गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२६
चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाचे प्रभावी नियोजन, पशुपालकांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना
दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने संभाव्य चारा टंचाईच्या परिस्थितीवर प्रभावीपणे मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध स्तरांवर नियोजन करण्यात येत आहे. चारा बियाणे वाटप, सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रात चारा उत्पादन, शासकीय जमिनीवर चारा पिकांची लागवड, मुरघास निर्मिती, ऊस पाचट व इतर पीक अवशेषांचा चारा म्हणून वापर अशा बहुआयामी उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. याशिवाय पशुपालकांमध्ये चारा उत्पादनाबाबत जनजागृती, जनावरांचे लसीकरण आणि आरोग्य तपासणी शिबिरांचेही नियोजन करण्यात येत आहे.
चारा बियाणे वाटपासाठी अतिरीक्त निधी
चारा उत्पादनाला चालना देण्यासाठी मका चारा बियाणे वाटपाकरिता 2 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला असून, 66.721 मे. टन बियाणे उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात एकूण 5415 लाभार्थींना चारा बियाणे वाटप करण्याचे नियोजन आहे. यामधून 118770 मे. टन चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. आजअखेर २७.५३० मे. टन बियाणे पशुपालकांना वाटप करण्यात आले आहे.
तसेच जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२०२७ अंतर्गत चारा बियाणे वाटपासाठी ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यातून 90357 किलो चारा बियाणे 18 हजार 967 लाभार्थ्यांना चारा बियाणे वाटप करण्यात आले असून, 4 हजार 873 हेक्टर क्षेत्रावर चारा लागवड करण्यात आली आहे. या लागवडीतून सुमारे 455 मे. टन हिरवा चारा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे.
सिंचन सुविधा असलेल्या क्षेत्रात चारा उत्पादन
जिल्ह्यातील १२ हजार १८ शेतकऱ्यांची प्राथमिक माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यापैकी 8 हजार 672 शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहे. या शेतकऱ्यांच्या रब्बी व उन्हाळी हंगामातील क्षेत्राचा चारा उत्पादनासाठी उपयोग करण्याचे नियोजन आहे. यासाठी 8286.54 एकर जमीन उपलब्ध आहे. उपलब्ध पाणी आणि जमिनीचा योग्य वापर करून हिरव्या चाऱ्याचे उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.
मुरघास निर्मितीतून चारा साठवणुकीला प्रोत्साहन
हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हंगामानुसार बदलत असल्याने भविष्यातील गरज लक्षात घेऊन मुरघास निर्मितीवरही भर देण्यात येत आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत तयार झालेले २ प्रकल्प व खाजगी ६ मुरघास (एनएलएम) प्रकल्पांच्या माध्यमातून सुमारे ८०० मे. टन चारा पुरवठा होऊ शकतो. मुरघासामुळे उपलब्ध हिरवा चारा साठवून ठेवणे आणि गरजेच्या काळात त्याचा वापर करणे शक्य होणार आहे.
शासकीय प्रक्षेत्रांवर चारा लागवड
पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या रांजणी प्रक्षेत्रावर 60 हेक्टर जिराईत जमिनीवर चारा पिकांची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय पाणी उपलब्ध झाल्यास अतिरीक्त 40 हेक्टर क्षेत्र चारा लागवडीसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच जत येथील वळुमाता पशुपैदास प्रक्षेत्रावर 30 हेक्टर क्षेत्रात चारा पिकांची लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. या दोन्ही प्रक्षेत्रांवरील चारा उत्पादन वाढविण्यासाठी सीएसआर निधीतून आर्थिक तरतुदीचे नियोजन असून, त्यातून सुमारे ५ हजार मे. टन चारा उपलब्ध होऊ शकतो.
शासकीय जमिनींचा चारा उत्पादनासाठी वापर
जिल्ह्यातील विविध ठिकाणी कृषी व वन विभागाच्या उपलब्ध शासकीय जमिनींचा उपयोग चारा लागवडीसाठी करण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच विकसित भारत जी राम जी योजनेंतर्गत जिल्ह्यातील उपलब्ध गाळपेरा क्षेत्रावर चारा लागवड करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. उपलब्ध जमिनीचा प्रभावी वापर करून चारा उत्पादनाचे क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न आहे.
ऊस वाडे आणि पीक अवशेषांतूनही चारा उपलब्धतेचे नियोजन
जिल्ह्यात १ लाख ४२ हजार २०१ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली आहे. या क्षेत्रातून सुमारे ८ लाख ५३ हजार २०६ मे. टन उसाचे वाडे उपलब्ध होऊ शकतात. ऊस तोडणी मशीनऐवजी मजुरांमार्फत केल्यास जमिनीवर उसाचे वाडे उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यामुळे ऊस वाड्यांचा जनावरांसाठी चारा म्हणून वापर करता येईल. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी साखर कारखानदारांशी बैठक घेऊन आवाहन केले आहे.
याशिवाय वनक्षेत्रातून ३७ हजार ९३० मे. टन आणि गायरान क्षेत्रातून ५ हजार मे. टन चारा उपलब्ध होऊ शकतो. इतर पिकांच्या अवशेषांमधून (Crop Residue) देखील मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पारंपरिक चारा उत्पादनासोबतच उपलब्ध नैसर्गिक व कृषी स्रोतांचा उपयोग करण्यावर भर देण्यात येत आहे. इतर पिकांतून 811408 मे. टन चारा उपलब्ध होऊ शकतो.
चारा साक्षरता आणि पशुआरोग्यालाही प्राधान्य
चारा टंचाईच्या काळात उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर करणे, पौष्टिक चारा तयार करणे आणि चारा उत्पादनाचे पर्यायी मार्ग पशुपालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये चारा पीक लागवड, हायड्रोफोनिक पद्धतीने चारा उत्पादन, निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविणे, अझोला उत्पादन आदि बाबींचा समावेश आहे. जिल्ह्यात चारा साक्षरता अभियानाच्या माध्यमातून पशुपालकांमध्ये या उपाययोजनांबाबत जागृती करण्यात येत आहे.
चारा उपलब्धतेसोबतच जनावरांचे आरोग्य जपण्यावरही भर देण्यात येत आहे. जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून, त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे.
अशा प्रकारे दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध साधनसंपत्तीचा प्रभावी वापर करून चारा उत्पादन वाढविणे आणि संभाव्य चारा टंचाईच्या काळात पशुपालकांना दिलासा देणे यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी नियोजन केले आहे.
संप्रदा बीडकर
जिल्हा माहिती अधिकारी, सांगली
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा