सोमवार, २८ सप्टेंबर, २०२६
सांगली अपर तहसील कार्यालयांतर्गत लोकअदालतीचा 136 नागरिकांना लाभ
सांगली, दि. 28 (जि. मा. का.) : ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालतीमध्ये अपर तहसीलदार सांगली यांचे न्यायालयात एकूण 25 प्रकरणे तडजोडीसाठी दाखल करण्यात आली होती. त्यापैकी एकूण 19 न्यायालयीन प्रकरणे एकमेकांच्या अर्जदार व जाबदार यांच्यामध्ये तडजोड होऊन निकाली काढण्यात आली आहेत. या तडजोडीमुळे एकूण 136 नागरिकांना याचा लाभ झाल्याची माहिती अपर तहसीलदार अश्विनी वरूटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार अपर तहसील कार्यालय सांगली येथे दिनांक 24 सप्टेंबर 2026 रोजी “महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. महसूल प्रशासनातील विविध अर्धन्यायिक न्यायालयातील तहसीलदार स्तरावर प्रलंबित असलेले जमिनीशी संबंधित दावे जलदगतीने आणि आपापसातील सहमतीने निकाली काढणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
लोक अदालतीमध्ये दोन्ही पक्षांच्या सहमतीने अंतिम आदेश पारित करण्यात आल्याने या प्रकरणांमध्ये पुढे वरिष्ठ न्यायालयात अपील होणार नाही. त्यामुळे शेतकरी व पक्षकारांमधील वर्षानुवर्षांचे वाद संपुष्टात येण्यास मदत झाली आहे. या प्रक्रियेमुळे महसूल अर्धन्यायिक यंत्रणेवरील ताण कमी होऊन प्रशासनाचा वेळ व खर्चाची बचत झाली आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा