सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२६

‘ओटीएस’ यादीमध्ये जिल्ह्यातील 7 हजार 946 शेतकऱ्यांचा समावेश दोन लाखांवरील कर्जमुक्तीसाठी एकवेळ परतफेड प्रक्रिया सुरू

सांगली, दि. 23 (जि. मा. का.) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत एकवेळ समझोता (ओटीएस) अंतर्गत सांगली जिल्ह्यातील पात्र 7 हजार 946 लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्जाच्या २ लाखांवरील कर्जाची रक्कम भरावयाची अंतिम मुदत दि. ३१ मार्च २०२७ पर्यंत राहील, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकवेळ समझोता अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची २ लाखांवरील शेतकऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम बँकेत भरल्यानंतर २ लाखाचा कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. बँकांकडील माहितीचे संकलन करून दि. २० नोव्हेंबर रोजी सांगली जिल्ह्यातील 7946 पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणिकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यापैकी जिल्हा बँकेचे 6262 शेतकरी व राष्ट्रीयकृत बँकांचे 1684 शेतकरी पात्र आहेत.लाभार्थ्यांची यादी बँक शाखा, विकास संस्था व ग्रामपंचायतीमध्ये पाहायला मिळणार आहे. दरम्यान, केलेल्या यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, गाव, विशिष्ट क्रमांक, बँक कर्जखाते तपशील, दि. ३१ मार्च २०२६ अखेरच्या थकबाकीची रक्कम, एकवेळ समझोता प्रमाणे थकबाकीची रक्कम, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम व शासनामार्फत देण्यात येणाऱ्या लाभाची रक्कम नमूद केलेली असणार आहे. शेतकऱ्यांनी प्रसिद्ध यादीतील तपशील तपासून त्यांच्या हिश्श्याची २ लाखांवरील रक्कम संबंधित बँकेत भरणा करावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्जखाते एकाच बँकेत आहे अशा शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत कर्जखात्यात भरणा करावी. ज्या शेतकऱ्यांची एकापेक्षा जास्त कर्जखाती आहेत अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम त्यांच्या कोणत्याही कर्जखात्यात भरण्याची सुविधा आहे. मात्र ओटीएस योजनेंप्रमाणे बँकेस देय असलेल्या रकमेपेक्षा जास्तची रक्कम त्या खात्यात भरू नये. शेतकऱ्याने २ लाखांवरील रक्कम संबंधित बँकेत भरल्यानंतर बँकेमार्फत ही माहिती दर शुक्रवारी पोर्टलवर अपलोड केली जाईल व शेतकऱ्यास कळविले जाईल. अशा शेतकऱ्याच्या थकबाकीचे अद्ययावतिकरण झाल्यानंतर तीन दिवसांनंतर संबंधित शेतकऱ्यासाठी आधार प्रमाणिकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेच्या निकषानुसार अशा शेतकऱ्यांसाठी ओटीपीद्वारे नोंदणी करणे आवश्यक असून ज्या शेतकऱ्यांनी ओटीपीद्वारे नोंदणी केलेली आहे व आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेले आहे अशा शेतकऱ्यांना २ लाख कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या याद्या यापुढेही प्रसिद्ध करण्यात येतील. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा