 692, वाळवा 1 हजार 133, तासगाव 1 हजार 103, कवठेमहांकाळ 1 हजार 679, जत 3 हजार 865, पलूस 520, शिराळा 750 आणि कडेगाव 595 शेतकऱ्यांचा समावेश आहे. योजनेचा लाभ वेळेत मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक असल्यास संबंधित बँक, महा-ई-सेवा केंद्र, सीएससी केंद्र, ग्रामपंचायत तसेच कृषी व सहकार विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून ॲग्रीस्टॅक नोंदणी, आधार प्रमाणीकरण आणि इतर आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा